घातक प्रयोगांची गोष्ट

नीलांबरी जोशी 
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

बुक-क्लब
 पुस्तक : एकर्स ऑफ स्किन 
 लेखक : ॲलन हॉर्नब्लम

इंग्लंडमधला जस्टिन हा एक देखणा, बुजरा, आत्ममग्न आणि हळवा तरुण राजकीय मुत्सद्दी असतो. टेस ही एक लाघवी, सुंदर आणि ‘ऍम्नेस्टी’ या मानवतावादी संस्थेत काम करणारी तरुणी असते. एका परिषदेत ते भेटतात तेव्हा जस्टिन टेसच्या प्रेमात पडतो. कामाच्या निमित्ताने जस्टिनची केनियामध्ये नियुक्ती होते. तेव्हा टेसशी लग्न करुण तो तिला केनियाला घेऊन जातो. पण ऍम्नेस्टीच्या कामासाठी एका कृष्णवर्णीय सहकाऱ्याबरोबर काही माहिती गोळा करायला गेलेल्या टेसचा खून होतो. या घटनेने ‘द कॉन्स्टंट गार्डनर’ हा चित्रपट सुरू होतो. नंतर आपल्या बायकोच्या खुनाची माहिती गोळा करताना जस्टिनला काही भयानक गोष्टी कळत जातात. त्यापैकी एक म्हणजे, एक अमेरिकन फार्मा कंपनी केनियातल्या लोकांना गिनिपिग बनवून क्षयरोगाची लस शोधण्यासाठी त्यांच्यावर प्रयोग करत असते. त्या औषधाचे भयंकर दुष्परिणाम कंपनीला कळत असतात पण तरीही स्वस्तात मिळणारे गिनिपिग्ज सोडण्याची त्यांची तयारी नसते. फार्मा कंपनीबद्दल हा शोध लावणाऱ्या टेसचा खून होतो. 

या चित्रपटात दाखविल्याप्रमाणे ज्या माणसांवर औषधांच्या चाचण्या घ्यायच्या असतात त्यांना कळू न देता त्यांच्यावर घातक प्रयोग करत राहाणे हा प्रकार इतिहासाला अजिबातच नवीन नाही. उदाहरणार्थ, डॉ. अल्बर्ट क्‍लिगमन या पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातल्या त्वचाविज्ञानाच्या प्राध्यापकाने होम्सबर्ग तुरुंगातल्या कैद्यांवर अनेक वैद्यकीय प्रयोग केले होते. होम्सबर्ग हा अमेरिकेतल्या फिलाडेल्फिया राज्यातला सर्वात मोठा तुरुंग होता. या तुरुंगात पाऊल ठेवल्यावर क्‍लिगमनच्या मनातला पहिला विचार होता.. ‘त्वचेवरच्या संशोधनासाठी आता हजारो मैल त्वचा उपलब्ध आहे...’ त्यामुळेच क्‍लिगमनच्या या अमानुष वैद्यकीय प्रयोगांवर ऍलन एम हॉर्नब्लम याने लिहिलेल्या पुस्तकाचे नाव आहे ‘एकर्स ऑफ स्किन..!’ औषधांसाठी मानवी शरीरावर चालणाऱ्या चाचण्या आणि वैद्यकीय प्रयोग याबाबत खरे तर ‘न्यूरेंबर्ग कोड’ अस्तित्वात आहे. हे ‘न्यूरेंबर्ग कोड’ कसे तयार झाले यामागचा इतिहास जाणून घेण्यासारखा आहे. दुसऱ्या महायुध्दात मलेरियासारख्या आजारांपासून हाडांच्या प्रत्यारोपणापर्यंत अनेक गोष्टींवर छळछावण्यातल्या ज्यू लोकांवर जर्मन डॉक्‍टर्सनी चाचण्या घेतल्या. या चाचण्यांची ज्यू लोकांना कल्पना तर नव्हतीच पण त्यांना भूलसुद्धा न देता त्यांच्यावर अनन्वित अत्याचार करण्यात आले. हजारो ज्यू यात मरण पावले. अनेकजणांना नंतर आयुष्यभर विकलांग व्हावे लागले. 

या गुन्ह्यांसाठी अमेरिकन लष्करी न्यायालयाने ९ डिसेंबर १९४६ रोजी २३ जर्मन डॉक्‍टरांवर खटला चालू केला. या डॉक्‍टरांपैकी डॉ. गेरहार्ड रोझ याला न्यायालयाने २० ऑगस्ट १९४७ रोजी फाशीची शिक्षा ठोठावली. पण डॉ. रोझ याने अमेरिकेने फिलिपाईन्समधल्या तुरुंगातल्या कैद्यांवर केलेल्या वैद्यकीय प्रयोगांचा उल्लेख केला. अमेरिकन डॉक्‍टरांनी फिलिपाईन्समध्ये प्लेग आणि कॉलरा या रोगांवरच्या प्रयोगांमध्ये कैद्यांना या रोगाचे जंतू टोचले होते. डॉ. रोझ याने ही घटना न्यायालयासमोर आणून दिल्यानंतर त्याच्या फाशीच्या शिक्षेचे जन्मठेपेच्या शिक्षेत रूपांतर झाले..! 

या खटल्यानंतर माणसांवर होणाऱ्या वैद्यकीय प्रयोगांमध्ये नैतिकता पाळली जावी यासाठी १९४८ मध्ये महत्त्वाचे १० नियम असलेले ‘न्यूरेंबर्ग कोड’ तयार झाले. मानवी शरीराच्या संशोधनासाठी जे लोक स्वेच्छेने तयार होतात त्यांचे मूलभूत हक्क आणि आरोग्य सांभाळणे हा या नियमांचा उद्देश होता. ज्या माणसावर वैद्यकीय प्रयोग करणार येणार आहेत त्या माणसाची डॉक्‍टरांनी परवानगी घेणे यातल्या नियमांनुसार अत्यावश्‍यक होते. 

पण ‘न्यूरेंबर्ग कोड’चे हे नियम धाब्यावर बसवून डॉ. क्‍लिगमन याने होम्सबर्गच्या तुरुंगातल्या कैद्यांवर सुमारे २० वर्षे वैद्यकीय चाचण्या घेतल्या. त्याच होम्सबर्गच्या तुरुंगात प्रौढ साक्षर वर्ग घेण्यासाठी हॉर्नब्लम हा ‘एकर्स ऑफ स्किन’ या पुस्तकाचा लेखक सुमारे २० वर्षे जात होता. या दरम्यान तिथल्या कैद्यांच्या अंगावर विविध ठिकाणी बॅंडेजेस असलेली पाहून हॉर्नब्लमला शंका आली. त्याने विचारणा केल्यावर आपल्यावर झालेल्या वैद्यकीय चाचण्यांच्या भयानक कथा या कैद्यांनी हॉर्नब्लमला सांगितल्या. ते ऐकून त्याने पुस्तक लिहिण्याच्या दृष्टीने शेकडो कैदी, डॉक्‍टर्स आणि या प्रयोगांशी संबंधित असलेल्या लोकांच्या मुलाखती घेतल्या. 

त्यानंतर १९९८ मध्ये प्रकाशित झालेले ‘एकर्स ऑफ स्किन..’ हे पुस्तक चार भागात विभागलेले आहे. पहिल्या भागात क्‍लिगमनने होम्सबर्गमधल्या कैद्यांवर कोणत्या रोगांवरची औषधे शोधण्यासाठी आणि कोणत्या सौंदर्यप्रसाधनांच्या सुरक्षेसाठी प्रयोग केले याबद्दल लिहिले आहे. दुसऱ्या भागात अमेरिकेतल्या निरनिराळ्या तुरुंगातले वैद्यकीय प्रयोग मांडले आहेत. तिसऱ्या भागात होम्सबर्गमधल्या तुरुंगातल्या कैद्यांवर प्रयोग कसकसे केले याच्या सविस्तर कहाण्या आहेत. चौथ्या भागात होम्सबर्गमधले हे प्रयोग कसे थांबले याबद्दल माहिती आहे. 

होम्सबर्गमधल्या कैद्यांवर लठ्ठपणावर आणि व्हायरल इन्फेक्‍शन्सवर मात करणारी औषधे, अँटिबायोटिक्‍सचे प्रमाण, तसेच डोळ्यात टाकायचे ड्रॉप्स, चेहऱ्याला लावायची क्रीम्स आणि टूथपेस्ट्‌स अशा गोष्टींच्या चाचण्या घेतल्या गेल्या. त्यासाठी आपल्याला कोणता घटक, द्रव्य, रसायन किंवा कोणते औषध दिले जाते आहे याची सुतराम कल्पना कैद्यांना नव्हती. गोरे आणि कृष्णवर्णीय अशा दोन्ही कैद्यांवर हे प्रयोग केले गेले. पण कृष्णवर्णीयांचे प्रमाण चिक्कार जास्त होते. डॉ. बिऍट्रिस ट्रॉयन या स्त्रीरोगचिकित्सक असलेल्या क्‍लिगमनच्या बायकोनेही होम्सबर्गमधल्या स्त्री-कैद्यांवर सॅनिटरी नॅपकिन आणि इतर प्रयोग केले होते. अनेक फार्मा कंपन्यांनीच चक्क या प्रयोगांना अर्थसाहाय्य पुरवले होते. उदाहरणार्थ, ‘ड्यूपॉंट’ कंपनीने सॅनिटरी नॅपकिन्सचे १५० महिला कैद्यांवर प्रयोग केले होते. ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ कंपनीने आपल्या टूथपेस्ट्‌स आणि माऊथवॉश किती प्रमाणात घातक आहेत याच्या चाचण्या घेतल्या होत्या. 

पुस्तकाच्या दुसऱ्या भागात अमेरिकन डॉक्‍टरांनी वेळोवेळी तुरुंगातल्या कैद्यांवर कोणते वैद्यकीय प्रयोग केले त्याचे तपशील आहेत. रिचर्ड पी स्ट्रॉंग या अमेरिकन डॉक्‍टरने मनिलाच्या तुरुंगात कॉलराच्या विषाणूचा कैद्यांवर प्रयोग केला होता. या प्रयोगात १३ कैदी मरण पावले होते. ‘लुईझियाना स्टेट बोर्ड ऑफ हेल्थ’ या सरकारी खात्यातल्या डॉक्‍टरांनीच तिथल्या तुरंगातल्या कृष्णवर्णीय कैद्यांना ५ आठवडे विशिष्ट अन्न खायला घातले. ते अन्न तयार करताना वापरलेल्या सल्फ्युरिक ऍसिडचा मानवी शरीरावर काय परिणाम होतो ते त्यांना आजमवायचे होते. तसेच ओहायो तुरुंगामधल्या काही कैद्यांवर तर चक्क कर्करोगाच्या चाचण्या घेतल्या गेल्या होत्या. कॅन्सरच्या जिवंत पेशी या कैद्यांना इंजेक्‍शनद्वारे टोचल्या जायच्या. ओरेगॉन आणि वॉशिंग्टनच्या तुरुंगात पुरुषांच्या प्रजोत्पादनावर किरणोत्साराचा काय परिणाम होतो त्याच्या चाचण्या घेण्यात आल्या. त्यासाठी ५ किंवा त्यापेक्षा जास्त वेळा त्यांची टेस्टिक्‍युलर बॉयॉप्सी करण्यात आली होती. 

पुस्तकाच्या तिसऱ्या भागात होम्सबर्गच्या तुरुंगात कैद्यांवर कसे प्रयोग केले ते तपशीलवार दिले आहे. रॉय विल्यम्स या कैद्याचे एका शांपूच्या चाचणीत डोक्‍यावरचे सगळे केस झडले. जॉनी विल्यम्स या कैद्याच्या शरीरावरच्या चाचण्यांमुळे अनेक व्रण पडले. त्याच्या त्वचेचा रंगही काही ठिकाणी कायमस्वरूपी बदलला. जेरोम रोच या कैद्यावर एका विशिष्ट गोळ्यांची चाचणी घेतल्यावर त्याला रुग्णालयात हलवावे लागले आणि त्याचे लिव्हर कायमस्वरूपी काम करेनासे झाले. 

अल झबाला या २७ वर्षांच्या अमेरिकन कैद्याची कहाणी खूपच करुण आहे. त्याला ‘एलएसडी’पेक्षा १० पट जास्त तीव्रतेच्या घटकाचे इंजेक्‍शन दिले गेले. त्यानंतर एक महिना घशाला कोरड पडत असल्यामुळे त्याला अन्नही गिळता येत नव्हते. ‘डाऊ केमिकल्स’ या खते आणि कीटकनाशके बनवणाऱ्या कंपनीने एका खतात डिऑक्‍सिन हा घटक वापरला होता. त्या घटकामुळे माणसांना कॅन्सर किंवा प्रजोत्पादनातल्या समस्या होऊ शकतात. या डिऑक्‍सिनचे प्रयोग अल झबालावर झाल्याचे सिध्द झाले होते. काही वर्षांनी ‘करेक्‍शन’ या मासिकात फिलाडेल्फिया तुरुंगातल्या कैद्यांवर झालेल्या वैद्यकीय प्रयोगांबद्दल विशेषतः ‘डिऑक्‍सिन’बद्दल लेख छापून आला होता. अल झबालाने तो लेख वाचल्यावर तात्काळ त्या लेखात आपलेच वर्णन केले आहे हे त्याच्या लक्षात आले होते. 

एका नियतकालिकामध्ये १९६७ मध्ये डॉ. केलर यांच्या लेखात हे प्रयोग करताना मानवी हक्कांची पायमल्ली कशी होते आहे याचे उल्लेख होते. १९७३ पर्यंत कैद्यांवर होणाऱ्या वैद्यकीय प्रयोगांवरची टीका कळसाला पोचली. त्यानंतर होम्सबर्गमधले वैद्यकीय प्रयोग १९७४ मध्ये बंद झाले. हॉर्नब्लमच्या या पुस्तकावर अर्थातच टीकाही झाली. ‘या प्रयोगांमध्ये कैद्यांना नाही म्हणायचे हक्क होते. नाझींचे प्रयोग केल्यानंतर कैद्यांचे मृत्यू झाले होते. तसेच त्यांना प्रयोगांचे पैसे दिले नव्हते आणि ‘‘न्यूरेंबर्ग कोड’’ नाझी डॉक्‍टरांसाठी होते,’ असे या प्रकरणाबद्दल अमेरिकेतल्या डॉक्‍टरांचे म्हणणे होते. 

हे प्रयोग करणाऱ्या क्‍लिगमनच्या नावावर आज ‘रेटिन ए’ या त्वचेवरच्या क्रीमचे पेटंट आहे. प्रसिद्धीच्या हव्यासाने मानवतावादाकडे दुर्लक्ष करणारे क्‍लिगमनसारखे लोक सर्व क्षेत्रात आहेत. मुख्य म्हणजे क्‍लिगमन हा काही चांगला संशोधक नव्हता असे त्याच्या सहाय्यकाने कबूल केले होते. क्‍लिगमनने अनेक प्रयोग वेळापत्रकाच्याआधीच संपवले आणि सिध्द न झालेल्या गोष्टींबद्दल निष्कर्ष काढून तो रिकामा झाला होता. क्‍लिगमनने ठरावीक वेळेआधी सर्वेक्षणे उरकली, अनेक औषधांचे गंभीर परिणाम नोंदवलेच नाहीत आणि तुरुंगातल्या हॉस्पिटलमधल्या कैद्यांचे रक्ताचे नमुने घेतल्याचा दावा केला तेव्हा ते कैदी रुग्णालयात नव्हतेच, असे आरोप त्याच्यावर ‘एफडीए’ने ठेवले होते. नवीन औषधांच्या तपासण्यांचे क्‍लिगमनचे हक्कही ‘एफडीए’ने काढून घेतले होते. 

सौंदर्यप्रसाधने आणि औषधे यांची वाढवली गेलेली बाजारपेठ हे या अमानुष प्रयोगांमागचे महत्त्वाचे कारण आहे. वसाहतवादामुळे आशिया आणि आफ्रिका या खंडातल्या देशांमध्ये गोरा रंग, मृदू त्वचा, सरळ सळसळते केस यांचे आकर्षण कमालीचे वाढले आहे. जे प्रत्यक्षात या देशातल्या सावळ्या वर्णाच्या आणि कुरळे केस असलेल्या लोकांना प्राप्त करणेच शक्‍य नाही. या सौंदर्यप्रसाधनांमुळे आणि पर्यावरणातल्या वाढत्या प्रदूषणामुळे असंख्य शारीरिक आजार वाढले आहेत. चंगळवादी संस्कृतीत सतत कशाचा तरी हव्यास धरल्याने डिप्रेशनसारख्या मनोविकारांचे प्रमाणही बेसुमार वाढत चालले आहे. या वाढत्या शारीरिक आणि मानसिक विकारांवर फार्मा कंपन्या नवनवीन औषधे काढून आपला नफा वाढवत बसतात. त्यामुळे असे प्रयोग थांबवायचे असतील तर मुळात चंगळवादीपणाचा त्याग करायला हवा हे कोणी लक्षात घेत नाही..! 

पुस्तकासाठी ॲमेझॉन लिंक 
https://www.amazon.in/Acres-Skin-Experiments-Holmesburg-Prison/dp/041592...

संबंधित बातम्या