हेल्दी ॲण्ड ग्लोइंग स्किन...

स्वप्ना साने
सोमवार, 14 फेब्रुवारी 2022

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...
स्वप्ना साने

आपल्या त्वचेसाठी कोणते प्रॉडक्ट उपयुक्त आहेत आणि नेमके काय वापरावे, याची आपल्यापैकी बहुतेक लोकांना माहिती नसते. त्यामुळे जाहिरातीत जे दाखवले जाते तेच प्रॉडक्ट आपल्या त्वचेलादेखील सुंदर करतील, असा गोड गैरसमज अनेक तरुण, तरुणींचा आणि इतर सर्व वयोगटातील लोकांचा झालेला आहे. त्वचा सुंदर आणि हेल्दी दिसण्यासाठी नेमके काय करावे, याबद्दल सर्वांनी जागरूक असणे महत्त्वाचे आहे. 

प्रश्न :  स्किन केअर रुटीनसाठी कोणते प्रॉडक्ट वापरावेत?
: स्किन केअर रुटीनमध्ये बेसिक केअर आहे ती CTM म्हणजेच क्लिन्सिंग, टोनिंग आणि मॉइस्चरायझिंग. स्किन केअरसाठी लागणारे प्रॉडक्ट नेहमी त्वचेचा प्रकार - स्किन टाइप कोणता आहे त्यानुसार वापरावेत. वेगवेगळ्या स्किन टाइपसाठी प्रॉडक्टही वेगवेगळे असतात. 
तुमची त्वचा तेलकट असेल, तर कमी ऑइली आणि जास्त वॉटर अथवा जेल बेस्ड प्रॉडक्ट तुमच्यासाठी योग्य आहेत. यामुळे त्वचेतील अतिरिक्त तेल क्लीन होण्यास मदत होते आणि चेहरा तेलकट दिसत नाही. फोम क्लिन्सरमुळे पिंपल आणि ब्लॅक हेडसुद्धा क्लीन होतात. तसेच जेल बेस्ड मॉइस्चरायझर त्वचेला हायड्रेट करून ऑइल कंट्रोल करते. अस्ट्रिंजेंट वापरल्यास त्वचेचे ph बॅलन्स होऊन स्किन पोअर बुजण्यास मदत होते. तुमची त्वचा नॉर्मल असेल, तर त्याप्रमाणे प्रॉडक्ट सिलेक्ट करावे. 

त्वचा कोरडी असेल तर त्यानुसार जास्त ऑइली आणि नरीशिंग प्रॉडक्ट वापरावे. साबण आणि फेस वॉशचा वापर टाळावा. त्याऐवजी ऑइल बेस्ड क्लीन्सरने चेहरा स्वच्छ करावा. गुलाब टोनर लावून त्यावर हायड्रेटिंग लोशन किंवा सीरम लावावे. कोरड्या त्वचेला अतिरिक्त मॉइस्चरायझरची गरज असते, त्यामुळे, कोको बटर, शे बटर असलेले प्रॉडक्ट वापरावेत. 
या बेसिक केअर व्यतिरिक्त, तुम्हाला जर कुठला स्किन प्रॉब्लेम असेल, तर त्यानुसार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मगच प्रॉडक्ट वापरावे. 

प्रश्न :   मी २३ वर्षांची आहे. त्वचा रफ जाणवते, नेमके काय वापरावे? सकाळी आणि रात्री वेगवेगळे प्रॉडक्ट वापरतात का?
: त्वचा रफ जाणवते, म्हणजे त्वचेचे नीट क्लिन्सिंग होत नाही आणि मृत त्वचा-डेड स्किनही नीट काढली जात नाही. त्वचा रफ होण्यामागे इतरही कारणे असू शकतात. त्वचा कोरडी असेल किंवा खूप जास्त प्रमाणात व्हाइट हेड्स आणि ब्लॅक हेड्स असतील, मृत त्वचेचा थर साचलेला असेल, तर त्यामुळे त्वचा डलदेखील दिसते. यावर उपाय म्हणजे नियमित क्लीन-अप करून घेणे, व्हाइट हेड्स ब्लॅक हेड्स असतील तर ते तज्ज्ञांकडून क्लीन करून घेणे. 
याशिवाय काही होम मेड पॅक लावावेत. मुलतानी माती, चंदन आणि ॲलोव्हेरा जेल मिक्स करून हा पॅक दहा मिनिटे लावून ठेवावा आणि नंतर हलक्या हातानी चोळून धुवावा. नंतर मॉइस्चरायझर लावावे. 

सकाळी आणि रात्री वापरायचे प्रॉडक्ट तुमच्या त्वचेनुसार वेगळे असू शकतात. साधारणपणे, सकाळी त्वचा फेस वॉश किंवा उटण्याने क्लीन करावी आणि मॉइस्चरायझर लावावे, त्यावर सनस्क्रीन लावावे. रात्री CTM रुटीन फॉलो करावे आणि जर एजिंग स्किन असेल तर नरीशिंग क्रीम वापरावे. जर पिगमेंटेशन असेल, तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन अँटी-पिगमेन्टेशन क्रीम लावावे. 

प्रश्न :   त्वचेला किती वेळा स्क्रबिंग करावे? मी चाळिशीची आहे, तर आणखी काय काळजी घ्यावी?
: चाळिशीतल्या त्वचेला आठवड्यातून दोन वेळा एक्सफोलिएट करावे, म्हणजेच मृत त्वचा काढावी. पण हे करण्यापूर्वी, तुमची त्वचा कोणत्या प्रकारची आहे हे नक्की पाहावे. जर ड्राय आणि सेन्सेटिव्ह त्वचा असेल तर आठवड्यातून एकदाच स्क्रब करावे, माईल्ड पिलिंग असणारे एक्सफोलिएटिंग क्रीम लावून मृत त्वचा क्लीन करावी. वॉलनट अथवा एप्रिकॉट स्क्रब वापरू नये. त्वचा डॅमेज होऊ शकते. जर ऑइली किंवा कॉम्बिनेशन स्किन असेल, तर आठवड्यातून दोन किंवा तीन वेळाही त्वचा एक्सफोलिएट केलेली चालेल. सॅलिसिलीक ॲसिड पिल असलेले प्रॉडक्ट वापरावे, अथवा आपल्या ब्यूटी थेरपिस्टकडून उपयुक्त प्रॉडक्टविषयी सल्ला घ्यावा. 

त्वचा मॅच्युअर अथवा एजिंग असेल, किंवा वय चाळिशीपेक्षा जास्त असेल तर आठवड्यातून दोन वेळा जेंटल केमिकल एक्सफोलिएटिंग क्रीम, ज्यात AHA म्हणजे अल्फा हायड्रोक्सी ॲसिड असेल, असे प्रॉडक्ट लावावे. चाळिशीनंतर रेग्युलर CTM बरोबरच, पार्लरला जाऊन नियमित अँटी एजिंग कोलाजेन फेशिअल करावे. त्वचेच्या प्रकारानुसार रात्री नरीशिंग  क्रीम लावावे. शिवाय रेग्युलर बॉडी पॉलिशिंग आणि मसाजही घ्यावा. यामुळे पूर्ण बॉडी डीटॉक्स होते आणि मृत त्वचेचा थर निघून, त्वचा नरम मुलायम आणि फ्रेश दिसते. 

प्रश्न :   माझ्या नाकावर आणि गालावर ब्राऊन स्पॉट्स आहेत. ते कशामुळे आले असावेत आणि त्यावर उपाय काय आहे?
: फ्लॅट ब्राऊन स्पॉट्स असतील तर ते फ्रेकल्स असावेत. फ्रेकल्स येण्यामागे सन एक्स्पोजर किंवा आनुवंशिक कारणे असू शकतात. फ्रेकल्स उन्हात गेल्यावर वाढतात आणि घरात असल्यावर कमी होतात. सहसा त्यावर ठोस असा उपाय नाहीये. पण ब्लीच करून किंवा रेटीनोईड क्रीम वापरून फिके करू शकता. शिवाय तज्ज्ञांकडून लाइट थेरपी किंवा लेझर थेरपी करून फ्रेकल्स फिके करू शकता. केमिकल पिल्सचा पर्यायदेखील आहे, ज्यामध्ये त्वचेचा वरचा थर निघून त्वचा उजळते आणि फ्रेकल्सही कमी दिसतात. पण हे सगळे उपाय काही दिवसांसाठी असतात, परत उन्हात गेल्यावर फ्रेकल्स वाढू शकतात. यासाठी काळजी घेणे महत्त्वाचे आहे. बाहेर पडायच्या पंधरा मिनिटे आधी किमान spf 40 असलेले सन स्क्रीन लावावे. चार तासांनी परत अप्लाय करावे. डी-टॅन पॅक लावावा आणि महिन्यातून एकदा तरी डी-टॅन फेशिअल करावे.

निवेदन 
‘थंडीत पायांना खूप भेगा पडतात, डोळ्यांखाली डार्क सर्कल्स तयार झाली आहेत, ओठ खूप फुटतात, कोंडा काही केल्या जात नाही...’ तुम्हालाही जाणवतात का अशा समस्या? त्यावर उपाय सापडत नाहीये? मग तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा, आम्ही या सदरातून त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. 
saptahiksakal@esakal.com या ईमेलवर तुमचे प्रश्न पाठवा. ईमेलच्या विषयात ‘ब्यूटी केअर’ असा उल्लेख करायला आणि सोबत तुमचा फोन नंबर लिहायला विसरू नका. 

संबंधित बातम्या