नखांचे सौंदर्य

स्वप्ना साने
सोमवार, 31 जानेवारी 2022

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...
स्वप्ना साने

सुंदर, सुबक, नखे सगळ्यांनाच आवडतात. हल्ली तर नखांसाठी खास नेल स्पा आणि नेल सलून सुरू झाले आहे. तिथे आर्टिफिशियल नेल्स लावून मिळतात अथवा तुमच्या नखांना काही प्रॉब्लेम असतील, त्यांची ग्रोथ होत नसेल तर त्यावर उपचार केले जातात. आपण आपल्या नखांना किती गृहीत धरतो याचा कधी विचार केलाय? त्यांचे ट्रीमिंग, क्लिनिंग, शेप देणे आणि काही इन्फेक्शन असेल तर त्यावर उपचार घेणे, ह्या गोष्टी नियमितपणे करणारे फार कमी लोक आहेत. हल्लीच्या लाइफस्टाइलमुळे सतत शूज वापरणे, अथवा फॅशनेबल चपला सतत वापरणे, रोज वेगवेगळ्या रंगाचे नेलपेंट लावणे, केमिकल्सचा मारा करणे, असंतुलित आहार घेणे यामुळे आजकाल बऱ्याच लोकांना नखांच्या काहीना काही समस्या उद्‍भवतात. 

प्रश्न :  नखे वाढत नाही, ह्यावर काय उपाय करता येईल?
ः नखांची वाढ होत नाही यामागे बरीच कारणे असू शकतात. उदाहरणार्थ, अन्नातून पुरेसे पोषण न मिळणे, प्रोटीनयुक्त डाएट नसणे, केमिकलचा सतत वापर करणे, सारखे पाण्यात आणि डिटर्जंटमध्ये हात घालणे, इत्यादी. ह्यावर उपाय म्हणजे प्रोटीन आणि व्हिटॅमिन ‘ई’युक्त आहार घेणे. रात्री झोपायच्या आधी ऑलिव्ह ऑइलने नखांना मसाज करावा. अगदीच गरज असेल तर तुम्ही नेल एक्सटेन्शन प्रोसेसही करू शकता. हे करायचे झाल्यास एक्स्पर्टकडूनच करून घ्यावे.

प्रश्न :   नखांची चमक गेलीये आणि ती पिवळसर दिसतात. काही घरगुती उपाय आहे का, ज्याने नखे चमकदार दिसतील?
ः नखे पिवळसर दिसतात आणि त्याची चमकही गेलीये म्हणजे नखांना काहीतरी इन्फेक्शन झाले आहे. फंगल इन्फेक्शनमुळे असे बहुतेकवेळा होते. दीर्घकाळ हात अथवा पाय दमट वातावरणात असतील, तर असे इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. यावर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तोवर घरच्या घरी करण्यासाठी उपचार म्हणजे, लिंबाचे साल नखांना चोळावे. कोमट पाण्यात टी-ट्री ऑइलचे काही थेंब टाकून थोडावेळ नखे बुडवून नेल ब्रशने नखे क्लीन करावीत. ऑलिव्ह ऑइलने मसाज करावा, फायदा होईल. 

प्रश्न :   वय वर्षे २२, पण नखे मात्र फारच रफ आणि डल दिसतात. शिवाय खूप हार्डही झाली आहेत आणि शेपही देता येत नाही. नेल्सखालची त्वचापण खूप ड्राय झाली आहे, काय करावे?
ः नखांना मिळणारे पोषण जर कमी पडले, तर ती कडक होतात, चमक नाहीशी होते आणि त्या नखाभोवतीची त्वचा ड्राय होते. इतरही बरीच कारणे असू शकतात. सगळ्यात पाहिले आहारात बदल करावा. भरपूर व्हिटॅमिन्स आणि प्रोटीनयुक्त आहार घ्यावा. नेल पॉलिशचा वापर बंद करावा. जेल अथवा ॲक्रॅलिक नेल्स लावणे टाळायला हवे. काही दिवस रेग्युलर मॅनिक्युअर आणि पेडिक्युअर करावे. रोज रात्री नखांना ऑलिव्ह ऑइलचा मसाज करावा. फायदा होतो. 

प्रश्न :  टो नेल फंगस काय असते, त्यावर उपचार आहेत का?
ः फंगल इन्फेक्शनमुळे पायाच्या नखांना जर इजा झाली असेल, ती पिवळी पडली असतील, जाडसर झाली असतील आणि खराब वास येत असेल तर त्याला टो नेल फंगस झाले असे म्हणता येईल. जर पायाची नीट स्वच्छता केली नसेल, पायाकडे दुर्लक्ष झाले असेल आणि त्यात वातावरण दमट असेल, तर टो नेल फंगस होण्याची शक्यता असते. सतत शूज वापरणे, पाय ओलसर राहणे किंवा सतत पाण्यात काम करणाऱ्यांना हा त्रास होऊ शकतो. ह्यावर उपचार म्हणजे डॉक्टरचा सल्ला घ्यावा आणि औषध सुरू करावे. पर्सनल हायजीन फॉलो करावे, मधुमेह असल्यास अतिदक्षता घ्यावी. शुगर कंट्रोलमध्ये असेल ह्याची काळजी घ्यावी. पाय नेहमी ड्राय आणि स्वच्छ ठेवावेत.

निवेदन 
थंडीत पायांना खूप भेगा पडतात, डोळ्यांखाली डार्क सर्कल्स तयार झाली आहेत, ओठ खूप फुटतात, कोंडा काही केल्या जात नाही... तुम्हालाही जाणवतात का अशा समस्या? त्यावर उपाय सापडत नाहीये? मग तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा, आम्ही या सदरातून त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. 
saptahiksakal@esakal.com या ईमेलवर तुमचे प्रश्न पाठवा. ईमेलच्या विषयात ‘ब्यूटी केअर’ असा उल्लेख करायला आणि सोबत तुमचा फोन नंबर लिहायला विसरू नका. 

संबंधित बातम्या