मनस्वी लिओनार्डो

नीलांबरी जोशी
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

बुक-क्लब
 पुस्तक ः लिओनार्डो दा विन्सी
 लेखक ः वॉल्टर इसाकसन

‘तेव्हा मेलिंडाशी माझं नुकतंच लग्न झालं होतं. एके दिवशी मी एक नोटबुक लिलावात विकत घेणार आहे असं तिला सांगितलं. त्याची किंमत खूप जास्त होती. त्यामुळे तुझ्याकडे एक महागडा लॅपटॉप आहे ना? असं तिनं (टिपिकल बायकोप्रमाणे..!) आश्‍चर्यानं विचारलं. त्यावर मी नोटबुक म्हणजे एक वही विकत घेणार आहे असं उत्तर दिलं. ते नोटबुक म्हणजे लिओनार्डो दा विन्सीच्या जर्नल्सपैकी होतं. लिओनार्डोच्या या ७२०० पानांमध्ये नकाशे, डूडल्स, शरीरशास्त्राची रेखाटनं, यंत्रांच्या कल्पनांची रेखाटनं, कल्पक शस्त्रास्त्रांची रेखाटनं, शहराच्या पुनर्रचनेची रेखाटनं, भौमितिक आकार, पोर्ट्रेटस्‌, वैज्ञानिक निरीक्षणं, केसांच्या आणि समुद्राच्या लाटांची रेखाटनं अशा गोष्टी खच्चून भरलेल्या सापडतात. मला लिओनार्डोचं इतकं आकर्षण असल्यामुळे मला वॉल्टर इसाकसनचं पुस्तक कधी वाचेन असं झालं होतं.’’ स्टीव्ह जॉब्ज आणि आइन्स्टाईन यांची चरित्रं लिहून गाजलेल्या इसाकसन यानं ‘लिओनार्डो दा विन्सी’ या अवलियावर नुकतंच एक पुस्तक लिहिलं आहे. त्या पुस्तकाबद्दल हे उद्गार चक्क बिल गेट्‌स यानं काढले होते. गे, शाकाहारी, रंगीबेरंगी  आणि विशेषत: गुलाबी रंगांचे पोशाख घालणाऱ्या, कामाच्या विचित्र सवयी असलेल्या आणि प्रसिद्धीशी काही देणंघेणं नसणाऱ्या या १५व्या शतकातल्या ‘रेनासांस मॅन’ बद्दल आजही अनेक शोध नव्यानं लागत असतात. 

वेगवेगळ्या चिक्कार क्षेत्रात जो तज्ज्ञ असतो तो ‘रेनासांस मॅन’ किंवा बहुश्रुत माणूस!  लिओनार्डो दा विन्सी हा ‘मोनालिसा’किंवा ‘द लास्ट सपर’ या चित्रांमुळे जगदविख्यात असलेला माणूस असाच ‘रेनासांस मॅन’ होता. पुरातत्त्वशास्त्र, जीवाश्‍मशास्त्र, स्थापत्यकला, विज्ञान, संगीत, गणित, इंजिनिअरिंग, साहित्य, शरीरशास्त्र, भूगर्भशास्त्र, जीवशास्त्र, लिखाण, इतिहास आणि नकाशे काढणं या सर्व क्षेत्रांमध्ये त्याचं नाव आदरानं घेतलं जातं.

वॉल्टर इसाकसन यानं अल्बर्ट आइन्स्टाईन, बेंजामिन फ्रॅंकलिन, स्टीव्ह जॉब्ज अशा बहुश्रुत आणि बुद्धिमान माणसांवर पुस्तकं लिहिलेली आहेत. निरीक्षण आणि कल्पनाशक्ती यांच्या जोरावर सर्व क्षेत्रातल्या गोष्टींचा एकमेकांशी संबंध जोडण्याचं काम या सर्वांनी केलं होतं. मात्र या सर्वांबद्दल बरीचशी माहिती सहज उपलब्ध होती. लिओनार्डोबाबत मात्र माहिती गोळा करणं सोपं नव्हतं. या दृष्टिकोनातून पाहिलं तर हे पुस्तक लिहिताना इसाकसननं केलेलं संशोधन थक्क करणारं आहे. महत्त्वाचं म्हणजे लिओनार्डोचं आयुष्य आणि त्याच्या कलाकृती यांच्याबद्दल इतक्‍या विविध दृष्टिकोनांमधून सोप्या भाषेत आणि ओघवत्या शैलीत लिहिलेलं दुसरं पुस्तक नाही.

‘‘लिओनार्डो १४५२ मध्ये अनौरस म्हणून जन्माला आला ही भाग्याचीच गोष्ट होती’’हे पुस्तकाच्या सुरुवातीचं वाक्‍य जरा विचित्र वाटतं. पण तत्कालीन इटलीचा इतिहास पाहिला तर १३०० पासून तिथे व्यापारउदीम जोमानं वाढत गेला होता. त्याबरोबर व्यवसायानिमित्तानं निरनिराळे करार करणं, जमिनींची खरेदी-विक्री करणं, मृत्यूपत्रं आणि इतर कायदेशीर कागदपत्रं करणं या सर्व गोष्टींचं प्रमाण वाढलं. ही कामं करणारे नोटरी समाजात महत्त्वाचे मानले जायचे. पहिलं मूल नोटरी होणार अशीही एक पद्धत रुढ होती. पण लिओनार्डो अनौरस असल्यामुळे तो साचेबंद पद्धतीत नोटरी होण्यापासून वाचला. त्याची आई शेतमजूर होती; पण वडील धनाढ्य असल्यामुळे त्याच्यावर मजुरी करण्याचीही वेळ आली नाही. 

औपचारिक शालेय शिक्षण न घेतलेला लिओनार्डो निसर्गाच्या मुक्त शाळेत मनमुराद शिकला. ‘‘अनुभव या गुरूचा तो शिष्य बनला’’ असं तो स्वत:च म्हणायचा. विज्ञानाची आवड, निसर्गात घडणाऱ्या गोष्टींचं बारकाईनं केलेलं निरीक्षण आणि मानवी भावनांबद्दलची सखोल जाण या गोष्टींमुळे लिओनार्डो महान ठरलाच. पण या सगळ्या गोष्टींपेक्षा महत्त्वाचं होतं ते त्याचं कुतूहल..! ‘‘पाण्यावरच्या पूलाची दुरुस्ती शिकण्यासाठी हायड्रॉलिक्‍समधला गुरू शोधणं, बदकाचे पाय न्याहाळून पाहणं, सुतार पक्ष्याची जीभ तपासून त्याचं सविस्तर वर्णन लिहिणं’’ अशी त्याच्या वहीत सापडणारी असंख्य कामं त्याची जिज्ञासा निदर्शनास आणतात. ससाण्यासारखा दिसणाऱ्या काईट पक्ष्याची चोच कशी काट्याचमच्यासारखी असते, तो उडताना पंख कसे फैलावतो आणि जमिनीवर उतरताना शेपूट कसं खाली घेतो, अशी निरीक्षणं तो सातत्यानं करत असे. त्याच्या सगळ्या क्षमतांमध्ये गोष्टींबद्दल नावीन्य आणि कुतूहल वाटणं ही सर्वात महत्त्वाची क्षमता होती. रक्तप्रवाह कसा वाहतो हे तपासण्यापासून सुतारपक्ष्याची जीभ कशी आहे हे तपासण्यापर्यंत तो सतत निरीक्षणं करुन, आपले विचार कागदावर उतरवून ठेवायचा.मग एखादी गोष्ट कशी घडत असेल त्याचे तर्क लढवायचा.

लिओनार्डोनं शोधलेल्या/कल्पना केलेल्या अनेक गोष्टी शास्त्रज्ञांनी काही दशकांपूर्वी शोधल्या इतका तो द्रष्टा संशोधक होता. उदाहरणार्थ, पॅराशूट, हेलिकॉप्टर आणि रणगाडे यांची त्यानं रेखाटनं केली होती. सौरऊर्जा, कॅल्क्‍युलेटर, भूगर्भशास्त्रातली टेक्‍टॉनिक्‍स याची त्याला कल्पना होती. फ्लाइंग मशिन्स, क्रॉसबो (धनुष्यबाणाचं आधुनिक यांत्रिक रूप), बाहुबली चित्रपटात दाखवलंय तसं चाकांच्या दोन्ही बाजूंमधून बाहेर आलेलं भाल्यासारखं टोक असलेले रथ, नीडल ग्राइंडर अशा त्यानं मांडलेल्या अनेक गोष्टी आज व्यवहारात वापरल्या जातात. गतीचा पहिला आणि तिसरा नियम याची त्यानं न्यूटनच्या आधी २०० वर्षं कल्पना केलेली होती. व्हेनिसचं रक्षण करण्यासाठी श्वसनाची उपकरणं घालून पाण्याखालून जाणारे पाणबुडे तयार करणं या त्याच्या कल्पनेतही चांगलंच तथ्य होतं. याच तत्वावरच्या स्कूबाचा शोध अनेक शतकांनंतर लागला.

शरीरशास्त्राबाबतचे त्याचे शोध अचंबित करणारे आहेत. १५०८ ते १५१३ च्या दरम्यान लिओनार्डोनं २० प्रेतांचं शवविच्छेदन केलं होतं. त्यातून त्यानं हृदयातल्या कप्प्यांमधून वाहणारा रक्तप्रवाह, स्नायूंची रचना, अवयवांचं कार्य, धमन्यांचं कार्य यावर सविस्तर टिपणं काढली होती. हृदयाची झडप कसं काम करते ते वैद्यकशास्त्रानं शोधायच्या ४५० वर्षं आधी त्यानं शोधलं होतं. तसंच एका १०० वर्षांच्या माणसाच्या प्रेताचं विच्छेदन करुन त्यानं arteriosclerosis (धमन्यांच्या कडेला कोलेस्टेरॉलसारख्या गोष्टी साठून त्या घट्ट होणं) वयोमानामुळे होतो हे दाखवून दिलं होतं. याच शरीरशास्त्राच्या अभ्यासाचा त्यानं चित्रकलेसाठी भरपूर उपयोग केला होता. परिपूर्णतेचा ध्यास असलेल्या लिओनार्डोनं ‘‘कानाच्या वरच्या टोकापासून डोक्‍याच्या वरच्या टोकापर्यंतचं अंतर हे हनुवटीच्या खालच्या टोकापासून डोळ्याच्या अश्रूपिंडापर्यंतच्या अंतराइतकं असतं’’ अशी मोजमापं परिश्रमपूर्वक केली होती. हसताना माणसाच्या चेहऱ्यावरच्या कोणत्या स्नायूंच्या कशा हालचाली होतात ते त्यानं तपासलं होतं. त्यापैकी कोणती नस मेंदूशी आणि कोणती मज्जारज्जुशी जोडलेली असते इथपर्यंत त्याचा सखोल अभ्यास होता. चित्रकलेत मोजमापं महत्त्वाची ठरतात हे जाणणाऱ्या लिओनार्डोनं रंगवलेलं मोनालिसाचं स्मितहास्य आजवर जगाला भुरळ घालतं त्यामागे इतका अभ्यास होता. यामुळेच लिओनार्डच्या विज्ञानाच्या वेडानं त्याची कला जोपासली असा इसाकसनचा दावा आहे.

मल्टिटास्किंगमुळे त्याच्या सर्व क्षेत्रातल्या क्षमता पुरेपूर वापरल्या गेल्या नाहीत का? असा एक प्रश्नही इसाकसन या पुस्तकात उपस्थित करतो. इतक्‍या विविध गोष्टींमध्ये रस असल्यामुळे अनेक कामं अर्धवट सोडून तो नवीनच कोणत्यातरी क्षेत्रात रस घ्यायचा. उदाहरणार्थ, एका सरकारी अधिकाऱ्याचा घोड्यावर बसलेला पुतळा शिल्पातून साकारायचं काम लिओनार्डोकडे होतं. या दरम्यान ते शिल्प पूर्ण करण्याची गरज म्हणून लिओनार्डोनं आधी काही घोड्यांचं विच्छेदन करण्यात अनेक दिवस घालवले. त्याच अभ्यासातून घोड्यांचे तबेले स्वच्छ कसे रहातील याचा विचार करुन त्यांची नवीन डिझाईन्स तयार केली. एवढं करुन त्यानं तो घोड्यावर बसलेल्या अधिकाऱ्याचा पुतळा कधीच पूर्ण केला नाही. तसंच घोड्यांवर एक शोधनिबंध लिहायला घेतला होता तोही पूर्ण केला नाही. १५०१ मध्ये इझाबेला या इटलीमधल्या प्रख्यात आणि विद्वान महिलेलं लिओनार्डोनं आपलं चित्र काढावं यासाठी एक मध्यस्थ नेमला होता. पण त्या मध्यस्थाला लिओनार्डो अव्यवस्थित आणि बेभरवशाचा माणूस वाटला. इझाबेलाला त्यानंतर लिओनार्डोनं तीन वर्षं टांगणीवर ठेवलं होतं. अखेरीस तिनं येशू ख्रिस्ताचं चित्र काढायला त्याला आमंत्रित केलं. तेव्हाही तो आपलं चित्रकलेचं साहित्य न घेताच हजर झाला होता. मुळात त्या सुमारास गणितातली आकडेमोड  लिओनार्डोला खूप भुरळ घालत होती. हातात कुंचला धरणं त्याला जवळपास अशक्‍य वाटत होतं. नंतर त्यानं इझाबेलाचं सुरेख पोर्ट्रेट काढलं. तसंच ‘द लास्ट सपर’ हे चित्र काढत असताना तो कुंचल्याचे काही फटकारे मारुन थांबत असे. यावर विचारणा केली असता त्यानं ड्यूकला ‘‘खरे कलाकार सर्वात कमी काम करतात तेव्हा त्यांनी सर्वात मोठा पल्ला गाठलेला असतो’’ असं उत्तरही दिलं होतं. मोनालिसा हे त्याचं सर्वाधिक गाजलेलं चित्रही तो १५ वर्षं काढत होता.

लिओनार्डोच्या चित्रांमध्ये उतरलेलं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे त्याचं समलिंगी असणं. त्यामुळेच त्यानं काढलेली पुरुषांची रेखाटनं स्त्रियांच्या काढलेल्या चित्रांपेक्षा उन्मादक वाटतात. इतकंच नव्हे तर त्याच्या चित्रांमधले काही पुरुष स्त्रियांसारखे दिसतात. उदाहरणार्थ, ‘व्हर्जिन ऑफ द रॉकस’ या त्याच्या एका गाजलेल्या चित्रामधला गॅब्रिएल किंवा युरिएल स्त्रीसारखेच दिसतात. लिओनार्डोला स्त्रियांबद्दल लैंगिक आकर्षण नसल्यामुळे त्यांच्याकडे तटस्थतेनं पाहून तो चित्रं काढू शकला. तसंच त्याबाबत रस नसल्यामुळे त्यानं स्त्रियांची नग्नचित्रं कधीच काढली नाहीत. या पुस्तकात अनेक रंगीत चित्रं उत्कृष्ट स्वरूपात पहायला मिळतात, हे या पुस्तकाचं अजून एक बलस्थान आहे.

चित्रकार म्हणून सर्वात जास्त गाजलेला लिओनार्डो स्वत:ला महान चित्रकार मानत नव्हताच. याबद्दलचं एक उदाहरण बोलकं आहे. वयाच्या तिसाव्या वर्षी त्यानं मिलान या इटलीतल्या शहरातल्या एका सरकारी जागेसाठी अर्ज केला होता. त्या अर्जात स्वत:ची माहिती लिहिताना ‘‘मिलिटरी इंजिनिअरिंग या विषयातलं ज्ञान इथपासून नाटकाचं नेपथ्य करणारे सेट्‌स डिझाईन करणं इथपर्यंत स्वत:च्या अनेक क्षमता त्यानं लिहिल्या होत्या. सर्वात शेवटी चित्रंही काढू शकतो’’ अशी नोंद होती.

पुस्तकाच्या शेवटच्या ‘मेंटल जिम्नॅस्टिक्‍स’ या प्रकरणातून आपण लिओनार्डोकडून काय काय शिकू शकतो त्याबद्दल लिहिलेलं आहे. लिओनार्डोमध्ये स्पर्धात्मक वृत्ती अजिबात नव्हती. त्याला आपल्या विद्वत्तेचा, कलेचा वृथा अहंकार नव्हता. ज्ञान मिळवणं हे ते ज्ञान लोकांसमोर मिरवण्यापेक्षा त्याला जास्त महत्त्वाचं वाटत होतं. ज्ञानाची लालसा त्याला वैयक्तिक आनंदासाठी गरजेची वाटत होती. अनेक गोष्टी करत असताना इतिहासात आपलं नाव व्हावं वगैरे इच्छा त्याच्या जवळपास फिरकल्याही नव्हत्या. हे सर्व आणि मुख्य म्हणजे कुतूहल जोपासणं हे त्याच्याकडून शिकण्यासारखं आहे..!

ज्या मनस्वी लिओनार्डोनं जगाला अनेक देणग्या दिल्या तो लिओनार्डो हीच जगासाठी एक देणगी आहे, असं सतत जाणवत राहणं हे या पुस्तकाचं मोठं यश आहे.

संबंधित बातम्या