दुसऱ्याच्या दुःखात सुख?

नीलांबरी जोशी
गुरुवार, 10 मे 2018

बुक-क्लब
कथासंग्रह : 'द जॉय ऑफ पेन' 
लेखक : रिचर्ड स्मिथ

सुनील आणि आनंद हे चाळिशीतले एकमेकांचे शेजारी..! आनंदनं एक दिवस सुनीलच्या कुटुंबीयांना जेवायला बोलावलं होतं. त्यावेळी आनंदनं आपली परचेस विभागातली नोकरी सोडून डावखुऱ्या लोकांसाठी लेफ्टोरियम नावानं एक उद्योग काढणार असल्याचं सांगितलं. सुनीलनं त्यानंतर जेवताना हा व्यवसाय काही चालणार नाही, अशा प्रकारचे बोल आनंदला ऐकवले. त्यानंतर आनंदनं जे ऑफिस सुरू केलं ते चालत नव्हतं. आनंदचा धंदा चालत नाही असं खुशीतच सुनील आपल्या घरातल्या लोकांना ऐकवायचा. सुनीलच्या मुलीचं नाव होतं ईशा..! ईशा एक दिवस त्याला म्हणाली, 'डॅड, तुम्हाला schadenfreude म्हणजे काय ते माहिती आहे?' 

दुसऱ्याला त्रास होताना पाहून आपल्याला आनंद होणं यासाठी schadenfreude हा जर्मन शब्द वापरतात. schaden म्हणजे इजा पोचणं आणि freude म्हणजे आनंद..! रिचर्ड स्मिथ या लेखकानं 'द जॉय ऑफ पेन' हे पुस्तक या संकल्पनेवरच लिहिलेलं आहे. 

खरं तर आनंदचा धंदा चांगला चालत नव्हता त्यामुळे सुनीलला काय फायदा होता? तर आनंद चांगला शेजारी असला तरी त्याच्या घरात देशविदेशातून जमवलेल्या अनेक उत्तमोत्तम वस्तू होत्या. तसंच त्याच्याकडे जगभरातून गोळा केलेल्या उत्कृष्ट दारूच्या बाटल्या होत्या. आनंदचा मुलगा जर्मनीत शिकत होता. याचं सुनीलला अनेक वर्ष वैषम्य होतं. आनंदचा धंदा चालत नाही हे त्याला सुखावणारं होतं. नॉर्मन फीदर या संशोधकाच्या म्हणण्यानुसार मत्सराबरोबरच दुसऱ्याला त्याच्या लायकीपेक्षा जास्त मिळतं, याबद्दलचा संताप अशा भावनांना कारणीभूत असतो. या तुलनेला 'सोशल कंपॅरिझन थिअरी' म्हणलं जातं. 

केवळ प्राणी मारुन खाणारा आदिमानव जसा टोळीपद्धतीत एकत्र राहायला लागला तशी मत्सर आणि दुसऱ्याशी तुलना करणं ही निसर्गदत्त भावना वाढीला लागली. तुलनेतून येणारी ही भावना मेंदूत हार्डवायर्ड आहे, असं संशोधकाचं म्हणणं आहे. एकोणीसाव्या शतकानंतर दुसऱ्याच्या त्रासानं किंवा दु:खानं आनंदी होणं हा प्रकार खूपच वाढीला लागला आहे. 

'द जॉय ऑफ पेन' या पुस्तकात एकूण ‌अकरा प्रकरणं आहेत. त्यापैकी पहिल्या 'द हाईज ऑफ सुपिरिऑरिटी' या प्रकरणात माणूस अपवर्ड कंपॅरिझन्स आणि डाऊनवर्ड कंपॅरिझन्स यातला फरक मांडला आहे. एखाद्या अभिनेत्यानं जर पदार्पणातच समजा दोन पारितोषिकं पटकावली तर त्याच्यापुढे दोन पर्याय असतात. पदार्पणातच अनेक पारितोषिकं मिळवलेल्या अभिनेत्याशी जर त्यानं स्वत:ची तुलना केली तर ती अपवर्ड कंपॅरिझन ठरते, पण आपल्या अभिनयापेक्षा कमी प्रतीचा अभिनय केलेल्या आणि पारितोषिक न मिळवलेल्या अभिनेत्याशी तुलना करुन तो स्वत:चं श्रेष्ठत्व सांगत बसला तर ती डाऊनवर्ड कंपॅरिझन. अशी तुलना करताना आपलं लिंग, वय आणि आपला सराव किती आहे तेही पहावं लागतं. 

पुस्तकाच्या दुसऱ्या 'लुकिंग अप बाय लुकिंग डाऊन' या प्रकणात दुसऱ्याचा अपमान करुन, त्याला कमी लेखून आपल्याला बरं वाटणं या प्रवृत्तीबद्दल विस्तारानं लिहिलं आहे. ‘विमानात बिझनेस क्‍लासनं प्रवास करतो हे आपल्याला पुरत नाही, तर आपल्या मित्रांनी इकॉनॉमी क्‍लासनं प्रवास करणं आपल्याला चांगलं वाटण्यासाठी गरजेचं वाटणं’ तोच हा प्रकार..! याची अनेक उदाहरणं टीव्हीवरच्या बातम्या आणि मालिकांमध्ये सापडतात. 'न्यूज अवर'मधल्या चर्चांमध्ये कोणालातरी अनुल्लेखानं मारणं, कोणालातरी बोलताना गप्प करणं, कोणाचंतरी म्हणणं खोडून काढणं हे प्रकार आम जनतेला आवडतात म्हणूनच ते जास्त प्रमाणात दाखवले जातात. ‘तो किंवा ती कसा/कशी पुढे पुढे करत होता/होती, आता बघा, झाला ना अपमान' असा याचा प्रेक्षकांना आनंद होतो. 

या प्रकारचाच पुढचा भाग तिसऱ्या ‘आदर्स मस्ट फेल’ या प्रकरणात आला आहे. दुसऱ्याचा पराभव होणं आपल्याला किती महत्त्वाचं वाटतं ते या प्रकरणात जाणवून आपण भयचकित होतो. स्टीव्ह स्मिथ या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूनं दक्षिण आफ्रिकेविरुध्द खेळताना चेंडू हाताळून फसवणूक केली हे प्रकरण नुकतंच गाजलं. त्यामुळे त्याच्यावर एक वर्षाची बंदी घातली गेली. नंतर स्मिथ पत्रकारांसमोर रडला. ऑलिंपिक किंवा विंबल्डन किंवा क्रिकेटचा विश्वचषक मिळाल्यावर अनेकदा आपलं यश खेळाडू उथळ किंवा हिडीस पद्धतीतही व्यक्त करतात. 

पुस्तकाच्या चौथ्या 'सेल्फ अँड आदर' या प्रकरणात बऱ्याच मजेशीर गोष्टी लक्षात येतात. आपण कोणत्याही घटनेत स्वत:चं भलं कसं शोधतो हे यात कळतं. समजा, अनघाचं ऑफिसमधल्या तुषारवर मनोमन प्रेम आहे. शामली ही अनघाची जिवाभावाची मैत्रीण. पण आकर्षक, बुद्धिमान शामलीकडे तुषार जास्त लक्ष देतो याची तिला जाणीव आहे. शामली एका वृत्तपत्रासाठी काम करते. त्या वृत्तपत्रानं दुसऱ्याच कोणाचा तरी मजकूर वापरला या कारणास्तव शामलीला काढून टाकलं. अनघाला याचं काही प्रमाणात वाईट वाटतं. पण शामलीची नोकरी गेली याबद्दल दु:ख व्यक्त करताना ती, ‘वाईट वाटतं’ यानंतर ‘शामली जे काही वागली ना, त्याचं मला भयंकर आश्‍चर्य वाटतं गं. वृत्तपत्राची यात चूक नाही. शामलीलाच समुपदेशनाची गरज आहे’ असं हमखास म्हणते. विल्यम जेम्स या प्रख्यात मानसशास्त्रज्ञानं आपल्या 'द प्रिन्सिपल्स ऑफ सायकॉलॉजी' या पुस्तकात मानवी मन कसा विचार करतं याबद्दल विस्तारानं लिहिलं आहे. आपल्या मनात मदत करण्याच्या एकत्र धरुन राहण्याच्या भावनेबरोबर सतत मत्सर आणि एकप्रकारची विरोधाची भावना नांदत असते. 

पुस्तकाच्या पाचव्या 'डिझर्व्हड मिसफॉर्च्युन्स आर स्वीट' या भागात दुष्ट प्रवृत्तीच्या माणसांना शिक्षा व्हावी असं वाटताना आपल्याला दुसऱ्याचा छळ झालेला कसा आनंद देतो ते कळतं. अनेक चित्रपटांमध्ये खलनायक नायक/नायिका/इतरजण/लहान मुलं यांचा अनन्वित छळ करतो. चित्रपटाच्या शेवटी खलनायक जर तडफडून किंवा हाल होऊन मरत असेल तर प्रेक्षकांना त्यात अत्यानंद होतो. सर्वसाधारणपणे, ज्या लोकांचं वाईट होतं ते त्यांच्या कृत्यांमुळेच होतं अशी भावना आपल्या मनात असते. 

'जस्टिस गेटस्‌ पर्सनल' हे या पुस्तकातलं सहावं प्रकरणही या न्यायाच्या भावनेबद्दलच आहे. सगळ्यांना सगळं ज्याच्या त्याच्या पात्रतेप्रमाणे मिळेल असं आपल्याला वाटतं. पण लायकीनुसार कोणाला कधीच काही मिळत नाही. वेळेवर काही घडत नाही असंही आपलंच एक मन सांगतं. मग आपल्याला वाईट वागवणाऱ्या लोकांचं वाईट झालं तर आपल्याला जास्त बरं वाटतं. उदाहरणार्थ, अमेरिकेतल्या ट्‌विन टॉवरच्या हल्ल्यात ज्या लोकांचे नातेवाईक मरण पावले त्या लोकांना ओसामा बिन लादेनच्या मृत्यूमुळे जास्त समाधान वाटलं. 'ह्युमिलिटेनमेंट' या सातव्या प्रकरणात ज्यात कोणाचातरी सर्वात जास्त अपमान होतो असे टीव्ही कार्यक्रम जास्त लोकप्रिय असतात अशी एक धक्कादायक गोष्ट कळते. १९व्या शतकापर्यंत तुरुंगवासाऐवजी लाकडी चौकटीत बंदिस्त करुन लोकांसमोर एखाद्याचा यथेच्छ अपमान करणं हीच शिक्षा दिली जायची. यात गुन्हेगारांची निंदानालस्ती तर केली जायचीच, पण त्यांच्या अंगावर कुजलेल्या अन्नापासून मेलेले प्राणी फेकण्यापर्यंत काहीही चालायचं. अशा गुन्हेगारांबद्दल पाहाण्याच्या मनात असायची ती schadenfreude ही भावना..! 

पुस्तकाच्या आठव्या 'देअर इज समथिंग अबाऊट एन्व्ही' या प्रकरणात मत्सराबद्दल सविस्तर माहिती आहे. गीतरामायणातली सीता 'जाताच पाहतील हरीण सासवा जावा, करतील कैकेयी भरत आपुला हेवा' असं श्रीरामांना म्हणते. पण या हेव्यानं जर उग्र रुप धारण केलं तर तो मत्सर द्वेषात परावर्तित होतो. तुम्हाला जे हवंय ते दुसऱ्या माणसाला मिळतंय या विचारात असमाधान, दुसऱ्याचं वाईट व्हावं अशी इच्छा आणि स्वत:बद्दलचा संताप याचं मिश्रण मत्सर या भावनेत हमखास असतं. ज्या व्यक्तीबद्दल मत्सर वाटत असतो त्या व्यक्तीच्या बाबतीत जर काही वाईट घडलं तर तुम्हाला एकदम मोकळं आणि हलकं वाटतं. पुस्तकाचं नववं प्रकरण 'एन्व्ही ट्रान्सम्युटेड' हेही मत्सर या भावनेवरच आधारित आहे. मत्सराबरोबर मनात कायम आपल्यावर अन्याय होतो आहे, ही भावना असतेच. ज्या व्यक्तीबद्दल मत्सर वाटतो त्याला त्याच्या लायकीपेक्षा जास्त काहीतरी मिळतंय असे विचार दरवेळी नसले तरी कमीत कमी आपल्याला हवं ते मिळालं नाही याचा राग तरी असतोच. आपल्यासारखीच सामाजिक, राजकीय, आर्थिक, धार्मिक, बौद्धिक पार्श्वभूमी असलेल्या लोकांना सगळं सारख्या प्रमाणात मिळावं अशी एक अपेक्षा किंवा हट्टच आपल्या मनात असतो. तसं नसेल तर समतोल बिघडतो असं आपल्याला वाटतं. उदाहरणार्थ, आपल्याला नीता अंबानीचा मत्सर वाटत नाही पण शेजारच्या घरात ५५ इंची टीव्ही आला याचा नक्कीच वाटतो. 

दहाव्या 'डार्क प्लेझर्स अनलीशड' या प्रकरणात दुसऱ्या महायुद्धात हिटलरनं ज्यूंचा संहार केला त्याबद्दल काही मुद्दे आहेत. दुसऱ्या महायुद्धाआधी १९३६ मध्ये व्हिएन्नात ९० टक्के कॅथॉलिक ख्रिश्‍चन आणि ९ टक्के ज्यू होते. मात्र शहरातल्या एकूण वकिलांपैकी ६० टक्के ज्यू होते; एकूण डॉक्‍टर्सपैकी ५० टक्के ज्यू होते; जाहिरातक्षेत्रात अधिकारपदांवर ९० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त ज्यू होते आणि वर्तमानपत्रांच्या १७४ संपादकांपैकी १२३ ज्यू होते. ज्यू लोक आर्य लोकांपेक्षा कमी प्रतीचे आहेत हे हिटलरचं विधान यामुळे चूक ठरतंच. पण आर्यन श्रेष्ठ असावेत असं मानणाऱ्या हिटलरला याचा खूप त्रास होत होता. अल्बर्ट स्पिअर हा हिटलरचा आर्किटेक्‍ट होता. हिटलरला ज्यू लोकांचा तिटकारा का वाटत होता? याची त्यानं तीन कारणं दिली होती. एक तर हिटलरची नैसर्गिक विनाशकारी प्रवृत्ती, दुसरं म्हणजे पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव ज्यू लोकांमुळे झाला असं त्याचं गृहीतक आणि तिसरं कारण म्हणजे हिटलरला ज्यू लोकांचं गुप्तपणे कौतुक आणि मत्सरही वाटत होता..! 

पुस्तकातल्या 'हाऊ वूड लिंकन फील' या शेवटच्या अकराव्या प्रकरणात लोकप्रिय माणसांमध्ये ही schadenfreude भावना नसते का? ते त्यावर काय उपाय करतात या विचारांवर ऊहापोह केलेला दिसतो. दुसऱ्याचं दु:ख किंवा त्रास पाहून कुठेतरी अंतर्मनाला आनंद होत असेल तर ती सवय बदलता येते. अशा लोकप्रिय माणसांमध्ये सहवेदना, संवेदनशीलता, संयम जास्त असतो. पण त्याहून जास्त असते ती दुसऱ्याला समजून घेण्याची क्षमता..! या क्षमतेमुळे समोरचा माणूस असं का वागला असेल हे त्यांच्या लक्षात येतं. तसंच ज्यांचं आयुष्य खडतर असतं ती माणसं एक तर कडवट होतात किंवा खूप समजूतदार होतात हा मुद्दाही खूप महत्त्वाचा आहे. यावरुन ''चंद्‍र्मे जे अलांछ्न, मार्तंड जे तापहीन, ते सर्वांही सदा सज्जन, सोयरे होतु'' या ज्ञानेश्वरीच्या पसायदानातल्या ओळीच आठवतात.

Tags

संबंधित बातम्या