हॅपी समर!

स्वप्ना साने
सोमवार, 11 एप्रिल 2022

बोल्ड अँड ब्यूटिफुल 

ऋतू बदलतो तसे आपल्या त्वचेमधील बदलही आपल्याला जाणवतात. आता उन्हाळ्यामुळे निर्माण होणारे त्रास जाणवू लागले आहेत. असह्य उकाडा, प्रचंड ऊन आणि सतत एसीमधला वावर यामुळे कितीही काळजी घेतली तरी त्वचा काळवंडणे, सनबर्न होणे, पिगमेन्टेशन होणे अशा त्वचेसंबंधित एक ना अनेक अडचणी आपल्यासमोर उभ्या राहतात. 

उन्हाळ्यात त्वचेची नेमकी कोणती काळजी घ्यावी? आणि मॉइस्चरायझर लावायची गरज आहे का?
उन्हाळा सुरू झाला की त्वचेवर होणारे बदलही जाणवतात. त्वचा तेलकट असेल तर ती जास्त तेलकट जाणवते. त्वचा कोरडी असेल तर उन्हाळ्यात कोरडी होते. नॉर्मल त्वचा असेल तर जास्त फरक जाणवत नाही. आपल्या स्किन टाईपनुसार CTM म्हणजेच क्लिन्सिंग, टोनिंग आणि मॉइस्चरायझर  लावावे. मॉइस्चरायझर बाराही महिने लावायचे असते. फक्त आपल्या त्वचेनुसार ते निवडावे. शिवाय सनस्क्रीन हा तुमच्या ब्यूटी रूटीनचा अविभाज्य भाग असायला हवा. उन्हाळा आहे म्हणून सनस्क्रीन वापरायचे असे नसते, कारण सूर्याची किरणे पावसाळ्यातसुद्धा ८० टक्क्यांपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचतात, आणि त्याच्या अतिनील किरणांपासून त्वचा डॅमेज होऊ शकते. म्हणून उन्हाळ्यात तर नक्कीच सनस्क्रीन किंवा सनब्लॉक वापरावे. शिवाय बाहेर पडताना त्वचेला सन कोट आणि स्कार्फने झाकावे. आठवड्यातून दोन वेळा अँटी टॅन पॅक लावावा. हे पॅक हल्ली विकतही मिळतात किंवा तुम्ही होम मेड पॅकही लावू शकता. मसूर डाळीचे पीठ, दही आणि चिमूटभर हळद चांगले मिक्स करून पंधरा मिनिटे लावून ठेवावे आणि गार पाण्याने धुवावे. नंतर मॉइस्चरायझर  लावावे. उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे, म्हणजे त्वचाही हायड्रेट होते. शिवाय सॅलड, फळे जास्त खावीत. कोल्ड ड्रिंकऐवजी ताक, लस्सी, गार दूध, सरबत प्यावे. 

कोणते सनस्क्रीन चांगले असते? बाजारात तर खूप वेगवेगळे प्रकार आहेत, त्यामुळे नेमके कोणते घ्यावे हे कळत नाही.
यात दोन प्रकार असतात, सनस्क्रीन आणि सनब्लॉक. सनस्क्रीनमधील घटक त्वचेमध्ये सामावून जातात आणि सूर्याची अतिनील किरणे त्वचेच्या आत पोहोचू देत नाही, त्यामुळे त्वचेचे रक्षण होते. सनब्लॉकमधील घटक त्वचेवर एक फिल्म अथवा लेयर तयार करतात, ज्यामुळे किरणे त्वचेच्या आत पोहोचू शकत नाहीत आणि ती रिफ्लेक्ट होतात. अशाप्रकारे त्वचेचे संरक्षण होते आणि त्वचा जळत नाही. हे वॉटरप्रूफदेखील असू शकतात, पण तरीही त्यातील काही घटक पाण्यात किंवा घाम येतो त्यावेळी निघून जाऊ जाऊ शकतात. हल्ली सनस्क्रीन जेल, लोशन, क्रीम आणि स्प्रेमध्येसुद्धा उपलब्ध आहेत. आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार निवडावे. तुमच्या कामाचे स्वरूप इनडोअर वर्क आहे की फिल्ड वर्क, त्याप्रमाणे प्रॉडक्ट निवडावे. याशिवाय खेळाडूंसाठी स्पोर्ट्‌स सनब्लॉक उपलब्ध आहेत. 

सनस्क्रीन अथवा सनब्लॉक घेताना एक महत्त्वाचे लक्षात घ्यावे, ते म्हणजे त्याचा SPF किती आहे. कमीतकमी 30 SPF ते 50 SPF चे प्रॉडक्ट घ्यावे. SPF म्हणजे सन प्रोटेक्शन फॅक्टर. UVB किरणांपासून तुमच्या त्वचेचे रक्षण कितपत करता येते, त्याचे मोजमाप करणारा हा फॅक्टर असतो. अजूनही संभ्रम निर्माण होत असेल, तर तुमच्या ब्यूटी थेरपिस्टचा सल्ला जरूर घ्यावा आणि त्यानुसार सनस्क्रीन वापरावे. 

माझ्या कामाच्या ठिकाणी सतत एसी सुरू असतो. तरी सनस्क्रीन आवश्यक आहे का? 
ऑफिसमध्ये एसी असला तरी सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे, कारण केव्हा तरी आपण उन्हाला एक्स्पोज होतोच. घरातून ऑफिसला जाताना अगदी कारमध्ये असलो तरीही त्वचेला प्रोटेक्शनची गरज असते. महत्त्वाचे म्हणजे, सनस्क्रीन अथवा सनब्लॉक हे दर दोन तासांनी रीअप्लाय करायचे असते. तरच तुम्हाला दिवसभरात जास्तीत जास्त प्रोटेक्शन मिळते. एसीमध्ये तर आवर्जून मॉइस्चरायझर लावून त्यावर सनस्क्रीन लावावे, किंवा हल्ली हायड्रेटिंग सनस्क्रीनही मिळतात. 

पुरुषांनीही सनस्क्रीन लावायचे असते का?
खूप छान प्रश्न आहे हा! याकडे खरेतर सोईस्कररीत्या दुर्लक्षच होते. सूर्याच्या घातक UVA आणि UVB किरणांपासून स्त्री, पुरुष आणि लहान मुलांनासुद्धा सुरक्षिततेची गरज असते. फक्त स्पोर्ट्सच्यावेळीच नाही, तर रोज बाहेर जायच्या आधी पुरुषांनीदेखील सनस्क्रीनचा वापर केला पाहिजे. 

अतिनील किरणांपासून त्वचेला नेमके काय नुकसान होऊ शकते? 
सूर्याची घातक UVA आणि UVB रेडिएशन्स ही त्वचेमधील पेशींना नुकसान पोहोचवून सनबर्न, पिगमेन्टेशन, प्री मॅच्युअर एजिंग, आय डॅमेज आणि एवढेच काय, तर स्किन कॅन्सरलासुद्धा कारणीभूत ठरू शकतात. जे लोक बर्फाळ प्रदेशात राहतात, त्यांना तर सनस्क्रीनची खूप जास्त गरज असते, कारण तिथे बर्फामुळे सूर्याची किरणे जास्त परावर्तित होतात. त्यामुळे तापमान जरी कमी असेल तरी त्वचा बर्न होऊ शकते. तसेच पोहतानादेखील पाण्यात असल्यावर यूव्ही रेडिएशन्स त्वचेला जास्त डॅमेज करतात. म्हणून पोहताना सनस्क्रीन किंवा सनब्लॉक आवर्जून लावावे. 

सनस्क्रीन वापरूनसुद्धा त्वचा टॅन झालीय, काय उपाय करावा?
सर्वप्रथम हे लक्षात घ्यावे, की सनस्क्रीन लावले तरीही त्वचा टॅन होऊ शकते. कारण टॅन होणे ही त्वचेची सेल्फ प्रोटेक्शन प्रोसेस असते. त्वचेमधील मेलनिन नावाचा घटक त्वचेचे रक्षण करण्यासाठी असतो. याच मेलनिनमुळे त्वचेला एक टोन अथवा रंग दिसतो. यूव्ही किरणांपासून रक्षण करण्यासाठी त्याचे प्रमाण वाढते आणि त्यामुळे त्वचा डार्क किंवा टॅन होते. टॅन झालेल्या त्वचेला रेग्युलर अँटी टॅन पॅक लावून टॅन कमी करता येते. काही घरगुती उपायही करता येतील. पपईचा गर लावून पंधरा मिनिटांनी धुवावा. बटाट्याचा कीस करून मुलतानी मातीमध्ये मिक्स करून पॅक लावावा. आठवड्यातून एकदा कॉफी स्क्रब लावावा. साखर, कॉफी आणि कोकोनट ऑइल मिक्स करून हळुवार स्क्रब करावे, मृत त्वचा निघून जाते आणि टॅनही कमी झालेले जाणवेल. 

सनस्क्रीन जरूर लावा आणि बिनधास्त उन्हाळा एन्जॉय करा. मेकअप करायच्या आधीदेखील सनस्क्रीन लावा. रेग्युलर क्लिनअप आणि फेशियल करायला विसरू नका. होम मेड पॅक लावा, अथवा क्ले पॅक लावा, त्वचेची काळजी जरूर घ्या. हेल्दी खा, भरपूर पाणी प्या, नारळ पाणी प्या, आणि स्वतःला हायड्रेट ठेवा!

निवेदन 
थंडीत पायांना खूप भेगा पडतात, डोळ्यांखाली डार्क सर्कल्स तयार झाली आहेत, ओठ खूप फुटतात, कोंडा काही केल्या जात नाही... तुम्हालाही जाणवतात का अशा समस्या? त्यावर उपाय सापडत नाहीये? मग तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा, आम्ही या सदरातून त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. 

saptahiksakal@esakal.com या ईमेलवर तुमचे प्रश्न पाठवा. ईमेलच्या विषयात ‘ब्यूटी केअर’ असा उल्लेख करायला आणि सोबत तुमचा फोन नंबर लिहायला विसरू नका. 

संबंधित बातम्या