आपण पुस्तकप्रेमी

अरुण तिवारी
सोमवार, 25 एप्रिल 2022

कव्हर स्टोरी

गेली शेकडो वर्षे छापील पुस्तके अस्तित्वात आहेत. पुस्तके वाचणाऱ्यांकडे त्यांचा स्वतःचा भरगच्च पुस्तक संग्रह असायचा आणि हे पुस्तकप्रेमी आपापल्या संग्रहात भर टाकण्यासाठी नेहमीच उत्तमोत्तम पुस्तकांच्या शोधात असायचे. इंटरनेटच्या आगमनानंतर आता कोणाच्याही कॉम्प्युटरवर स्वतःचा वैयक्तिक संग्रह असू शकतो, आणि तोही अगदी कमी किमतीत किंवा फुकटही मिळालेला असतो. सूचीबद्ध केलेले मोठे गंथ्र, अभिजात साहित्यकृती आणि अनेक चांगली पुस्तके आता ऑनलाइन उपलब्ध आहेत. जे अशा पुस्तकांच्या शोधात आहेत, त्यांना ती सहज मिळू शकतात. पण वाचक खरेच ही पुस्तके शोधतायत का? किंवा पुस्तके आता सहज उपलब्ध होतात म्हणून अर्थशास्त्रातल्या ‘लॉ ऑफ मार्जिनल डिमिनिशिंग’प्रमाणे, वाचकसंख्या तर घटत नाहीये ना? 

वरवर पाहिले तर एखादे पुस्तक लेखकाने वाचकांसाठी लिहिलेले असले, तरी लेखक आणि वाचक या दोन्ही टोकांना जोडणारी एक लांबलचक प्रक्रिया आहे. लेखकाच्या पुस्तक लिहिण्याच्या आंतरिक इच्छेपासून या प्रक्रियेची सुरुवात होते. त्यानंतर येते संपूर्ण प्रकाशन प्रक्रिया, आणि शेवटी ते पुस्तक वाचकाच्या हातात पोहोचते. १९०८मध्ये प्रकाशित झालेले थॉमस ट्रेहर्न लिखित ‘सेंच्युरीज ऑफ मेडिटेशन’ आता अभिजात कलाकृतींमध्ये गणले जाते. पण हे पुस्तक त्याच्या प्रकाशनानंतर २०० वर्षांनी एका रद्दीच्या दुकानात सापडले होते. ट्रेहर्न यांचे पुस्तक वाचविण्यामध्ये त्याची निर्मिती करणारे, ते वितरित करणारे, ते विकणारे, त्यावर चिंतन करणारे आणि शेवटी सामूहिक जाणिवेतून त्याचे जतन करणारे सगळे जितके महत्त्वाचे होते तितकाच ‘एक योगायोगही’ महत्त्वाचा होता.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वाखाली १९९५पासून दरवर्षी २३ एप्रिल रोजी साजरा केला जाणारा ‘जागतिक ग्रंथ दिन’ म्हणजे, पडद्यामागचे कलाकार असलेले प्रकाशक आणि कॉपीरायटर यांचाही उत्सव आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या इतर जागतिक दिवसांप्रमाणे ‘जागतिक ग्रंथ दिना’साठी  कोणताही विशेष असा वार्षिक विषय नसतो. पण आशेचा किरण दाखविणाऱ्या काही कल्पना इतरांबरोबर शेअर करण्याची ऊर्मी असणाऱ्या आणि जगामध्ये काहीतरी चांगले घडावे अशी इच्छा उराशी बाळगणाऱ्यांचे हे एक समांतर जग असते.

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी मंडालेच्या कारागृहात ‘गीतारहस्य’ लिहिले. एका ‘उदार’ कारागृह अधिकाऱ्याकडून मिळालेल्या कागद आणि पेन्सिलचा वापर करून त्यांनी त्यांच्या आठवणींतून ‘गीतारहस्य’ लिहिले. त्यांच्या सुटकेनंतर पुण्यात आल्यावर १९१५मध्ये हा ग्रंथ प्रकाशित झाला, आणि त्याने भारतीय स्वातंत्रलढ्याचा मार्गच बदलला. भगवद्‍गीतेचा चुकीचा अर्थ लावल्यामुळेच भारतीय तरुणांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सहनशील झाला आहे आणि या चुकीच्या अर्थामुळेच भारताला स्वातंत्र्य गमावावे लागले, असे लोकमान्यांचे म्हणणे होते. स्वातंत्र्य विनवणी करून मिळणार नाही, तर आग्रह करूनच मिळेल, हा दृष्टिकोनातला बदल गीतारहस्यामुळे झाला. हीच त्या ग्रंथाची ताकद आहे!

डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी त्यांचे चरित्र लिहावे यासाठी मी सहा वर्षे त्यांना आग्रह करीत होतो. गावागावात, खेड्दूयापाड्यांमध्ये राहणाऱ्या सामान्य कुटुंबातील मुलांना प्रेरणा मिळावी, हा त्यामागचा उद्देश. जर डॉ. कलाम असे करिअर घडवू शकत असतील, तर ही मुलेही घडू शकतात, असे माझे म्हणणे होते. पण अब्दुल कलामांनी स्वतःच्या कार्याबद्दल लिहिण्याऐवजी त्यांचे पालक, शिक्षक, सहकारी आणि पुस्तकांविषयी लिहिले, त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. ‘माझ्या कार्याबद्दल इतरांनी लिहावे, मी नाही,’ असे त्यांचे म्हणणे होते. त्यांच्या याच अनुभवांच्या ‘विंग्ज ऑफ फायर’ – ‘अग्निपंख’ या पुस्तकाची ६५वी अवृत्ती प्रकाशित झाली आहे आणि वीस लाखांहून अधिक पुस्तके विकली गेली आहे. हीच या पुस्तकाची ताकद आहे!

पुस्तक चांगले आहे हे कशावरून ठरते? माझ्या मते त्यातील प्रामाणिकपणामुळे. १९६२मध्ये प्रकाशित झालेल्या व्हिक्टर ह्युगोंच्या ‘ले मिजराब्ल’ या पुस्तकाचा इझाबेल फ्लोरेन्स हॅपगूड यांनी इंग्रजीत केलेला उत्तम अनुवाद मी वाचला, तेव्हा माझ्या डोळ्यात पाणी उभे राहिले होते. फ्रेंच राज्यक्रांतीच्या काळातील दुर्दैवी लोकांची व्यथा ह्युगो यांनी स्वतः अनुभवल्यासारखी व्यक्त केल्यामुळे वाचकही ती अनुभतात, यात नवल नाही. मृत्यूचे हौतात्म्यात आणि दुःखाचे मोक्षात रूपांतर करणाऱ्या काळ्याकुट्ट आणि क्रूर नशिबावर मानवाची दुर्दम्य इच्छाशक्ती कशाप्रकारे मात करते, हे या पुस्तकातून दिसते आणि त्यामुळेच हे पुस्तक आजरामर झाले. पुस्तकात एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे - जर त्या दुःखी लोकांना त्यांचे कष्ट सहन करता येत असतील, तर मग मी का करू शकत नाही? त्या पुस्तकाच्या तासाभराच्या सोबतीनंतर  माझ्या मनातल्या निराशेच्या जागी आशा आणि शंकेच्या जागी विश्वास निर्माण झालेला असतो. ही आहे पुस्तकाची ताकद!

आयआयटी कानपूरने ‘श्रीमद भगवद्‍गीता’, ‘वाल्मिकी रामायण’, ‘रामचरितमानस’, ‘उपनिषदे’, ‘ब्रह्मसूत्र’ आणि ‘योगसूत्र’ यांसारखे आपले ग्रंथ ऑनलाइन ठेवण्याचे प्रशंसनीय काम केले आहे. त्यांनी जुने नेपाळी  ग्रंथही ऑनलाइन आणले आहेत. भारत-नेपाळ संबंधांच्या एकजिनसीपणाचीच ही साक्ष आहे. हे एक उत्तम टीमवर्क आहे – कोणत्याही संपादकांचे, समन्वयकांचे कौतुक केलेले नसले, तरी यामागे मोठी चांगली टीम आहे हे जाणवते. ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम आणि सखुबाई अशा संतांच्या साहित्यासाठी असे काम कोण करणार?

आज भारताकडे सर्व काही आहे – साहित्य, लोक, तंत्रज्ञान आणि पैसाही. जगभरातील लेखकांचे साहित्य प्रकाशित करून आणि त्यांचा वाचकवर्ग हजारोंवरून लाखोंकडे नेऊन भारत ‘जगातील पुस्तकांचे दुकान’ होऊ शकतो. पण तरीही, आपल्या विद्यापीठांची ऑक्सफर्ड आणि हार्वर्डसारखी स्वतःची युनिव्हर्सिटी प्रेस का नाही? काही सेवा भाग आउटसोर्स करता येऊ शकतात, परंतु त्यांनी दरवर्षी किमान एक जागतिक दर्जाचे जर्नल आणि एक पाठ्यपुस्तक प्रकाशित करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. भारतातील वैद्यकीय पुस्तके क्वचितच पाहायला मिळतात. आपल्याकडील तज्ज्ञ डॉक्टरांचे अफाट ज्ञान आणि अनुभव मानवजातीच्या हितासाठी प्रकाशित का होऊ नये?

आपले राजकीय पक्षांची स्थिती याहूनही हास्यास्पद आहे. त्यांचा विचार मांडणारी पुस्तके कुठे आहेत? अपप्रचार आणि स्वतःचे अखंड कौतुक व विरोधकांविषयी द्वेष म्हणजे राजकारण नव्हे. जेव्हा मी आमचे काही राजकीय नेते बेरोजगारी, महागाई आणि सार्वजनिक आरोग्यावर बोलताना पाहतो, तेव्हा मला त्यांच्या उथळपणाची कीव येते. आपल्याकडे समस्येचे विश्लेषण करणारी आणि व्यवहार्य उपाय सांगणारी चांगली पुस्तके का नाहीत? समाजशास्त्र आणि राज्यशास्त्रावरील पुस्तके कुठे आहेत? कोविड-१९ महासाथीमध्ये झालेल्या स्थलांतराच्या मानवी शोकांतिकेबद्दल कोणी लिहिले आहे का? असे काही घडलेच नाही का?

एक परिसंस्था निर्माण करण्याची नितांत गरज आहे. त्यामध्ये शाळांमध्ये भाषा आणि व्याकरणाचे योग्य शिक्षण; ज्या विद्यार्थ्यांकडे कला आहे आणि ज्यांना पत्रकारिता व साहित्यिक क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्यांच्यासाठी शिष्यवृत्या, फेलोशिप; तसेच याला पाठिंबा देण्यासाठी लोकांकडून आलेला निधी आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कर्तव्यदक्ष मार्गदर्शकांची छोटी फौज असणे आवश्यक आहे. आपल्याकडचे ज्ञान किमान दहा शिष्यांना दिल्याशिवाय ह्या जगाचा निरोपही ज्यांना घेववणार नाही,  असे मार्गदर्शक हवे आहेत. 

आपण पुस्तकप्रेमींनी आपल्या नशिबात जेवढे आहे, त्यापेक्षा जास्त मिळवण्याची महत्त्वाकांक्षा ठेवण्याची गरज नाही; पण त्याचवेळी मिळणारे कमी असेल तर त्यामध्ये समाधान मानण्याचीही गरज नाही.

(लेखक शास्त्रज्ञ आणि विविध विषयांचे अभ्यासक आहेत.)
(अनुवादः इरावती बारसोडे)

संबंधित बातम्या