ब्यूटिफुल कॉफी

स्वप्ना साने
सोमवार, 15 मार्च 2021

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...
स्वप्ना साने

कॉफी इज फुल ऑफ ब्यूटी! सकाळी गरम कॉफीचा मग बहुतेकांना दिवसभराची एनर्जी देतो; त्याचप्रमाणे त्वचेसाठी ही कॉफी एक फुल ब्यूटी टॉनिकही आहे.

कॉफीमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स असतात. ते त्वचेमधील फ्री रॅडिकल्स नष्ट करून, त्यामुळे होणारे डार्क स्पॉट्स, एजिंग आणि डलनेस नाहीसे करतात. फ्रेश कॉफी ग्राउंड किंवा वापरून झालेले कॉफी ग्राउंड्सपासून उत्तम बॉडी स्क्रब तयार करता येतो. या बॉडी स्क्रबने मृत त्वचा निघून जाते आणि काही प्रमाणात टॅन कमी होते. त्वचा तजेलदार होते. 

कॉफीमध्ये आढळून येणारा महत्त्वाचा घटक म्हणजे कॅफेन. स्किन सेल्युलाईटला कमी करण्यासाठी या कॅफेनचा उपयोग होतो. सेल्युलाईट हे बहुतांश वेळा वजन वाढल्यानंतर मांड्या आणि आर्म्सवर आढळून येतात. कॉफी स्क्रब नियमित वापरल्यानंतर ते सेल्युलाईट काही प्रमाणात कमी होते आणि त्वचा नितळ व सॉफ्ट होते. कॉफीमध्ये व्हिटॅमिन B-3 (किंवा नियासीन) असते. एका रिसर्च स्टडीनुसार, हे व्हिटॅमिन स्किन कॅन्सरपासून बचाव करू शकते. 

कॉफी केसांसाठीसुद्धा बहुपयोगी आहे. कॉफी ॲसिडिक असते आणि केसांचे pH देखील ॲसिडिक असते. कॉफी रिन्सने केस धुतल्यास pH बॅलन्स होऊन हेअर क्युटिकल फ्लॅट होतात. त्यामुळे केस चमकदार आणि मऊ होतात. केसांना ब्राउन कलर करण्यासाठी कॉफीचा उपयोग होऊ शकतो. स्ट्राँग ब्लॅक कॉफी तयार करून गार करून घ्यावी. हे पाणी केसांना लावून ३० मिनिटे ते तीन तास ठेवावे आणि नंतर साध्या पाण्याने केस धुवावेत. हवा तसा डार्क कलर मिळवण्यासाठी आठवड्यातून एकदा लावावे. 

क्विक रेसिपीज

  • बॉडी स्क्रब : अर्धा कप कॉफी ग्राउंड, अर्धा कप कोकोनट ऑईल आणि थोडी ब्राउन शुगर चांगली मिक्स करून हळुवार स्क्रबिंग करावे. डेड स्किन निघून त्वचा चमकदार आणि फ्रेश दिसेल.
  • डार्क सर्कलसाठी : एक चमचा कॉफी आणि एक चमचा ऑलिव्ह ऑईल, थोडेस पाणी घालून पेस्ट तयार करावी. डोळ्याखाली हळुवार पेस्ट लावावी, स्क्रब करू नये. १५ मिनिटांनी धुऊन घ्यावे. असे नियमित केल्यास नक्कीच फरक जाणवेल. 
  • हेअर रिन्स : एक लिटर पाणी घेऊन त्यात अर्धा कप कॉफी ग्राउंड्स उकळून घ्यावेत. नंतर गाळून गार करून या पाण्याने केस धुवावे किंवा कॉफी ग्राउंड्सने केस आणि स्कॅल्प चोळावा. स्कॅल्पवरची डेड स्किन निघून जाते, केस मऊ अन चमकदार होतात. 
  • फेस मास्क : फाइन ग्राउंड कॉफी आणि थोडासा मध, त्यात अर्धा चमचा बदाम तेल घालून मिक्स करावे. २० मिनिटे चेहऱ्याला हा मास्क लावून ठेवावा आणि गार पाण्याने धुऊन टाकावा. चेहरा टवटवीत होतो  आणि टॅन नाहीसे होते. 
  • सन बर्नसाठी ः सन बर्न झाले असल्यास, थंड कॉफी रिन्समध्ये टिशू पेपर डीप करून बर्न झालेल्या जागी ठेवावा. असे थोडा वेळ केल्यास लगेच आराम मिळेल आणि त्वचा लवकर हील होईल. 

(महत्त्वाचे ः तुम्हाला कुठल्याही प्रकारची ॲलर्जी असल्यास वरील उपाय करायच्या आधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

संबंधित बातम्या