ब्लॅक आणि व्हाइट हेड
बोल्ड अँड ब्यूटिफुल
चेहऱ्यावरचे पांढरे पुरळ कसे क्लीन करावे?
पांढरे पुरळ म्हणजे व्हाइट हेड असू शकतात. त्वचेमधील रोम छिद्रांमध्ये जेव्हा मृत त्वचा, ऑइल, आणि जिवाणू अडकतात, त्या वेळी रोम छिद्रे बंद होतात. त्यांना व्हाइट हेड म्हणतात. सहसा ‘T’ झोन, म्हणजे कपाळ, नाक आणि हनुवटीवर जास्त आढळतात. क्लीन करण्यासाठी सौम्य एक्सफोलिएशन करणे गरजेचे असते. फेस वॉश किंवा क्लीन्सर घेताना, त्यामध्ये सॅलिसिलीक ॲसिड किंवा बेंझोयल पेरोक्सिडसारखे अँटी बॅक्टेरिअल घटक असलेले प्रॉडक्ट घ्यावे. ब्यूटी थेरपिस्ट कडून क्लिनअप करून Q-टीपने व्हाइट हेड क्लीन करून घ्यावेत. घरी रेग्युलर CTM रुटीन फॉलो करावे.
माझी मुलगी पंधरा वर्षांची आहे. तिच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात ब्लॅक आणि व्हाइट हेड आहेत. कानातसुद्धा ब्लॅक हेड झालेले दिसतात, काय उपाय करावा?
वयात येत असताना शरीरात खूप बदल होत असतात. हार्मोनल बदल आणि इतरही काही कारणांमुळे त्वचेवर तैल ग्रंथी जास्त सक्रिय होतात. त्वचेमध्ये अनेक प्रकारचे बदल घडत असतात. स्किन पोअरमध्ये ऑइल, मृत त्वचा, जिवाणू अडकून बंद झालेले पोअर ओपन झाले की हवेतील ऑक्सिजनमुळे ऑक्सिडेशन होते आणि ते पोअर ब्लॅक दिसतात. या सगळ्याची सुरुवात झाली असेल वेळेत स्किन केअर घेणे गरजेचे असते.
खूप जास्त प्रमाणात ब्लॅक हेड झाले असल्यास, तज्ज्ञांकडून फेस क्लिनिंग करून घ्यावे, फक्त घरगुती उपाय करू नयेत. क्लिनिकल पद्धतीने स्टरलाईज्ड एक्स्ट्रॅक्टर घेऊन ब्लॅक हेड आणि व्हाइट हेड क्लीन करावे लागतात. यात स्टीम किंवा वॉर्म कॉम्प्रेशन देऊन त्वचा सॉफ्ट केली जाते, पोअर ओपन केले जातात. असे केल्यास एक्स्ट्रॅक्शन करणे सोपे जाते. कानातील ब्लॅक हेड क्लीन करणे थोडे कठीण असते आणि क्लीन केल्यावर वारंवार तिथे होऊ नयेत यासाठी उपाय करावे लागतात. ते तज्ज्ञांकडूनच करून घ्यावेत. घरी CTM जरूर करावे. त्वचा खूप तेलकट असल्यास, ऑइल कंट्रोल फेस वॉश आणि स्क्रब वापरावा. आठवड्यातून दोन वेळा क्ले पॅक लावावा. मुलतानी माती, चंदन पावडर, चार थेंब लिंबाचा रस आणि दही मिक्स करून त्वचेवर लावावे. पंधरा मिनिटांनी धुवावे. फायदा होईल.
माझ्या पाठीवर खूप पुरळ आहे. ते ब्लॅक हेड आहेत की पिंपल? त्यावर उपाय आहे का?
पाठीवर असणारे पुरळ किंवा पिंपल हे व्हाइट किंवा ब्लॅक हेड असू शकतात किंवा त्यात पसदेखील असू शकतो, त्याला सिस्ट म्हणतात. पस झाला असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्यावे लागेल. फक्त व्हाइट हेड असतील तर सौम्य स्क्रब वापरून क्लीन करता येते. टी-ट्री ऑइलयुक्त स्क्रब आणि पॅक लावावा. तुमच्या पाठीवर यापैकी नेमके काय आहे, ते ब्यूटी थेरपिस्टकडे जाऊन दाखवावे.
ब्लॅक आणि व्हाइट हेड होऊ नयेत म्हणून कोणती काळजी घ्यावी?
सर्वप्रथम तुमच्या त्वचेनुसार प्रॉडक्ट वापरावेत आणि CTM फॉलो करावे. मेकअपचे प्रॉडक्ट वापरत असाल, तर ते नॉन-कोमेडोजेनिक असावेत, म्हणजे हे प्रॉडक्ट स्किन पोअर ब्लॉक करत नाहीत. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, तुमच्या त्वचेनुसार रेग्युलर फेशिअल अथवा क्लीन अप करावे. म्हणजे त्या प्रोसेसमध्ये त्वचा पूर्ण क्लीन होते. शिवाय आहाराकडे लक्ष द्यावे. भरपूर पाणी प्यावे, म्हणजे त्वचा हायड्रेट राहते.
घरच्या घरी आठवड्यातून दोन वेळा क्लीन्सिंग मास्क लावावा. पिल ऑफ मास्कनेही फायदा होतो, किंवा टी-ट्री ऑइल असेल असा पॅक वापरावा.
निवेदन
थंडीत पायांना खूप भेगा पडतात, डोळ्यांखाली डार्क सर्कल्स तयार झाली आहेत, ओठ खूप फुटतात, कोंडा काही केल्या जात नाही... तुम्हालाही जाणवतात का अशा समस्या? त्यावर उपाय सापडत नाहीये? मग तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा, आम्ही या सदरातून त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू.
saptahiksakal@esakal.com या ईमेलवर तुमचे प्रश्न पाठवा. ईमेलच्या विषयात ‘ब्यूटी केअर’ असा उल्लेख करायला आणि सोबत तुमचा फोन नंबर लिहायला विसरू नका.