कब मिली थी कहाँ बिछडी...

नीलांबरी जोशी
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

बुक-क्लब    

  •  कथासंग्रह : मेन विदाऊट विमेन 
  •  लेखक : हारुकी मुराकामी

‘‘सर्वात जास्त वेदना कोणती असते सांगू? मी तिला पुरतं ओळखू शकलो नाही किंवा तिचा महत्त्वाचा कप्पा मला अनाकलनीयच राहिला. आता ती मरण पावल्यानंतर तर मला ते कळेल अशी सुतराम शक्‍यता नाही. समुद्राच्या तळाशी एक कुलुपबंद पेटी असावी तसं काहीसं आहे हे..! ही जिवघेणी तडफड आहे..!'' काफूकू म्हणाला. तात्सुकीनं त्याला उत्तर देण्यापूर्वी क्षणभर विचार केला आणि ती म्हणाली ''पण मि. काफूकू, आपलं एखाद्या व्यक्तीवर कितीही जिवापाड प्रेम असलं तरी आपल्यापैकी कोणीही दुसऱ्या व्यक्तीला पूर्णपणे जाणू शकतो का?''...या ओळींमध्ये जशा डोकावतात तशा प्रेम, वेदना, वैफल्य, शृंगार, फसवणूक, आर्तता, गूढपणा अशा अनेक भावना हारुकी मुराकामी या लेखकाच्या ''मेन विदाऊट विमेन'' या कथासंग्रहातल्या सात कथांमध्ये डोकावतात. पण या कथांमधल्या पुरुष व्यक्तिरेखांना जाणवणारी प्रमुख भावना आहे ती म्हणजे, स्त्रियांशिवाय वाटणारा एकाकीपणा..! हारुकी मुराकामी हा ६७ वर्षांचा जपानी लेखक त्याच्या 'काफ्का ऑन द शोअर', 'नॉर्वेजियन वूड' अशा कादंबऱ्या आणि काही कथासंग्रहांमुळे जगप्रसिद्ध आहे. या कथासंग्रहातली पहिली कथा आहे, ड्राईव्ह माय कार..! यातला काफूकू वयाच्या पन्नाशीत आहे. नाटकात अभिनेत्री असलेली बायको कॅन्सरनं मरण पावल्यानंतर तो जास्तच एकाकी, अंतर्मुख आणि काहीसा अबोल होतो. जपानी रंगभूमीवर काही अभिजात नाटकांमध्ये कामं करणारा काफूकू उच्च मध्यमवर्गीय आयुष्य जगत असतो. डोळ्यांना मोतिबिंदू असल्याची शंका आल्यामुळे त्याला आपली पिवळ्या रंगाची कन्व्हर्टिबल मोटारगाडी चालवायचा परवाना मिळत नाही. अनेक गोष्टी सांभाळताना काफूकूसाठी गाडीचा वापर अपरिहार्य असतो. मग तो गाडी चालवायला एक ड्रायव्हर ठेवायचं मुश्‍किलीनं मान्य करतो. ती ड्रायव्हर असते चोवीस वर्षांची युवती मिसाकी..! ''आपलं काम बरं आणि आपण बरं'' अशा पद्धतीत वागणारी मिसाकी काफूकूला आवडते. एके दिवशी मिसाकी, ''तुला फारसे मित्र नाहीत का?'' असं विचारते आणि काफूकूबरोबर तिचं दीर्घ संभाषण सुरू होतं. काफूकू त्याची बायको जिवंत असताना तिच्याबरोबर एकनिष्ठ असतो. पण आपल्या बायकोचे चार जणांशी वेगवेगळ्या काळात शारीरिक संबंध आलेले असतात हे त्याला ठाऊक असतं. बायकोच्या मृत्यूनंतर त्या चौघांपैकी एकाबरोबर ताकात्सुकीबरोबर मैत्री करायचा काफूकू प्रयत्न करतो. पण रात्री उशिरापर्यंत बारमध्ये बसून खूप दारू पिण्यापलीकडे त्यांच्या मैत्रीची मजल जात नाही. ताकात्सुकीसारख्या पुरुषांबरोबर आपल्या बायकोनं का संबंध ठेवले असतील? तिचं त्यांच्यावर खरोखर प्रेम असेल का? असे प्रश्न काफूकूला पडतात. यावर मिसाकी ''काफूकूच्या बायकोचं त्या पुरुषांवर प्रेम नसावंच, म्हणूनच ती त्यांच्याबरोबर संबंध ठेवू शकत होती'' असं उत्तर देते. हे उत्तर ऐकून काफुकू शांतपणे गाडीतच झोपी जातो. त्याची अस्वस्थता कमी होते. 

कथासंग्रहातल्या दुसऱ्या ''यस्टरडे'' या कथेचं नाव बीटल्स या गाजलेल्या संगीतचमूच्या ''यस्टरडे'' या गाण्यावरुन दिलं आहे. मुराकामीचं स्वत:चं संगीतावर असलेलं प्रेम त्याच्या कथांमधल्या बीथोव्हेनपासून बीटल्सच्या उल्लेखांमधून सतत जाणवत रहातं. 

''यस्टरडे'' या कथेतला नायक तानिमुरा वयाच्या तिशीत असताना वाइन टेस्टिंगच्या एका सोहळ्यात त्याला एरिका भेटते. त्याचं मन भूतकाळात जातं. आपल्या कितारु या मित्रासोबत वयाच्या १६व्या वर्षी एका रेस्टॉरंटमध्ये तानिमुरा काम करत असतो. कितारुची मैत्रीण असते एरिका..! कितारुची अभ्यासू असून काहीच शिकण्याची महत्त्वाकांक्षा नसणं एरिकाला खटकत असतं. पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे कितारुला आपल्याबद्दल शारीरिक आकर्षणच वाटत नाही याचा एरिकाला सर्वात जास्त त्रास होत असतो. एरिका आपल्याला सोडून जाणार याची कल्पना असलेला कितारु चक्क तानिमुरालाच एरिकाबरोबर डेटिंग करायची विनंती करतो. ती जर तानिमुराबरोबर गेली तर त्यांच्यात काय चाललं आहे ते तरी आपल्याला कळेल असा त्याचा विचार असतो. तानिमुरा मात्र अनिच्छेनंच एरिकाबरोबर जातो. ते दोघं तेव्हा आपापल्या पूर्वायुष्याबद्दल चिक्कार बोलतात. कितारुबद्दल मनात एक विशेष स्थान असलं तरी त्याच्याबरोबर आयुष्य काढणं जमणार नाही असं एरिका सांगते. नंतर तानिमुराचे एरिका आणि कितारु दोघांशीही काहीच संबंध उरत नाहीत. १६ वर्षांनंतर एरिका भेटते तेव्हा ती एकटीच असते. तानिमुरानं मात्र लग्न केलेलं असतं. कितारु एका मोठ्या हॉटेलमध्ये शेफ असतो आणि एकटाच राहत असतो. कितारुची आपल्याला आजही आठवण येते असं एरिका तानिमुराला सांगते. 

''ऍन इंडिपेंडंट ऑर्गन'' या तिसऱ्या कथेचा नायक आहे डॉ. टोकाई..! उमदा, बुद्धिमान आणि भाषेवर प्रभुत्व असणारा ५२ वर्षांचा टोकाई कॉस्मेटिक सर्जन असतो. स्वत:च्या भल्या मोठ्या अपार्टमेंटमध्ये आनंदानं एकटा राहणारा, उत्तम स्वयंपाक करणारा टोकाई बुद्धिमान आणि चतुर स्त्रियांशी मैत्री एंजॉय करतो. त्या स्त्रियांबरोबर केवळ शारीरिक संबंध ठेवणं हा त्याचा हेतू कधीच नसतो. पण त्याला कोणाबरोबरच कायमस्वरुपी राहायचं नसतं. दरम्यान नाझींच्या छळछावण्यात दाखल झालेल्या एका ज्यू डॉक्‍टरबद्दल वाचून टोकाई अस्वस्थ होतो. भरलं घर, बायकोमुलं असलेला तो ज्यू डॉक्‍टर छळछावणीत गेल्यावर फक्त कैदी क्रमांक अमुकतमुक उरतो. हे वर्णन वाचून टोकाईला माणसाचं अस्तित्व म्हणजे नक्की काय असे प्रश्न पडतात. त्याच सुमारास टोकाई एका विवाहित स्त्रीच्या प्रेमात पडतो. ती स्त्री आपला नवरा आणि टोकाई या दोघांना सोडून तिसऱ्याच पुरुषाबरोबर निघून जाते. कथेच्या शेवटी टोकाई तिच्या अशा वागण्यानं झुरुन मरण पावल्याचं वाचकांना कळतं. ''स्त्रियांना मनात कोणतंही किल्मिष येऊ न देता खोटं बोलण्याचा ऍन इंडिपेडंट ऑर्गन असतो'' असं एक वाक्‍य टोकाईच्या बोलण्यात येतं. त्यावरून या कथेच्या नावामागचं रहस्य उलगडतं. ''बुद्धिमान स्त्रिया आपल्याकडे केवळ एक भोगवस्तू म्हणून पाहणाऱ्या पुरुषांना कंटाळलेल्या असतात'' हे अत्यंत महत्त्वाचं वाक्‍य या कथेत आहे. 

यानंतरच्या ''शहराजाद'' या कथेतल्या आजारी असलेल्या हबारा या तरुणाच्या घरी एक नर्स रोज येते. त्यांच्यात शारीरिक संबंध निर्माण होतात. रोज ती नर्स हबाराला एक कथा सांगते. अरेबियन नाईटसमध्ये शहराजाद अशीच रोज रात्री एक गोष्ट सांगते. त्यामुळे हबारा तिचं टोपणनाव शहराजाद ठेवतो. माध्यमिक शाळेत असताना शहराजाद एका मुलाच्या प्रेमात असते. त्याची गोष्ट एक दिवस ती हबाराला सांगते. त्या प्रगाढ प्रेमापायी त्या मुलाचं घर उघडून ती त्याचा बॅग, त्याचे केस आणि त्याच्या शरीराचा गंध येणारा शर्ट तिनं पळवून आणलेला असतो. पण तिनं त्या घरातल्या वस्तू चोरल्या असं लक्षात आल्यावर तो मुलगा आपल्या घराचं कुलूपच बदलतो. त्यानंतर शहराजाद त्या मुलाला विसरु पहाते. पण पुढे नर्सिंगचं शिक्षण घेताना त्याच्या आईमार्फत परत एकदा तो मुलगा तिला भेटतो. यानंतर काय झालं? ही कथा आपण पुढच्या भेटीत सांगू असं ती हबाराला वचन देते. पण ती परत येणारच नाही असं हबाराला वाटत रहातं. यानंतरची पाचवी ''किनो'' ही कथा मुराकामीनं काहीशा गूढ प्रकारे मांडली आहे. आपली बायको आपल्याशी एकनिष्ठ नाही असं लक्षात येऊन या कथेतला तिशीतला नायक किनो उदास होतो. काहीतरी वेगळं करावं म्हणून आपल्या एका आत्याकडून अर्थसहाय्य घेऊन तो एक बार सुरू करतो. सुरवातीला त्या बारमध्ये कोणीच फिरकत नाही. पण मग एक मांजर येतं आणि तिथेच रहायला लागतं. नंतर काही चित्रविचित्र ग्राहक बारमध्ये येऊन चिक्कार वेळ दारू पीत बसतात. 

एके दिवशी एक देखणी स्त्री येते. दोघांना जॅझ संगीत आवडतं या कारणानं किनोला तिच्याबद्दल आकर्षणही वाटतं. पण बारमधले सगळे गेल्यावर तिच्या अंगावरचे सिगारेटच्या चटक्‍यांचे व्रण ती किनोला दाखवते. कथा नंतर बरीच वळणं घेते. किनोचा मधल्या काळात घटस्फोट होतो. तेव्हा तो काहीकाळापुरता बार बंद करुण आत्मशोधाच्या प्रवासाला निघतो. त्या प्रवासात छोट्या छोट्या गोष्टीत आनंद लुटताना अनेकजण किनोला दिसतात. आपण उगाच एक उदास आयुष्य जगत होतो असं त्याला वाटायला लागतं. इथे ही कथा संपते. 

''सामसा इन लव्ह'' या सहाव्या कथेशी फ्रॅंझ काफ्का या लेखकाच्या गाजलेल्या मेटॅमॉर्फॅसिस या कादंबरीचा संबंध आहे. मुराकामीचा नायक आपल्या दुमजली घरातल्या बेडरुममध्ये सकाळी जागा होतो. आपण....ग्रेगॉर सामसा झालो आहोत हे त्याला कळतं. पण आपण कुठे आहोत ते क्षणभर कळतच नाही. अधाशासारखं खाऊन झाल्यावर त्याला आपण नग्नावस्थेत आहोत याची जाणीव होते. मग तो एक गाऊन घालतो. तेवढ्यात घराची बेल वाजते. एक तरुणी कुलूप दुरुस्त करायला आलेली असते. वरच्या मजल्यावरच्या दाराचं कुलूप दुरुस्त करुण ती निघते. पण आपण एकमेकांशी खूप खूप बोलावं अशी ग्रेगॉरची इच्छा असते. दुरुस्त करायला घेतलेलं कुलूप परत द्यायला आपण येऊ तेव्हा खूप गप्पा मारून असं ती वचन देते. ती गेल्यावर कथेचा नायक ''आपण कोण आहोत? आपण कोण असायला हवं'' याबाबत गोंधळलेलाच असतो. 

''मेन विदाऊट विमेन'' ही या कथासंग्रहातली सातवी आणि शेवटची कथा. यातल्या निवेदकाला कथेच्या सुरवातीला एक फोन येतो. एम नावाच्या महिलेनं आत्महत्या केली असं त्या महिलेचा नवरा निवेदकाला फोनवर सांगतो. निवेदक त्या वार्तेनं कोलमडूनच जातो. एमवर त्याचं पराकोटीचं प्रेम असतं. आता एमच्या आठवणी त्याच्या मनात रुंजी घालायला लागतात. पहिल्या भेटीत दोघं चौदा वर्षांचे असताना शाळेच्या वर्गात खोडरबराचा निम्मा तुकडा त्याला देणारी एम आठवून त्याचा जीव कासावीस होतो. नंतरच्या काळात जगाची सफर घडवून आणू असं सांगणाऱ्या एका भटक्‍याबरोबर एम निघून जाते. त्यानंतरच्या आयुष्यात त्यांच्या काही तुरळक भेटी घडलेल्या असतात. आत्ता जगात आपण सर्वात जास्त असहाय्य आणि एकाकी आहोत असं मनोमन वाटत असतानाच निवेदकाच्या मनात एक विचार येतो. तो म्हणजे, इतका जिव्हाळा असलेल्या एमच्या नवऱ्याला आपल्याहून जास्त एकाकी वाटत असेल..! 

''विदाऊट विमेन'' हा अर्नेस्ट हेमिंग्वेचा १९२७ या वर्षीचा कथासंग्रह होता. हेमिंग्वेवरच्या प्रेमानं मुराकामीनं आपल्या कथासंग्रहाला तेच नाव दिलं आहे. मुराकामीच्या कथांमधले पुरुष गूढ भासणाऱ्या स्त्रियांना समजावून घेण्याचा प्रयत्न करतात. पण तरीही त्या त्यांच्या हाताला लागत नाहीत. त्यावरून ''कब मिली थी कहां बिछडी थी हमें याद नहीं, जिंदगी तुझको तो बस ख्वाबमें देखा हमने'' या ओळींसारखं आयुष्य निसटून जातं असं मुराकामीला सुचवायचं असावं. 

पुस्तकासाठी ॲमेझॉन लिंक :
https://www.amazon.in/Men-without-Women-Haruki-Murakami/dp/191121537X

संबंधित बातम्या