स्मूदी बेनिफीट

स्वप्ना साने
सोमवार, 28 मार्च 2022

बोल्ड अँड ब्यूटिफुल 
काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...
स्वप्ना साने

वर्कआउटनंतरचे स्मूदी, मधुमेह असलेल्यांचे स्मूदी, शरीर डीटॉक्स करण्यासाठी स्मूदी... असे स्मूदीचे असंख्य प्रकार हल्ली ऐकायला मिळतात. मुळात स्मूदी म्हणजे नेमके काय आणि ती प्यायची कशासाठी?...

हल्ली स्मूदीचे फॅड आहे. खूप जण कुठल्या तरी कारणासाठी कुठली तरी स्मूदी पीत असतात. तर काही जण फक्त आपणही हे करून बघावे, म्हणून स्मूदी प्यायचे ठरवतात. खरेच, स्मूदीने काय फरक पडतो? आपणही घ्यावी का? याचे काही वाईट परिणाम होणार नाहीत ना? आणि स्मूदी नेमकी करायची कशाची? असे एक ना अनेक प्रश्न सर्वांनाच पडत असतील. 

स्मूदी म्हणजे दोनपेक्षा जास्त जिन्नस ब्लेंड करून तयार केलेले ‘हेल्दी ड्रिंक’. ‘बेस’ आणि ‘लिक्विड’ यांचे एकत्रीकरण करून स्मूदी केली जाते. बेस म्हणजेच फळे, सुकामेवा आणि फळभाज्या वापरल्या जातात. लिक्विड म्हणजे पेय पदार्थ. यामध्ये, दूध, पातळ दही किंवा फ्रूट ज्यूस असू शकतात. या पदार्थांची विविध कॉम्बिनेशन करून स्मूदी केली जाते. भरपूर फायबर, व्हिटॅमिन, मिनरल, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडन्ट मिळतील अशा पद्धतीने पदार्थ वापरले जातात. हे सगळे न्यूट्रिएन्ट आपल्या शरीरासाठी आणि त्वचेसाठी खूप आवश्यक असतात.

फ्रूट स्मूदीचे ‘ब्यूटी बेनिफीट’ बघितले, तर त्यात भरपूर व्हिटॅमिन ‘सी’ आणि व्हिटॅमिन ‘B6’ असते, त्यामुळे त्वचेची लवचिकता राखली जाते. अँटीऑक्सिडन्ट असल्यामुळे त्वचेला फ्री रॅडिकल्स डॅमेजपासून संरक्षण मिळते आणि एजिंग प्रोसेस स्लो होते.  

स्मूदीमध्ये घालण्यासारखा एक जादुई पदार्थ म्हणजे हळद! प्रतिकारशक्ती वाढवणारे, अँटी ऑक्सिडन्ट असणारे कर्क्युमीन हळदीत असते. आपल्या शरीर आणि त्वचेसाठी खूपच फायद्याचे! कुठल्याही स्मूदीमध्ये चिमूटभर हळद घालू शकता. 

स्मूदीचे काही प्रकार

कॉलजेन बुस्टिंग ब्यूटी स्मूदी 

अर्धे फ्रोझन केळे, पाऊण कप अनस्वीटण्ड बदाम दूध, २ स्कूप कॉलजेन पावडर आणि शक्य असल्यास पाऊण कप स्ट्रॉबेरी, १ कप बर्फ असे सगळे ब्लेंड करावे. अँटी एजिंग कॉलजेन बुस्टिंग ब्यूटी स्मूदी तयार! सकाळी नाश्त्याच्यावेळी घ्यावी अथवा व्यायाम झाल्यावर घ्यावी. 

डीटॉक्स स्मूदी

  • स्किन डीटॉक्स स्मूदीमुळे, शरीरातील अतिरिक्त टॉक्सिन बाहेर निघतात, रक्त शुद्ध होते आणि त्यामुळे त्वचेवर छान हेल्दी ग्लो दिसतो. या स्मूदीसाठी अर्धा कप नारळाचे पाणी, २ फ्रोझन केळी, १ कप अननसाचे तुकडे, १ कप आंब्याचे काप, २ कप पालक, १ टेबलस्पून जवस पूड, चवीनुसार मध घालून ब्लेंड करावे. 
  • पपई, दही किंवा दूध आणि हिरव्या सफरचंदाची स्मूदीही खूप छान आहे, शरीराला आतून डीटॉक्स करून त्वचेला तजेलदार करते.

 ग्रीन स्मूदी

  • पालक, कोथिंबीर, पुदिना, कोरफडीचा ज्यूस, थोडा आवळा ज्यूस किंवा एक आवळा हे सर्व पदार्थ ब्लेंड करून त्यामध्ये चवीनुसार थोडा मध घालावा. या ग्रीन स्मूदीमध्ये क्लोरोफिल असल्यामुळे रक्त शुद्ध करते, तसेच यामुळे केसांची वाढही चांगली होते. त्वचेला भरपूर पोषण मिळते. 
  • अशाच प्रकारे वजन कमी करण्यासाठीदेखील स्मूदीचे कॉम्बिनेशन वापरले जाते. फक्त फ्रूट ज्यूसपेक्षा स्मूदी एक सुपर हेल्दी ड्रिंक आहे. 

ही काळजी घ्या

  • पण कुठल्याही गोष्टीचा अतिरेक झाला तर त्याचे परिणाम चांगले नसतात, हे आपल्याला माहिती आहेच. म्हणून स्मूदीचाही अतिरेक करू नये. एकावेळी १५० किंवा २०० मिलीपेक्षा जास्त स्मूदी पिऊ नये नये. शिवाय एका सर्व्हिंगमध्ये एक कप फळाचे तुकडे असतील याप्रकारे कॉम्बिनेशन करून स्मूदी तयार करावी. 
  • सगळे साहित्य ताजे आणि स्वच्छ असावे. शक्य असल्यास सेंद्रिय पदार्थ वापरावेत.
  • सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, कुठलीही स्मूदी तयार करण्याआधी डाएटीशियनचा सल्ला जरूर घ्यावा. कारण आपण स्मूदी ब्यूटी बेनिफीटसाठी घेणार असलो, तरी त्याचा तुम्हाला इतर काही त्रास होत नाही ना, याची खात्री करून घ्यावी. सुरुवातीला थोडी कमी प्रमाणात  घ्यावे, म्हणजे आपल्याला स्मूदी झेपते आहे का ते कळेल. 
  • स्मूदी घ्यायला सुरुवात केल्यावर आपल्या बाकी आहाराकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. कारण जेव्हा तुम्ही संतुलित आहार घ्याल, भरपूर पाणी प्याल, व्यायाम कराल आणि सोबत रेग्युलर स्किन केअर रूटीन फॉलो कराल तेव्हाच ब्यूटी बेनिफिट मिळेल.
  • डू इट युवर सेल्फ स्मूदीच्या बऱ्याच रेसिपी ऑनलाइन असतात, पण तज्ज्ञांचा सल्ला घेऊन मगच स्मूदी घ्यायला सुरुवात करावी.

 

निवेदन 

थंडीत पायांना खूप भेगा पडतात, डोळ्यांखाली डार्क सर्कल्स तयार झाली आहेत, ओठ खूप फुटतात, कोंडा काही केल्या जात नाही... तुम्हालाही जाणवतात का अशा समस्या? त्यावर उपाय सापडत नाहीये? मग तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा, आम्ही या सदरातून त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. saptahiksakal@esakal.com या ईमेलवर तुमचे प्रश्न पाठवा. ईमेलच्या विषयात ‘ब्यूटी केअर’ असा उल्लेख करायला आणि सोबत तुमचा फोन नंबर लिहायला विसरू नका. 

 

संबंधित बातम्या