विज्ञान साहित्याचं योगदान...

डॉ. बाळ फोंडके
सोमवार, 25 एप्रिल 2022

कव्हर स्टोरी

विज्ञान साहित्याची परंपरा तशी फार जुनी आहे. विज्ञानाला ज्या काळात निसर्गाचं तत्वज्ञान, नॅचरल फिलॉसॉफी, असं म्हटलं जाई त्या काळापासून विज्ञान साहित्याच्या परंपरेला सुरुवात झालेली आहे. प्रथम हस्तलिखिताच्या रूपात ते उपलब्ध होतं. मुद्रणप्रणालीचा शोध लागल्यानंतर त्याच्या एकाहून अधिक प्रती काढणं शक्य झालं. 

निसर्गाचे अनेक आविष्कार नजरेला पडतात. त्यांच्या कार्यकारण भावाचा उलगडा होत नव्हता तोवर कोणत्या तरी अदृश्य शक्तीची ती किमया आहे, असाच समज प्रसृत होता. पण त्या काळातल्या विद्वान आणि अध्ययन, अध्यापन करणाऱ्या तत्त्वज्ञांनी त्या नैसर्गिक विभ्रमांची तर्कसंगत उपपत्ती लावण्याचे प्रयत्न सुरू केले. त्याची फलश्रुती विज्ञानाच्या स्वरूपात रूढ झाली. आपल्याला भावलेल्या तर्कसंगत निरुपणाचा परिचय इतरांना करून देण्याच्या दृष्टिकोनातून जे लेखन उपलब्ध झालं, तेच विज्ञान साहित्याच्या रूपात प्रकट झालं.

त्यात अनेकांचा सहभाग होता. आपल्याच देशातल्या आर्यभट, भास्कराचार्य, वराहमिहिर यांनी खगोलशास्त्राची पायाभरणी केली. त्यांच्या ग्रंथलेखनातून खगोलात घडणाऱ्या घटनांची उपपत्ती शोधली. त्यातल्या काही घटना आवर्तनाच्या स्वरूपातल्या होत्या. काही क्वचितच घडणाऱ्या होत्या. पण त्यासंबंधीच्या निसर्गनियमांची ओळख त्यांनी आपल्या ग्रंथामधून करून दिली. चरक, सुश्रुत यांचे आरोग्य उपचारासंबंधीचे, खास करून विविध शस्त्रक्रिया, औषधोपचार यांसंबंधीचे ग्रंथ, ग्रीक तत्त्ववेत्ता युक्लिडची ‘जॉमेट्री’, आर्किमिडीजचे ‘डेनसिटी’, बॉयन्सी, लिव्हर्स यांचं भौतिकशास्त्र, इजिप्तच्या अल गिबरचा ‘अल्जिब्रा’ हे आद्य विज्ञानग्रंथ. परंतु त्यांचा वाचकवर्ग मर्यादित होता. त्या क्षेत्रांचं अध्ययन, अध्यापन करणाऱ्या तज्ज्ञांनाच ते भावलं होतं. लेखकानंही त्यांचाच विचार करून लेखन केलं होतं. 

हा प्रवाह मधल्या अंधारयुगापायी, डार्क एजेसपायी, काही प्रमाणात खंडित झाला. पण युरोपातील पुनरुत्थानाच्या, रेनेसॉँच्या, कालखंडात त्याला परत झळाळी मिळाली. तोपर्यंतचा विज्ञानवेध निसर्गातील आविष्कारांचं केवळ अवलोकन करून मनन, चिंतन यांच्या मदतीनं त्यांच्या विषयीच्या गूढाची उकल करण्याचाच होता. पण आता त्याला प्रत्यक्ष प्रयोगांची जोड मिळाली. त्याची परिणती मग न्यूटनचं ‘प्रिन्किपिया माथेमाटिका ए फिलॉसॉफिया नातुरालिस’. किंवा गॅलिलिओच्‍या ‘आल्बेरेस’, डार्विनचा ‘ओरिजिन ऑफ स्पिसिज’, पृथ्वीचं सूर्याभवती परिभ्रमण करते हे सांगणारा कोपर्निकसचा सूर्यकेंद्री सिद्धांत यासारख्या ग्रंथांच्या निर्मितीत झाली. भारतात अजूनही अंधारयुगाचं जाळं कायम होतं. त्यामुळं त्या कालखंडात इथं मौलिक विज्ञानग्रंथांची फारशी निर्मिती झाल्याचं आढळत नाही. 

मात्र अजूनही या ग्रंथांचा वाचक त्याच परिघात घुटमळणारा होता. ते अनेकांना खटकत होतं. कारण हे निसर्गाचे विभ्रम जगातल्या सर्वांनीच, सर्वसामान्य नागरिकांनीही अनुभवले होते. त्यांच्याही मनातलं या गूढांचं आकर्षण कमी झालेलं नव्हतं. त्या बाबतच्या अज्ञानापोटी वाटणाऱ्या भीतीचं निर्मूलन करणं आवश्यक होतं. त्याच्याच अनुषंगानं या ग्रंथांच्या रचनेत आणि भाषेत लक्षणीय बदल झाले होते.

या प्रयासाची व्याप्ती विस्तारायला अठराव्या, एकोणिसाव्या शतकापर्यंत वाट पाहावी लागली. विज्ञानातील काही सूत्रांचा हात पकडून त्यांचं गोष्टीरूपात सादरीकरण करण्याच्या इंग्लंडच्या एच.जी. वेल्स आणि फ्रान्सच्या ज्यूल्स व्हर्न यांच्या प्रयत्नांना अभूतपूर्व दाद मिळाली. त्याचं कारणही स्पष्ट होतं, एक तर या लेखनात गणिती समीकरणांना स्थान दिलं गेलेलं नव्हतं. वैज्ञानिक परिभाषा टाळली होती. शिवाय त्या सूत्रांच्या धाग्यांचा आधार घेत कल्पनेच्या पतंगाला मुक्तपणे संचार करू दिला होता. गोष्टीवेल्हाळ भाषा, सर्वसामान्य थरातली पात्रयोजना, त्यांच्या आयुष्यावर होणाऱ्या भल्याबुऱ्या परिणामांचं चित्रदर्शी वर्णन सर्वदूरच्या वाचकांच्या पसंतीस उतरलं. विज्ञानकथा साहित्याची मुहूर्तमेढ रोवली गेली. मेरी शेलीची ‘फ्रॅन्केन्स्टाईन’ ही आद्यविज्ञानकथा मानली जात असली तरी साहित्यातल्या या प्रवाहाला खरी मान्यता मिळाली ती वेल्सच्या ‘इन्व्हिजिबल मॅन’ आणि व्हर्नच्या ‘जर्नी टू द मून’ या कथांनंतरच. व्हर्नच्या ‘अराऊन्ड द वर्ल्ड इन एटी डेज’नं तर कळस चढवला. आणि तेव्हापासून विज्ञानसाहित्य म्हणजे ललितविज्ञानसाहित्य असं समीकरणच होऊन बसलं आहे. 

मराठीत, खरं तर भारतीय भाषांमध्ये, विज्ञानकथा विसाव्या शतकातच लिहिल्या जाऊ लागल्या. श्री.बा. रानडे यांची १९१३ साली प्रकाशित झालेली ‘तारेचे हास्य’ ही मराठीतली आद्य विज्ञानकथा. त्यानंतरच्या तीस चाळीस वर्षांच्या कालखंडात काही विज्ञानकथा लिहिल्या गेल्या. त्यातले बहुतेक पाश्चात्य भाषेतील वाचकप्रिय कथांचे सकस अनुवादच होते. द.पां. खांबेटे, भा.रा. भागवत, द.चिं. सोमण प्रभृतींनी ‘माझं नाव रमाकांत वालावलकर’, ‘उडती छबकडी’ यासारखं स्वतंत्र लेखन जरूर केलं. परंतु त्यांनी ना वाचकांच्या ना संपादक-प्रकाशकांच्या मनाची हवी तशी पकड घेतली. समीक्षकांनी तर या साहित्यप्रकाराची दखलही घेतली नाही. त्यांची ही उपेक्षा आजही अबाधित राहिली आहे. इंग्रजीमध्ये ह्युगो गर्न्सबॅक यासारख्या साक्षेपी संपादकांनी विज्ञानकथा लेखनाला सक्रिय प्रोत्साहन देत आयझॅक असिमॉव्ह, आर्थर सी क्लार्क, रॉबर्ट हाईनलाईन, रॉबर्ट सिल्व्हरबर्ग, फिलिप के डिक, उर्सुला के ल ग्विन यासारख्या विज्ञानकथालेखकांची भक्कम फळी उभी केली. असा कोणीतरी खंबीर पुरस्कर्ता लाभल्याशिवाय कोणत्याही साहित्य प्रकाराचा विकास होत नाही. मराठीतही श्री.पु. भागवत यांनी नवकथेची तळी उचलून धरली नसती तर गाडगीळ, गोखले, भावे, माडगूळकर आणि इतर अनेक प्रतिभाशाली कथालेखक आणि त्यांचं कथालेखन अंधारातच राहिलं असतं. 

विज्ञानकथांनाही असाच कोणीतरी मान्यवर पुरस्कर्ता, चॅम्पियन मिळण्याची गरज होती. ती डॉ. जयंत नारळीकरांनी भागवली. त्यांनी सत्तरच्या दशकात विज्ञानकथालेखनाला सुरुवात केली. त्यांच्या कथांना मुकुंदराव किर्लोस्करांसारख्या भविष्यदर्शी संपादकाची साथ मिळाली. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून दुर्गाबाई भागवत आणि पुलंनी त्याचा उल्लेख केला. नारळीकरांनी आपल्या विश्वरचना विज्ञानातील संशोधनानं साऱ्या जगाचंच लक्ष वेधून घेतलं होतं, प्रतिष्ठा मिळवली होती. त्याचाच परिणाम मराठीतील विज्ञानकथांचं  विश्व उजळण्यात झालं. माझ्यासह सुबोध जावडेकर, लक्ष्मण लोंढे यासारखे ताज्या दमाचे लेखक नियमितपणे लिहू लागले. वाचकांचा त्याला उदंड प्रतिसाद मिळाला. त्याचा परिणाम संपादक आणि प्रकाशक यांच्या दृष्टिकोन बदलण्यात झाला नसता तरच नवल. विज्ञानकथा संग्रह, विज्ञान कादंबरी प्रकाशित होऊ लागले. त्यानंतर विज्ञानकथेनं मागं वळून पाहिलं नाही.

तीस वर्षांपूर्वी भारतीय विज्ञानकथांचा एक प्रातिनिधिक संग्रह संपादित करण्याची संधी मला देण्यात आली होती. त्या वेळी निरनिराळ्या प्रमुख भाषांमधील विज्ञानसाहित्याचा आढावा मी घेतला होता. अर्थात त्या सर्वच भाषा मला अवगत नव्हत्या. पण त्यावर त्या भाषांमधील वैज्ञानिकांशी आणि विज्ञानसाहित्यिकांशी संपर्क साधून, त्यांच्याशी चर्चा करून आणि काही प्रमाणात त्या भाषेतील विज्ञानसाहित्याचा अनुवाद मिळवून मी त्यावर मात केली होती. 

त्या संदर्भातली विविधता त्यावेळी एका वेगळ्याच अंगानं सामोरी आली होती. मराठी भाषेत विज्ञानकथांचा जितका जोमदार प्रवाह आढळला तितका इतर भाषांमध्ये नसल्याचं स्पष्ट झालं होतं. खरं तर ललितविज्ञानसाहित्याची उपेक्षाच आजवर होत आली आहे. प्रतिष्ठित साहित्यिक या उपप्रवाहाकडे वळलेले नाहीत. समीक्षकांनी तर ते साहित्यच नसल्याचा दावा केला आहे. इंग्रजी भाषेत आजमितीला तरी ही दरी जाणवत नाही. कदाचित तिथं विज्ञानकथेची उत्क्रांती लवकर झाली असावी. पण आज त्या भाषिक प्रदेशात विज्ञानकथेला वाचकांचा प्रतिसाद तर भरघोस मिळालेला आहेच, पण शारदेच्या दरबारातही तिला मानाचं स्थान मिळालेलं आहे. डोरिस लेसिन्ग या विज्ञानकथा लेखिकेला तर नोबेल पुरस्काराचा सन्मानही प्राप्त झालेला आहे. 

मळलेली वाट सोडून नवा मार्ग चोखाळणाऱ्या साहित्यप्रकाराला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी कोणीतरी मान्यवर पुरस्कर्ता असण्याची गरज असते. इंग्रजीमध्ये जरी मेरी शेलीनं ‘फ्रॅन्केस्टाईन’ ही कथा लिहून विज्ञानकथेचा श्रीगणेशा केला असला तरी एच.जी. वेल्स आणि त्याचा समकालीन फ्रेंच लेखक ज्यूल्स व्हर्न यांनी विज्ञानकथा सादर केल्यानंतरच त्या प्रवाहाकडे थोडंफार लक्ष वेधलं गेलं. तरीही जोवर वेल्सच्या कथेवर आधारित ‘वॉर ऑफ द वर्ल्डस’ या श्रुतिकेचं अनोखं प्रक्षेपण ऑर्सन वेल्ससारख्या आघाडीच्या दिग्दर्शकाकडून झालं नव्हतं, तोवर विज्ञानकथेचा संख्यात्मक तसंच गुणात्मक  विकास झाला नव्हता.

मराठीत डॉ. जयंत नारळीकरांनी उभ्या केलेल्या विज्ञानकथांच्या दिंडीत मग इतर लेखकही सहभागी झाले आणि विज्ञानकथेचा जोमदार प्रवाह वाहू लागला. मात्र इतर भारतीय भाषांमध्ये तशा कोणी प्रणेत्यानं बहुतेक पुढाकार घेतला नसल्यामुळं त्या भाषांमध्ये विज्ञानकथेची रुजवातच झाली नव्हती. त्यापायीच ‘इट हॅपन्ड टुमॉरो’ या नावानं प्रकाशित झालेल्या त्या प्रातिनिधिक भारतीय विज्ञानकथासंग्रहात केवळ सात भाषांमधील कथांचा समावेश करता आला. त्यातही काही भाषांमध्ये तर एकेकटेच लेखक मिळाले. विज्ञान प्रसाराचा गाढा परिपाठ असणाऱ्या काही भाषांमध्ये तर विज्ञानकथालेखन होतच नव्हतं.  गेल्या तीस वर्षांमध्ये गंगागोदावरी आणि नर्मदाकावेरीमधून बरंच पाणी वाहून गेलं आहे. परिस्थितीत चांगलाच बदल झाला आहे. ‘इट हॅपन्ड टुमॉरो’चं सर्वत्र स्वागत झालं. परदेशातही त्याची दखल घेतली गेली. त्यात समाविष्ट झालेल्या कित्येक कथांचे कित्येक पाश्चात्य भाषांमध्ये अनुवादही झाले. त्यापासून कदाचित इतर भारतीय भाषक लेखकांना स्फूर्ती मिळाली असावी. त्यांनीही नेटानं विज्ञानकथालेखनाला सुरुवात केली.

हिंदी भाषेमध्ये ‘विज्ञानगल्प’ या नावानं काही लेखन होत होतं. पण त्यांना विज्ञानकथा म्हणणं कठीण होतं. कारण त्यात बहुतांश ‘शोध कसे लागले’ याचे किस्से किंवा वैज्ञानिकांची ललितलेखनाच्या अंगानं लिहिलेली चरित्रगाथा यांचाच समावेश होता. ‘प्रस्थापित विज्ञानाच्या भविष्यातील संभाव्य प्रक्षेपणाचा वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक आणि मुख्य म्हणजे भावनिक आयुष्यावर होऊ शकणाऱ्या प्रभावाचं तर्कसंगत चित्रण करणारी कथा,’ अशी आजची विज्ञानकथेची व्याख्या आहे. ती वास्तववादी कथा आहे. मात्र ते वास्तव आजचं किंवा या क्षणाचं नाही. ते भविष्यातलं वास्तव आहे. त्या व्याख्येचा निकष पार करणारी कथा मराठीत काही प्रमाणात त्याही वेळी लिहिली जात होती. आज तर प्रामुख्यानं तीच लिहिली जात आहे. इतर भाषांमध्येही ही जागृती आता आलेली दिसते.  विज्ञानकथेच्या विकासाच्या चार पायऱ्या आहेत. पहिल्या पायरीवरच्या कथांमध्ये अद्‌भुतरसाचा प्रभाव जास्त आढळतो. त्यांना साहसप्रधान कथा म्हणावयासही हरकत नाही. सैद्धांतिक विज्ञानातून ज्या संकल्पना साकार झाल्या आहेत, अशांवर या कथांची मदार असते. उदाहरणार्थ आइन्स्टाईनच्या सापेक्षतावादाच्या सिद्धांतानुसार विश्व चार मितींचं बनलेलं आहे. स्थलाच्या तीन मितींच्या जोडीला कालाच्या चौथ्या मितीचीही सांगड घातली गेली आहे. त्यामुळंच कालप्रवासाची संकल्पना समोर आली. अर्थात अजूनही कालप्रवास या संकल्पनेच्या स्तरावरच स्थिरावलेला आहे. तो प्रत्यक्षात साकार झालेला नाही. तरीही भविष्यात तसा तो होण्याची कल्पना करून अनेक कथा लिहिल्या गेल्या आहेत. त्यांचं गारुड वाचकावर पडून त्याला विज्ञानकथेची ओढ लावण्यात या कथांचा सिंहाचा वाटा आहे, यात संशय नाही. त्या पुढच्या पायरीवरच्या कथा विज्ञानाच्या अधिक स्पष्ट संकल्पनावर आधारित असतात. साहजिकच त्या अधिक विज्ञानप्रचुर बनतात. कथासाहित्याचं अधिष्ठान असलेल्या लालित्याकडे त्यापायी काही वेळा दुर्लक्ष झालेलं दिसतं. तरीही या कथाप्रकाराच्या उत्क्रांतीतील तो महत्त्वाचा टप्पा आहे. या कथा रूढ झाल्यावर अर्थात यातील कथासाहित्याच्या वैशिष्ट्यांकडे अधिक लक्ष पुरवलं जाऊ लागलं. पार्श्वभूमी, व्यक्तिरेखाटन, संवाद आणि भाषासौंदर्य या पैलूंना उचित स्थान मिळू लागलं. कथासाहित्याच्या मूळ प्रवाहाकडे जाण्याची धडपड या पायरीवरच्या कथांमध्ये दिसून येते. चौथ्या आणि सांप्रतच्या विज्ञानकथा अधिक प्रगल्भ झाल्या आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आविष्कारांचा मानवी आयुष्यावर होत असलेल्या किंवा होऊ शकणाऱ्या परिणामांचा वेध या कथांमध्ये घेतलेला आढळतो. या विज्ञानकथा माणसाच्या, किमानपक्षी मानवकेंद्री, होतात. व्यक्तिरेखाटन अधिक वेधक होत जातं. कथेमध्ये संवादाचा उपयोग कौशल्यानं केलेला दिसून येतो. आज ना उद्या त्यातल्या वास्तवाला सामोरं जाण्याचा प्रसंग आपल्यावरही येऊ शकतो अशी वाचकाची भावना होऊ लागते. त्यापायी या कथा अधिक विश्वासार्ह वाटू लागतात. त्यात अद्‌भुतरसाला अजिबात वगळलेलं नसतं. पण ते अद्‌भुत म्हणजे जादू किंवा चमत्कार नसून तो विज्ञानाचा आविष्कारच असल्याची ग्वाही मिळाल्यामुळं ते अद्‌भुत वास्तवाक़डे झुकत असल्याची खूणगाठ वाचक बाळगू लागतो. मराठी भाषेतली आजची बहुतांश कथा या पदाला पोचलेली आहे. 

पाश्चात्त्य विज्ञानकथांनी तर आता पुढची मजल मारली आहे. त्यामध्ये शैलीला प्राधान्य दिलं जात आहे. त्या हट्टापायी कित्येक कथा दुर्बोध होऊ लागल्या आहेत. यावर कडी म्हणजे या कथांमध्ये मिथ्यविज्ञानाला मोठ्या प्रमाणात थारा दिला जात आहे. ‘हॅरी पॉटर’ ज्यामध्ये  अनेक अवैज्ञानिक संकल्पनांचा सढळ वापर झाला आहे, तिला शीर्षस्थ विज्ञानकथा मानलं जात आहे.. जिथं आधीच अंधश्रद्धांचा पगडा समाजावर आहे अशा आपल्या देशात जर विज्ञानकथांच्या व्याख्येत असा बदल होऊ लागला तर त्याचा अनिष्ट परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांची उपेक्षा करायला समीक्षकांना आणखी एक, आणि तेही सबळ, कारण मिळेल.

संबंधित बातम्या