पाऊस आला; त्वचेला, केसांना जपा!

स्वप्ना साने
सोमवार, 25 जुलै 2022

पावसाळ्यामध्ये त्वचा, केस यांची विशेष काळजी घ्यावी लागते. आर्द्रतेमुळे तेलकटपणा, चिकटपणा अशा समस्या उद्‍भवू शकतात. त्यासाठी वेळीच योग्य ती काळजी घेतल्यास या समस्यांचे निकारण होऊ शकते.

मॉन्सून सुरू झाला की माझी कोरडी त्वचा तेलकट जाणवते; आणि काहीच लावायची इच्छा होत नाही कारण खूप चिप चिप वाटते. काय करावे? कशी काळजी घ्यावी?

हवेतील आर्द्रता आणि त्यामुळे येणारा घाम यामुळे त्वचेतील रोम छिद्रे अतिरिक्त तेल निर्माण करतात. परिणामी त्वचा तेलकट आणि चिपचिपी जाणवते. हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात ही ड्राय असणारी त्वचा या दिवसात ऑइली किंवा कॉम्बिनेशन टाईप जाणवू शकते. असे असताना त्वचेला काहीच लावायची इच्छा होत नाही, हे साहजिकच आहे. पण रुटीन केअर घेणे गरजेचे आहे, जसे CTM रुटीन फॉलो करणे. क्ले बेस्ड फेस वॉश आणि फेस पॅक लावावा. उदा. मुलतानी मातीयुक्त फेस वॉश आणि आणि चंदन पावडर, ऑरेंज पावडरयुक्त फेस पॅक आठवड्यातून दोन वेळेस लावावा. असा पॅक घरीही तयार करू शकता. एक चमचा चंदन पावडर, एक चमचा ऑरेंज पावडर, अर्धा चमचा मुलतानी माती आणि रोज वॉटर मिक्स करून पॅक तयार करावा. पंधरा मिनिटे लावून मग गार पाण्याने धुऊन घ्यावा. नंतर ॲलोव्हेरा जेल लावून त्वचा मॉइस्चराइझ करावी. 

बाहेर जाण्याआधी सन स्क्रीन जरूर लावावे. त्याआधी चिपचिपी फीलिंग कमी करण्यासाठी चेहऱ्यावर बर्फ फिरवावा. तुम्ही रोज वॉटरचा बर्फदेखील तयार करून लावू शकता. असे केल्यास तुम्हाला मॉन्सूनमध्येही त्वचा फ्रेश आणि टवटवीत जाणवेल. 

पावसाळ्यात केस खूप तेलकट आणि चिकट जाणवतात. हेअर वॉश केल्याच्या दुसऱ्याच दिवशी खराब दिसायला लागतात. घाम येतो त्यामुळे केसांना दमट वासही येतो, त्यामुळे बाहेर जाताना खूप एम्बॅरसिंग होतं. काही उपाय आहे का यावर?
दमट वातावरण असल्याने केसांना एक प्रकारचा वास यायला लागतो, त्यात जर त्वचा तेलकट असेल तर केस लवकरच खराब दिसतात. अशा वेळेस केसांना हर्बल शिकेकाई आवळा युक्त माईल्ड शाम्पू लावावा. एक दिवसाआड शाम्पू करावा. आठवड्यातून एकदा हेड मसाज करावा; खोबरेल तेल आणि एरंडेल तेल सम प्रमाणात मिक्स करून त्यात रोजमेरी ऑइल, लव्हेंडर ऑइल अथवा टी ट्री ऑइल अशा प्रकारच्या इसेन्शियल ऑइलचे काही थेंब टाकावेत. असे केल्यास केसांना पोषण तर मिळतेच, पण छान सुगंधही येतो. एका स्प्रे बॉटलमध्ये पाणी घेऊन त्यात इसेन्शियल ऑइलचे काही थेंब टाकावेत. केस पूर्ण वाळत आले की हे सोल्युशन हलकेच केसांवर स्प्रे करावे. दिवसभर छान सुगंधित आणि फ्रेश जाणवेल. आठवड्यातून एकदा हेअर पॅक लावावा. मुलतानी माती, भिजलेल्या मेथी दाण्याची पेस्ट आणि कपूरकचरी पावडर, पाण्यात मिक्स करून हा पॅक स्काल्प आणि केसांना लावावा. एका तासाने धुवावे. केस चमकदार आणि सुगंधित होतील. वरील उपाय करून बघा, तुमचा प्रॉब्लेम नक्की सुटेल आणि कुठेही एम्बॅरसिंग सिच्युएशन येणार नाही. 

कॉम्बिनेशन स्किनसाठी पावसाळ्यात काय काळजी घेता येईल? खूप व्हाइट हेडही आहेत.
त्वचेमधील रोम छिद्रांमध्ये जेव्हा मृत त्वचा, तेल आणि जिवाणू ट्रॅप होतात तेव्हा ती बंद होतात आणि त्याचे व्हाईट हेडमध्ये रूपांतर होते. ‘T-झोन’वर हे जास्त प्रमाणात आढळून येतात. या स्किन टाईपची काळजी घेताना सॅलिसिलीक ॲसिड किंवा बेंझोईल पॅरॉक्साइडसारखे अँटी बॅक्टेरियल घटक असलेला फेस वॉश वापरावा. पंधरा दिवसांतून एकदा ब्यूटी थेरपिस्टकडून क्लिनअप करावे, त्या वेळेस व्हाईट हेड क्लीन करायला सांगावे. होम केअरसाठी टी ट्री ऑइलयुक्त फेस पॅक आठवड्यातून दोन वेळेस लावावा. CTM रुटीन नियमित करावे. हायड्रेटिंग ॲलोव्हेरा बेस्ड मॉइस्चरायझर लावावे. मेकअप करत असाल तर नॉन कोमेडोजेनिक प्रॉडक्ट वापरता आहात याची खात्री करून घ्यावी. 
 
पावसाळ्यात फंगल इन्फेक्शन कसे टाळावे? विशेषतः पावलांना फंगल इन्फेक्शन होऊ नये यासाठी काय काळजी घ्यावी?
पावसाळ्यात आर्द्रतेमुळे फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते. पायाच्या बोटांच्या मधे अथवा नखांना, किंवा पावलांवरसुद्धा इन्फेक्शन होऊ शकते. त्वचा खाजणे, लालसर दिसणे आणि चट्टे उठणे ही काही लक्षणे आहेत. ओपन फूटवेअर वापरावे, म्हणजे चपला किंवा समोरून ओपन असलेले बूट. पायाची त्वचा कोरडी ठेवावी. अँटी फंगल पावडर लावावी. इन्फेक्शन झाले असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने अँटिफंगल औषध घ्यावे, म्हणजे जास्त त्रास होणार नाही.

(लेखिका कॉस्मेटॉलॉजिस्ट आहेत.)

निवेदन 
थंडीत पायांना खूप भेगा पडतात, डोळ्यांखाली डार्क सर्कल्स तयार झाली आहेत, ओठ खूप फुटतात, कोंडा काही केल्या जात नाही... तुम्हालाही जाणवतात का अशा समस्या? त्यावर उपाय सापडत नाहीये? मग तुमचे प्रश्न आम्हाला पाठवा, आम्ही या सदरातून त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू. 
saptahiksakal@esakal.com या ईमेलवर तुमचे प्रश्न पाठवा. ईमेलच्या विषयात ‘ब्यूटी केअर’ असा उल्लेख करायला आणि सोबत तुमचा फोन नंबर लिहायला विसरू नका. 

संबंधित बातम्या