तरीही उरे काही उणे..!

नीलांबरी जोशी
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

बुक-क्लब

  •  पुस्तक ः सी पी कवाफी -  कंप्लीट पोएम्स
  •  लेखक ः डॅनियल मेंडेलसन

‘‘टिमोलॉस हा सिसिलीमधला एक उत्कृष्ट संगीतकार आहे. त्याच्या संगीताच्या नादमधुर लहरी ग्रीसमध्ये सर्वत्र पोचल्या आहेत. त्याचे जलसे ऐकायला नगरजन पराकोटीचे उत्सुक आहेत. सगळ्याच वाद्यांवर त्याचं प्रभुत्व आहे. त्यामुळे त्यानं वाजवायला हातात वाद्य घेतल्यावर त्यातून निघणारे स्वर्गीय स्वर प्रेक्षकांच्या हृदयाचा कायमच ठाव घेतात. पण आपल्याला लाभलेल्या या देदीप्यमान यशानंतरही टिमोलॉस मात्र एकाकी आहे. शब्दात न मावणारं कोणतंतरी दु:ख त्याचं काळीज पोखरतंय. त्याचा आत्मा संगीताच्या सुरावटींनी भरुन गेला असला तरी आपली वाद्यं त्याला सुनी वाटतायत. आपल्या मनात लपलेले गूढ स्वर त्या वाद्यांमधून उमटावेत यासाठी तो सतत बेचैन आहे. त्या अस्वस्थ अवस्थेत प्रेक्षकांच्या टाळ्यांचा कडकडाट त्याला मरणप्राय यातना देऊन जातो. असंख्य दैवी देणग्या लाभल्यानंतरही तो संगीतकार सुन्नपणे तिथे उभा आहे..!'' टिमोलॉस या कवाफी या ग्रीक कवीनं लिहिलेल्या कवितेत हे वर्णन आहे. ‘कंप्लीट पोएम्स' या डॅनियल मेंडेलसन यानं अनुवादित केलेल्या कवितासंग्रहात ही कविता आहे. 

‘‘टिमोलॉसच्या वर्णनावरुन धन मिळत असेल, कीर्ती मिळत असेल आणि आपले मनोरंजनही होत असेल; पण यातील कोणत्याही गोष्टीसाठी मी सारंगीला स्पर्श करीत नाही. सारंगीतून निघणारे स्वर मला दिसतात म्हणून मी सारंगी वाजवतो. ते स्वर मेघमंडलापर्यंत जातात आणि अंतर्धान पावतात. हे अलौकिक दृष्य पुनःपुन्हा दिसावे म्हणून मी सारंगिया झालो.'' ही कुसुमाग्रजांची ‘सांरगिया' ही कविता आठवते. पण सगळ्या कलाकारांना हे भाग्य लाभतंच असं नाही. अनेकदा प्रतिभावान कलाकाराला सतत भेडसावणारी एक अतृप्ती, तडफड, सगळं काही मिळवल्यावरही काहीतरी उणं असल्याची भावना सतावते. तीच न्यूनत्वाची भावन ‘टिमोलॉस'मध्ये दिसते. 

कवाफी स्वत:देखील काहीतरी अपुरं असल्यासारखंच एक अलिप्त आयुष्य जगला. अलेक्‍झांड्रिया या ग्रीसमधल्या शहरात एका धनाढ्य कुटुंबात जन्माला आलेल्या कवाफीला प्राचीन ग्रीक संस्कृतीचं प्रचंड आकर्षण होतं. ‘अ पॅसेज टू इंडिया'सारख्या कादंबऱ्यांमुळे गाजलेल्या इ. एम. फॉर्स्टर या इंग्रजी साहित्यकाराबरोबर कवाफीची चांगली मैत्री होती. फॉर्स्टर पहिल्या महायुद्धाच्यावेळी अलेक्‍झांड्रियामध्ये राहिला होता. तेव्हा दोघांनी एकमेकांना अनेक लालित्यपूर्ण पत्रं लिहिली होती. कदाचित यामुळेच कवाफीच्या कविता ग्रीक भाषेतल्या असल्या तरी त्यांची धाटणी युरोपियन आहे. टी एस इलियट या आधुनिक काळातल्या कवीलाही कवाफीच्या कवितांनी वेड लावलं होतं. मजेचा भाग म्हणजे कवीवृत्तीच्या या माणसानं चक्क ‘द थर्ड सर्कल ऑफ इरिगेशन' या सरकारी विभागात ३० वर्षं नोकरी केली. त्याचबरोबर जमेल तेव्हा अलेक्‍झांड्रियाच्या शेअरबाजारात तो पैसेही मिळवायचा. तेव्हाच एकीकडे सिगारेट ओढता ओढता ग्रीक भाषेत उत्तम कविता करायचा. कवितेच्या काही ओळी लिहून कवाफी एका लिफाफ्यात घालायच्या. अस्ताव्यस्त पसरलेल्या घरात तो लिफाफा कुठेतरी ठेवून द्यायचा. मग कधीतरी तो लिफाफा उघडल्यावर त्या ओळी तपासून कविता पूर्ण करायची असा त्याचा शिरस्ता होता. उदाहरणार्थ, ‘वन नाईट' ही कविता त्यानं १९०७ मध्ये लिहिली आणि नंतर १९१६मध्ये पूर्ण केली. या कवितांमधल्या दोन कडव्यांमध्ये कवाफीचा बदललेला मोहरा स्पष्ट जाणवतो. कविता पूर्ण झाल्यावर तो फक्त एखाद्या मित्राला दाखवायचा. वर्तमानपत्राचे संपादक किंवा प्रकाशक यांना कविता देण्यात त्याला स्वारस्य नव्हतं. त्याच्या या आयुष्यावरुन आणि कवितांमधल्या गूढवादावरुन आपल्याकडच्या आरती प्रभुंची आठवण येते. 

१५४ उत्तमोत्तम कवितांचा धनी असलेल्या कवाफीनं जिवंतपणी आपला एकही कवितासंग्रह प्रकाशित होऊ नये याची पुरेपूर काळजी घेतली होती. यामुळेच १९३३ मध्ये कवाफी त्याच्या वयाच्या ७०व्या वर्षी मरण पावला तेव्हा त्याच्या कविता ग्रीस सोडून इतर देशांमध्ये परिचित नव्हत्या. १९३५ मध्ये त्याच्या कवितांचा इंग्रजी अनुवाद प्रथम प्रकाशित झाला. यानंतर ‘कलेक्‍टेड पोएम्स' हा त्याच्या समग्र कवितांचा संग्रह डॅनियल मेंडेलसन यानं २०१२ मध्ये प्रकाशित केला. यात कवाफीच्या अपूर्ण कवितादेखील समाविष्ट केल्या आहेत. ‘‘अनुवादित कविता मूळ भाषेतल्या कवितांइतक्‍याच परिणामकारक वाटणं हा प्रकार दुर्मिळ असतो. मेंडेलसननं केलेल्या अनुवादामुळे ते कवाफीच्या कवितांबाबत घडलं'' असं चक्क डब्ल्यू एच ऑडेन या प्रसिद्ध कवीनं मान्य केलं होतं. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत मेंडेलसन यानं कवाफीच्या कविता अनुवादित करणं हे किती मोठं आव्हान होतं हे लिहिलं आहे. मेंडेलसनच्या अभ्यासपूर्ण अनुवादातून कवितांसोबत कवाफीचं व्यक्तिमत्त्व समोर येतं हे या पुस्तकाचं मोठं यश आहे. 

कवितेचं तंत्र म्हणून कवाफीनं अनेक प्रकार वापरले आहेत. त्याच्या भाषेची वळणं आणि त्यातले संदर्भ थक्क करणारे आहेत. महत्त्वाचं म्हणजे, त्याच्या कविता त्याच्या वाचनाच्या व्यासंगाची साक्ष पटवतात. अवघ्या सात ओळींची कविता वाचल्यानंतर कवाफीनं त्यासाठी किमान सातशे पानं वाचली असतील असं वाचकांच्या लक्षात येतं. 

आधुनिक काळात इतर कोणत्याच कवीनं मध्ययुगातल्या आणि इतिहासातल्या व्यक्ती आजच्या काळातलं रूप देऊन कवाफीइतक्‍या प्रभावीपणे कवितांमधून मांडल्या नसाव्यात. आपल्याकडे रामायण/महाभारत या महाकाव्यांमधल्या व्यक्तिरेखांना आत्ताचे संदर्भ देऊन साहित्य निर्माण करावं तसं काहीसं हे आहे. त्यामुळेच ग्रीक पुराणकथांमधले डेडॉलस, ओडिसी, ऍचिलिस, व्हीनस अशा अनेक व्यक्तिरेखा, राजे महाराजे, रथीमहारथी, योद्धे यांची रेखाटनं कवाफीच्या कवितेत सातत्यानं दिसतात. उदाहरणार्थ, अलेक्‍झांड्रन किंग्ज या कवितेत अलेक्‍झांड्रियाच्या राजांच्या किनखापी पोशाखांचं, भव्य, दिमाखदार स्वागतांचं वर्णन आहे; पण आपलं राज्य, राजेशाही हे शब्दसुद्धा किती पोकळ आहेत आणि आपलं मूल्य काय आहे याची त्यांना चांगलीच जाणीव होती हे though of course they knew what they were worth, what empty words these kingdoms were अशा ओळींमधून कवाफी मांडत जातो. सत्यजित रे यांच्या ‘जलसाघर' सारख्या चित्रपटात बंगालमधल्या जमीनदारांची संपन्नता किती पोकळ होती ते अशाच प्रकारे दिसून येतं. 

कवाफीच्या कवितांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे तो सामान्य माणसाचं जिणं जगला असला तरी मानवी आयुष्याची अतर्क्‍यता त्यानं जाणली. जीवनातले संघर्ष, ताणतणाव, अस्थिरता, सतत चालणारे आशानिराशेचे खेळ यांना कसं तोंड द्यावं याचं मार्गदर्शन करणारं गाइड नसतं. कोणाकडून काय घ्यावं ते आपल्यालाच ठरवावं लागतं. या पार्श्वभूमीवर कवाफीच्या कविता एखाद्या ‘सेल्फ हेल्प' पुस्तकाचं काम करतात. भवितव्याची अनिश्‍चितता, एकाकीपणा, अभिलाषा, जीवनाचा मनमुराद उपभोग घेणं, व्यक्तींच्या मानसिकता आणि भावभावना, मानवी अस्तित्वाचं गूढ अशा चित्रविचित्र, गुंतागुंतीच्या संकल्पना त्याच्या कवितांमध्ये कायम डोकावतात. सामान्यातल्या सामान्य माणसांच्या भावभावनांबद्दल या कविता बोलतात. अतिशय तत्त्वज्ञ, मनोज्ञ आणि बुद्धिमान माणसानं या कविता लिहिल्या आहेत याची सतत प्रचिती येते. उदाहरणार्थ, ‘रिमॉर्स' ही कविता भूतकाळाला चिकटून राहू नका आणि स्वत:चा अपराधी मानून स्वत:चा छळ करू नका (फरगेट अँड फरगिव्ह टू युअरसेल्फ) ही संकल्पना मांडते. याच कवितेत पुढे ‘‘तुम्हाला ज्याबद्दल याक्षणी अपराधी वाटतंय तसं वाटायचा चांगुलपणा तुमच्यात आहे हे मान्य करा'' असे सकारात्मक सल्लेही दिले आहेत. तसंच ‘द गॉड ऍबंडन्स अँटोनी' या त्याच्या कवितेत ‘‘नैराश्‍यात खचून जाऊ नका, गोष्टी कायम तुमच्या मनाप्रमाणे घडत नाहीत, त्यासाठी स्वत:ला बोल लावून घेऊ नका किंवा दैवालाही दोष देऊ नका'' हेच समजावून सांगतात. 

कवाफीमधला तत्त्वज्ञ कवितांमध्ये अजिबात लपत नाही. उदाहरणार्थ, ‘मॉर्निंग सी' या कवितेत ‘‘क्षणभर थांबून सकाळचा संथ समुद्र, तुरळक मेघसुद्धा नसलेलं आकाश, निळाभोर किनारा आणि आसमंतात भरुन राहिलेला उजेड पाहू दे..'' असं वर्णन आहे. पण ‘‘नजरेला दिसणारं विश्व क्षणभंगुर असतं'' हा काहीसा तात्विक विचार या कवितेतल्या हे सगळं सृष्टीवैभव खरोखर दिसतंय या विचारानं स्वत:ला क्षणभर फसवू दे'' अशा ओळींमध्ये दिसतो. तसंच ‘वॉल्स' या कवितेत ‘‘कोणतीही दया, शरम, समजूतदारपणा न बाळगता माझ्याभोवती कोणीतरी अज्ञात माणसांनी भिंती उभारल्या. आता मी सतत पुढे काय होणार या अस्वस्थतेत आतमध्ये बसलो आहे. माझ्या नशिबात काय आहे हा विचार माझं काळीज कुरतडतोय. त्यांनी भिंती उभारल्या तेव्हाच मी का लक्ष दिलं नाही. आता मला त्यांनी जगापासून तोडलं'' असं एका माणसाचं आक्रंदन ऐकू येतं. पण कवितेच्या शेवटी शेवटी ‘‘त्या भिंती बांधल्या जात असताना मला बांधकामाचे आवाज ऐकू आले नाहीत’’ असं तो माणूस म्हणतो. तेव्हा आपणच आपल्याभोवती भीतीच्या, समाजाच्या नजरांच्या, कोण काय म्हणेल याच्या अदृश्‍य भिंती बांधत असतो. मग त्या भिंतींच्या आड आपण गुदमरत जातो, असा विचार या कवितेत मांडल्याचं लक्षात येतं. 

तत्वज्ञानावर आधारित प्रचंड गाजलेली कवाफीची कविता म्हणजे ‘इथाका..!’ग्रीक पुराणात दहा वर्षं चाललेलं ट्रोजनचं युद्ध संपवून ओडिसी हा राजा आपल्या इथाका या शहरात परत येत असतो. या कथेवरुन इथाका हे वाटचाल करत उद्दिष्टाकडे पोचण्याचं प्रतीक मानून कवाफीनं इथाका ही अजरामर कविता लिहिली आहे. जेम्स बॉंडच्या भूमिकेनं गाजलेल्या शॉन कॉनरी या अभिनेत्यानं अभिवाचन केलेली ही कविता त्याच्या आवाजात युट्यूबवर ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात. या कवितेतल्या ‘‘तुम्ही इथाकाकडे प्रवासाला निघालात तर खूप मार्गक्रमण करण्याचं वरदान मागा. वाटेत चालत असताना तुमच्या मनात इथाका सतत असेल. इथाकाला पोचणं अपरिहार्यही असेल. पण तिथे पोचायची अजिबात घाई करू नका. ‘‘हमको तो सफर प्यारा मंझिल का खुदा हाफिज' अशा विचारानं अनेक वर्षं तो प्रवास चालू दे. मग तुम्ही इथाकाला पोचाल तेव्हा वयोवृद्ध झालेले असाल. पण वाटेत जे काही लाभलं त्यानं तुम्ही ज्ञानसंपन्न आणि अनुभवसंपन्न झालेले असाल. इथाकानं तुम्हाला तो अद्भुत प्रवास करायची संधी दिली हे विसरु नका. इथाकाकडे तुम्हाला देण्यासारखं यापेक्षा जास्त काही नाही’’ अशा अर्थांच्या ओळी वाचून आपलं स्वत:चं आयुष्य प्रत्येकाच्या डोळ्यासमोर तरळत जातं. कवाफीची कोणतीही कविता मध्येच पान उघडून वाचायला सुरवात करावी. आपल्या अस्तित्वाचा अर्थ शोधायला लावणाऱ्या कवितांमुळे कवाफी चिरतरुण आणि आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर नित्यनूतन भासत जातो...! आपल्या आयुष्याचं प्रतिबिंब सापडत जाणं यापलीकडे कविता तरी आपल्याला जास्त काय देऊ शकते? 

संबंधित बातम्या