मॉन्सून मेकअप

स्वप्ना साने
सोमवार, 19 जुलै 2021

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...
स्वप्ना साने

पावसाळ्यात सगळीकडे हिरवळ बघून मन प्रसन्न होते, पण मेकअप लव्हर्ससाठी मात्र हा ऋतू फार त्रासदायक असतो. कारण पाऊस, ह्युमिडिटी आणि घाम यामुळे त्वचा चिपचिपी होते आणि मेकअप टिकत नाही. म्हणूनच आज आपण बघूया, मॉन्सून सीझनमध्ये मेकअप टिकवण्यासाठी आणि फ्रेश दिसण्यासाठी काही टिप्स.

पावसाळ्यात शक्यतो कमीत कमी मेकअप प्रॉडक्ट्स वापरावेत. एरवी जे प्रॉडक्ट्स वापरतो त्यामध्ये थोडा बदल करावा. वॉटर बेस्ड मॉइस्चरायझिंग लोशन वापरावे, त्यामुळे त्वचेला हायड्रेशन पण मिळते आणि एक्सेस ऑइल शोषले जाते. त्वचा टवटवीत दिसते. पावडर बेस वापरावा, त्यामुळे मॅट लुक दिसतो आणि चेहरा तेलकट दिसत नाही. फाउंडेशन क्रिम बेस्ड न वापरता कॉम्प्रेस्ड पावडर बेस्ड वापरावे. फाउंडेशन लावण्याआधी प्रायमर जरूर लावावे, त्यामुळे मेकअप करायला इव्हन बेस तयार होतो आणि मेकअप जास्त वेळ टिकतो. खूप घाम येत असेल तर पावसाळ्यात मेकअप केल्यावर चेहरा पॅची दिसतो. हे टाळण्यासाठी कन्सिलर आणि फाउंडेशनचा कमीत कमी वापर करावा.

आय मेकअप मात्र वॉटरप्रूफ असावा. आय शॅडो आणि ब्लशर क्रीम बेस्ड वापरावे. सौम्य शेड्सचा वापर करावा. खूप भडक आणि डार्क शेड्स या ऋतूमध्ये सूट होत नाहीत. आय लायनर वॉटरप्रूफ फेल्ट पेनने लावावे. क्रीम बेस्ड काजळ कटाक्षाने टाळावे, कारण ते ह्युमिडिटी आणि घामामुळे स्मज होते. त्याऐवजी वॉटरप्रूफ जेल काजळ लावावे. तसेच मस्कारा लावतानाही कमीत कमी लावावा आणि वॉटरप्रूफ असावा. 

पावसाळ्यात वापरावयाच्या लिपस्टिक शेड्स सौम्य असाव्यात, उदा. पिंक्स आणि ब्राउन्स. तसेच ते ग्लॉसी आणि क्रिमी नसतील याची काळजी घ्यावी. कारण या दिवसात क्रिमी प्रॉडक्ट्स घाम येत असल्यामुळे स्मज होतात. लॉँग लास्टिंग आणि मॅट लुक असणाऱ्या चांगल्या क्वालिटीच्या लिपस्टिक निवडाव्यात.

तुमचा एकंदर मेकअप कॉम्प्रेस्ड पावडर लावून सेट करावा. असे केल्यास मेकअप जास्त वेळ टिकतो आणि त्वचाही फ्रेश दिसते. 

क्विक टिप्स

  • तुम्ही जर रोज मेकअप करत असाल आणि तो तुमच्या रुटीनचा अविभाज्य भाग असेल, तर कमीत कमी प्रॉडक्ट्स वापरून मेकअप करावा. तसेच झोपण्यापूर्वी मेकअप रीमुव्हरने क्लिन करायला विसरू नका. 
  • नितळ आणि इव्हन स्किन टोनला खूप जास्त मेकअप करायची गरज नसते. त्यामुळे आपल्याला नेमके काय करायचे आहे आणि कोणत्या प्रसंगासाठी मेकअप करायचा आहे हे कायम लक्षात घ्यावे. 
  • पावसाळ्यात मेकअप प्रॉडक्ट्स फार लवकर कंटॅमिनेट होतात, त्यावर फंगस होऊ शकते. असे प्रॉडक्ट वापरल्यामुळे त्वचेला फंगल इन्फेक्शन होऊ शकते. म्हणून प्रॉडक्ट्सला पाणी लागू देऊ नये. फार जुने प्रॉडक्ट्स अजिबात वापरू नयेत. 
  • मेकअप ब्रशसुद्धा स्वच्छ आणि सॅनिटाइझ करावे.
  • शक्यतो आपली मेकअप किट आपणच वापरावी, दुसऱ्याबरोबर शेअर करू नये, विशेषतः लिप आणि आय प्रॉडक्ट्स. डिस्पेन्सिंग बाटलीतील फाउंडेशन शेअर करायला हरकत नाही. 
  • CTM रुटीन नक्की करावे. रात्री झोपायच्या आधी त्वचा पूर्ण क्लिन करून टोनर लावावे आणि त्वचेच्या प्रकारानुसार मॉइस्चरायझिंग लोशन लावावे. 
  • मेकअप प्रॉडक्ट्स नेहमी चांगल्या क्वालिटीचे वापरावेत. आपल्या ब्यूटी थेरपिस्टला विचारून तुम्हाला सूट होणारे प्रॉडक्ट्स आणि शेड्स यांची माहिती करून घ्यावी.

संबंधित बातम्या