जरा विसावू या वळणावर..! 

नीलांबरी जोशी
गुरुवार, 24 मे 2018

बुक-क्लब
कथासंग्रह : इन प्रेझ ऑफ स्लोनेस
लेखक : कार्ल होन्रे

‘‘गेल्या महिन्याभरातले आनंदाचे क्षण सांगा’’ असं विचारल्यावर बहुतेकजण नातेवाईक किंवा मित्रमैत्रिणींबरोबरचं खाणंपिणं, केलेली मौजमजा, खेळलेले खेळ, केलेल्या धाडसी आणि साहसी गोष्टी, जोडीदाराबरोबर घालवलेले निवांत आणि प्रेमाचे क्षण, निर्माण केलेल्या कलाकृती अशा गोष्टींमध्ये आनंद लाभला असंच सांगतील. पण प्रत्यक्षात मात्र या गोष्टी करण्याला प्राधान्य देण्याऐवजी आपण सतत काम करण्यालाच प्राधान्य देतो. काम म्हणजे काय? हा विचार मनात आल्याबरोबर बर्ट्रांड रसेलचा ‘इन प्रेझ ऑफ आयडलनेस’ हा निबंध आठवतो. ‘‘काही न करता स्वस्थ बसणं हा खरोखर गुन्हा आहे का? सतत काहीतरी काम करायलाच हवं असं आपल्यापैकी सगळ्यांच्याच मनावर बिंबलेलं असतं. खूप काम करणं हे प्रतिष्ठेचं आणि मोलाचं आहे, या गृहीतकानं जगात फार मोठा हाहा:कार माजवला आहे’’ असं रसेल या लेखात म्हणतो. याच लेखाच्या नावावरून प्रेरित होऊन 'इन प्रेझ ऑफ स्लोनेस' हे पुस्तक कार्ल होन्रे यानं लिहिलं आहे. १९व्या शतकातल्या औद्योगिक क्रांतीनंतर जग वेगाच्या आवर्तात सापडलं आहे. सगळेजण सगळ्या गोष्टी वेगात करायच्या मागे आहेत. ''काम मागे पडलंय? जास्त वेग असलेलं इंटरनेट कनेक्‍शन घ्या; गेल्या वर्षी आणलेलं पुस्तक वाचून झालं नाही? भराभर वाचून टाका. डाएट नियंत्रित करुन वजन कमी होत नाही, लायपोसक्‍शन वापरा. स्वयंपाक करायला वेळ नाही. बाहेरून अन्न आणा. ते गरम करायला मायक्रोवेव्ह आणा''अशी सगळ्यांची मानसिकता झाली आहे. अतिवेगाच्या 'कल्ट ऑफ स्पीड' या पंथाला लहानथोर सर्वजण लागले आहेत. 

यावरुन आपण सतत इतके घाईत का असतो? या वेगाच्या व्यसनाला काय उपाय आहे? हा वेग कमी करणं गरजेचं आणि शक्‍य आहे का? या प्रश्नांचा 'इन प्रेझ ऑफ स्लोनेस' या पुस्तकात उत्कृष्टरीत्या वेध घेतला आहे. कार्ल होन्रे हा या पुस्तकाचा लेखक पत्रकार आहे. कार्ल स्वत: काही वर्षांपूर्वी 'स्पीडोहोलिक' होता. पण त्या वेगवान आयुष्यानंच त्याला आत्मचिंतन करायला भाग पाडलं आणि हे पुस्तक जन्माला आलं. अर्थात हे पुस्तक म्हणजे वेगाशी पुकारलेलं युद्ध नव्हे. 'सावकाश' हा मूलमंत्र वाचकांना देताना लेखक औद्योगिक क्रांतीच्या आधीच्या काळात जायला सांगत नाही. उदाहरणार्थ,वेगवान विमानांमधून करायचा प्रवास, इंटरनेटचा वेग या गोष्टींची गरज तो मान्य करतो. यातल्या 'सावकाश'चा हेतू आयुष्यात प्रत्येकानं समतोल साधावा हा आहे. 

या पुस्तकात ऑफिसेस, कारखाने, स्वयंपाकघरं, हॉस्पिटल्स, कलादालनं, संगीतसंमेलनं, बेडरुम्स, जिम आणि शाळा या सर्व ठिकाणी वेग कमी का आणि कसा करायचा हे प्रकरणांमध्ये लिहिलं आहे. डू एव्हरीथिंग फास्टर, स्लो इज ब्युटिफूल, फूड : टर्निंग द टेबल्स ऑन स्पीड, ब्लेंडिंग ओल्ड अँड न्यू, माईंड/बॉडी : मेन्स साना, मेडिसीन : डॉक्‍टर्स अँड पेशन्स, सेक्‍स : अ लव्हर वुईथ अ स्लो हॅंड, वर्क : द बेनिफिटस्‌ ऑफ वर्किंग लेस हार्ड, लेझर : द इंपॉर्टन्स ऑफ बिईंग ऍट रेस्ट, चिल्ड्रेन : रेझिंग ऍन अनहरीड चाइल्ड अशी ती दहा प्रकरणं आहेत. 

१९८० मध्ये जपान देशात शेअर मार्केट तेजीत असताना कामेई शुजी हा ब्रोकर वर्षाला ९४ आठवडे इतकं काम करत होता. त्याची कंपनी अत्यंत अभिमानानं अनेक वर्तमानपत्रांमध्ये आणि कंपनीच्या प्रशिक्षणाच्या मॅन्युअल्समध्ये कामेईचं उदाहरण द्यायची. कंपनीत सर्व कर्मचाऱ्यांचं जे स्वप्न होतं त्या 'गोल्ड स्टॅंडर्ड' पर्यंत कामेई पोचला होता. एवढचं नव्हे तर कंपनीनं आपले नियम मोडून आपल्या वरिष्ठांना सेल्समनशिप शिकवायला सुद्धा त्याला नियुक्त केलं होतं. १९८९मध्ये जपानमधल्या शेअर मार्केटचा बुडबुडा कोसळला तेव्हा नुकसान भरुन काढायला कामेईनं अजूनच जास्त काम करायला सुरवात केली. १९९० कामेई अचानक हृदयविकाराच्या तीव्र धक्‍क्‍यानं मरण पावला. तेव्हा त्याचं वय २६ होतं ..! अतिकाम- ओव्हरवर्कमुळे येणाऱ्या मृत्यूसाठी जपानी भाषेत 'कारोशी' हा शब्द वापरला जातो. तो आता आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वमान्य झाला आहे. पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात वेगामुळे काय परिणाम होतात ते अशा उदाहरणांमधून लेखकानं मांडलं आहे. आयटी कंपन्या आपलं सॉफ्टवेअर टेस्ट न करता बाजारात आणतात त्यामुळे ते बंद पडणं, त्यात त्रुटी आणि उणिवा असणं हे प्रकार वाढतात. त्यातून ग्राहक असमाधानी तर राहतोच पण कंपनीलाही करोडो रुपयांचा फटका बसतोच. यात वेगानं गेल्यामुळे क्वांटिटी वाढली तरी गुणवत्ता खालावते आणि सावकाश गेल्यानं मात्र गुणवत्ता वाढते हा महत्त्वाचा संदेश मिळतो. 

दुसऱ्या प्रकरणात प्रत्येक जीवमात्र, घटना, वस्तू, प्रसंग यांना आपला अंगभूत वेग असतो. तो वाढवणं म्हणजे मोठ्या वृक्षांना बोनसाय करुन खुंटवणं आहे, हा मुद्दा विस्तारानं मांडला आहे. पुस्तकाच्या तिसऱ्या प्रकरणात लेखकानं अन्नाबद्दल उपयोगी मुद्दे मांडले आहेत. आजकाल शेतीमध्ये रासायनिक खतं आणि जंतुनाशकं यांचा वापर करुन पिकांचा वेग वाढवला जातो. उदा. आंबे जबरदस्तीनं पिकवले जातात. कोंबड्या आणि डुकरं यांची लवकर कत्तल करता यावी यासाठी त्यांना विशिष्ट अन्न खायला घातलं जातं. डुकरांचं वजन १३० पौंडांपर्यंत पोचायला ५ वर्षं लागतात. पण आजकाल सहा महिन्यात डुकरांचं वजन २२० पौंड होईल अशी व्यवस्था केली जाते. तयार अन्नाच्या बाबतीतही फास्ट फूड प्रचंड बोकाळलंय. अन्नपदार्थ घरी सावकाशपणे तयार करणं, आप्तेष्टांबरोबर त्यांचा आस्वाद घेणं हे आता कालबाह्य व्हायला लागलं आहे. 

चौथ्या प्रकरणात तुम्ही राहाता त्या शहरात जर भयावह वेग नसेल तर तुम्हालाही स्वस्थ चित्तानं कामं करायला, विचार करायला, माणसाच्या अस्तित्वाचा अर्थ शोधायला मदत होते असे मुद्दे आले आहेत. पाचव्या प्रकरणात सावकाश आणि वेगानं केलेला विचार यात काय फरक असतो आणि त्यातून घेतलेल्या निर्णयांमुळे कसा फरक पडतो ते मांडलं आहे. 'टॉरटॉईज माईंड : व्हाय इंटेलिजन्स इनक्रीझेस व्हेन यू थिंक लेस 'हे गाय क्‍लॅक्‍स्टन या ब्रिटिश मानसशास्त्रज्ञाचं पुस्तक आहे. ''वेगानं केलेला विचार तर्कबुद्धिवर आधारित, विश्‍लेषणात्मक, एकरेषीय असतो. तो आपण सहसा मनावर ताण असताना करतो. मात्र सावकाश विचार केलेला सृजनशील, नावीन्यपूर्ण गोष्टींना चालना देणारा असतो. ताण नसताना सुचलेल्या संकल्पनांवर नंतरही अनेकवार उलटसुलट विचार करता येतो'' असं क्‍लॅक्‍स्टन म्हणतो. त्याचाच आधार घेऊन होन्रेनं माणूस शांत, घाईत नसताना आणि ताणविरहित असताना जास्त सृजनशील विचार करू शकतो असं स्वत:चं मत मांडलं आहे. 

पुस्तकातलं सहावं प्रकरण डॉक्‍टर्स, रुग्ण आणि उपचार यांच्या वेगाबद्दल भाष्य करतं. एकतर अतिवेगानं आणि अतिताणाखाली कामं केल्यामुळे निद्रानाश, अर्धशिशी, उच्च रक्तदाब, दमा, पोटाचे विकार हे शारीरिक आणि मानसिक विकार यांच्या रुग्णांनी दवाखाने भरुन गेले आहेत. सगळ्यांनाच रोगाचं निदान, उपचार आणि बरं होणं हे फटाफट व्हायला हवं असतं. यासाठी जगभरातले डॉक्‍टर्स आणि दवाखाने घाईनं उपचार करायच्या मागे असतात. रुग्णांचं म्हणणं ऐकून घेऊन, त्यांच्या आजारांचा पूर्वेतिहास जाणून घेऊन, त्यांची दिनचर्या, राहणीमान, खाण्यापिण्याच्या सवयी ऐकून घेऊन मग त्यांना उपचार सुचवण्याइतका कोणाकडेच वेळ नसतो. अर्थात काही वेळा वैद्यकीय मदत तातडीनं द्यावी लागते. पण सरसकट स्कॅन्स काढणं, औषधं देणं आणि शस्त्रक्रिया या गोष्टींना आजकाल प्राधान्य मिळत जातं. यासाठी युरोपमधल्या वैद्यकीय कॉलेजेसमध्ये आता रुग्णांना जास्त वेळ कसा देता येईल तेही अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून शिकवायला सुरवात झाली आहे. 

सातव्या प्रकरणात लैंगिक संबंधांमध्येही जोडीदाराबरोबर ते घाईनं उरकून टाकणं हे प्रकरण वाढत चाललं आहे, याबद्दल लेखकाची विरोधी मतं आढळतात. संसारात सूर जुळण्यासाठी एकमेकांच्या भावनांचा आणि संवेदनशीलतेचा आदर दाखवून भावनिक जवळीक निर्माण करायला हवी याबद्दलची आस्था लोप पावत चालली आहे हे नक्की..! 

आठव्या प्रकरणात कामाच्या ठिकाणचे तणाव कसे निर्माण होतात आणि कसे टाळावे याबद्दल उपयोगी टिप्स आहेत. 'वर्क लाईफ बॅलन्स' साधण्यासाठी रॉबर्ट क्रिगेल यानं आपल्या 'हाऊ टू सक्‍सीड इन बिझिनेस विदाऊट वर्किंग सो डॅम हार्ड' या पुस्तकात रोज काही अंतरानं पंधरावीस मिनिटांचा ब्रेक घ्या असं सुचवलं आहे. फुरसतीचा वेळ वाढवून त्या वेळात बागकाम, मित्रमैत्रिणींना भेटणं, विणकाम, वाचन, बुकक्‍लब्ज, चित्रं काढणं, शिल्पकला आणि गायन/वादन किंवा स्वयंसेवक म्हणून काम करावं असे उपाय लेखकानं सुचवले आहेत. 

नवव्या प्रकरणात 'इन प्रेझ ऑफ आयडलनेस' या बर्ट्रांड रसेलच्या निबंधाचा आधार घेऊन विरंगुळ्याची माणसाला किती गरज आहे ते उलगडलं आहे. पुस्तकाच्या शेवटच्या दहाव्या प्रकरणात मुलांनाही वेगात मोठं करण्याच्या नादात बोकाळलेल्या 'हायपर पॅरेंटिंग' बद्दल रंजक माहिती मिळते. १९८९ मध्ये डेव्हिड एलकाईंड या अमेरिकन मानसशास्त्रज्ञानं 'द हरीड चाइल्ड : ग्रोईंग अप टू फास्ट टू सून'हे मुलांना घाईत प्रौढत्वाकडे ढकलणाऱ्या संस्कृतीवर भाष्य करणारं पुस्तक लिहिलं होतं. त्यानुसार आजकाल घरटी एक असलेल्या मुलांवर घरातल्या जबाबदाऱ्यांचा ताण लहान वयात येतो. जाहिराती मुलांना लवकरात लवकर ग्राहक बनवण्याच्या मागे असतात. पालक त्यांना शाळेबरोबर क्रीडाप्रकार, संगीत, चित्रकला, नृत्य, अशा इतर हजारो गोष्टी शिकवायला उत्सुक असतात. मग जितकं वेगवान आयुष्य तितकं चांगलं आयुष्य - कम ऑन हरी अप..हा मूलमंत्र बालपणापासून मुलांच्या मनात रुजतो. 

या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे या सगळ्यावर ज्या लोकांनी/संस्थांनी उपाय शोधले आहेत त्यांची माहितीदेखील यात मिळते. 'स्लो' या चळवळीसाठी साठी चक्क स्लो फूड, जपान्स स्लॉथ क्‍लब, अमेरिकेत लॉंन नाऊ फाऊंडेशन, युरोपमध्ये सोसायटी फॉर डिसिलिरेशन ऑफ टाईम आणि ऑस्ट्रेलिया, नॉर्वे, भारत, इस्राईल आणि तैवान या ठिकाणी सुपरस्लो स्टुडिओज हे जिम सुरु झालं आहे. 

होन्रेचं हे पुस्तक वाचून एका वाचकानं टीव्ही पाहाणं कमी केलं, वाचन वाढवलं आणि आपला अडगळीत धूळ खाणारा तबला बाहेर काढूर सराव सुरु केला. अशा प्रकारे वेग कमी करुन जगणारी माणसं जास्त आनंदी, जास्त आरोग्यदायी आणि जास्त कार्यक्षम आयुष्य जगत आहेत असं संशोधनही सांगतं. 'देअर इज मोअर टू लाईफ दॅन इनक्रिजिंग इटस्‌ स्पीड' असं महात्मा गांधी का म्हणाले होते ते यावरुन लक्षात येईल. 

ऑनलाईन पुस्तक खरेदीसाठी ॲमेझॉन लिंक :
https://www.amazon.in/Praise-Slowness-Challenging-Cult-Speed/dp/0060750510

संबंधित बातम्या