नवा आशावाद जागवणारी कादंबरी 

प्राजक्ता पटवर्धन
सोमवार, 11 जानेवारी 2021

पुस्तक परिचय

संत ज्ञानेश्वरादि भावंडांवर आजवर बरेच लिखाण झाले आहे. कोवळ्या वयात अलौकिक प्रतिभेचे दर्शन घडवून आपले अवतारकार्य पूर्ण झाल्याचे समजताच समाधी घेणारी ही भावंडे सर्वांच्याच प्रेमास आणि आदरास पात्र ठरली. पण या सर्वांमध्ये थोडेसे दुर्लक्षित म्हणता येतील असे व्यक्तिमत्त्व म्हणजे निवृत्तिनाथ. संत ज्ञानदेव, संत सोपानदेव आणि मुक्ताबाईचे गुरू, गहिनीनाथांचे शिष्य, आणि या तिन्ही भावंडांचे पालकत्व निभावणारा मोठा दादा असणारा निवृत्ती. 

‘ज्ञानसूर्याचे आकाश - संत निवृत्तिनाथ’ ही मंजुश्री गोखले लिखित कादंबरी माझ्या हाती आली, तेव्हा तिचे अर्थपूर्ण शीर्षक आणि उत्तम मुखपृष्ठ मला खूप काही सांगून गेले. ही कादंबरी सुरू होते ती उद्विग्न, भग्न अशा अवस्थेत पूर्णा नदीच्या काठी बसलेल्या निवृत्तिनाथांपासून. हसती बोलती मुक्ता अचानक विजेच्या लोळाबरोबर गुप्त झाल्याने कोसळून पडलेला बंधू निवृत्तिनाथ येथे वर्णिला आहे. संत नामदेवादि सख्यांशी बोलताना निवृत्तीला मुक्ताईचे बालपण आठवते आणि एका धगधगत्या तरीही शीतल प्रवासाची सुरुवात होते.. 

विठ्ठलपंतांनी गुरूंच्या आज्ञेने संन्यास सोडून पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारल्याने समाजाने बहिष्कृत केलेल्या कुटुंबाचा वेदनादायी प्रवास आपण आजवर वाचला होता. संन्यासाची मुले म्हणून पदोपदी झालेली अवहेलना, अपमान आणि त्यातूनही जगण्यासाठी आवश्यक भिक्षा मागण्यासाठी गेल्यावर या मुलांना मिळणारी तिरस्कारपूर्ण वागणूक हेही आपण वाचले आहे. पण समाजाच्या या वर्तणुकीचा दहा बारा वर्षांच्या या कोवळ्या मुलांच्या मनोवस्थेवर नेमका कसा आणि कोणता परिणाम झाला असेल, याचे उत्तम  वर्णन लेखिकेने विविध प्रसंगांतून प्रभावीपणे केले आहे. विठ्ठलपंतांचे पांडित्य, त्यांनी आणि त्यांच्या पत्नी रुक्मिणीबाईंनी मुलांवर केलेले संस्कार यांचेही सुरेख वर्णन या कादंबरीत आले आहे. अवघ्या अडीच वर्षाच्या लहानग्या मुक्तीला सोडून देहान्त प्रायश्चित्त घेतलेल्या आई वडिलांच्या पश्चात मोठा दादा म्हणून कर्तव्य बजावण्यासाठी निवृत्तीने केलेली धडपड या कादंबरीतून दाखवून देण्यात लेखिका यशस्वी झाली आहे. देहान्त प्रायश्चित्त म्हणजे काय हे माहिती नसताना या मुलांवर लादलेले पोरकेपण वाचताना अंगावर काटा येतो आणि या मुलांनी सोसलेल्या वेदना जाणवून मन भरून येते. 

वयाच्या नवव्या वर्षी पाठीमागच्या तीन भावंडांची जबाबदारी पेलाव्या लागलेल्या निवृत्तीने भावंडांचे संगोपन योग्य रीतीने करण्याचा घेतलेला ध्यास या कादंबरीत दिसतो. यासाठी गुरू गहिनीनाथांचे लाभलेले मार्गदर्शन आणि ज्ञानेश्वरासारख्या संवेदनशील भावाची साथही मोलाची ठरली. त्याचबरोबर या भावंडांना हक्काने माया लावणाऱ्या कावेरीअक्का, त्यांचे पुत्र विनायकबुवा ही पात्रेही लेखिकेने उत्तम रंगवली आहेत. सोपान आणि मुक्ताची लुटुपुटूची भांडणे, ज्ञाना आणि निवृत्तीचा हस्तक्षेप आणि न्यायनिवाडा या सर्वांतून चारही भावंडांना एकत्र बांधून ठेवणारा धागा म्हणून निवृत्तिनाथ पुढे येतात. दादा, आई आणि गुरू अशी तिहेरी भूमिका बजावणाऱ्या निवृत्तिनाथांचे वेगळेपण लेखिकेने उत्तम प्रकारे अधोरेखित केले आहे. 

ब्रह्म म्हणजे ज्ञाना, विष्णू म्हणजे सोपान, साक्षात महेश म्हणजे निवृत्ती आणि आदिमाया म्हणजे मुक्ताबाई हे लेखिकेने केलेले वर्णन आपल्याला पूर्णपणे पटते. यासाठी लेखिकेने वर्णन केलेले काही प्रसंग काल्पनिक असले तरी ते अजिबात तसे वाटत नाहीत, हे विशेष. पैठणला जाऊन शुद्धिपत्र का आणायचे, याचे निवृत्तीने सांगितलेले स्पष्टीकरण आपल्यालाही पटते. पाण्याची खोली काठावर बसून मोजता येणार नाही, त्यासाठी पाण्यात उतरावे लागेल. तसेच समाजाला बदलायचे असेल तर समाजात मिसळावे लागेल आणि त्यासाठी शुद्धिपत्र आणावे लागेल, हे त्यांचे विचार योग्यच ठरतात. आईवडिलांनी देहान्त प्रायश्चित्त घेऊनही समाजाने वाळीत टाकलेल्या या अद्वितीय भावंडांना खरेतर शुद्धिपत्राची गरजच नव्हती. पण ते मिळवायचे कशासाठी याचे लेखिकेने निवृत्तिनाथांच्या तोंडून दिलेले स्पष्टीकरण मनाला पटते. रेड्याकरवी वेद वदविण्याचा चमत्कार ऊर्जा संक्रमणाचा सिद्धांत व एकेश्वर तत्त्व असा आधार घेऊन लेखिकेने रंगवला आहे. तसेच अन्य काही चमत्कारही लेखिकेने योगसाधनेचे संदर्भ देऊन सिद्ध केले आहेत. त्यामुळे त्यात कोठेही अतिशयोक्ती वाटत नाही. 

आपले जीवनकार्य पूर्ण झाल्याची जाणीव होताच सर्वप्रथम ज्ञानेश्वर, नंतर महिनाभराने सोपानदेव, त्यानंतर दोनच महिन्यांनी मुक्ताईचे  

शिष्य व मानसपुत्र चांगदेव आणि अखेरीस तीन महिन्यानंतर मुक्ताबाई गेल्याने कोसळलेले निवृत्तिनाथ आपल्या मनाला जखम करून जातात. मोठ्या भावाची.. नव्हे गुरूंची अनुमती घेऊन मार्गस्थ झालेले दोघे भाऊ आणि त्यानंतर काही कळायच्या आत लुप्त झालेली लाडकी बहीण.. यामध्ये निवृत्तीचे पोरकेपण मनाच्या चिंध्या करून जाते. 

निवृत्तिनाथांच्या समाधीने कादंबरीचा शेवट होतो. मराठी सारस्वतावर ज्यांनी अगणित उपकार केले त्या अद्‍भुत भावंडांच्या युगाचा हा अस्त! ज्ञानदेवादि भावंडांचे पालकत्व खऱ्या अर्थाने स्वीकारणाऱ्या निवृत्तीदादाचा अंत.. गुरू गहिनीनाथांच्या लाडक्या शिष्याचा अंत.. ज्ञानदेवांना ज्ञानसूर्य बनविणाऱ्या आकाशाचा अंत.. पण शेवट करतानाही समाधिस्थानी बसलेल्या नामदेवांना ज्ञानसूर्य लोपला नाही.. तो अस्तंगत झाला आहे, पुन्हा उगवण्यासाठी, या आशावादाची जाणीव देऊन जाते. अतिशय रसाळ, ओघवती भाषा हे लेखिकेचे सामर्थ्य त्यांच्या या कादंबरीतही पुन्हा एकदा नव्याने प्रत्ययाला येते. थोडक्यात सांगायचे, तर संग्रही असावी, पुन्हा पुन्हा वाचावी अशीच ही कादंबरी आहे. 

००००००००००
ज्ञानसूर्याचे आकाश संत निवृत्तिनाथ 
लेखिका - मंजुश्री गोखले 
प्रकाशन - सकाळ प्रकाशन, पुणे 
किंमत - २९० रुपये
पाने - २८० 

संबंधित बातम्या