उन्हाळ्यातली काळजी
बोल्ड अँड ब्यूटिफुल
उन्हाळ्यात ऊन आणि उष्णतेमुळे त्वचा काळवंडणे, डोळे वारंवार कोरडे होणे, त्वचा कोरडी पडणे अशा समस्या सतत जाणवतात. कधी घरच्या घरी, तरी कधी प्रोफेशनल मदत घेऊन या समस्यांवर उपाय करणे शक्य आहे.
माझे वय ३६ वर्षे आहे. सध्या उकाडा खूप आहे, तर कोणते फेशियल करावे? त्वचा खूप कोरडी आहे.
उन्हाळ्यात त्वचा काळवंडते, तेलकट दिसते. त्वचा कोरडी असली, तरीही घाम आणि तेल ग्रंथी जास्त सक्रिय होत असल्यामुळे त्वचा तेलकट असूनही कोरडेपणा जाणवतो. पस्तिशीनंतर त्वचेला भरपूर पोषणाची गरज असते. कारण त्वचेमधील ओलावा आणि ऑइल, दोन्ही कमी होते. उन्हाळ्यामध्ये अशा त्वचेसाठी AHA, म्हणजे अल्फा हायड्रॉक्साईड ॲसिड असलेले फ्रूट फेशियल उपयुक्त आहे. AHAमुळे त्वचेचे डीप क्लिन्सिंग होऊन पोषण मिळते, एजिंग प्रोसेस स्लो होते आणि टॅन झालेली त्वचा उजळलेली दिसते. तसेच ड्रायनेस आणि पिगमेन्टेशन असेल तर पपाया फेशियल करता येईल. त्वचेला हायड्रेट करणारे ॲलो व्हेरा फेशियलही खूप तजेलदार आणि रिफ्रेशिंग असते.
हल्ली बरेच ब्यूटी प्रॉडक्ट बाजारात उपलब्ध असतात, त्यामुळे नेमके कोणते प्रॉडक्ट घ्यावे ते समजत नाही. अशा वेळी आपल्या ब्यूटी थेरपिस्टचा सल्ला घ्यावा आणि तुमच्या त्वचेला उपयुक्त असे फेशियल करावे.
सन टॅन घालवण्यासाठी घरगुती उपाय आहेत का?
बेसन, दही आणि चिमूटभर हळद मिक्स करून १५ मिनिटे टॅन झालेल्या त्वचेला लावून ठेवावे. नंतर पाण्याचा हात घेऊन हळुवार स्क्रब करावे आणि धुऊन घ्यावे. लगेच फरक जाणवेल. हा पॅक आजीच्या बटव्यातील खास ऑल पर्पज पॅक आहे. सगळ्या प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त असा ऑल इन वन पॅक!
दुसरा इफेक्टिव्ह पॅक म्हणजे, कोरफड जेल, चिमूटभर हळद आणि चमचाभर मध, चांगले फेटून घ्यावे आणि टॅन झालेल्या त्वचेवर १५ मिनिटे लावून ठेवावे. नंतर गार पाण्याने धुऊन, त्वचेला मॉइस्चरायझर लावावे. या पॅकमुळे टॅन कमी होईल आणि सन बर्न झाले असल्यास तेही बरे होण्यास मदत होईल.
तसेच, मुलतानी माती आणि कोरफड जेलमध्ये थोडी चंदन पावडर मिक्स करून त्वचेला लावल्यास २० मिनिटांनी धुऊन घ्यावे. त्वचा टवटवीत आणि रिफ्रेशिंग दिसेल. त्वचा जर खूप कोरडी असेल तर पपईचा गर आणि मध एकत्र करून त्वचेला २० मिनिटे लावून ठेवावा आणि गार पाण्याने धुवावे. टॅन कमी होईल आणि त्वचा हायड्रेटेड दिसेल.
गरम हवेमुळे डोळ्यांना खूप त्रास होतो, थकलेले दिसतात. दिवसभर एसीमध्ये संगणकासमोर काम करून डोळ्यांवर जास्तच ताण पडतो. त्यामुळे डार्क सर्कलही दिसायला लागले आहेत, काय करावे?
उष्णतेमुळे डोळ्यांना तर खूपच त्रास होतो. गॉगल वापरला तरीही गरम हवेमुळे डोळ्यांच्या आत कोरडेपणा जाणवतो. शिवाय एसीमध्ये बसूनही त्वचा आणि डोळे, दोन्हीला कोरडेपणा जाणवतो. त्यात जर संगणकावर काम असेल तर डोळ्यांवर ताण पडतोच. थकलेल्या डोळ्यांसाठी अधूनमधून गार पाण्याचा पट्ट्या डोळ्यांवर ठेवाव्यात. एका छोट्या डबीत गुलाबजलमध्ये भिजवलेल्या पट्ट्या बरोबर ठेवाव्यात. दोन ते तीन तासांनी १० मिनिटे पट्ट्या डोळ्यांवर ठेवाव्यात, खूप रिलॅक्स वाटेल. तसेच तुम्ही वापरलेल्या टी बॅगही फ्रीझ करून डोळ्यांवर ठेवू शकता. ऑफिसमध्ये असताना, जमत असल्यास ताज्या काकडीच्या चकत्या करून त्या डोळ्यांवर ठेवाव्यात खूप आराम मिळेल. डार्क सर्कलही कमी होतील. याशिवाय, डोळ्यांचे व्यायाम तज्ज्ञांकडून शिकून घ्यावेत. वेळोवेळी कॉम्प्युटर स्क्रीनपासून ब्रेक घ्यावा. सकाळी गवतावर अनवाणी चालावे, फायदा होईल. दिवसभरात भरपूर पाणी प्यायला विसरू नका.
चप्पल वापरल्यामुळे पावले काळवंडली आहेत; पावलांवर चपलेच्या पट्ट्यांचे डिझाईन तयार झाले आहे, ते कसे घालवावे? आणि त्वचेचा रंग एकसारखा कसा दिसेल?
तुम्हाला रेग्युलर पेडिक्युअर करावे लागेल. जास्तच काळवंडलेली त्वचा असेल, तर पावलांना ब्लीच लावून टॅन कमी करू शकता. पण वारंवार ब्लीच करणे टाळावे. महिन्यातून एकदा पावलांना ब्लीच केलेले चालेल. पार्लरला जाऊन पेडिक्युअर करून घ्यावे आणि डी-टॅन पॅक दर आठवड्याला किंवा आठवड्यातून दोन वेळा लावावा. फायदा होईल. होम मेड डी-टॅन पॅकही लावू शकता. मसूर डाळ पीठ आणि दही मिक्स करून त्यात चिमूटभर हळद, अर्ध्या लिंबाचा रस घालावा अन् हा पॅक पावलांना लावावा, १५ मिनिटांनी धुऊन घ्यावा. असे काही दिवस रोज केल्यास फायदा होईल. बाहेर जायच्या आधी, चेहऱ्यावर, हाताला, आणि पावलांना सन स्क्रीन जरूर लावावे. त्वचा खूपच काळी पडत असेल, तर मोजे वापरावेत अथवा पूर्ण पाऊल झाकले जाईल असे बूट वापरावेत.
निवेदन
थंडीत पायांना खूप भेगा पडतात, डोळ्यांखाली डार्क सर्कल्स तयार झाली आहेत, ओठ खूप फुटतात, कोंडा काही केल्या जात नाही... तुम्हालाही जाणवतात का अशा समस्या? त्यावर उपाय सापडत नाहीये? मग तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा, आम्ही या सदरातून त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू.
saptahiksakal@esakal.com या ईमेलवर तुमचे प्रश्न पाठवा. ईमेलच्या विषयात ‘ब्यूटी केअर’ असा उल्लेख करायला आणि सोबत तुमचा फोन नंबर लिहायला विसरू नका.