केसांचे स्प्लिट एंड
बोल्ड अँड ब्यूटिफुल
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...
स्वप्ना साने
काळेभोर, लांबसडक आणि चमकदार केस असणे, हे प्रत्येक तरुणीचे स्वप्न असते. पण हल्लीचे वातावरण, केमिकल एक्सपोजर, प्रदूषण, स्ट्रेस आणि पौष्टिक अन्नाची कमतरता या सगळ्याचा परिणाम केसांवर आणि त्वचेवर होतो. परिणामी, केस गळणे, ड्राय होणे, तुटणे, आणि स्प्लिट एंड होणे अशा समस्या उद्भवतात.
स्प्लिट एंड म्हणजे नेमके काय? तर केस भुरकट आणि ड्राय दिसायला लागतात. केसांचे टोक स्प्लिट झालेले दिसते आणि गाठी दिसतात. अशा केसांमध्ये गुंतापण खूप होतो आणि केस विंचरल्यावर ते तुटतात. जंक फूड, स्ट्राँग शाम्पूचा वापर हे यामागचे प्रमुख कारण अस् शकते. त्याशिवाय केसांवर वारंवार हिटिंग, कर्लिंग रॉड किंवा स्ट्रेटनरचा उपयोग; तसेच ओले केस टॉवेलने खूप घासून पुसणे आणि प्लॅस्टिकच्या कंगव्याने केस विंचरणे यामुळेही स्प्लिट एंड होतात.
उपाय
स्प्लिट एंडसाठी मुख्य उपाय म्हणजे, लक्षात येताच केस ट्रिम करावेत. तीन किंवा चार महिन्यांनी नियमित केस ट्रिम करावेत. होम मेड हेअर पॅक लावता येतील. अंड्याचा पिवळा भाग आणि दही चांगले फेटून केसांना लावावे (मुळाशी नाही लागले तरी चालेल) आणि एक तास कॅप घालून ठेवावी. नंतर कोमट पाण्याने केस धुवावेत. माइल्ड शाम्पू वापरला तरी चालेल. लगेच केस सॉफ्ट आणि स्मूथ झालेले जाणवतील. हॉट ऑईल ट्रीटमेंट तर आठवड्यातून एकदा किंवा दोनदा करावी. नारळाचे तेल कोमट करून त्याने केसांना मसाज करावा. टोकापासून स्कॅल्पपर्यंत तेल लावत जावे. यात रूट मसाज महत्त्वाचा नाहीये, तर हेअर लेंथला पोषण मिळणे महत्त्वाचे आहे. दुसऱ्या दिवशी माइल्ड शाम्पूने केस धुवावे. नारळाच्या तेलासारखेच, नारळाचे दूधपण केसांना खूप पोषण देते. त्यात भरपूर व्हिटॅमिन ‘ई’ असल्यामुळे केस रीहायड्रेट होतात. घरच्या घरी हेअर स्पाचा इफेक्ट मिळेल. नारळाचे दूध केसांना लावून दोन तास ठेवावे आणि हर्बल शाम्पूने केस धुवावेत.
या प्रोसेसमध्ये स्प्लिट एंड जात नाहीत, पण केस स्मूथ आणि चमकदार दिसतात.
आणखी एक घरगुती उपाय म्हणजे, फ्लॅट बिअरने केस रिन्स करावेत. मग एकदा सध्या पाण्याने करावेत. यामुळे केस तात्पुरते का होईना, सॉफ्ट आणि सिल्की दिसतात.
स्प्लिट एंड खूपच जास्त असतील, तर मात्र एखादा शॉर्ट हेअर कट करून घ्यावा आणि नंतर केसांची काळजी घ्यावी. आणि हो, काहीही करायच्या आधी ब्यूटी थेरपिस्टचा सल्ला नक्की घ्यावा.
क्विक टिप्स
- कधीही ओले केस विंचरायचे नाहीत, त्यामुळे केस तुटतात आणि स्प्लिट एंड होऊ शकतात. केस विंचरायला नेहमी लाकडी कंगवा वापरावा.
- शाम्पू नेहमी माइल्ड असावा आणि त्याआधी ऑईल मसाज नक्की करावा.
- केस धुवायला कधीही खूप गरम पाण्याचा वापर करायचा नाही. नेहमी गार पाणी किंवा अगदी थंडी असेल तर कोमट पाण्याने केस धुवावेत. गरम पाण्यामुळे केसातील नॅचरल ऑईल आणि मॉइस्चर निघून जाते.
- केस खूपच ड्राय आणि फ्रिझी असतील तर शाम्पू केल्यावर फ्रिझ कंट्रोल प्रोटीन कंडिशनर लावावे. ते नसेल तर स्वीट अलमंड ऑईलचे काही थेंब ओल्या केसांना मिड लेंथपासून खाली लावावे.
- केस नॅचरल वाळू द्यावेत.
- हिटिंग आणि स्टॅयलिंग टूल्सचा कमीत कमी वापर करावा.