उन्हाळ्यातला मेकअप...

स्वप्ना साने, नागपूर
सोमवार, 25 एप्रिल 2022

काळवंडणाऱ्या चेहऱ्यापासून पायांच्या भेगांपर्यंत... तुमच्या सगळ्या सौंदर्यविषयक समस्यांची उत्तरं इथं मिळणार आहेत...
स्वप्ना साने

उन्हाळ्यात घाम जास्त येतो. त्यामुळे मेकअप पुसला जाण्याची शक्यता असते. उन्हात खूप डार्क मेकअप चांगला दिसत नाही. त्यासाठी काही टिप्स...

उन्हाळ्यात मेकअप कसा असावा?
उन्हाळ्यात मेकअप अगदी सिम्पल आणि लाईट असावा. अर्थात तुम्ही कोणत्या प्रसंगासाठी मेकअप करताय, त्यावरही अवलंबून असते. बेसिक मेकअप करायचा असेल, तर कॉर्पोरेट लुक अथवा डे मेकअप अगदी नॅचरल लुकमध्ये असावा. नॅचरल लुक म्हणजे, मेकअप खूप भडक, डार्क, बोल्ड नसावा. फक्त तुमच्या चेहऱ्याचे फीचर हायलाईट करून एक फ्रेश लुक दिसेल, असा मेकअप असावा. हेवी फाउंडेशन न वापरता, टिंटेड मॉइस्चरायझर लावावे किंवा बीबी क्रीम लावून त्यावर हलके लूज पावडर लावून सेट करावे. आय मेकअप करताना वॉटर प्रूफ आणि न पसरणारे प्रॉडक्ट वापरावे. ऑकेजननुसार लिपस्टिकची शेड ठरवावी. रोज लावण्यासाठी न्यूड शेड्स किंवा टिंटेड लिप कलर सूट होतो. 

दिवसा मेकअप करताना मेकअपचा थर खूप लावू नये, तसेच कन्सिलर अथवा हायलाईटर लावू नये. शक्यतो कमीतकमी प्रॉडक्ट वापरावेत. हे सगळे करण्याआधी सनस्क्रीन आणि प्रायमर जरूर लावावे, म्हणजे मेकअप टिकतो. 
तुमच्या प्रोफेशनमध्ये जर हेवी मेकअप करावा लागत असेल, तर त्या वेळी वॉटर प्रूफ, स्वेट प्रूफ मेकअप प्रॉडक्ट वापरावेत आणि सेटिंग स्प्रे शेवटी स्प्रे करावा. प्रॉडक्ट नॉन-कोमेडोजेनिक असावेत, म्हणजे त्वचा डॅमेज होणार नाही आणि स्किन पोअर्स ब्लॉक होणार नाहीत. 

मेकअप केल्यावर घाम न येण्यासाठी काय करावे?
उन्हाळ्यात एरवीही घाम येतच असतो, पण मेकअप केल्यावर बऱ्याच वेळा त्या प्रॉडक्टमुळे किंवा उकाड्यामुळे जास्त घाम येतो आणि त्यामुळे मेकअप खराब होऊ शकतो. अशा वेळी मेकअप करायच्या आधी चेहरा स्वच्छ धुऊन, बर्फ लावावा. त्यामुळे त्वचेचे पोअर्स आक्रसून त्वचा टवटवीत दिसते. पोअर्स रिफ्रेश झाल्यामुळे खूप घाम येत नाही. नंतर त्वचा व्यवस्थित हायड्रेट करावी, जेल अथवा त्वचेच्या प्रकारानुसार मॉइस्चरायझर लावावे. आणि नंतर प्रायमर लावून मेकअप करावा. घाम न येण्यासाठी मेकअप प्रॉडक्ट हे नेहमी चांगल्या क्वालिटीचे वापरावेत. स्वेट प्रूफ आणि नॉन कोमेडोजेनिक प्रॉडक्ट वापरावेत. हे प्रॉडक्ट त्वचा डॅमेज करत नाहीत. स्किन पोअर्स ब्लॉक करत नाही, त्यामुळे प्रॉडक्टमुळे पिंपल येत नाहीत.  

उन्हाळ्यात मेकअप जास्त वेळ टिकण्यासाठी काय करावे?
मेकअप जास्त वेळ टिकण्यासाठी काही बेसिक गोष्टी कराव्या लागतील. चेहऱ्याला चांगल्या स्क्रबने स्क्रबिंग करावे, म्हणजे मृत त्वचेचा थर निघून जातो आणि चेहरा गुळगुळीत आणि सॉफ्ट होतो. नंतर टोनर स्प्रे करावा. याआधी बर्फ लावला तर चेहरा जास्त वेळ फ्रेश राहतो. टोनरचाही बर्फ करून तो चेहऱ्यावर फिरवू शकता. गुलाबजलचा बर्फ डायरेक्ट लावू शकता, त्यामुळे त्वचा एकदम तजेलदार होईल. यानंतर आता मॉइस्चरायझर अथवा हायड्रेटिंग सिरम लावावे. त्यावर प्रायमर आणि सनस्क्रीन लावावे. आता प्रसंगानुसार फाउंडेशन किंवा टिंटेड सनस्क्रीन किंवा बीबी क्रीम लावावे. त्यावर लूज पावडरचा ब्रश फिरवावा. पावडरचे खूप थर लावू नयेत, चेहरा पॅची दिसू शकतो. कमीत कमी प्रॉडक्ट वापरून मेकअप करावा, पण जो बेस हवा असतो तो स्टेप बाय स्टेप तसाच करावा. म्हणजे मेकअप दीर्घकाळ टिकतो. मॅट फिनिश असलेले प्रॉडक्ट लावावे. ब्लश आणि आयशॅडो क्रीम बेस्ड लावावे, म्हणजे ते चांगले सेट होतात आणि घामामुळे पुसले जात नाही. लिपस्टिक लॉँग लास्टिंग लिक्विड लिप कलर लावावे आणि नॅचरल शेड निवडावी. खूप भडक शेड रोजच्या मेकअपला सूट होत नाही. 

तेलकट त्वचेसाठी मेकअप कसा असावा?
तेलकट त्वचेसाठी मॅट आणि ऑइल फ्री मेकअप प्रॉडक्ट निवडावेत. जेल बेस्ड प्रायमर लावून ऑइल फ्री फाउंडेशन लावावे, किंवा टिंडेड सिरमचा इफेक्टही खूप छान येतो. त्यावर अगदी लाईट कॉम्पॅक्ट पावडर अथवा लूज पावडर लावावी. डे वेअर नॅचरल लुकसाठी हा परफेक्ट बेस होतो. प्रॉडक्ट ऑइल फ्री असावेत आणि नॉन कोमेडोजेनिक असावेत. असे प्रॉडक्ट स्किन पोअर्स ब्लॉक करत नाहीत आणि पिंपल येण्याची शक्यता कमी असते. आय प्रॉडक्ट वॉटरप्रूफ आणि वॉटर रेझिस्टंट असावेत. जेल बेस्ड काजळ आणि लिक्विड मॅट लिपस्टिक वापरावी. ब्लॉटिंग पेपर नेहमी जवळ असू द्यावा, म्हणजे घाम किंवा ऑइल चेहऱ्यावर दिसत असेल तर लगेच  टिपून घेता येते. खास करून ‘टी-झोन’ला त्वचा जास्त तेलकट होते. अशा वेळी ब्लॉटिंग पेपरने टिपून घेता येते. 
मेकअप केल्यावर तो रात्री झोपायच्या आधी नीट पुसला गेला आहे ना, ह्याची काळजी घ्यावी. त्यासाठी मेकअप रीमुव्हरने क्लिनिंग करावे. कोकोनट ऑइल कापसावर घेऊन त्यानेही मेकअप काढता येतो. त्यानंतर टोनिंग आणि त्वचा मॉइस्चराइझ करणे आवश्यक आहे. लिपबाम जरूर लावावे, कारण रोज लिपस्टिक लावून आणि उकाड्यामुळे त्वचा डीहायड्रेट होते आणि ओठ फुटतात. स्किन केयर रूटीन फॉलो करावे. काही स्किन प्रॉब्लेम असल्यास तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा. रेग्युलर फेशियल आणि क्लीन अप करावे, भरपूर पाणी प्यावे आणि हेल्दी अन्नपदार्थ खावेत.

निवेदन 
थंडीत पायांना खूप भेगा पडतात, डोळ्यांखाली डार्क सर्कल्स तयार झाली आहेत, ओठ खूप फुटतात, कोंडा काही केल्या जात नाही... तुम्हालाही जाणवतात का अशा समस्या? त्यावर उपाय सापडत नाहीये? मग तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा, आम्ही या सदरातून त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. 
saptahiksakal@esakal.com या ईमेलवर तुमचे प्रश्न पाठवा. ईमेलच्या विषयात ‘ब्यूटी केअर’ असा उल्लेख करायला आणि सोबत तुमचा फोन नंबर लिहायला विसरू नका. 

संबंधित बातम्या