सौंदर्य समस्या आणि उपाय

स्वप्ना साने
सोमवार, 3 जानेवारी 2022

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...
स्वप्ना साने 

प्रश्न : थंडीमुळे त्वचा खूप ड्राय झाली आहे, क्रीम लावूनसुद्धा फरक पडला नाही. काय उपाय करावा?
: हिवाळ्यात त्वचेला जास्त कोरडेपणा जाणवतो, त्यातच तुमची त्वचा जर ड्राय असेल तर अधिकच त्रास होतो. सुरकुत्याही दिसायला लागतात. अशा वेळेस आपली त्वचा ऑईली आहे की नॉर्मल आहे की ड्राय आहे, ते लक्षात घेऊन त्यानुसार बॉडी लोशन आणि चेहऱ्याला मॉइस्चरायझर लावावे. सकाळी अंघोळ झाल्यावर त्वचा टॉवेल ड्राय करावी, आणि ओलसर त्वचेवर बॉडी लोशन आणि फेस मॉइस्चरायझर लावावे. असे केल्यास दीर्घ काळ त्वचा सॉफ्ट आणि तजेलदार राहते. शिवाय रात्री झोपायच्या आधी त्वचा क्लीन करून परत त्वचेला पोषण द्यावे. 
आठवड्यातून एकदा बॉडी स्क्रब करावी आणि चेहरासुद्धा स्क्रब करावा. यामुळे मृत त्वचा निघून जाते आणि त्वचेवर छान ग्लो दिसतो. 

प्रश्न : हात फार रूक्ष झाले आहेत आणि टॅन पण निघत नाहीये, काय करावे?
: चेहऱ्याच्या त्वचेपेक्षा हातावरच्या त्वचेला जास्त ड्रायनेस जाणवतो. कारण हातावर तेल ग्रंथी नसल्यामुळे ते बाहेरील पोषणावर अवलंबून असतात. हल्ली वारंवार हात धुण्याच्या क्रियेमुळे सुरकुत्याही लगेच दिसायला लागतात. यावर उपाय म्हणजे, रोज रात्री झोपायच्या आधी हातांना पेट्रोलियम जेलीने मसाज करावा. आठवड्यातून दोन वेळा स्क्रब करावे. त्यासाठी मसूर डाळीचे पीठ आणि दही मिक्स करून हळुवार स्क्रब करावे. यामुळे टॅनपण कमी होईल आणि त्वचेला पोषण मिळेल.

प्रश्न : फेशियल नेमके कोणत्या वयापासून करायला हवे आणि कोणते फेशियल चांगले असते?
: फेशियल प्रोसेसमध्ये फेस मसाज केला जातो. त्यामुळे साधारणपणे वय वर्षे २५च्या पुढे फेशियल करता येते. प्रत्येक वयोगट आणि त्वचेच्या प्रकारानुसार कोणते फेशियल करायला हवे ते ठरवतात.  
हल्ली केमिकल पिल्स आणि फ्रूट पिल्सची क्रेझ आहे. पण ते करण्याआधी त्याबद्दल पूर्ण माहिती घेऊन आणि गरज असल्यासच करावे. वयोमानानुसार कोलाजेन आणि ईलासटीनचे प्रमाण कमी होते, म्हणून अँटी एजिंग फेशियल आणि त्यानुसार मसाज घ्यायला हवा. 

प्रश्न : नाकावर व्हाईट हेड्स आहेत, काय उपाय करावा?
: व्हाईट हेड्स हे मुख्यतः मृत पेशी, सेबम, आणि बॅक्टेरिया 
जेव्हा स्किन पोअर्स मध्ये ट्रॅप होतात, तेव्हा तयार होतात. स्पेशली ‘T’ झोन म्हणजे नाक, कपाळ आणि हनुवटीवर जास्त होऊ शकतात. ते क्लीन करण्यासाठी आठवड्यातून एकदा त्वचा हळुवार स्क्रब करावी. हलकी स्टीम देऊन, ब्लॅक हेड रिमुव्हरने एक्सट्रॅक्ट करावे. हा उपाय तज्ज्ञांकडून करून घ्यावी, अन्यथा त्वचेला इजा होऊ शकते. 

स्क्रब केल्यानंतर डीप पोअर क्लिन्सिंग पॅक लावावा. टी ट्री ऑईल असलेला पॅक लावल्यास उत्तम, म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन होत नाही. त्वचा वेळोवेळी क्लीन करावी. खूप घाम येत असल्यास क्लिन्सिंग वाईप्सने क्लीन करावे. ॲलोव्हेरा जेल लावावे, त्याने त्वचा मॉइस्चराईझ्ड राहते.

निवेदन 
थंडीत पायांना खूप भेगा पडतात, डोळ्यांखाली डार्क सर्कल्स तयार झाली आहेत, ओठ खूप फुटतात, कोंडा काही केल्या जात नाही... तुम्हालाही जाणवतात का अशा समस्या? त्यावर उपाय सापडत नाहीये? मग तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा, आम्ही या सदरातून त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. 
saptahiksakal@esakal.com या ईमेलवर तुमचे प्रश्न पाठवा. ईमेलच्या विषयात ‘ब्यूटी केअर’ असा उल्लेख करायला आणि सोबत तुमचा फोन नंबर लिहायला विसरू नका. 

संबंधित बातम्या