विज्ञान आणि धर्मातील द्वंद्वं 

नीलांबरी जोशी
गुरुवार, 7 जून 2018

बुक-क्लब
कादंबरी : ओरिजिन
लेखक : डॅन ब्राऊन

मी आज इथे उपस्थित आहे’ किर्शनं बोलायला सुरुवात केली. ‘मी विज्ञानातला एक अद्भुत शोध लावला आहे. गेली अनेक वर्षं मानवाला आपल्या अस्तित्वाबद्दल जे दोन मूलभूत प्रश्न पडले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी अनेक वर्षं झगडून हा शोध लावला. धर्मावर आणि देवावर विश्वास ठेवणाऱ्यांवर या शोधाचा विलक्षण प्रभाव पडणार आहे. त्यामुळे आता मी त्यात यशस्वी झाल्यावर 'खास' करुन तुमच्याशी बोलतोय.’ २४ तासांत उलगडत जाणारं रहस्य, भरपूर सिंबॉल्स, आधुनिक चित्रकलेचे अचूक संदर्भ, गुप्त गोष्टींच्या खाणाखुणा, संकेतचिन्हं आणि कटकारस्थानं यानं खच्चून भरलेल्या डॅन ब्राऊन या लेखकाच्या ताज्या 'ओरिजिन' या कादंबरीची ही सुरवात. 

या संवादात आपल्या खास शोधाबद्दल बोलणारा एडमंड किर्श हा कोट्याधीश, प्रचंड बुद्धिमान आणि कम्प्युटरमधला किडा असतो. तो ज्या तिघांसमोर हे बोलत असतो ते तिघं असतात रोमन कॅथॉलिक धर्माचे बिशप अँटोनियो व्हाल्डेस्पिनो, ज्यू धर्माचे प्रमुख रब्बाय येहुदा कोव्हस आणि मुसलमान धर्माचे प्रमुख इमाम सय्य अल फादल. ज्या दोन मूलभूत प्रश्नांबद्दल किर्श बोलत असतो ते प्रश्न म्हणजे 'अस्तित्व कुठून सुरु झालं' आणि 'आता मानवजात कुठे चालली आहे.' या प्रश्नांचं रहस्य आपण शोधलं आहे, असं किर्शचं म्हणणं असतं. त्यासाठी तो जगभरातल्या धर्मप्रमुखांना बोलावून एक प्रेझेंटेशन देणार असतो. त्या प्रेझेंटेशनचं पुढे काय होतं ते या कादंबरीत उत्कंठावर्धक शैलीत वाचकांसमोर उलगडत जातं. किर्शच्या या प्रेझेंटेशनला हजर रहाणार असतो तो किर्शचा मेंटॉर आणि हार्वर्ड विद्यापीठातला सिंबॉलॉजिस्ट रॉबर्ट लॅंगडन. शेरलॉक होम्स, जेम्स बॉंड किंवा इंडियाना जोन्स याच मालिकेतला रॉबर्ट लॅंगडन ब्राऊननं उत्तम साकारला आहे. लॅंगडन ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा असलेल्या एंजल्स अँड डिमॉन्स, द दा विन्सी कोड, द लॉस्ट सिंबॉल आणि इन्फर्नो या ब्राऊनच्या कादंबऱ्याही खूप गाजल्या. जगातल्या ५६ भाषांमध्ये भाषांतरित झालेल्या या कादंबऱ्यांच्या आजवर ५० कोटी प्रती खपल्या आहेत. 

विज्ञान आणि धर्म यांच्यातलं द्वंद्व ही 'ओरिजिन' या कादंबरीची मध्यवर्ती संकल्पना आहे. पृथ्वी, मानवप्राणी आणि इतर जीव कसे अस्तित्वात आले यावरचा 'क्रिएशन का इव्होल्यूशन' हा वाद पूर्वापार चालू आहे. ख्रिश्‍चन धर्मामध्ये अनेक शतकं देवानंच हे सगळं निर्माण केलं (क्रिएशिनिझम) असं मानलं जात होतं. मात्र १९व्या शतकाच्या मध्यापासून उत्क्रांतीवादाचं आणि पर्यायानं विज्ञानाचं महत्त्व वाढलं. तरीही आज १० पैकी ४ अमेरिकन्स १० हजार वर्षांपूर्वी देवानंच मानव निर्माण केला असं मानतात असं २०१४ वर्षातील 'गॅलप' या संस्थेचा अहवाल सांगतो. 

'ओरिजिन' ही कादंबरी इतिहास, कला आणि धर्म यांचा समृद्ध वारसा लाभलेल्या स्पेनमध्ये घडते. आपलं ठरलेलं प्रेझेंटेशन किर्श गुगेनहाईम म्युझियम, बिलबाव या स्थापत्यशैलीच्या बाबतीत प्रचंड गाजलेल्या ठिकाणी देणार असतो. जगभरात ते प्रेझेंटेशन प्रक्षेपित होणार असतं. आपल्या आईचा मृत्यू धार्मिक संघटनांच्या टोकाच्या भूमिकांमधून झाला या विचारामुळे किर्श निरीश्वरवादी झालेला असतो. त्यानं 'विन्स्टन' नावाचं एक उपकरण कृत्रिम बुद्धिमत्ता वापरुन तयार केलेलं असतं. या प्रेझेंटेशनच्या तयारीसाठी किर्शनं विन्स्टनची चिक्कार मदत घेतलेली असते. दरम्यान 'धर्माचं युग संपून विज्ञानयुगात प्रवेश करायचा' हा प्रेझेंटेशनचा हेतू किर्श लॅंगडनपाशी व्यक्त करतो. पण ज्या दिवशी प्रेझेंटेशन होणार असतं तेव्हा लुईस अव्हिला हा नौदलातला अधिकारी किर्शचा खून करतो आणि लुईस पळून जातो. 'पाल्मेरियन कॅथॉलिक चर्च'चा सदस्य असलेल्या लुईसला खून करण्यासाठी रिजंटनं पाठवलेलं असतं. पाल्मेरियन हा वेगळ्या विचारसरणीच्या कॅथॉलिक ख्रिश्‍चन लोकांचा चर्च स्पेनमध्येच आहे. त्याचे कुटुंबीय ज्या व्यक्तीनं केलेल्या बॉंबहल्ल्यात मारले गेले ती व्यक्ती किर्शची समर्थक होती, असं सांगून रिजंटनं लुईसला भडकवलेलं असतं. अल फादलचाही खून लुईस करतो. कोव्हज या ज्यू रब्बायचाही खून होतो. 

किर्शच्या प्रेझेंटेशनला गुगेनहाईम म्युझियमची प्रमुख अँब्रा व्हिडाल ही देखणी युवती हजर राहाणार असते. अँब्रा ही स्पेनचा भावी राजा ज्युलिआन याची वाग्दत्त वधू असते. यानंतर प्रेझेंटेशन देण्यासाठी किर्शनं जे उपकरण वापरायचं ठरवलेलं असतं ते शोधून प्रेझेंटेशन ठरलेल्या वेळीच द्यायचं, असं लॅंगडन ठरवतो. त्या प्रेझेंटेशनचा पासवर्ड ४७ अक्षरांचा असतो. किर्शच्या एका लाडक्‍या कवितेत तो पासवर्ड लपलेला असतो इतकं अँब्राला ठाऊक असतं. तो पासवर्ड आणि प्रेझेंटेशनचं उपकरण 'कॅसा मिला' या किर्शच्या घरात सापडेल या आशेनं लॅंगडन आणि अँब्रा म्युझियममधून पळून जातात. अँटोनी गॉडी या स्पॅनिश आर्किटेक्‍टनं बार्सिलोनामध्ये स्वत:साठी दगडापासून बांधलेलं 'कॅसा मिला' हे निवासस्थान हे स्थापत्यशास्त्राचा अत्युत्तम नमुना आहे. ज्युलियाननंच लुईसला शेवटच्या क्षणी या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवू नये, असं लॅंगडन अँब्राला समजावून सांगतो. ते दोघं किर्शचं उपकरण शोधण्यासाठी निरनिराळे मार्ग आणि वाहनं वापरुन विन्स्टनच्या मदतीनं बार्सिलोनाला पोचतात. दरम्यान टीव्ही आणि सोशल मिडियावर तीन महत्त्वांच्या खून प्रकरणांमुळे खळबळ माजते. व्हाल्डेस्पिनो हा ख्रिश्‍चन बिशप एकटाच वाचल्यामुळे संशयाची सुई त्याच्याकडे वळते. हे सगळं थांबवण्यासाठी स्पेनचं सरकार डिएगो गार्झा या कमांडरला खुनांच्या संशयावरून अटक करतं. तसंच लॅंगडननं अँब्राचं अपहरण केल्याची बातमीही पसरते. बार्सिलोनामध्ये लॅंगडन आणि अँब्रा या दोघांना किर्शच्या घरातल्या कागदपत्रांवरुन तो पॅंक्रियाच्या कर्करोगानं ग्रस्त होता आणि मरणपंथाला लागला होता असं लक्षात येतं. मग दोघं तो ४७ अक्षरी पासवर्ड शोधायच्या मागे लागतात. आधी पासवर्ड नित्शेच्या कवितेतला असेल असं दोघांना वाटतं. पण तेवढ्यात लॅंगडनला 'समग्र विल्यम ब्लेक' असं लिहिलेलं एक खोकं दिसतं. मात्र खोक्‍यात विल्यम ब्लेकच्या कवितांचं पुस्तक नसतंच. तिथे ते पुस्तक 'साग्राडा फॅमिलिया'ला दिल्याची चिठ्ठी फक्त असते. अँटोनी गॉडी यानंच 'साग्राडा फॅमिलिया' हे चर्च स्पेनमध्ये बांधायला सुरवात केली होती. लॅंगडननं अँब्राला पळवलं आहे अशा संशयानं लॅंगडनच्या मागे लागलेले पोलिस 'कॅसा मिला' पर्यंत पोचतात. ''आपल्याला लॅंगडननं पळवलेलं नाही'' असं अँब्रा पोलिसांना समजावून सांगायचा प्रयत्न करते. मात्र त्या झटापटीत किर्शचा स्मार्टफोन-विन्स्टन तिच्या हातून नादुरुस्त होतो. तेवढ्यात अँब्राचे सुरक्षारक्षक हेलिकॉप्टरमधून येऊन तिला आणि लॅंगडनला 'साग्राडा फॅमिलिया' या ठिकाणी घेऊन जातात. इकडे लुईस ऍव्हिला आपल्या कुटुंबियांच्या मारेकऱ्यांचा सूड घ्यायचा निश्‍चय करुन पाल्मेरियन चर्चमध्ये जातो. तिथले पोप त्याला लॅंगडन आणि अँब्रा यांना मारण्याबद्दल सुचवतात. लुईसही मग 'साग्राडा फॅमिलिया'ला पोचतो. लॅंगडन आणि ऍब्रा यांना एक पाद्री विल्यम ब्लेकच्या पुस्तकाच्या ठिकाणापर्यंत पोचवतात. ते पुस्तक 'झोआस' या कवितेच्या शेवटच्या कडव्याच्या पानावर उघडं असतं. त्यावरुन The dark Religions are departed & sweet Science reigns हा ४७ अक्षरी पासवर्ड त्यांना कळतो. तेवढ्यात लुईस तिथे येतो. तो अँब्राच्या सुरक्षारक्षकांना मारतो. पण नंतर लॅंगडनबरोबर झालेल्या झटापटीत लुईस मरण पावतो. लॅंगडनचीही काही काळ शुद्ध हरपते. मात्र भानावर आल्यावर काहीशा जखमी अवस्थेत तो अँब्राबरोबर प्रेझेंटेशन सादर करण्यासाठीचं उपकरण शोधायला जातो. त्यानंतर गुगनहाईममधल्या एका चित्राच्या खुणेवरुन बार्सिलोना सुपरकम्प्युटिंग सेंटरमध्ये एडमंडचं रहस्य लपलेलं उपकरण असावं, असं लॅंगडनच्या लक्षात येतं. ते सुपरकम्प्युटिंग सेंटर चक्क एका जुन्या चर्चमध्ये असतं. लॅंगडन आणि अँब्रा दोघं त्या सेंटरमध्ये पोचून 'इ वेव्ह' नावाचं ते प्रचंड मोठं उपकरण शोधतात. मग ४७ अक्षरी पासवर्ड घालून किर्शनं तयार केलेलं प्रेझेंटेशन नियोजित वेळेनुसार म्हणजे, पहाटे ३ वाजता ते सुरु करतात. 

त्या प्रेझेंटेशनमध्ये प्रसिद्ध मिलर युरे प्रयोग वापरुन, भौतिकशास्त्राचे नियम आणि एनट्रॉपी ही संकल्पना वापरुन इ वेव्ह काळाच्या पुढे पोचू शकेल अशी तजवीज किर्शनं केलेली असते. मिलर युरे या रासायनिक प्रयोगात पृथ्वीची उत्पत्ती झाली तेव्हाचं वातावरण तयार करायचा प्रयत्न केला होता. अनेक प्रक्रिया घडून ऑर्गनिक कंपाऊंडसमधून पृथ्वीवर जीव निर्माण झाले या प्रक्रियेला ऍबिओजेनेसिस म्हणलं जातं. तो ऍबिओजेनेसिसचा क्षण यातून मिळवण्याचा प्रयत्न किर्शनं केलेला असतो. यातून सृष्टीची उत्पत्ती निसर्गनियमानं झाली, देवामुळे नाही हे किर्शनं सिद्ध केलेलं असतं. हे सगळं त्या प्रेझेंटेशनमध्ये दाखवलेलं असतं. आजपासून ५० वर्षांनंतर कृत्रिम बुध्दिमत्तेमुळे माणूस आणि तंत्रज्ञान एकत्र होईल. जगातलं धार्मिक वितुष्ट संपेल असा किर्शचा दावा असतो. हे प्रेझेंटेशन जगभरातले लोक पहात असतात. त्यामुळे मग त्यावर भराभर चर्चा सुरु होतात. 

यानंतर लॅंगडनवरचे सगळे खटले मागे घेतले जातात. अँब्रा राजवाड्यात परतते पण ज्युलियानशी आपलं पटणार नाही हे तिच्या लक्षात येतं. ते दोघंही मग लग्नाच्या आणाभाकांमधून मुक्त होतात. कादंबरीच्या शेवटी विन्स्टनबद्दल एक रहस्य ब्राऊननं उघड केलं आहे. किर्शनं प्रेझेंटेशन संपल्यावर दुपारी १ वाजता विन्स्टन नष्ट होईल अशी व्यवस्था केलेली असते. त्याप्रमाणे विन्स्टन नष्ट होतो. खरं तर आपल्या प्रेझेंटेशनला जास्तीत जास्त प्रेक्षक लाभावेत यासाठी 'वाट्टेल ते' करण्याची विन्स्टनला मुभा किर्शनं दिलेली असते. त्याचा गैरफायदा घेऊन विन्स्टनच किर्शचा, कोव्हजचा आणि इमाम अल फादल यांचा खून घडवून आणतो. तोच व्हाल्डेस्पिनोवर आरोप होतील याची खातरजमा करतो आणि लोकांच्या मनात कॅथॉलिक चर्चबद्दल संशय पैदा करतो. इतक्‍या सनसनाटी घटनांनंतर लाखो, करोडो प्रेक्षक ते प्रेझेंटेशन पहाणार याची विन्स्टनला खात्री असते. यावरुन यंत्रमानव आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याबद्दल काही प्रश्न मनात उभे रहातात. आजचा यंत्रमानव खरं तर त्याला दिलेल्या सूचना पाळून कामं करतो. पण यंत्रमानवाचं हे कौशल्य पुढे वाढत जाऊन आज माणसाचा गुलाम असलेला हा यंत्रमानव उद्या माणसालाच आपला गुलाम बनवील अशी भीती अनेकांना वाटायला लागली आहे. प्रख्यात शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्ज याच्या मते कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले यंत्रमानव हा मानवाच्या इतिहासात घडलेला सर्वात भयंकर प्रकार आहे. थोडक्‍यात यंत्रमानवांकडे मानवजातीच्या अस्तित्वाचं नियंत्रण जाणार नाही, असं पाहून संशोधकांना पुढे पाऊल टाकावं लागेल इतकंच आपण आज म्हणू शकतो. ''तुम्ही जेव्हा भवितव्याबद्दल अंदाज बांधू शकत नाही तेव्हा निरनिराळी अनेक भवितव्यं असू शकतात ही शक्‍यता तरी मान्य करायला हवी'' हे एडवर्ड डी बोनोचं वाक्‍यच यावरुन आठवतं..!

संबंधित बातम्या