हेल्दी केसांसाठी...

स्वप्ना साने
सोमवार, 17 जानेवारी 2022

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...
स्वप्ना साने

हल्ली केसांच्या समस्यांमध्ये वाढ होताना दिसते आहे. ज्यांचे केस स्ट्रेट असतात त्यांना कुरळे केस आवडतात आणि कुरळे केस असतील त्यांना स्ट्रेट केस हवे असतात. या नादात केसांवर वेगवेगळे प्रयोग केले जातात, उदा. रीबॉण्डिंग, क्रिम्पिंग, कर्लिंग इत्यादी. या प्रोसेस पर्मनंट आणि टेम्पररी अशा दोन्ही प्रकारे करता येतात. पण त्यामुळे केस खराब होऊ शकतात. शिवाय केसांमध्ये कोंडा होणे ही एक कॉमन बाब आहे. म्हणूनच केसांच्या काही समस्यांवरचे उपाय आज पाहू या.

प्रश्न :  सहा महिन्यांपूर्वी केस रीबॉण्डिंग केले होते. आता खूप हेअर फॉल होतोय, काय करावे?
ः रीबॉण्डिंग प्रोसेसच्यावेळी केसांवर भरपूर केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स वापरले जातात. त्यामुळे त्याचे नॅचरल बॉँडिंग ब्रेक होऊन केस स्ट्रेट होतात. या प्रोसेसमुळे केस खूप डॅमेज होतात. आफ्टर केअर घेणे गरजेचे असते. हेअर स्पा, रेग्युलर हेअर पॅक लावणे, हेअर सिरम वापरणे या गोष्टी प्रोसेसिंगनंतर करणे आवश्यक आहे, ज्यामुळे केस हायड्रेट होतात आणि केस सॉफ्ट व हेल्दी दिसतात. हेअर फॉल होत असेल आणि केस तुटत असतील, तर त्यासाठी रेग्युलर ऑइल मसाज करावा, स्मूथनिंग शाम्पू वापरावा आणि दहा दिवसांच्या अंतराने हायड्रेटिंग हेअर स्पा करावा. फायदा होईल.

प्रश्न :  केसांना काय लावावे ज्यामुळे कोंडा होणार नाही? कितीही तेल लावून मसाज केला तरी कोंडा जात नाही, घरगुती उपाय काय करावा?
ः फक्त तेल मसाज करून कोंडा जात नाही. केसांना घरी तयार केलेला पॅक लावून फायदा होऊ शकतो. ॲलोव्हेरा जेल, नारळाचे तेल, तुळशीच्या पानांची पेस्ट आणि त्यात एक चमचा ग्लिसरीन घालून पॅक तयार करावा. स्काल्प आणि केसांना हा पॅक ३० मिनिटे लावून ठेवावा आणि माइल्ड शाम्पूने केस धुवावेत. आठवड्यातून दोन वेळा असे केल्यास नक्कीच फायदा होईल. तरीही कोंडा जास्त होत असल्यास तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. 

प्रश्न :  स्प्लिट एंड असल्यास काय करावे?
ः केसांना फाटे फुटले आहेत म्हणजे त्यांना नीट पोषण मिळत नाही. आहारात प्रोटिनचे प्रमाण कमी झाल्यास किंवा वारंवार स्ट्राँग शाम्पूचा वापर केल्यास, अथवा ओले केस खूप वेळा टॉवेलने झटकून पुसल्यास असे होऊ शकते. यावर उपाय म्हणजे, प्रोटिनयुक्त आहार घ्यावा. दोन चमचे दह्यात एका अंड्याचे व्हाइट मिक्स करून हा पॅक केसांना लावावा. अर्ध्या तासाने केस धुवावेत. प्रोटिनयुक्त शाम्पू आणि कंडिशनर लावावे. याशिवाय तीन महिन्यांच्या अंतराने केस ट्रिम करावेत. 

प्रश्न :  केस खूप कुरळे आहेत, मॅनेज होत नाहीत आणि शॉर्ट केस सूट होत नाही, काय करावे?
ः कुरळे केस असल्यास गुंता होणे, ड्रायनेस येणे अशा अडचणी उद्‍भवतात. केस फार डल दिसायला लागतात. अशा केसांना हायड्रेशनची फार गरज असते. डीप हायड्रेटिंग हेअर पॅक अथवा हेअर स्पा प्रोसेस करावी. केसांना रेग्युलर ऑइल मसाज करावा आणि स्टीम द्यावी. माइल्ड शाम्पूने केस धुऊन डीप कंडिशनर लावावे. आठवड्यातून एकदा नारळाच्या दुधाचा पॅक लावावा. केस सॉफ्ट आणि चमकदार दिसतील, शिवाय मॅनेज करायला सोपे जाईल.

निवेदन 
थंडीत पायांना खूप भेगा पडतात, डोळ्यांखाली डार्क सर्कल्स तयार झाली आहेत, ओठ खूप फुटतात, कोंडा काही केल्या जात नाही... तुम्हालाही जाणवतात का अशा समस्या? त्यावर उपाय सापडत नाहीये? मग तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा, आम्ही या सदरातून त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. 
saptahiksakal@esakal.com या ईमेलवर तुमचे प्रश्न पाठवा. ईमेलच्या विषयात ‘ब्यूटी केअर’ असा उल्लेख करायला आणि सोबत तुमचा फोन नंबर लिहायला विसरू नका. 

 

संबंधित बातम्या