हिवाळा आणि हेअर केअर

स्वप्ना साने
रविवार, 31 जानेवारी 2021

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...
स्वप्ना साने
 

हिवाळ्यात वातावरणात कोरडेपणा असतो. थंड आणि रूक्ष वारे असल्याने केस आणि त्वचा जास्तच कोरडी होते. त्वचा तर क्रीम आणि लोशन लावून सॉफ्ट होते, पण केसांना काय पोषण द्यावे हा प्रश्न पडतो. 

हिवाळ्यातही केस मऊ आणि चमकदार दिसण्यासाठी काही टिप्स :

  • ऑईल मसाज : नॉर्मल, ड्राय केसांना आठवड्यातून दोन वेळा कोमट तेलाने मसाज करावा. त्यासाठी खोबऱ्याचे तेल किंवा बदाम तेल घ्यावे. रात्री तेल लावून दुसऱ्या दिवशी शाम्पू करावा. ऑईली केसांना गरजेनुसार तेल लावावे, म्हणजे स्काल्प ड्राय असेल तर तेल लावावे. 
  • सौम्य शाम्पू :  केस धुवायला शक्यतो सौम्य हर्बल शाम्पू वापरावा. अर्थात शाम्पूची निवड तुमच्या हेअर टाइपनुसार करावी, म्हणजे केस डॅमेज होणार नाहीत. हेअर वॉश करताना कोमट पाणी वापरावे, गरम पाण्यामुळे केसातील नॅचरल ऑईल निघून जाते आणि केस जास्त ड्राय आणि निर्जीव दिसतात. 
  • डीप कंडिशनिंग : शाम्पू झाल्यावर कंडिशनर जरूर लावावे. त्यामुळे केसांना तेल आणि मॉयश्चरायझर दोन्हीचे पोषण मिळेल. पंधरा दिवसातून एकदा डीप कंडिशनिंग करावे. अति रूक्ष आणि कुरळे केस असतील, तर हेअर स्पा जरूर करावा. त्यामुळे केसांना भरपूर पोषण आणि हायड्रेशन मिळते. केस नरम, मुलायम आणि चमकदार दिसतात. 
  • हिटिंग प्रोसेस टाळावी : हेअर ड्रायरचा उपयोग टाळावा. कुठलीही हिटिंग प्रोसेस केसांवर करू नये; अगदीच आवश्यक असेल तर प्रॉपर केअर घेऊन करावे. हीट प्रोटेक्टिव्ह स्प्रे लावून आणि हेअर सिरम लावून करावे, म्हणजे केस कमी डॅमेज होतील. 
  • वूडन कोंब : केस विंचरायला वूडन कोंबचा वापर करावा किंवा चांगल्या क्वालिटीचा हेअर ब्रश वापरावा. प्लॅस्टिकच्या कंगव्यामुळे हेअर स्ट्रेण्ड डॅमेज होऊन स्प्लिट एंड तयार होऊ शकतात. 
  • तज्ज्ञांचा सल्ला : केसांवर स्ट्रेटनिंग, स्मूथनिंग, हेअर कलर, हायलाईट्स, अशी काही केमिकल प्रोसेस केली असेल, तर त्यासाठी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार केसांची काळजी जरूर घ्यावी.
  • मिश्र तेल : हिवाळ्यात केस तुटतात आणि हेअर फॉलही जास्त होतो. शिवाय कोंडाही होतो. त्यासाठी आवळा, माका आणि नीम तेलाचे समप्रमाणात मिश्रण करून मसाजसाठी वापरावे, फायदा होतो. 
  • हेअर मास्क : एक अंडे फेटून त्यात चार चमचे दही आणि थोडा लिंबाचा रस मिक्स करून हा पॅक केसांना अर्धा तास लावून ठेवावा. नंतर कोमट पाण्याने धुऊन नॉर्मल शाम्पू करावे. कोंडा तर कमी होतोच, शिवाय केसांना पोषण मिळून, ते चमकदार दिसतात. 
  •  योग्य आहार : या हेअर केअरबरोबरच तुमचा आहारही समतोल असावा. केसांसाठी पालेभाज्या, अंडी, प्रोटीन रिच प्रॉडक्ट्स आणि व्हिटॅमिन ‘सी’चा आहार आवश्यक आहे.

(लेखिका कॉम्सेटॉलॉजिस्ट आहेत.)

संबंधित बातम्या