बहुगुणी वाळा

स्वप्ना साने
मंगळवार, 27 एप्रिल 2021

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...
स्वप्ना साने

कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे संपूर्ण राज्यात निर्बंध आहेत आणि त्यात उन्हाळाही. गर्मीमुळे वैतागल्यासारखे होते. अशा वेळी घरीच राहूया आणि गर्मी व कोरोना दोन्हीवर मात करूया. उन्हाची तीव्रता कमी करण्यासाठी आणि आपल्या त्वचेला तजेलदार ठेवण्यासाठी एक बहुपयोगी वस्तू आहे, ज्याचे नाव आहे.. ‘वाळा’ किंवा ‘खस’. 

वाळ्याला इंग्रजीत ‘व्हेटिव्हर’ म्हणतात. उन्हाळ सुरू झाला की ठिकठिकाणी वाळा उपलब्ध असतो. बहुतेक वेळा याचा उपयोग प्यायच्या पाण्याच्या माठात टाकण्यासाठी होतो. वाळा घातलेले पाणी प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होऊन उन्हाळीचा त्रास पण कमी होतो.

 सौंदर्यासाठी खस अथवा वाळा फारच गुणकारी आहे. खस टोनर किंवा खस पॅक त्वचेला लावल्यास सन बर्नपासून आराम मिळतो आणि त्वचा लवकर हील होते. वाळ्यामध्ये त्वचेला संपूर्ण पोषण देण्याची क्षमता आहे. वाळा त्वचेचे pH बॅलन्स करून एका उत्तम टोनरचे काम करतो. शिवाय एकन, पिंपल्स किंवा काळे डाग असतील तर त्यावर उपचार म्हणूनही खस पॅक आणि खस इसेन्शियल ऑईलचा उपयोग होतो. वाळा हे त्वचेमधील कोशिकांच्या रिजनरेशनसाठी मदत करते. त्यात भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असल्यामुळे त्वचेमधील फ्री रॅडिकल्स नष्ट करून त्वचा सुदृढ आणि तजेलदार करते.

 वाळ्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता बरीच आहे. त्यामुळे हे एक उत्तम मॉइस्चराईझरचे काम करते. त्यामुळे ऑईल आणि वॉटरचे परफेक्ट बॅलन्स करून त्वचा ग्लोइंग आणि नॉनग्रीझी दिसते. एक उत्तम बॉडी स्क्रब म्हणून वाळ्याचा उपयोग होतो, यामुळे डेड स्किन रिमूव्ह होऊन त्वचा मऊ आणि टवटवीत दिसते. 

क्विक टिप्स

  •     सन बर्न झाल्यास चंदन पावडर आणि खस जल किंवा खस टोनर मिक्स करून हा पॅक १५ मिनिटे लावून ठेवावा. नंतर गार पाण्याने धुऊन घ्यावे. त्यावर खस टोनर स्प्रे करावा. त्वचा लगेच हील होईल. 
  •     चार-पाच थेंब खस इसेन्शियल ऑईल बदाम किंवा कोकोनट ऑईलमध्ये मिक्स करून चेहऱ्याला मसाज करावा. रोज रात्री हे तेल लावल्यास त्वचा चमकदार आणि हेल्दी दिसेल. एजिंग लाइन्स कमी दिसतील. 
  •  माठातील वाळा वापरून झाल्यावर फेकून न देता, त्याचा बॉडी स्क्रब म्हणून वापर करावा. आठवड्यातून एकदा किंवा दोनदा असे केल्यास संपूर्ण त्वचा सॉफ्ट आणि सिल्की होईल.
  •     एक लिटर पाणी चांगले उकळून घ्यावे, शक्य असल्यास मातीचे भांडे घ्यावे. पाणी उकळून निम्मे झाले की गॅस बंद करावा. नंतर त्यात थोडा वाळा घालून झाकण ठेवावे. पूर्णपणे गार झाल्यावर गाळून घ्यावे आणि त्यात दोन चमचे ग्लिसरीन घालावे. चांगले मिक्स करून स्प्रे बाटलीमध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावे. हे फेशियल मिस्ट दिवसातून दोन किंवा तीन वेळा चेहऱ्यावर स्प्रे करावे. त्वचा दिवसभर फ्रेश आणि ग्लोइंग दिसेल.

(महत्त्वाचे ः तुम्हाला कुठल्याही प्रकारची ॲलर्जी असल्यास वरील उपाय करायच्या आधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
 

संबंधित बातम्या