परफेक्ट पाऊटसाठी...!

स्वप्ना साने
सोमवार, 5 जुलै 2021

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...

हल्ली मुली, महिला सेल्फी काढतात, तेव्हा नकळत आपल्या ओठांचा चंबू करतात. यालाच म्हणतात ‘पाऊट’. हा पाऊट परफेक्ट असावा असे प्रत्येकाला वाटत असते. परफेक्ट पाऊटसाठी ओठांचा शेपदेखील परफेक्ट हवा असतो. म्हणजेच, वेल बॅलन्स्ड लिप्स, वरचा ओठ आणि खालचा ओठ दोन्ही समांतर आणि मध्यम आकाराचे. वरच्या ओठाचा धनुष्यासारखा आकार असावा. याला क्युपिड बोपण म्हणतात. जितका तो रेखीव, तितका त्या ओठांचा पाऊट परफेक्ट!

सर्वांचेच ओठ सारख्या शेपचे नसतात. कोणाचे मोठे आणि बोल्ड असतात, तर कोणाचे नाजूक पाकळ्यांसारखे. कोणाचा वरचा ओठ मोठा असतो, तर कोणाचा खालचा ओठ मोठा. कोणाचे ओठ राऊंड असतात, तर कोणाचे जास्त आडवे आणि बारीक. 

परफेक्ट पाऊटसाठी काय करावे?

मार्केटमध्ये निरनिराळे लिप मेकअप प्रॉडक्ट्स आणि लिप केअर प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत; लिप बाम, लिप स्क्रब, लिप लायनर, लिपस्टिक, लिप ग्लॉस, लिक्विड लिपस्टिक आणि इतर बरेच लिप केअर प्रॉडक्ट्स.  

परफेक्ट पाऊटसाठी, लिप लायनरने ओठांना हवा तसा आकार देऊन नंतर त्यात लिपस्टिक फिल करावी. उदाहरणार्थ, तुमचा वरचा ओठ बारीक व खालचा ओठ जाड असेल आणि तुम्हाला ‘फुल्लर लिप्स’ हवे असतील, तर लिप लायनरने वरच्या ओठाला लागून, थोडी बाहेरच्या बाजूने आऊटलाइन काढावी, आणि खालचा वरचा ओठ समान दिसेल हे बघून लिपस्टिक लावावी. मात्र हे करत असताना काळजी घ्यावी, की नॅचरल आउटलाइनला लागून किंवा किंचित दुरून लिप लायनरची आउटलाइन काढावी. खूप जास्त गॅप असू नये, नाहीतर ते फार वाईट दिसते. जाड ओठ असतील, तर आऊटलाइन ओठांच्या नॅचरल लाइनच्या आतून घ्यावी. फिनिशिंग टच देताना ओठांच्या बाजूला फाउंडेशन अथवा कन्सिलर लावावे आणि कॉम्पॅक्ट पावडरने ते सेट करावे. असे केल्याने लिप शेप परफेक्ट दिसतो आणि लिपस्टिक ब्लीड होत नाही. 

याला आर्टिस्टिक मेकअप म्हणतात. आर्टिस्टिक लिप मेकअप करायचा असेल तर चेहऱ्यावर थोडा बेस मेकअपदेखील करावा. म्हणजे लिप मेकअप नॅचरल दिसतो.

लिप केअर टिप्स

  • परफेक्ट पाऊटसाठी लिप्स हेल्दी असायला हवेत.
  • भरपूर पाणी प्यावे.
  • ओठांवरून वारंवार जीभ फिरवू नये, अशाने ते आणखी ड्राय होतात आणि फाटतात. 
  • आठवड्यातून एकदा लिप स्क्रब वापरावा. कॉफी आणि मध मिक्स करून हा होम मेड स्क्रब ओठांवर लावू शकता. डेड आणि ड्राय स्किन लगेच निघून जाईल. ओठ सॉफ्ट होतील. तसेच सॉफ्ट टूथब्रशनेदेखील हळुवार ब्रशिंग करत डेड स्किन काढता येते. 
  • चांगल्या क्वालिटीचे लिप बाम लावावे. कोकोनट ऑइलने मसाज करावा. 
  • सारखी लिपस्टिक लावू नये. दिवसभर लावल्यास रात्री झोपायच्या आधी पूर्ण ओठ स्वच्छ करून  लिप बाम लावावे. 
  • लिपस्टिक चांगल्या क्वालिटीची वापरावी. हलक्या क्वालिटीची वापरल्यास ओठांना इन्फेक्शन होऊ शकते किंवा ओठ काळे पडू शकतात. 

महत्त्वाचे : कुठल्याही प्रकारचे लिप प्रॉडक्ट वापरताना त्याची क्वालिटी बघून घ्यावे आणि तुम्हाला त्याची ॲलर्जी तर नाही ना ते तपासून घ्यावी. आपल्या ब्यूटी थेरपिस्टचा सल्ला जरूर घ्यावा.

संबंधित बातम्या