डागांवर उपाय

सोनिया उपासनी
सोमवार, 4 ऑक्टोबर 2021

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...
स्वप्ना साने

डागाळलेल्या कपड्यांवर घरच्या घरी नैसर्गिक आणि नॅचरल पदार्थ वापरून कापडाला हानी न पोहचवता आपण कापड डागविरहित करू शकतो. 

आजकाल प्रत्येकाजवळच असंख्य वस्त्रभांडार असतो. घरी घालायचे कपडे वेगळे, कॅज्युअल वेअर वेगळे, फॉर्मल वेअर वेगळे, फंक्शनल वेअर आणि पार्टी वेअर वेगळे. एवढे सगळे वेगळे प्रकार असले तरी प्रत्येकाचे आपले विशेष आवडीचे असे काही कपडे वॉर्डरोबमध्ये असतातच, जे अर्धवट जुने झालेले अथवा कुठल्या कारणाने खराब झाले तरी जपून ठेवलेले असतात. डाग पडलेले कपडेही असतात. कुठल्याही फंक्शन अथवा पार्टीमध्ये चॉकलेट, आइस्क्रीम, ज्यूस, पान, ग्रेव्ही, वाइन, मिठाई व तेलकट पदार्थांचे डाग पडणे हे आपल्या थोड्याशा हलगर्जीपणामुळे स्वाभाविक आहे. रोजच्या जीवनशैलीतसुद्धा शाईचे डाग, लिपस्टिक, चहा, कॉफी, हळद, माती, घाम, पेंट अथवा ग्रीस, काही लागले, खरचटले तर पडलेले रक्ताचे डाग आणि अगदी धसमुसळेपणाने खाताना पांढऱ्या कपड्यांवर सांडलेले अनेक पदार्थांचे डाग घालवणे हे प्रत्येक गृहिणीसाठी चॅलेंजिंग असते. 

अशा वेळी प्रत्येक जण पहिली चूक करतो, ती म्हणजे डाग लागलेले कपडे गरम पाण्यात टाकायची. बरेच लोक योग्य माहिती अभावी डागावर टाल्कम पावडर टाकून त्यावर इस्त्रीही फिरवतात. पण या प्रकारांमुळे जेव्हा डाग अधिकच गडद होतात, तेव्हा शेवटचा पर्याय म्हणून स्ट्राँग केमिकल ट्रीटमेंटसाठी दुकानात पाठवतात.

या सर्व डागांवर घरच्या घरी नैसर्गिक आणि नॅचरल पदार्थ वापरून कापडाला हानी न पोहचवता आपण कापड डागविरहित करू शकतो. सुती, जॉर्जेट, सॅटीन, क्रेप, मल कॉटन, लीनन कापड असेल तर डाग काढायला थोडी हार्ष ट्रीटमेंट देऊ शकतो. पण कापड जर वूलन आणि सिल्कचे असेल तर खूपच काळजीपूर्वक हाताळायला लागते. 

चॉकलेट, आइस्क्रीम, ज्यूसचे डाग 

चॉकलेटच्या डागावर थोडी टाल्कम पावडर पसरावी व सावलीत तासभर वाळू द्यावी. नंतर हलक्या हाताने चोळून पावडर झटकावी व कोमट पाण्याने कापड नीट धुऊन घ्यावे. आइस्क्रीम व ज्यूसच्या डागांवर लिक्विड अमोनिया लावून चोळावे व गार पाण्याने धुऊन घ्यावे.

गोड पदार्थांचे, वाइन अथवा अल्कोहोलचे डाग 
हायड्रोजन पॅरॉक्साईड व गार पाणी सम प्रमाणात घेऊन डागांवर किमान अर्धा तास लावून ठेवावे. नंतर माईल्ड डिटर्जंटने धुऊन काढावे.  

ग्रेव्हीचे आणि तेलकट डाग 
फ्रेश डागांवर लिंबू त्वरित चोळले, तर डाग लगेच निघतात. लिंबू चोळून नंतर एन्झायमॅटीक डिटर्जंटने धुतले की डाग छू मंतर!

पानाचे डाग 
डाग असलेल्या भागावर आंबट दही अथवा आंबट ताक लावून ठेवावे. काही वेळ भिजल्यानंतर हलक्या हाताने चोळावे व साध्या पाण्याने धुवावे. डाग ताजा असेल तर लगेच निघेल. डाग जर जुना असेल तर समूळ नष्ट होण्यासाठी ही प्रक्रिया दोन ते तीन वेळा करायला लागेल. 

हळदीचे डाग 
बेकिंग सोडा व पाण्याचा घोळ करून डागावर लावून ठेवावा. तासाभराने गार पाण्याने धुवावे. 

लिपस्टिकचे डाग 
कापसाचा बोळा ॲसिटोनमध्ये बुडवून डाग लागलेल्या जागी चोळावे. नंतर साबणाच्या कोमट पाण्याने धुवावे.

चहा व कॉफीचे डाग 
हे डाग जर वारंवार कपड्यांवर पडत असतील, तर घरात बोरॅक्स पावडर हँडी ठेवावी. कापड पाण्यात बुडवून काढावे व त्यावर बोरॅक्स पावडर शिंपडावी. थोड्या वेळाने साध्या पाण्याने धुवावे. चहा व कॉफीचे डाग बेकिंग सोड्याचा घोळ अथवा डागांवर पांढरी टूथपेस्ट लावल्यानेसुद्धा निघतात.

घामाचे डाग 
एक कप पाण्यात एक झाकण व्हिनेगर घालून घोळ करावा व डाग पडलेला भाग या घोळात बुडवून ठेवावा. काही मिनिटांतच डाग नाहीसे व्हायला लागतात. नंतर गार साबणाच्या पाण्याने कापड धुवावे.

पेंट अथवा ग्रीसचे डाग 
हे काढण्याचा सोपा मार्ग म्हणजे डागांवर थोडे केरोसीन लावून ठेवावे. केरोसीन नसेल तर कोरे पेट्रोल कापसाच्या बोळ्याने लावून थोड्या वेळाने उच्च प्रतीच्या डिटर्जंटने व्यवस्थित धुवावे.

मातीचे डाग
स्ट्राँग डिटर्जंटचा घोळ करून डागांवर चोळावा. नंतर ब्रशने घासून कापड धुवावे.

शाईचे डाग
हे डाग हमखास शर्टच्या खिशाच्या कोपऱ्यावर लागतात. यावर मिथायलेटेड स्पिरीट (मेडिकल स्टोअरमध्ये मिळते) अथवा हेअर स्प्रे जर घरी हॅंडी असेल तर स्प्रे करून अर्धा तास ठेवावे. कापड जर पांढरे असेल तर टोमॅटो अर्धा चिरून तो मिठात बुडवावा व फक्त डाग असलेल्या ठिकाणी अलगद चोळावा. दोन्ही प्रकारांमध्ये नंतर गार साबणाच्या पाण्याने कापड धुवावे (लोकलाईज्ड क्लिनिंग). 

रक्ताचे डाग 
रक्तामधला एक घटक कार्बनिक प्रोटिनची चेन फक्त मिठाच्या घोळात नष्ट होते. मिठाचा घट्ट घोळ करून त्या जागी लावून ठेवावा. नंतर एन्झायमॅटिक डिटर्जंटने कापड स्वच्छ धुवावे.

महत्त्वाचे

  • सिल्क व वूलन कपड्यांमध्ये कधीही डांबराच्या गोळ्या डायरेक्ट ठेवू नयेत. याचे डाग कशानेच समूळ नष्ट होत नाहीत. 
  • पेट्रोल, केरोसीन व स्पिरीट हे ज्वलनशील पदार्थ आहेत. त्यामुळे क्लिनिंगच्यावेळी आगीचा कुठलाही स्रोत जवळपास नसावा. 
  • ऐनवेळी काहीच सुचले नाही, तर कुठलेही स्ट्रॉँग केमिकल वापरण्याआधी माईल्ड सोप व थंड पाण्याने डाग काढायचा प्रयत्न करावा. कुठले केमिकल वापरायचे झालेच तर आधी ते कापडाच्या एका कोपऱ्यावर वापरून बघावे. कारण प्रत्येक कापड हे वेगळ्या तंतूंनी विणलेले असते, त्यामुळे प्रत्येक कापडावर होणारी रासायनिक प्रक्रिया वेगळी असते. 
  • पांढऱ्या कापडांसाठी हा प्रश्न उद्‍भवत नाही, कारण ब्लिच करणे हा त्यावर सोपा उपाय असतो. पण यातही सावधानता बाळगली पाहिजे, कारण वारंवार ब्लिच केल्यानेपण कापड रफ व खराब होते.

संबंधित बातम्या