डायबेटिक ब्यूटी केअर

स्वप्ना साने
सोमवार, 20 डिसेंबर 2021

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...
स्वप्ना साने

डायबेटिस म्हणजेच मधुमेह असलेल्यांना नॉर्मल ब्यूटी केअरपेक्षा जरा वेगळे आणि स्पेशल ब्यूटी रुटीन फॉलो करायला लागते. त्वचेला कुठेही जखम होता कामा नये याची काळजी घेऊन ब्यूटी रुटीन फॉलो करावे लागते, हे अनेकांना माहिती नसते. म्हणूनच या लेखात आपण बघू या मधुमेह असलेल्यांसाठी ब्यूटी ट्रीटमेंट..

मधुमेह असलेल्यांची स्किन खूप ड्राय होते. हाय ब्लड शुगर लेव्हल्समुळे त्वचेला कोरडेपणा येतो. रक्ताभिसरण नीट होत नाही. 

त्यामुळे त्वचेला पोषण मिळत नाही आणि बरेच वेळा त्वचा डार्क, जाडसर आणि 
रफ होते. अंडर आर्म्स, ब्रेस्ट खालची त्वचा, मानेवर, दोन पायांच्या मधे आणि इतर स्किन फोल्ड्स येथील त्वचा ॲफेक्ट होते.

यावर उपाय म्हणजे, भरपूर रिच मॉइस्चरायझरचा वापर करणे. इथे ‘रिच’ म्हणजे त्वचेला पोषण देणाऱ्या कोकम बटर, कोकोआ बटर, ऑलिव्ह ऑइल, ग्रेप सीड ऑइल असे ॲक्टिव्ह्ज गोष्टी असलेले लोशन/प्रॉडक्ट्स वापरावेत. लोशन विकत घेताना त्याचे लेबल नीट वाचून यापैकी काही ॲक्टिव्ह्ज त्यात आहेत का याची खात्री करून घ्यावी. 

अंघोळ झाल्यावर लगेच त्वचा ओलसर असताना लोशन लावावे. लगेच त्वचेत जिरून जाते. पायाच्या बोटांच्या मधे लावू नये. कारण तिथली त्वचा जर ओलसर राहिली, तर फंगल इन्फेक्शन होऊ शकते. 

ओठ ड्राय होतात आणि क्रॅक होतात, म्हणून लिप बाम आवर्जून लावावे.  

डायबेटिक पेशंट्सनी पायांची आणि नखांची काळजी घेणे खूप आवश्यक असते. नखांना नेल पॉलिश लावू नये किंवा लावल्यास, तेवढ्या पुरते लावून मग काढून टाकावे. कारण फंगल इन्फेक्शन झाल्यास, नेल पॉलिशमुळे लक्षात येत नाही. तसेच नखे कापतानासुद्धा खूपच काळजी घेऊन कापावीत. कुठेही जखम होणार नाही अशा पद्धतीने कापावीत. 

पेडिक्युअर करायचे असल्यास तज्ज्ञांकडून करून घ्यावे. डायबेटिक असल्याचे त्यांना सांगावे, म्हणजे ते काळजी घेतील. पाय जास्त वेळ पाण्यात सोक करू नयेत, इन्फेक्शन होऊ शकते. मसाज केल्याने आराम मिळतो. जमेल तसा पायाला मसाज नक्की करावा. रक्ताभिसरण सुधारते. ड्रायनेस कमी होतो. त्वचा शक्य असेल तेवढी कोरडी ठेवावी, म्हणजे कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन होण्याची रिस्क कमी होते. 

ब्यूटी थेरपिस्टकडे गेल्यावर त्यांना तुम्ही डायबेटिक असल्याचे जरूर सांगावे. त्याप्रमाणे ते तुमच्यासाठी ब्यूटी प्रॉडक्ट्स निवडतील आणि काळजी घेतील. फक्त डायबेटिक पेशंट्सच नव्हे, तर इतर लोकांनीही जागरूक असायला हवे. वेळोवेळी ब्लड शुगर तपासत राहावी, पौष्टिक आहार घ्यावा आणि स्वतःची काळजी घ्यावी.

संबंधित बातम्या