हर घडी बदल रही है... 

नीलांबरी जोशी
गुरुवार, 19 जुलै 2018

हॉस्टेलमध्ये असताना बस आणि लोकमधून मी मुंबईत खूप फिरले आहे. सगळ्या आर्ट गॅलरीज धुंडाळणं हा माझा लाडका प्रकार होता. खरं तर आख्खं आयुष्य मुंबईत काढलेल्या माणसापेक्षा मला मुंबई जास्त परिचयाची झाली होती. माझ्यासाठी मुंबई म्हणजे गगनचुंबी इमारती, चमकदार गाड्या आणि दिमाखदार माणसं नव्हेत...! तर मुंबई म्हणजे जुने रस्ते आणि धुरकटलेल्या प्राचीन वाटाव्यात अशा इमारती...! भटकण्याबरोबरच मला शास्त्रीय संगीत मोहात पाडतं. सध्याच्या गायकांमध्ये मला तर, मुकुल शिवपुत्र प्रचंड आवडतो. राशिद खान आणि वीणा सहस्रबुद्धे हेही माझे लाडके गायक/ गायिका आहेत!

हॉस्टेलमध्ये असताना बस आणि लोकमधून मी मुंबईत खूप फिरले आहे. सगळ्या आर्ट गॅलरीज धुंडाळणं हा माझा लाडका प्रकार होता. खरं तर आख्खं आयुष्य मुंबईत काढलेल्या माणसापेक्षा मला मुंबई जास्त परिचयाची झाली होती. माझ्यासाठी मुंबई म्हणजे गगनचुंबी इमारती, चमकदार गाड्या आणि दिमाखदार माणसं नव्हेत...! तर मुंबई म्हणजे जुने रस्ते आणि धुरकटलेल्या प्राचीन वाटाव्यात अशा इमारती...! भटकण्याबरोबरच मला शास्त्रीय संगीत मोहात पाडतं. सध्याच्या गायकांमध्ये मला तर, मुकुल शिवपुत्र प्रचंड आवडतो. राशिद खान आणि वीणा सहस्रबुद्धे हेही माझे लाडके गायक/ गायिका आहेत! ‘धोबी घाट’ आणि ‘शिप ऑफ थीसिस सारखे चित्रपट काढणाऱ्या किरण राव हिचे हे उद्गार ’ब्रेव्ह न्यू बॉलिवूड’ या पुस्तकात आहेत. धोबी घाट या चित्रपटातली मुंबईतल्या पावसातली अप्रतिम दृश्‍यं आणि आमिर खान चित्र काढत असताना मागे ऐकू येणारी बेगम अख्तरची ठुमरी यामागे किरण रावची ही जडणघडण कारणीभूत आहे.

‘ब्रेव्ह न्यू बॉलिवूड’ या पुस्तकात किरण रावसारख्या प्रवाहाविरुद्ध पोहत जायचं धाडस दाखवून चित्रपट दिग्दर्शित करणाऱ्या नवीन पिढीच्या आठ दिग्दर्शकांच्या मुलाखती आहेत. आपल्या देशात चित्रपट सहसा त्यात काम करणाऱ्या अभिनेत्यांमुळे ओळखले जातात. चित्रपटामागचे तंत्रज्ञ, निर्माते, दिग्दर्शक, कथा-पटकथा/ संवादलेखक, वेशभूषाकारक इ. कलाकारांना फारसं कोणी ओळखत नाही. उदाहरणार्थ महल, हावडा ब्रिज, गाईड किंवा मुघले-आझम अशा गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक किती लोकांना ठाऊक आहेत? या भेदभावामुळेच मेनस्ट्रीम आणि समांतर आर्ट सिनेमा असे दोन प्रकार हिंदी चित्रपटात अनेक वर्षे होते. मात्र, गेल्या १० वर्षांमध्ये चित्रपटांचा एक वेगळाच प्रकार बॉलिवूडमध्ये रुजतो आहे. त्या प्रकाराला दिबाकर बॅनजी या दिग्दर्शन ‘अँटी डब’ असं नाव दिलं आहे. स्त्री - पुरुषांमधील बदललेली नाती, समलिंगी संबंध, एड्‌स, मनोविकार किंवा लहान मुलांवरचे लैंगिक अत्याचार असे अनेक विषयांना हे चित्रपट हात घालतात. बडे अभिनेते/ अभिनेत्री, आयटम साँग्स आणि जाहिरातींचा प्रचंड बजेट हे हीट चित्रपटाचे निकष या चित्रपटांनी मोडीत काढले आहेत. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटांनी दिग्दर्शकांचं अस्तित्व प्रेक्षकांपर्यंत पोचलं.

’ब्रेव्ह न्यू बॉलिवूड ’ या पुस्तकातल्या मुलाखती प्रीती चतुर्वेदी आणि निर्मल कुमार या दोघांनी घेतल्या आहेत. या मुलाखतींमध्ये दिग्दर्शकांची शैक्षणिक आणि कौटुंबिक पार्श्‍वभूमी, धार्मिक श्रद्धा, सामाजिक मतं, साहित्य, संगीत, सिनेमा याबाबतचे संस्कार, चित्रपटांकडे पहाण्याचा आणि चित्रपटाचं दिग्दर्शन करायचा दृष्टिकोन उलगडत जातो.

पुस्तकात पहिली मुलाखत दिबाकर बॅनर्जी यांची आहे. दिबाकर जिथे वाढला त्या दिल्लीतल्या त्यांच्या करोल बागेतल्या घरात साहित्य, हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत याबद्दल जाणकार लोकांची उठबस होती. त्यामुळेच दिबाकरनं वेगळी वाट चोखाळून सोळाव्या वर्षी ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन’ या अहमदाबादच्या प्रख्यात संस्थेत प्रवेश घेतला. पण व्हिज्युअल कम्युनिकेशन आणि ग्राफिक डिझाईन शिकण्याचा त्याला दीड वर्षातच कंटाळा आला. नंतर वेगळ्या वाटेनं जाऊन दिबाकरनं जे चित्रपट काढले त्यात सामान्य माणूस केंद्रस्थानी होता. उदाहरणार्थ, ‘खोसला का घोसला’ या चित्रपटात दिल्लीतल्या एका माणसानं आयुष्यभर पुंजी साठवून घेतलेल्या जागेत अतिक्रमण कसं होतं, मग त्याचं कुटुंब त्याच्यामागे कसं ठामपणे उभं राहतं ही कहाणी आहे. लव्ह, सेक्‍स, धोखा या दिबाकरच्या बहुचर्चित चित्रपटात नैतिकतेच्या सीमारेषा कशा बदलत गेल्या आहेत ते जाणवतं. ऑनर किलिंग, एमएमएसचे धोके आणि स्टिंग ऑपरेशन या विषयांवरच्या तीन कथा यात आहेत. तुम्हाला हवे ते चित्रपट काढत राहा... मग एक दिवस आपल्यापेक्षा काहीतरी वेगळं याला माहिती आहे, असं लक्षात आल्यावर तुमच्यामागे लोक उभे राहातात, असं दिबाकर म्हणतो. पुस्तकातल्या दुसऱ्या किरण राव हिच्या मुलाखतीत मिसेस आमीर खान झाल्याबरोबर चित्रपटसृष्टीत चित्रपटसृष्टीत पायघड्या घातल्या गेल्या का? या प्रश्‍नांचं उत्तर देताना फक्त मोठं नाव आहे म्हणून तुमच्या चित्रपटांना आर्थिक साहाय्य मिळतं असं नाही; पण २० हाऊसफुल्ल चित्रपट तुमच्या नावावर जमा झाल्यानंतर मग पुढच्या चित्रपटात आर्थिक गुंतवणूक मात्र सहज केली जाते, असं किरण राव मान्य करते. या पुस्तकातल्या आठ मुलाखतींपैकी पाच मुलाखती स्त्री दिग्दर्शकांच्या आहेत हे एक वैशिष्ट्य आहे. किरण रावनंतर रीमा कागती आणि झोया अख्तर या दोघींच्या मुलाखत आहेत. या दोघींमधली एक समान गोष्ट म्हणजे दोघींनीही मीरा नायरचा ’सलाम बॉम्बे’ हा चित्रपट पाहून चित्रपट क्षेत्रात यायचं ठरवलं.

दिगबोई या आसाममधल्या गावात रीमा कागती जन्माला आली. तिच्या जन्माच्या वेळी आसाममध्ये हिंसा कमी असली तरी नंतर तिनं तिथली राजकीय अस्थिरताही पाहिली आहे. नंतरच्या काळात दिल्लीत शिकत असताना तिनं चित्रपटसृष्टीत कामाला सुरुवात केली. आशुतोष गोवाकीकरचा लगान, मीरा नायरचा ’व्हॅनिटी फेअर’ फरहान अख्तरचे ’दिल चाहता है’ आणि ’लक्ष्य’ या चित्रपटांमध्ये ती सहाय्यक दिग्दर्शिका होती. हनीमूनला आल्यावर एकमेकांबरोबर वावरताना अनेकदा अडखळणारं एक जोडपं पाहून तिला ’हनीमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड’ हा चित्रपट सुचला. वेगवेगळ्या संस्कृतींमधून आणि सामाजिक पार्श्‍वभूमीतून लग्न झाल्यानंतर हनीमूनला गेलेल्या जोडप्यांच्या विविध कथा या चित्रपटात आहेत. तिनं दिग्दर्शित केलेल्या आणि आमीर खान, करिना कपूर आणि राणी मुखर्जी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ’तलाश’ या चित्रपटामध्ये अस्तित्वाचाच शोध सर्व जण घेत असतात असा तत्त्वज्ञानात्मक विचार दिसतो. यानंतर जिची मुलाखत आहे ती झोया अख्तर मात्र कलेचा वारसा असणाऱ्या अभिरुचीसंपन्न  घरातली आहे. झोयाचे आजोबा म्हणजे साहित्य अकादमीचं मानाचं पारितोषिक  लाभलेले जान निसार अख्तर. ते हिंदी चित्रपटसृष्टीतले लोकप्रिय गीतकार होते. जावेद अख्तर हे झोयाचे वडील! सलीम - जावेद या जोडगोळीतले जावेद हे उत्तम  संवादलेखक आणि शायर आहेत. झोयाला खरं तर वकील किंवा पत्रकार व्हायचं होतं; पण सलाम बॉम्बे पाहून आपल्याला चित्रपट करायचे आहेत, हा तिचा निश्‍चय झाला. ’लक बाय चान्स’ या तिच्या चित्रपटात चित्रपटसृष्टीतली पिळवणूक, दुटप्पीपणा, भोंदूपणा उघड दिसतो. तिच्या ’जिंदगी ना मिलेगी दोबारा’ या चित्रपटावर यातल्या व्यक्तिरेखा धनाढ्य आहेत आणि सर्वसामान्यांचं त्या प्रतिनिधीत्व करत नाहीत, अशी काही वेळा टीका होते. यावर त्या व्यक्तिरेखा आणि चित्रपटाची कथा तुमच्या भावनांना हात घालतात हे जास्त महत्त्वाचं आहे, असं झोया म्हणते. या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर आलेल्या ’दिल धडकने दो’ या झोयाच्या चित्रपटाबाबतही हेच वाक्‍य लागू पडतं.

झोयानंतरची मुलाखत असलेली शोनाली बोस हिचं बालपण कोलकत्त्यात गेलं असलं तरी नंतर तिनं दिल्ली विद्यापीठातून पदवी घेतली. अमेरिकेत कोलंबिया विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण घेत असताना ती बेदब्रत पेन या नासामध्ये संशोधन करणाऱ्या माणसाच्या प्रेमात पडली. दोघांनी मिळून प्रथम ’चित्तागाँग’ हा चित्रपट काढला. ब्रिटिश राजवटीतल्या बांग्लादेशातल्या एका उठावावर  हा चित्रपट आधारित होता. शोनालीनं दिग्दर्शित केलेला ’अमू’ हा चित्रपट पहिला चित्रपट तिनं स्वतःच लिहिलेल्या कादंबरीवर आधारित होता. कोंकणा सेननं यात अमेरिकेत वाढलेल्या अमू या मध्यवर्ती व्यक्तिरेखेचं काम केलं आहे. इंदिरा गांधी यांचा खून, त्यानंतर झालेल्या शीखविरोधी दंगली, त्यात गमावलेले आई-वडील आणि निर्वासित असण्याचं दुःख असे अनेक पदर या चित्रपटाला आहेत. या पुस्तकात उल्लेख नसलेला शोनालीचा पुढचा चित्रपट म्हणजे मार्गारिटा वुईथ अ स्ट्रॉ...! सेरेब्रल पाल्सी हा मनोविकार जन्मजात असलेल्या मुलीचं काम यात काल्की कोचीन हिनं उत्कृष्ट केलं होतं.

’पीपली लाईव्ह’ या टेलिव्हिजन माध्यमावर घणाघाती प्रहार करणाऱ्या चित्रपटानं गाजलेल्या अनुषा रिझवीची यानंतर या पुस्तकात मुलाखत आहे. अनुषा काही वर्षे एनडीटीव्हीवर पत्रकारितेचं काम करत होती. त्यानंतर मात्र तिथल्या कामाचा कंटाळा आल्यावर तिनं राजीनामा दिला. ’पीपली लाईव्ह’ या अनुषाच्या चित्रपटात एका शेतकऱ्याच्या आत्महत्येचा माध्यम कसा टिआरपीसाठी फायदा उठवतात त्याचं चित्रण होतं. या पुढच्या मुलाखतीतल्या ओनिरच्या ’आयॲम’ या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे जगभरातून ४०० जणांनी या चित्रपटाला आर्थिक साहाय्य पुरवलं होतं. अगदी फेसबुकवरूनसुद्धा आवाहन करून हा क्राऊडफंडिंगचा प्रयोग यशस्वी झाला. आय ॲममध्ये चार कथा आहे. अभिमन्यूमध्ये लहान मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार, ओमारमध्ये समलिंही संबंध मेघामध्ये काश्‍मिरी पंडितांचा प्रश्‍न आणि ‘आफिया’मध्ये स्पर्म डोनेशन असे अत्यंत वेगळे विषय मांडले आहेत. भूतानमध्ये जन्म झालेल्या ओनिरला नंतर तिथल्या धार्मिक दंगलींमुळे भारतात यावं लागलं. एकटेपणा, निर्वासितता असे विषय त्यामुळे त्याच्या चित्रपटांमध्ये डोकावणं अपरिहार्य ठरलं. ’माय ब्रदर निखिल’  या चित्रपटात त्यानं एड्‌सग्रस्तांना नोकरीतून कसं डावललं जातं, त्यांना समाज कसा दूर लोटतो याचं चित्रण आहे.

या पुस्तकातली शेवटची मुलाखत आहे तिगमांशू धुलियाची. मी व्यावसायिक आणि इंटलेक्‍चुल सिनेमा याचं कॉकटेल आहे, असं तिगमांशू मान्यच करतो चित्रपटात अनेक जणांचे पैसे अडकलेले असतात. त्यामुळे तो मनोरंजक हवा, लोकांच्या मनाला जाऊन भिडमारा हवा आणि त्यात तुम्हाला दिग्दर्शक म्हणून समाधान लाभलेलं असायला हवं, असं तिगमांशून ’दिल से’ या मणिरत्नमच्या चित्रपटातलं संवादलेखन, केतन मेहताच्या ‘बॅंडीट क्वीन’मध्ये सहाय्यक दिग्दर्शन, ‘गॅंग्ज ऑफ वासेपूर’मधल्या रामाधीर सिंगच्या भूमिकेत अभिनय आणि ‘पान सिंग तोमार’ ‘साहिब बिबी और गॅंगस्टर’ या चित्रपटाचं दिग्दर्शन अशा अनेक प्रकारे स्वतःला सिद्ध केलं आहे. ‘साहिब बिबी और गॅंगस्टर’ या त्याच्या चित्रपटाच्या दोन भागांमध्ये उत्तर प्रदेशातली संपत चाललेली राजेशाही, आधुुनिक काळातला सत्तासंघर्ष, माणसाच्या दबलेल्या इच्छा, महत्त्वाकांक्षा, उणिवा याचं यथार्थ दर्शन होतं.

नाविन्यपूर्ण आणि परंपरांना छेद देणाऱ्या संकल्पनांवरचे चित्रपट ही भारतात दिग्दर्शकांना न परवडणारी  चैन आहे, असं सत्यजित रे या महान दिग्दर्शकाचं मत होतं. आज उण्यापुऱ्या ५० वर्षांतर काही मूठभर दिग्दर्शक ही चैन करून त्यात यशस्वी झाले आहेत, ही आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे, असं हे पुस्तक वाचल्यावर पटतं.

 पुस्तक ः ब्रेव्ह न्यू बॉलिवूड
 लेखक ः निर्मल कुमार/ प्रीती चतुर्वेदी

संबंधित बातम्या