सुंदर केसांसाठी...

स्वप्ना साने
सोमवार, 6 जून 2022

केसांवर केमिकल असलेल्या प्रॉडक्टचा सतत मारा करणे किंवा हेअर स्टाइल करताना सातत्याने हीट प्रोसेसिंग वापरणे, स्ट्रँप शाम्पू वापरणे, अशा काही गोष्टींमुळे केसांचा पोत खराब होतो. त्यामुळे केसांचा प्रकार कोणताही असो, केसांचे आरोग्य राखण्यसाठी काळजी घेणे आवश्यकच आहे.

नागपूरमाझे वय १९ वर्षे आहे. माझा स्किन टाईप नॉर्मल आहे. त्वचेला काही प्रॉब्लेम नाही, पण त्वचेची काळजी घ्यायची म्हणजे नेमके काय करायचे ते कळत नाही. माझ्या मैत्रिणी चेहऱ्याला सतत काहीतरी लावत असतात, मीपण काही लावायला हवे का?
खरेतर टीनएजपासून जवळ जवळ सगळ्या मुली आणि हल्ली मुलगेसुद्धा स्वतःची त्वचा आणि केसांबद्दल जागरूक असतात. त्यात ‘डीआयवाय’ व्हिडिओ तर लाखोंच्या संख्येने उपलब्ध आहेत. त्यामुळे विचार न करता मुली/मुलगे प्रयोग करून बघतात. मैत्रिणींना सूट होणारे प्रॉडक्ट आपल्यालाही सूट होईलच असे नाही. याबाबत तुला विचार करून माहिती घेण्याची इच्छा आहे, हे मला खूप आवडले. खरेतर यामुळे सगळेच वाचक जागरूक होतील. 

त्वचा नॉर्मल आणि प्रॉब्लेम फ्री आहे, तरी त्वचेची काळजी घ्यावीच. म्हणजे रोज त्वचा स्वच्छ करणे. दिवसभर बाहेर असाल, तर सनस्क्रीन लावून जाणे. झोपायच्या आधी ‘सीटीएम’, म्हणजे क्लिन्सिंग, टोनिंग आणि मॉइस्चरायझर त्वचेला लावणे. मेकअप करत असाल तर आधी मेकअप रिमूव्हरने क्लीन करून मग ‘सीटीएम’ करावे. तर हे झाले बेसिक स्किन केअर रूटीन. यात आठवड्यातून एकदा त्वचा एक्सफोलिएट करावी, म्हणजे स्क्रब करून मृत त्वचेचा थर काढावा. नंतर एखादा नरीशिंग पॅक, फ्रूट पॅक अथवा होम मेड पॅक लावावा. 

एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी, त्वचेसाठी आणि केसांसाठीसुद्धा, आपल्या त्वचा प्रकार आणि केसांचा प्रकार लक्षात घेऊनच प्रॉडक्ट निवडावे, अथवा आपल्या ब्यूटी थेरपिस्टला विचारून माहिती करून घ्यावी. कुठल्याही इन्स्टन्ट ग्लो फेअरनेस प्रॉडक्टच्या आहारी जाऊ नये. आपले नॅचरल कॉम्प्लेक्शन आहे, तेच चांगले ठेवायचा प्रयत्न असावा. 

पूर्वी माझे केस बऱ्यापैकी सॉफ्ट आणि सिल्की होते. आता फार ड्राय, डल आणि लाइफलेस दिसतात. मी काही महिने सतत हेअर स्ट्रेटनर वापरले, म्हणून असे झाले असेल का? त्यावर काही उपाय ?
केसांवर सतत केमिकलचा वापर असेल किंवा हिट प्रोसेसने स्टाईलिंग करत असाल, तर केसांचा पोत खराब होतो. त्यात खूप स्ट्राँग शाम्पूचा वापर अथवा रोज शाम्पू करणे, किंवा अनहेल्दी डाएट या गोष्टीही केस खराब होण्यास कारणीभूत असतात. 
 

शक्य असल्यास माइल्ड हर्बल शाम्पू वापरावा आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन हेअर स्पाच्या सेटिंग कराव्यात, त्याने केसांचा पोत बराच सुधारतो. हॉट कर्लिंग रॉड अथवा स्ट्रेटनरचा उपयोग न केलेलाच बरा. 

वेळोवेळी ऑइल मसाज करावा. केसांसाठी खोबरेल तेल, बदाम तेल आणि एरंडेल तेल सम प्रमाणात एकत्र करून हलका मसाज करावा. दोन तासांनी केस माइल्ड शाम्पूने आणि कोमट अथवा गार पाण्याने धुवावे. हेअर ड्रायर वापरू नये, केस नैसर्गिकरीत्या वाळू द्यावेत. एवढे करून बघा, नक्की फायदा होईल. 

केस कशामुळे तुटतात? काय कारणे असू शकतात?
याची अनेक कारणे असू शकतात. खूप जोरात ओढून केस विंचरणे. चांगल्या दर्जाचा कंगवा न वापरणे. केस ओले असताना विंचरणे. ओले केस घेऊन झोपणे अथवा खूप घर्षण होईल असे केस पुसणे. हेअर स्टाइल करताना खूप घट्ट आणि केसांवर ताण पडेल अशी स्टाइल करणे. चांगल्या क्वालिटीचा शाम्पू नसणे अथवा खूप वेळा शाम्पू करणे. हेअर स्प्रे, हेअर सेटिंग जेलसारख्या स्ट्राँग केमिकल असलेल्या प्रॉडक्टचा सारखा वापर करणे. हीट प्रोटेक्टिंग लोशन वापरून हिट स्टाईलिंग केले, तरीही सारखे सारखे केल्याने केस खराब होतात आणि तुटतातही. 

या सगळ्याव्यतिरिक्त, योग्य आहार नसणे, खूप जागरण होणे, किंवा पाणी चांगले नसणे यामुळेही केस गळतात. तब्येतीच्या सारख्या काही तक्रारी असतील, तरीही अशक्तपणामुळे केस गळती होऊ शकते आणि केसांचा पोत खराब होऊ शकतो. 

मी ज्या पार्लरमध्ये जाते, तिथे मला नेहमी हेअर स्पा करून बघायला सुचवतात, पण अजून मी केलेला नाही. माझे केस खूप कुरळे आहेत. त्यामुळे सांगत असावेत का? की खरेच स्पा केल्यावर केस चांगले दिसतात?
हेअर स्पा केल्याने केसांचा पोत सुधारतो, विशेषतः ज्यांचे कुरळे केस असतील, अथवा खूप कोरडे, फ्रीझी, डल लुक असेल, तर हेअर स्पा जरूर करून बघावा. हेअर स्पा केल्याने स्काल्पची त्वचा स्वच्छ होते, नरीशमेंट मिळते. कोंडा कमी होतो. रक्ताभिसरण चांगले होते. तेल आणि पाण्याचे संतुलन होऊन केस हायड्रेट होतात. या सगळ्यामुळे केसांची मुळे स्ट्राँग होऊन केसांचा पोत सुधारतो, केस मऊ आणि चमकदार होतात. कुरळे केसही सॉफ्ट आणि मॅनेजेबल होतात. थोड्याफार प्रमाणात केस गळणेही कमी होते.  मात्र हेअर स्पा प्रॉडक्टची क्वालिटी विचारून, त्याची माहिती करून घ्यावी. तुमच्या केसांना सूट होणारे प्रॉडक्ट वापरत आहे ना याची खात्री करून घ्यावी.
                           

(लेखिका कॉस्मेटॉलॉजिस्ट आहेत.)

निवेदन 
थंडीत पायांना खूप भेगा पडतात, डोळ्यांखाली डार्क सर्कल्स तयार झाली आहेत, ओठ खूप फुटतात, कोंडा काही केल्या जात नाही... तुम्हालाही जाणवतात का अशा समस्या? त्यावर उपाय सापडत नाहीये? मग तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा, आम्ही या सदरातून त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. 
saptahiksakal@esakal.com या ईमेलवर तुमचे प्रश्न पाठवा. ईमेलच्या विषयात ‘ब्यूटी केअर’ असा उल्लेख करायला आणि सोबत तुमचा फोन नंबर लिहायला विसरू नका. 

संबंधित बातम्या