‘स्व’चा शोध - ‘एज्युकेटेड’ 

नीलांबरी जोशी
शनिवार, 8 डिसेंबर 2018

बुक-क्लब
 पुस्तक ः एज्युकेटेड
 लेखक ः तारा वेस्टओवर

शॉन माझ्या वडिलांना म्हणाला, ‘हिच्याबद्दल गावात काय काय काय बोललं जातं..’ 

त्याच्या या वक्तव्यावरून, दिवस गेले असणार, याची वडिलांना तत्काळ खात्री पटली. 

‘आपण तिला गावात जाऊन नाटक पाहायला परवानगी दिली हेच चुकलं आपलं..’ वडील आईच्या अंगावर खेकसले. 
‘माझी मुलगी तशी नाही. मला तिच्याबद्दल खात्री आहे,’ आई म्हणाली. 

‘छे.. या वयातल्या सगळ्याच मुली तसल्याच असतात.. आणि हिच्यासारख्या वरून साध्याभोळ्या दिसणाऱ्या तर खात्रीनं वेश्‍याच असतात....!’ हे त्यावर शॉनचं उत्तर. 

शॉन हा माझा भाऊ. हा संवाद घडला तेव्हा मी पंधरा वर्षांची होते. त्यादिवशी मी किंचितसा मस्कारा आणि लिपस्टिक लावली होती. त्यावरून घरात हे आकांडतांडव चाललं होतं. त्यांचा हा गदारोळ चालू असताना मी घाबरून आतल्या खोलीत गेले. थोडावेळ गुडघे पोटाशी आवळून त्याभोवती हातांची मिठी घालून थरथरत बसले. मग मी उठले. आरशासमोर उभी राहिले. शर्ट किंचित वर करून पोट चाचपलं. ‘खरोखर दिवस गेले असतील?’ तोपर्यंत एकाही मुलाचं मी चुंबनसुद्धा घेतलं नव्हतं..! मुलांशी बोलायलाही आमच्यावर बंदी होती. खरं तर दिवस जाण्याबद्दल सगळेजण काय म्हणत होते तेच मला कळत नव्हतं! 

मर्मोनिझम या धर्मातल्या तारा नावाच्या मुलीची ही गोष्ट. ‘मर्मोनिझम’ला शिक्षण मान्य नसल्यामुळे १९८६ मध्ये अमेरिकेतल्या इडाहो राज्यात एका छोट्या गावात जन्माला आलेल्या तारानं वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत वर्गात पाऊलही ठेवलं नव्हतं. सतराव्या वर्षी शिकायला सुरुवात करून तिनं ब्रिगहॅम यंग विद्यापीठातून बी.ए. केलं. तिथं तिला ‘गेटस केंब्रिज’ ही शिष्यवृत्ती मिळाली. २००९ मध्ये तिनं केंब्रिजमधून एम. फिल. केलं. हार्वर्डमध्ये काही काळ शिकून तिनं २०१४ मध्ये डॉक्‍टरेट मिळवली. आपल्या या अनुभवांवर तिनं नुकतंच ‘एज्युकेटेड’ हे आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहिलं आहे. 

‘मर्मोनिझम’ हा धर्म जोसेफ स्मिथ या माणसानं १८३० मध्ये न्यूयॉर्कमध्ये स्थापन केला. ‘बुक ऑफ मर्मोन’ हे पुस्तक एका टेकडीवर पुरलं आहे असं मर्मोनी नावाच्या देवदूतानं त्याला सांगितलं. त्यावरून त्यानं ते पुस्तक शोधून प्रकाशित केलं, अशी कथा सांगतात. या धर्माचे एकूण १.५ कोटी अनुयायी आहेत. त्यापैकी भारतात ११ हजार अनुयायी आहेत. स्मिथची १८४४ मध्ये हत्या झाल्यानंतर ‘मर्मोनिस्ट’ लोकांनी ब्रिगहॅम यंग याला नवीन धर्मगुरू मानलं. मर्मोनिझममध्ये एकापेक्षा जास्त बायका असणं हीच रीत आहे. चहा कॉफी पिणं आणि तलावांमध्ये सैतान वास करतो या गृहीतकामुळे पोहणं या धर्मात निषिद्ध आहे. मुलींनी बिनबाह्यांचे कपडे घालण्यावर बंदी आहे, रविवारी चर्चमध्ये जाणं सोडून इतर कोणतीही गोष्ट करणं मर्मोनिझमच्या मूलतत्वात बसत नाही. 

या तत्त्वांमुळं ताराला लहानपणापासून अनेक अत्याचारांना तोंड द्यावं लागलं. ते सगळं सहन करून पीएच.डी. मिळवण्यापर्यंतचा तिचा प्रवास या पुस्तकात आहे. ‘एज्युकेटेड’ हे पुस्तक ताराचं इडाहोमधलं बालपण आणि किशोरवय, तिचं ब्रिगहॅम विद्यापीठातले दिवस आणि केंब्रिजमधल्या शिक्षणातले अनुभव अशा तीन भागात विभागलेलं आहे. 

‘आम्ही सात भावंडं होतो. त्यापैकी चौघांकडं जन्मदाखला नव्हता. आमची मेडिकल रेकॉर्डसच नव्हती. डॉक्‍टर्स किंवा नर्सेस यांच्याशिवाय घरातच आमचा जन्म झाला होता. आम्ही शाळेत कधीच गेलो नाही. त्यामुळं आमच्याकडं शाळेचा दाखलाही नव्हता. इडाहो राज्य आणि अमेरिकन सरकार यांच्यानुसार मुळात मी अस्तित्वातच नव्हते...’ अशा वर्णनानं पहिला भाग सुरू होतो. वेस्टोव्हर कुटुंबातल्या सात भावंडांमध्ये तारा सर्वांत धाकटी मुलगी होती. ताराची आई फाये ही मर्मोनिझमची सगळी तत्त्वं मानत नव्हती. ताराची आई सुईण होती. आईला काढे उकळायला अनेकदा तारा मदत करायची. 

ताराच्या घरात पैशाचा कायम तुटवडा असायचा. जेने हे ताराचे वडील स्वतःला कुटुंबाचे प्रेषित मानत होते. दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ खाणं हाही ते गुन्हा मानत. ते जुन्या गाड्यांचे भाग वेगळे करून विकायचे. त्यातला भंगार गोळा करण्याचं काम घरातल्या सगळ्यांनाच करावं लागायचं. जुन्यापुराण्या गाड्यांचे पत्रे गंजलेले असल्यामुळं सगळ्या कुटुंबीयांच्या हातापायांना कायम जखमा व्हायच्या. तसंच घोड्यावरून पडणं, मोटारगाड्यांना अपघात असे प्रकारही सतत होत असतं. मर्मोनिझममध्ये वैद्यकव्यवस्था अमान्य असल्यामुळं भाजण्यापासून ते डोक्‍याला मार लागण्यापर्यंत सर्व दुखापतींवर फक्त आयुर्वेदिक उपचार चालायचे. भाजलेल्या त्वचेवर किंवा डोक्‍याला मार लागल्यावर वेदनाशामक गोळ्या किंवा अँटिबायोटिक्‍स न घेता दुखणं बरं करणं हे भयंकर होतं. त्यावर ताराची आई इलाज करायची. पण आईलाच जर काही झालं तर तिच्यावर इलाज करायलाही कोणी नसायचं. ताराचा भाऊ शॉन यानंही तिच्यावर अनन्वित अत्याचार केले. एकदा गावातल्या मुलाशी मैत्री झाल्यामुळं तारा झोपेत असताना तिचा गळा दाबून खून करण्याचाही प्रयत्न शॉननं केला होता. 

या कुटुंबातल्या मुलांना शिक्षण मिळावं याची तजवीज करणारं कोणी नव्हतं. दिवसभरातली कामं करून झाल्यावर तळघरात पुस्तकं चाळणं इतकंच शिक्षण ताराला उपलब्ध होतं. त्या पुस्तकांमधून काय शिकायचं, कसं शिकायचं हे स्वतःलाच ठरवायला लागायचं. टायलर या दुसऱ्या भावानं आपल्या कुटुंबाच्या पारंपरिक पद्धतींना विरोध करत प्रथम घर सोडलं आणि तो शिकायला गेला. त्याच्यावरून प्रेरणा घेऊन तारानं जेव्हा शिकायचा मनोदय बोलून दाखवला तेव्हा वडिलांनी अर्थातच नाराजी व्यक्त केली. ‘देवाचा या निर्णयामुळं कोप होईल’ असंही सांगितलं. पण घर सोडून बाहेर पडायचं आणि शिक्षण घ्यायचं हा तारानं निर्धार केला होता. मग तिनं स्वतःच गणित, व्याकरण, विज्ञान यांचा अभ्यास केला. एक परीक्षा देऊन ती ब्रिगहॅम यंग विद्यापीठात दाखल झाली. तिथं तारा मानसशास्त्र, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, इतिहास हे विषय शिकली. 

विद्यापीठात असताना तारानं एक शब्द वाचला. तिला त्या शब्दाचा अर्थ समजला नाही. वर्गात इतर मुलं हात वर करून शंका विचारतात हे तिनं पाहिलं होतं. मग इतर मुलांप्रमाणं तिनंही हात वर करून त्या शब्दाचा अर्थ विचारला. तो शब्द ऐकून वर्गात स्मशानशांतता पसरली. शिक्षकांनी उत्तर देणं टाळलं. तास संपल्यावर एका मित्रानं ताराला स्पष्ट शब्दात असे जोक्‍स करत जाऊ नकोस असं बजावलं. अखेरीस तारानं कॉम्प्युटर लॅबमध्ये जाऊन त्या शब्दाचा अर्थ गुगलवर पाहिला. तो शब्द होता ‘होलोकॉस्ट’..! तारानं तोपर्यंत होलोकॉस्ट, नेपोलियन, मार्टिन ल्यूथर किंग ही नावंही ऐकली नव्हती. युरोप हा तिला एक देश वाटत होता. कृष्णवर्णीयांना दिल्या जाणाऱ्या वागणुकीबद्दलही तिला कॉलेजमध्ये जाईपर्यंत माहिती नव्हतंच. वर्गात इतर कोणीच मर्मोनियम धर्माचं नसल्यामुळं ती आणि इतर विद्यार्थी यांच्यातला फरक दिवसेंदिवस उठून दिसत होता. त्याचा ताराला खूप मानसिक त्रास झाला. मर्मोनिझममधल्या बहुपत्नीत्वाच्या चालीवरून ताराला एक विचित्र फटका बसला. कॉलेजमध्ये असताना तिला एक दोघांनी डिनरला आमंत्रण दिलं. तारानं निक्षून नकार दिला. तेव्हा लग्नाला विरोध असणारी स्त्री म्हणून तिला तिच्या धर्माच्या बिशपनं बोलावणं धाडलं. त्यांनी तिला जाबच विचारला. पण पुरुषांबरोबर संबंधाला होकार देणं म्हणजे बहुपत्नीत्वाकडं वाटचाल असं ताराचं ठाम मत होतं. त्याचा आपण बळी व्हायचं नाही असं तारानं ठरवलं होतं. खरं तर, तारुण्यसुलभ भावना तिला छळत असणार. पण हे द्वंद्वही तिला सहन करावंच लागलं. 

सुट्यांमध्ये घरी आल्यावर ती शिकतेय याच्या रागानं शॉन तिला मारहाण करायचा. तर वडील शिक्षा म्हणून तिला चिक्कार कामं करायला लावायचे. 

अशा प्रतिकूल परिस्थितीत तारानं पदवी घेतली. केंब्रिज विद्यापीठामध्ये शिकायला गेल्यावर दोन फेमिनिस्ट स्त्रियांबरोबर तिचं पहिल्यांदाच संभाषण झालं. त्यांच्या बुद्धिमत्तेनं आणि सहज प्रेमळ वागण्यानं ताराला फेमिनिझमबद्दल आकर्षण निर्माण होऊन तिनं त्या विषयावरचं साहित्य वाचलं. पण तोपर्यंत फेमिनिझमची पहिली लाट ओसरून दुसरी लाट आली होती. ‘सिमॉन द बोव्हाची पुस्तकं मी वाचायचा प्रयत्न केला. पण त्यातलं फारसं कळलं नाही म्हणून काही पानं वाचून मी बंद केली..’ असं तारानं लिहिलं आहे. पण नंतर तिनं मेरी वूलस्टोनक्राफ्टची पुस्तकं वाचली. ‘एकोणिसाव्या शतकात इंग्लंडमध्ये स्त्रीपुरुष समान आहेत. फक्त महिलांना शिक्षणाचा अभाव आहे,’ असं मानणारी मेरी तिला जवळची वाटली. तसंच ‘स्त्रियांना आपल्यातला न्यूनगंड आणि अवलंबित्व कमी करायचं असेल तर त्यांनी शिकायला हवं,’ असं मत मांडणारा जॉन स्टुअर्ट मिल हा विचारवंत तिला जास्त जवळचा वाटला. 

पितृसत्ताक पद्धतीचा तिच्यावर, तिच्या कुटुंबावर आणि तिच्या भविष्यावर किती परिणाम झाला त्याचे चटके ताराला चांगलेच जाणवत होते. त्यामुळं पितृसत्ताक पद्धतीत पुरुष स्त्रियांवर किती अन्याय करतात आणि त्याचे परिणाम त्यांच्या आयुष्यावर किती खोलवर जातात त्याबद्दलचे विचार तारानं या भागात सविस्तरपणं मांडले आहेत. 

तारानं कॉलेजमध्ये असताना मानसशास्त्र हा विषय घेतला होता. तो विषय शिकताना ताराला आपल्या वडिलांच्या वागण्याची लक्षणं बायपोलार डिसऑर्डर या मनोविकाराची वाटली. त्यावर तिनं अनेकजणांशी सल्लामसलत केली. अनेक पुस्तकं वाचली. मानसशास्त्राच्या एका प्राध्यापकांना एका कल्पित काकाची कहाणी रचून तिनं याबाबत विचारणाही केली. पण त्यांच्या म्हणण्यानुसार ती लक्षणं स्किझोफ्रेनिया या मनोविकाराशी जुळत होती. मात्र या मनोविकारांची कारणं मेंदूतल्या रासायनिक बदलांशी निगडित असतात हे शिकल्यावरही तिचा आपल्या वडिलांवरचा राग मात्र कमी झाला नाही. ताराला स्वतःला ताणानंतर होणारा ‘पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर - पीटीएसडी’ हा मनोविकारही काही प्रमाणात असावा अशी शंका पुस्तक वाचताना येते. 

स्वतःशी प्रामाणिक राहताना कुटुंबातल्या नीतीनियमांशी प्रामाणिक राहता येत नाही हे लक्षात आल्यानं ताराची झालेली द्विधावस्था पुस्तकात अनेकदा जाणवते. या दृष्टिकोनातून हे पुस्तक म्हणजे कुटुंबातले नातेसंबंध करकचून आवळले गेल्यावर उठणाऱ्या व्रणांची कहाणी आहे. जवळच्या माणसांबरोबरच्या ताणलेल्या नात्यांमुळं मनावर चरे उमटल्यामुळं होणाऱ्या अव्यक्त ठसठसत्या दुःखाची एक मूक व्यथा आहे. 

‘एज्युकेटेड’ हा या अर्थानं एका ‘स्व’च्या शोधाचा प्रवास आहे. शिक्षण एखाद्याला काय देतं याचं उत्तर या पुस्तकात मिळतं. अन्यायाविरुद्ध बंड करून उठणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला अशा प्रकारचे अनुभव येतात. या अर्थानं हे पुस्तक वैश्‍विक ठरतं.

संबंधित बातम्या