तंत्रस्नेही @१७५

मधुमिलिंद मेहेंदळे
सोमवार, 25 एप्रिल 2022

कव्हर स्टोरी

मराठी भाषेमध्ये अनेक जुन्या पुस्तकांमध्ये विविध विषयांचे अभ्यासपूर्ण प्रतिपादन वाचावयास मिळते. ही सर्व पुस्तके लेखकांनी त्या त्या विषयाचा सखोल अभ्यास व त्यांचे चिंतन याच्या साहाय्याने सिद्ध केली आहेत. एकोणिसाव्या व विसाव्या शतकाच्या प्रारंभी प्रसिद्ध झालेली अनेक पुस्तके काळाच्या ओघात नष्ट होत आहेत, गहाळ होत आहेत अथवा ती वाचण्यायोग्य स्थितीत उपलब्ध होत नाहीत. या विविध विषयातील ज्ञान नष्ट होऊ नये व ते सध्याच्या अभ्यासकांना, संशोधकांना व वाचकांना उपलब्ध व्हावे म्हणून पुणे नगर वाचन मंदिर संस्थेने गेल्या दोन वर्षांपासून डिजिटाजेशन प्रकल्प हाती घेतला आहेत. मराठी भाषेतील हे ज्ञान सर्वांना निश्चितच उपयोगी पडेल व ते नष्टही होणार नाहीत या दोनही गोष्टी संस्थेच्या या प्रयत्नामुळे साध्य होतील.

’पुणे नगर वाचन मंदिर’ ही पुण्यातील एक जुनी संस्था. ७ फेब्रुवारी १८४८ रोजी स्थापन झालेली हे ग्रंथालय गेली पावणे दोनशे वर्षे पुण्याच्या साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्रात मोलाचे योगदान देत आहे. या संस्थेचे वेगळेपण म्हणजे जुन्या गोष्टी व आधुनिकता याचा सुरेख समन्वय संस्थेच्या कामात पाहावयास मिळतो. सव्वाशे वर्षे जुनी वास्तु; शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षांचा वारसा सांगणाऱ्या त्या वास्तूत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला सहजपणे त्या काळात घेऊन जाणारी लाकडी कपाटे, टेबल व खुर्च्या, संस्थेतील प्रसिद्ध साहित्यिकांची तैलचित्रे यामुळे संस्थेला वारसा वास्तूचा दर्जा मिळाला आहे. याबरोबरच पुस्तकांची देवघेव व नोंदी संगणकावर करणे, आरएफआयडी यंत्रणा, पुस्तक संग्रहासाठी कॉम्पॅक्टर ते ग्रंथालयातील पुस्तके शोधण्यासाठी वेबसाइट अशा विविध आधुनिक गोष्टींचा वापर करून वाचकांची ज्ञानार्जनाची आस पूर्ण  करण्याचा संस्था प्रयत्न करत आहे. नागरिकांमध्ये वाचनाची आवड व ज्ञानार्जनाची आकांक्षा निर्माण व्हावी म्हणून संस्थेतर्फे प्रामुख्याने ग्रंथालय सेवा दिली जाते. पुण्यामध्ये सिटीपोस्ट चौकातील मुख्य शाखेबरोबरच पुण्यातल्या वारजे, बिबवेवाडी, कोथरूड, सिंहगड रोड, कर्वेनगर व पाषाण या  शाखांद्वारे सुमारे एक लाख पुस्तके वाचकांना वाचण्यासाठी व संदर्भासाठी उपलब्ध आहेत. याशिवाय संस्थेतर्फे वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यानमाला, ग्रंथपुरस्कार, विविध कार्यशाळा यांचे आयोजनही केले जाते. संस्थेच्या मानसी महिला मंचातर्फे महिलांसाठी विशेष कार्यक्रम व बालविभागातर्फे विविध उपक्रम राबविले जातात. ‘अवघे शतकोत्तर पाऊणशे वयमान’ असणाऱ्या संस्थेच्या आधुनिकीकरणाच्या प्रयत्नातील एक प्रमुख प्रकल्प म्हणजे संस्थेचा डिजिटायजेशन प्रकल्प.

मराठी भाषेमध्ये अनेक जुन्या पुस्तकांमध्ये विविध विषयांचे अभ्यासपूर्ण प्रतिपादन वाचावयास मिळते. ही सर्व पुस्तके लेखकांनी त्या त्या विषयाचा सखोल अभ्यास व त्यांचे चिंतन याच्या साहाय्याने सिद्ध केली आहेत. एकोणिसाव्या शतकातील (सन १८०१ ते १९०० ) व २०व्या शतकाच्या प्रारंभी प्रसिद्ध झालेली अनेक पुस्तके काळाच्या ओघात नष्ट होत आहेत, गहाळ होत आहेत अथवा ती वाचण्यायोग्य स्थितीत उपलब्ध होत नाहीत. या विविध विषयातील ज्ञान नष्ट होऊ नये व ते सध्याच्या अभ्यासकांना, संशोधकांना व वाचकांना उपलब्ध व्हावे म्हणून पुणे नगर वाचन मंदिर संस्थेने गेल्या दोन वर्षांपासून डिजिटाजेशन प्रकल्प हाती घेतला आहेत. मराठी भाषेतील हे ज्ञान सर्वांना निश्चितच उपयोगी पडेल व ते नष्टही होणार नाहीत या दोनही गोष्टी संस्थेच्या या प्रयत्नामुळे साध्य होतील.

डिजिटायजेशन प्रक्रिया

पुस्तके डिजिटाइज करताना प्रथम त्या पुस्तकांच्या पानांचे रॉ स्कॅनिंग करावे लागते. सदर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या पुस्तकाची पाने एकाच आकारात लावून घेणे त्यानंतर पुस्तकाच्या पानाची पिवळसर झाक काढून टाकणे, जुन्या पुस्तकांच्या पानावरील अन्य खुणा, टिंबे इत्यादी गोष्टी काढून टाकणे अशी एकप्रकारे क्वालिटी कंट्रोल प्रक्रिया पूर्ण करावी लागते. मग त्या पुस्तकाची प्रत पीडीफ स्वरूपात जतन करण्यात येते. ओसीआर प्रणालीच्या वापराने पुस्तकातील एखादा शब्द वा संदर्भ कोठे आला आहे हे शोधणे आता शक्य होते. यानंतर हे पुस्तक कोणालाही उपलब्ध होऊ शकते.

अन्य ग्रंथालये व व्यक्ती यांचेशी संपर्क

पुणे नगर वाचन मंदिर संस्थेच्या या प्रकल्पाचे वेगळेपण म्हणजे केवळ संस्थेच्या ग्रंथालयातील पुस्तके डिजिटाइज न करता अन्य ग्रंथालये व व्यक्तींशी साधलेला संपर्क. भोर येथील ‘गंगूबाई पंत सार्वजनिक वाचनालय’, वाई येथील ‘लो. टिळक वाचनालय’ तसेच ‘पुणे ग्रंथोत्तेजक संस्था’, ‘पुणे मराठी ग्रंथालय’, पुण्यातली ‘शिक्षण प्रसारक मंडळी’ अशा विविध ग्रंथालयातील दुर्मीळ ग्रंथ पुणे नगर वचन मंदिर नि:शुल्क डिजिटाइज करून देते. या बरोबरच अनेक व्यक्तींकडे अतिशय जुनी व दुर्मीळ पुस्तके असतात त्यांचेही डिजिटाजेशन संस्था करते. प्रामुख्याने उदाहरण द्यायचे पुण्यातील सनदी लेखापाल सुरेश रानडे यांच्या सुमारे २५० पुस्तकांचे डिजिटाजेशन संस्थेने पूर्ण केले आहे. पुणे वाचन मंदिराच्या १५० पुस्तकांव्यतिरिक्त अन्य संस्था व व्यक्तींची सुमारे दोन हजार पुस्तके संस्थेने डिजिटाइज केली आहे. 

पुणे नगर वाचन मंदिराच्या या प्रकल्पामुळे अनेक दुर्मीळ व अभ्यासपूर्ण पुस्तके पीडीएफ स्वरूपात वाचकांना मिळू शकतात. यामध्ये ‘विदुरनीति’ हे शिळाछाप पुस्तक, पाककृतीवरील ‘सूपशास्त्र’ हे पुस्तक, गीतेतील श्लोक व त्याच्या समानार्थी आर्या, दोहे, अभंग यांचे संकलन असलेले ‘गीतार्थ बोधिनी’ हे पुस्तक, ‘व्यायाम ज्ञानकोशा’चे दहा खंड अशी विविध माहितीपूर्ण व दुर्मीळ पुस्तके जतन करण्यात आली आहे. या प्रकल्पाचा उपयोग अनेक संस्था व व्यक्तींना होतो आहे. या कामात सेंटर फॉर इंटरनेट अॅण्ड सोसायटी ह्या संस्थेचे सुबोध कुलकर्णी यांचे मोलाचे साहाय्य लाभत आहे. ‘ज्ञानदीप लावू जगी’ या संस्थेच्या ब्रीदवाक्यानुसार सध्याच्या कार्यकारिणी निर्णयाप्रमाणे सदर ज्ञान उपलब्ध करून देण्याचे कोणतेही मूल्य संस्था व्यक्ती किंवा ग्रंथालयांकडून घेत नाही.

भविष्यकालीन योजना

पुणे नगर वाचन मंदिराने डिजिटाइज केलेली व प्रताधिकार मुक्त झालेली पुस्तके commons.wikimedia.org या संकेतस्थळावर books scanned by pune nagar vachan mandir या ठिकाणी पाहता येतात. आत्तापर्यंत सुमारे १७० पुस्तके या संकेतस्थळावर जगभरातील कोणीही पाहू शकतो व वाचू शकतो. आगामी काळात ही पुस्तकांची संख्या ४०० पर्यंत जाईल असा संस्थेला विश्वास आहे. यापुढील काळात पुस्तके ई-बुक स्वरूपात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. त्याचबरोबरच मराठी लेखकांच्या नावांचा व त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा एकत्र असा एक बृहतकोशही (Metadata) करावयाचा आहे. 

ग्रंथालय समन्वय

पुणे नगर वाचन मंदिर संस्थेव्यतिरिक्त अनेक ग्रंथालये व संस्था सध्या डिजिटाजेशनचे काम करत आहेत. यासर्व संस्थांनी संस्थागत अभिनिवेश बाजूला ठेवून एकत्रितपणे व समन्वयाने मराठी भाषेच्या ग्रंथामधील ज्ञान जपण्यासाठी आवश्यक तो पुढाकार घेण्याची पुणे नगर वाचन मंदिर संस्थेची तयारी आहे. असा समन्वय व संघटित प्रयत्न ही काळाची गरज आहे, असे संस्थेत काम करणाऱ्या आम्हा सर्वांना प्रामाणिकपणे वाटते. 

पुणे नगर वाचन मंदिराचा हा डिजिटाजेशनचा प्रकल्प पुस्तकप्रेमी नागरिकांच्या सहकार्यानेच अधिक यशस्वी होणार आहे. विविध व्यक्ती, संस्था, ग्रंथालये यांनी त्यांच्याकडील दुर्मीळ पुस्तकांचे जतन करण्यासाठी पुणे नगर वाचन मंदिर यासंस्थेशी संपर्क साधल्यास, त्या पुस्तक ठेव्याच्या जतनासाठी संस्था निश्चितपणे सहकार्य देईल.  

(लेखक पुणे नगर वाचन मंदिर संस्थेचे अध्यक्ष आहेत.)

संबंधित बातम्या