अकेला हूँ मैं, इस दुनियामें.. 

नीलांबरी जोशी
गुरुवार, 26 एप्रिल 2018

बुक-क्लब

  •  कथासंग्रह : गोईंग सोलो 
  •  लेखक : एरिक क्‍लिनेनबर्ग
     

जैसे कभी प्यारे झील के किनारे, हंस अकेला निकले, वैसे ही देखो जी, यह मनमौजी मौजोंके सीनेपे चले.. चांद सितारों के तले.. कोई साथी है तो मेरा साया.. अकेला हूँ मैं.. हे गाणं ऐकल्यावर इथे माझे सूर्य, चंद्र आणि तारे आहेत. हे माझं स्वत:चं छोटंसं विश्व आहे, असं म्हणणारा अमेरिकन विचारवंत थोरो आठवतोच. थोरो जंगलात तळ्याकाठी झोपडी बांधून एकटा राहिला होता. त्याच्या जीवनशैलीबद्दल अनेकांना खूप आदर असतो. पण आज समाजात एकटं राहणाऱ्या माणसांबद्दल ते विक्षिप्त किंवा नार्सिसिस्ट आहे, अशी मतं सर्रास आढळतात. 

अशा एकट्या राहणाऱ्या अमेरिकन माणसांचं 'न्यूयॉर्क विद्यापीठा'नं एक सर्वेक्षण केलं होतं. त्यातले बरेच लोक निराशेनं घेरलेले असतील असं तज्ज्ञाना वाटत होतं. पण प्रत्यक्षात अनेकजणांना 'आपल्या आयुष्यात काय ही एकटं राहायची वेळ आली' असं वाटण्याऐवजी 'आपण सर्वोत्कृष्ट आयुष्य जगत आहोत' याची खात्री होती. गेल्या ५० - ६० वर्षांत आपखुषीनं एकटं राहणाऱ्या आणि उत्तम आयुष्य जगणाऱ्या लोकांच्या संख्येत जगभरात भरच पडत चालली आहे. एकटं राहाण्याचा पर्याय निवडून वेगळ्या वाटेनं जाणाऱ्या या माणसांबद्दल एरिक क्‍लिनेनबर्ग यानं एक पुस्तकच लिहिलं आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे ''गोईंग सोलो'''न्यूयॉर्क टाइम्स'पासून 'गार्डियन'पर्यंत अनेक आघाडीच्या वृत्तपत्रांमध्ये एरिक लिहीत असतो. अमेरिका आणि स्वीडन या देशांमध्ये एकटं राहणाऱ्या विविध वयोगटातल्या, विविध सामाजिक स्तरातल्या लोकांच्या मुलाखती घेऊन एरिकनं काळाला सुसंगत असलेलं हे पुस्तक लिहिलं आहे. आज इतर अनेक देशांच्या तुलनेत अमेरिकेत एकटं राहणाऱ्या माणसांचं प्रमाण खूप कमी आहे. जर्मनी, फ्रान्स आणि इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा या देशांमध्येही अमेरिकेतच्या तुलनेत एकटं राहणाऱ्या लोकांचं प्रमाण जास्त आहे. स्वीडन, नॉर्वे, फिनलंड आणि डेन्मार्क या देशांमध्ये सुमारे ४०-४५ टक्के लोक एकटे राहतात. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या देशांमध्ये एकटं राहणाऱ्या माणसांचं प्रमाण वाढतं आहे ते देश एकत्र कुटुंबपध्दतींसाठी प्रसिद्ध आहेत. जपानमध्ये सुमारे ३० टक्के लोक एकटे राहातात. एकटं राहणाऱ्या माणसांचं प्रमाण झपाट्यानं वाढत चाललं आहे असे तीन देश आहेत चीन, ब्राझील आणि भारत..! 

एकटं राहणाऱ्या या लोकांचा लेखकानं पुस्तकभर ‘सिंगलटन’ असा उल्लेख केला आहे. तरुण व्यावसायिकांपासून ते मध्यमवयीन घटस्फोटितांपर्यंत आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांचे अनुभव यात आहेत. यातल्या अनेकजणांनी संपूर्ण स्वातंत्र्य, आपलं वेळापत्रक बनवून ते पाळायची मुभा, आपल्या सवयींनुसार जगण्यातला आनंद घेत आपली उन्नती आणि विकास हे सगळं साधता येतं याबद्दल समाधानच व्यक्त केलं होतं. नात्यातले तणाव आणि सततच्या मागण्या यात घुसमट करुण घेण्यापेक्षा व्यक्ती म्हणून जगणं या साऱ्यांना महत्त्वाचं वाटतं. अर्थातच प्रत्येक सिंगलटनची कौटुंबिक पार्श्वभूमी निराळी आहे. उदाहरणार्थ, यातली एला ही एक वकील आहे. एलाला भटकंती करायला खूप आवडते आणि स्वतंत्र आयुष्य कसं जगायचं ते तिनं आत्मसात केलं आहे. हेलेनचा दोनदा घटस्फोट झाला आहे. दोन्ही लग्नांमध्ये ती कधीच आनंदात नव्हती. आताचं एकटीचं आयुष्य ती मस्त उपभोगते आहे. 

मध्यमवर्गातले तरुण तरुणी हा सिंगलटन्सच्या संख्येत दिवसेंदिवस जास्तीत जास्त भर टाकणारा प्रकार आहे. एकटं राहाणारे हे तरुण तरुणी खूप प्रगल्भ विचारांचे असतात. एकटं राहिल्यामुळे मिळणारा वेळ ते स्वत:ची व्यावसायिक आणि वैयक्तिक पातळीवर प्रगती करुण घेण्यासाठी वापरतात. या पिढीची समस्या म्हणजे अमुकतमुक लग्न न करता एकटा/एकटी राहातो, त्यामुळे तो/ती दु:खी आहे, म्हणजे तमुकतमुकही दु:खी असणारच अशा गैरसमजांना त्यांना तोंड द्यावं लागतं. दुसऱ्या वयोगटात मध्यमवयीन लोक आहेत. यातले बहुतेक घटस्फोट झाल्यानं किंवा जोडीदाराच्या अचानक मृत्यूनं एकटं राहातात. अशा लोकांच्या मुख्य समस्या म्हणजे त्यांना सणसमारंभात, सार्वजनिक ठिकाणी आणि स्नेहमेळाव्यांमध्ये सामावून घेतलं जात नाही. ते आनंदानं एकटं कसं राहावं ते शिकत जातात. एकटं कसं राहावं याचं काही गाइड नसतं. उदाहरणार्थ, एकट्यासाठीच वाणसामानाची किंवा भाजीची खरेदी करणं आणि स्वयंपाक करणं; स्वत:चा खाजगी वेळ, एकांत एंजॉय करुण समाजात मिसळणं यातला समतोल राखणं; एकट्यानं टीव्हीवरचे कार्यक्रम एंजॉय करणं इथपासून मोबाईल आणि इंटरनेट सारख्या संवादांना दिवसभरात नेमका किती वेळ द्यायचा ते ठरवणं. कधीतरी जाणवणाऱ्या एकाकीपणाशी सामना करणं. एकटं रहाणं हे समाज अपयशाचं लक्षण मानतो. त्यामुळे आपल्यालाही 'अपयशी समजतील' त्या भीतीतून सुटका कशी करुण घ्यावी अशी अनेक आव्हानं सिंगलटन्सना पेलावी लागतात. 

वृद्धापकाळी तरी जोडीदाराची किंवा मुलांसोबत राहण्याची सगळ्यांना आतून गरज वाटत असेल असं आपल्याला वाटतं. पण आपण जर मुलांकडे राहायला गेलो तर परत एकदा फक्त काळजी घेण्याचं काम आपल्याला करावं लागेल हे या पिढीतल्या लोकांना पुरतं माहिती असतं. उदाहरणार्थ, या पुस्तकातली जोआन ही एक निवृत्त मानसोपचारतज्ज्ञ आहे. आपली ११ वर्षांची नात आपला खूप वापर करुण घेते हे तिच्या नेहमीच लक्षात येतं. त्यामुळे आपल्या विवाहित मुलांकडे राहायला जाण्याऐवजी घरातली कामं करायला नोकरचाकर ठेवून आपलं आयुष्य मजेत घालवणं अनेकजण पसंत करतात. पण एकटं राहाण्याचं हे प्रमाण वाढत का गेलं असावं? मुळात मानवजातीच्या इतिहासानुसार २ लाख वर्षं माणूस कुटुंबात राहात होता. एकटं राहाणं तेव्हापासून आजतागायत अनेकांना त्रासदायक वाटतं हे नक्की! कैद्याला कठोर शिक्षा म्हणून एकांतात ठेवणं ही फार पूर्वीपासून पद्धत आहे. त्यामुळे एखादा जीवघेणा प्रसंग घडल्यानं, गरिबीमुळे किंवा आजारपणामुळे ज्यांना जबरदस्तीनं एकटं राहावं लागतं त्यांना एकटेपणासारखा शाप नाही. गरिबीमुळे एकटे राहणारे लोक अनेकदा बेरोजगारी, व्यसनाधीनता, आरोग्याच्या समस्या अशा प्रश्नांना तोंड देतात. सामाजिक स्तर, वय, लिंग, स्वेच्छेनं एकटं रहाणं अशा गोष्टींवर एकटं राहाण्याचे अनुभव वेगवेगळे असतात. तरीही एकटं राहण्याची ही लाट कशी आली याबद्दल ऊहापोह करताना एरिकनं दुसऱ्या महायुद्धानंतर आलेली आर्थिक सुबत्ता, व्यक्तिवाद, स्त्रियांचं उंचावलेलं राहणीमान, संवादाच्या माध्यमांमधली क्रांती, शहरीकरण आणि वाढलेलं आयुष्यमान अशी सहा कारणं मांडली आहेत. एकटं राहताना सगळे खर्च एकच व्यक्ती करत असल्यामुळे ते प्रकरण खर्चिक असतं. ज्यांच्याकडे तसं राहाण्यापुरते पैसे आहेत तेच एकटं राहातात आणि राहू शकतात. अर्थात केवळ पैसे आहेत म्हणून सगळ्यांना एकटं रहाणं जमतंच असं मात्र नाही. एकत्र कुटुंबपद्धती लोप पावत गेल्यानंतर व्यक्तिवादाकडे ओढा वाढला. पण पर्याय निवडून एकटं राहणारी माणसं जोडीदाराबरोबर राहणाऱ्या माणसांच्या तुलनेत समाजाशी जास्त जोडलेली असतात. एकटं राहणारी माणसं मित्रमैत्रिणी आणि सामाजिक किंवा सांस्कृतिक गोष्टींना विवाहित जोडप्यांपेक्षा जास्त वेळ देऊ शकतात. गेल्या पन्नास वर्षात स्त्रियांनी घराबाहेर पडून नोकऱ्या करायचं प्रमाण वाढलं. आर्थिक स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपलं आयुष्य आपण कसं जगावं हे आपल्याला ठरवता येईल याचं त्यांना भान आलं. त्यातून लग्न करण्याचं वय पुढे ढकलणं, स्वत:च्या पायावर उभं राहाणं आणि त्रासदायक लग्न मोडणं त्यांना जमायला लागलं. उदाहरणार्थ, आज भारतात एकटं राहणाऱ्या स्त्रियांची संख्या ७.४१ कोटी आहे. यात घटस्फोटित, विधवा किंवा सेपरेटेड स्त्रियांचं प्रमाण गृहीत धरलेलं नाही. एकूणच एकटं राहणाऱ्या पुरुषांपेक्षा स्त्रियांची संख्या जास्त असली तरी त्यांना समाजाकडून जास्त विरोध आणि त्रास सहन करावा लागतो हेही खरं! 

एकटं राहणारे लोक मोबाईल, मेसेजिंग, इमेल्स आणि सोशल मिडिया या माध्यमांमधून जगाशी संपर्क ठेवू शकतात. खरं तर आपण या माध्यमांमुळे ओव्हरकनेक्‍टेड झालो आहोत. शहरातल्या सततच्या धावपळीमध्ये, तणावपूर्ण संवादांमध्ये, व्हॉटसऍप, फेसबुक, इन्स्टाग्रामच्या वर्दळीमध्ये आपलं छोटं पण शांत घर हे एकट्या माणसांना नव्हे तर सर्वांसाठी वाळवंटातलं मृगजळच ठरतं. 

शहरात एकटं राहाणं खेडेगावात एकटं राहण्याच्या तुलनेत सोपं आहे. शहरात सर्व सेवा आणि सुविधा तिथे चुटकीसरशी उपलब्ध असतात. तसंच आज स्त्रियांचं आयुष्यमान सरासरी ८० आणि पुरुषांचं ७६ असल्यामुळे एक जोडीदार गेल्यानंतर दुसऱ्याला अनेक वर्षं एकटं राहण्याची वेळ येते. 

ऑफिसेसमध्ये कामाचे तास वाढले हेही एकटं रहाण्याचं कारण आहे. आज काम करणाऱ्या अनेकांनी आठवड्याला ७० तास काम करणं अपेक्षित असतं. तेव्हा विशीत किंवा तिशीत लग्न करायला कोणालाच वेळ होत नाही. ते जिथे नोकऱ्या करतात तिथे आपल्या आवडीनिवडी आणि मतं ज्यांच्याशी जुळतात ती माणसंही असतात. उदाहरणार्थ, जस्टिन या एकट्या राहणाऱ्या पत्रकारानं मुलाखतीच्या वेळी माझ्याभोवती माझ्या आवडीनिवडींशी जुळणारी अनेक माणसं आहेत हे एकटं राहूनही एकाकी न वाटण्याचं कारण लेखकाला सांगितलं होतं. समाजातला हा बदल लक्षात घेऊन या प्रश्नानं उग्र रूप धारण करण्याआधी सामाजिक आणि राजकीय धोरणं आखायला हवीत असं लेखकाचं मत आहे. त्यासाठी त्यानं स्टॉकहोममधलं उदाहरण दिलं आहे. तिथे ६० टक्के लोक १९३० सालापासून ''कलेक्‍टिव्ह हाऊस''प्रकारातल्या गृहरचनेत राहातात. या प्रकारात सगळ्यांना स्वतंत्र घरं असतात. पण स्वयंपाकाचा कंटाळा आला तर ३ युरोत जेवण उपलब्ध असतं. वैद्यकीय सेवा, व्यायामशाळा, ग्रंथालय, स्विमिंग पूल अशा अनेक प्रकारच्या सुविधा एकत्रितपणे उपलब्ध असतात. सहा आठवड्यात एकदा प्रत्येकानं स्वच्छता आणि स्वयंपाकात मदत करणं अनिवार्य आहे. हा प्रयोग प्रचंड यशस्वी झाल्यामुळे स्वीडिश सरकारनं १९६० मध्ये अशा योजनांना आर्थिक साहाय्य पुरवायला सुरवात केली आहे. एकाकी लोकांसाठी पुण्यात डॉ. हेमंत देवस्थळी यांनी ''आनंदयात्रा'' हा स्वमदत गट १० वर्षांपूर्वी चालू केला होता. एकट्या आणि निराश असलेल्या लोकांसाठी असे उपाय समाजानं करायलाच हवेत. एकटं राहणाऱ्या प्रत्येकानं, एकटं राहणाऱ्या माणसांना ओळखणाऱ्या प्रत्येकानं तसंच समाजशास्त्रज्ञ मानसशास्त्रज्ञ, आरोग्यावर काम करणारे सर्वजण, अर्थशास्त्रज्ञ, आर्किटेक्‍ट, राजकीय धोरणं आखणारे अशा सर्वांनी हे पुस्तक वाचायलाच हवं. एकटं आणि आनंदानं कसं राहावं या विषयाला वाहिलेलं हे पुस्तक शेवटी या पृथ्वीवरच्या प्रत्येकानं एकत्रितरीत्या आनंदानं कसं राहावं याबद्दलच भाष्य करतं...! 

संबंधित बातम्या