माझी पुस्तक पन्नाशी...

डॉ. रामचंद्र देखणे
सोमवार, 25 एप्रिल 2022

कव्हर स्टोरी

माझ्या साहित्य-निर्मितीला ५० वर्षे पूर्ण होत असताना ‘गौळण: वाङ्‍मय आणि स्वरूप’ या माझ्या ५०व्या ग्रंथांचे प्रकाशन ‘पुस्तक पन्नाशी’ या कार्यक्रमात नुकतेच पुण्यात करण्यात आले. या पुस्तक पन्नाशीच्या कार्यक्रमाला आणि माझ्या ५०व्या पुस्तकाला रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला. माझ्या सर्वच पुस्तकांना वाचकांनी भरभरून दाद दिली. वाचकांची ही कृतिशील सदिच्छा माझ्या लेखनाची प्रेरणा ठरली आणि मी पुस्तक पन्नाशीची ही वाटचाल यशस्वीपणे करू शकलो. 

आजपर्यंत लिहिलेल्या पन्नास पुस्तकांमधून संत साहित्य, लोकसाहित्य, संशोधनात्मक, वैचारिक, कथा-कादंबरी, चरित्रलेखन, चिंतनात्मक, सामाजिक, बालसाहित्य अशा विविध साहित्य प्रकारातून मी वाङ्‍मयीन सर्जनशीलतेला मांडू शकलो, याचा मला एक वेगळा आनंद आहे. कथा-कादंबरी स्वरूपातील ललित साहित्याची सहा, संत साहित्य व चिंतनात्मक एकूण पंधरा, लोकसाहित्य व वैचारिक स्वरूपाची तेरा, बालसाहित्याची आठ, चरित्रात्मक दोन आणि संपादित व इतर वाङ्‍मय प्रकारातील सहा पुस्तके अशी या पन्नास पुस्तकांची स्थूलमानाने वर्गवारी करता येईल.

माझ्या वाङ्‍मयनिर्मितीची सुरुवात कथा लेखनाने झाली. माझे अजाणतेपणाचे आणि पुढे थोडेफार जाणतेपणाचे बालपण हे शिरूर तालुक्यातील कारेगांव नावाच्या एका लहानशा खेडेगावात गेले. घरी वारकरी परंपरा. कीर्तन, भजन, भारुडे, लळीत, गावची जत्रा, लोकजीवन, शिवार, गुराखी जीवन, जत्रेतला तमाशा, सोंगे, सुतारनेट, पारावरच्या गप्पा, मोटेवरची गाणी या साऱ्‍या ग्रामीण लोकजीवनाशी, लोकाचाराशी, लोककलांशी आणि लोकसंस्कृतीशी मी एकरूप झालो. तिथली माणसे, त्यांचा स्वभाव, जगण्यातील स्वाभाविकता, सहजीवन, गावगाड्यात घडलेले, पाहिलेले, अनुभवलेले प्रसंग आणि व्यक्तिरेखा, मी माझ्या पद्धतीने ग्रामीण कथांमधून मांडत गेलो. माझ्या त्यावेळच्या दृष्टिक्षेपातील काहीशा मर्यादित अशा अनुभवविश्‍वाला मी माझ्या पद्धतीने शब्दरूप देत गेलो. त्यातून काही भावदर्शी, काही वास्तववादी, काही ग्रामीण लोकजीवनातील बेरकेपणा मांडणाऱ्‍या विनोदी कथा मी लिहिल्या. त्या कथा वाङ्‍मयीनदृष्ट्या फार परिपक्व होत्या असे नाही, पण कोणतेही औपचारिक संस्कार न लाभलेली एक स्वाभाविक अनुभूती त्या कथांतून व्यक्त होत होती. 

सन १९७१-७२मध्ये महाराष्ट्रात प्रचंड दुष्काळ पडला. माणसांना जगण्याची भ्रांत पडली, तर गुराढोरांना जगविण्याची आशाच संपली. त्यावेळी मी नुकताच महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुण्यात आलो होतो. माझा जेवणाचा डबा एस.टी. गाडीने रोज गावावरून येत असे. डब्यात वडिलांची चिठ्ठी यायची आणि त्यातून गावच्या दुष्काळाचे एक विदारक चित्र माझ्या डोळ्यासमोर उभे राहायचे. मी परीक्षा संपवून गावी गेलो. पाहिले तर, माझे आई-वडील दुष्काळी कामावर काम करत होते. मीपण दुष्काळी कामावर हजर झालो. आमची गुरे अन्नपाण्याविना आमच्या दावणीला मरू नयेत म्हणून गावापासून दहा-बारा किमी अंतरावरील तालुक्याच्या गावी, गाई-गुरांचे पालन करणाऱ्‍या एका जीवदया मंडळात आमची गाय नेऊन घातली. दुसऱ्‍याच दिवशी पहाटेच्यावेळी दाराची कडी वाजली. दार उघडून पाहतो तर तीच गाय रात्रीतून दहा-बारा किमी अंतर कापून धापा टाकत दारात उभी होती. तिच्या अंगावर तारेच्या कंपाउंडचे ओरखडे उमटले होते. आम्ही आश्‍चर्याने पाहत होतो. ती जणू आम्हाला सांगत होती, ‘या दुष्काळात मीच तुम्हाला जड झाले का? मीदेखील तुमच्याच दावणीला मरणार.’ आपल्या घरावरचे प्रेम, घराची ओढ आणि तिच्या डोळ्यातील त्यावेळचे ‘भाव’ हा माझ्या पहिल्या कथेचा विषय होता. मी जेव्हा ती कथा दुष्काळी कामावरच्या लोकांना वाचून दाखविली, तेव्हा अनेकांनी डोळ्याला पदर लावले. माझ्या कथेला श्रोता मिळाला आणि आपण लिहू शकू, असा आत्मविश्‍वास वाढला. ‘जितराब’ ह्या शीर्षकाखाली आणखी एक कथा लिहिली आणि तिच्यासह सोळा कथा एकत्रित करून माझा ‘हौशी-लख्याची’ हा पहिला कथासंग्रह प्रकाशित झाला. त्यावेळच्या कथाविश्‍वातील साचेबंध कथांपेक्षा वेगळ्या जाणिवा, वेगळ्या भावना, वेगळ्या व्यक्तिरेखा मांडणाऱ्‍या ह्या कथा असल्याने, माझ्या  ह्या पहिल्याच कथासंग्रहाचे अनपेक्षितपणे पण उत्तम स्वागत झाले. काही वेगळ्या धाटणीच्या कथा माझ्या ‘येरवाळीचं येणं’ या कथासंग्रहात मी लिहिल्या आहेत. रस्त्याच्या फूटपाथवर जुनी दर्जेदार पुस्तके अत्यल्प किमतीत विकणाऱ्‍या एका विक्रेत्याकडे पुस्तक घ्यायला एक लेखक येतो आणि आपलेच गाजलेले पुस्तक अतिशय अल्प किमतीत रस्त्यावर विकायला आलेले तो पाहतो. तो अस्वस्थ होतो. स्वतःवरच चिडतो. त्यावेळी त्याला काय वाटले असेल, हे ‘येरवाळीचं येणं’मध्ये व्यक्त होते.

सातवीपर्यंतची शाळा मी गुरे वळत वळत केली. त्यामुळे मी गुराखी जीवनाचा खरा आनंद घेतला आहे. गावाचे संपूर्ण शिवार गुराख्याला ज्ञात असते आणि संपूर्ण शिवार हे त्याचे आनंदधाम असते. ह्या गुराखी जीवनाचे चित्रण ‘गोरज’ या कथासंग्रहात केले आहे. ‘गोरज’ ह्या नावावरूनच पुस्तकाचे अंतरंग स्पष्ट होते. प्रत्येक गावच्या शिवारामध्ये एक अज्ञात ठिकाण असते. ‘तिथे कोणी जाऊ नये कारण, तिथे पिशाच्च आहे, तिथे लागीर होते’ अशी भीती पिढ्यान् पिढ्या गावकऱ्‍यांच्या मनात असते. त्यामुळे तिथे कुणीही जात नाही. एकदा गुराच्या खांडातील एक वासरू फापलते. गुराखी सारे शिवार पालथे घालतो पण ते सापडत नाही. त्या अज्ञात जागेत ते वासरू गेले की काय या विचाराने तो गुराखी धाडस करून वासरू शोधायला तिथे जातो आणि त्या अज्ञातात, त्याला एका चैतन्यमय सृष्टीचे दर्शन घडते. ह्या अज्ञाताचा शोध ‘गोपा - निनाद’ या कादंबरीत मांडला आहे. सुमारे १८८५ ते ९०च्या सुमारास आमच्या गावात एमआयडीसी आली. औद्योगिकीकरणासाठी अत्यल्प दराने जमिनी संपादित झाल्या. मोठ्या कष्टाने आणि प्रतिकूलतेतही राखलेली जमीन क्षणात सोडून गेली; त्याचे दुःख सहन करू न शकणाऱ्‍या एका भूमिपुत्राची कथा ‘भूमिपुत्र’ या कादंबरीत मी मांडली. गावगाडा, जत्रा, यात्रा, पालखी, वारी, दिंडी, तमाशा, ईरजिक, लोकाचार, लोकरूढी या सर्वांतून उभे राहिलेले शिवार आता खऱ्‍या अर्थाने मुके होणार आहे, याची जाणीव करून देणाऱ्‍या एका गाव शिवाराची ही कादंबरी आहे. जमिनी गेल्यानंतर भूमिहीन झालेल्या शेतकऱ्‍यांच्या व्यथा मांडणाऱ्‍या कथा-कादंबऱ्‍या आल्या असतील. पण सांस्कृतिक अंगाने गावांचे गावपण संपविणाऱ्‍या दुःखाला पचविता न येणाऱ्‍या, मानवी भावनेचे चित्रण आणि चिंतन ह्या कादंबरीत केल्यामुळे ग्रामीण आणि शहरी लोकजीवनात या कादंबरीचे खूप मोठे स्वागत झाले. बालसाहित्याच्या माध्यमातून मी मुलांसाठी लिहिलेल्या ललित कथा ह्या संस्कार कथा आणि बोधकथा म्हणून अधिक भावल्या.

माझ्या ‘भारुड वाङ्‍मयातील तत्त्वज्ञान’ या संशोधन प्रबंधासाठी मला पुणे विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्राप्त झाली. तत्त्वज्ञान विषयातील हे संशोधन एकीकडे संत साहित्याशी, तर दुसरीकडे भारुडांसारख्या लोकसाहित्य प्रकाराशी जोडले गेले. माझ्या घरी वारकरी परंपरा असल्याने कीर्तन, प्रवचन, दिंडी, भारुडे या साऱ्‍या भक्तिरंगात मी लहानपणापासून रमलो होतो. गावच्या दिंडीत, हरिनाम सप्ताहात, वारीमध्ये भारुडे करत होतो. माझी आई मला म्हणायची ‘तू भारुडे करतो हे चांगले आहे, पण नाथांच्या भारुडांचा अर्थ शोध. ‘सासरा माझा गावी गेला- तिकडंच खपवी त्याला’... हा सासरा म्हणजे कोण? ‘मला दादला नको ग बाई’ या भारुडातला दादला कोण?’ आणि मग अशा भारुडांचा अर्थ सांगण्यासाठी मी भारुडांची रूपके शोधत गेलो आणि तोच माझा पीएच.डी.चा प्रबंध ठरला. भारुडांची पार्श्‍वभूमी, संतांचे तत्त्वज्ञान, विविध संतांची भारुडे, भारुडांचे विषय, वर्गवारी, त्यांचे संत साहित्यातील व लोकवाङ्‍मयातील स्थान आणि प्रत्येक भारुडातील रूपक, यांची मांडणी करीत लिहिलेल्या प्रबंधाचे संपादन करून ‘भारुड वाङ्‍मयातील तत्त्वज्ञान’ हा माझा ग्रंथ सिद्ध झाला. त्यातून भारुडासारख्या लोककलाप्रकाराची तात्त्विक उंची वाचकांना समजली. आम्ही बहुरूपी भारुडाचे २२०० प्रयोग भारतभर आणि देश-विदेशातही केले आणि या प्रबंध ग्रंथातील भारुडांच्या सखोल तत्त्वचिंतनाचा उपयोग सादरीकरणात झाला. त्यामुळे मराठी मुलुखात भारुडाला एकीकडे वाङ्‍मयीन, दुसरीकडे तत्त्वचिंतनात्मक, तर तिसरीकडे शास्त्रशुद्ध सादरीकरणाची उंची प्राप्त झाली. ह्या भारुडांनी मला एक प्रकारची ओळख प्राप्त करून दिली. 

मी अनेक वर्षे माझी स्वतःची दिंडी घेऊन पंढरपूरची पायी वारी करतो आहे. ज्ञानियांचे ज्ञेय, ध्यानियांचे ध्येय, तपस्वियांचे तप, जपकांचे जाप्य आणि योगियांचे गौप्य विठ्ठलाच्या रूपात जिथे समचरणावर उभे आहे, त्या परब्रह्माला भेटायला निघालेला वैष्णवांचा मेळा म्हणजे वारी. आनंदाला साठवीत साठवीत विवेकाच्या दिशेने होणारी उन्नत वाटचाल म्हणजे वारी. वारीच्या माध्यमातून संतांनी मानवतेचा धर्म शिकवला. भक्तीच्या महाद्वारात अद्वैताचे रिंगण फुलले आणि पंढरीच्या वाळवंटी ‘एकचि टाळी झाली’. महाराष्ट्राच्या लोकजीवनाला वळण देणारा हा वारीचा सांस्कृतिक ठेवा त्याच्या वैशिष्ट्यांसह वाचकांसमोर यावा, या उद्देशाने ‘वारी: स्वरूप आणि परंपरा’ हे पुस्तक लिहिले. ते मराठी लोकजीवनात इतके लोकप्रिय झाले, की त्याच्या अनेक आवृत्त्या निघाल्या. वारी विषयाचा तो एक प्रमाणभूत ग्रंथ ठरला. संत साहित्याचे दर्शन घडविणारी ‘दिंडी’, ‘पालखी’, ‘एकचि टाळी झाली’, ‘ज्ञानदीप लावू जगी’, ‘आषाढी’, ‘तुका झालासे कळस’ यांसारखी माझी पुस्तके संत साहित्याच्या विचारधारेला चिंतनाच्या महाद्वारात घेऊन जातात. संत साहित्यातील भक्ती, अध्यात्म, तत्त्वदर्शन, समाजदर्शन, लोकदर्शन, मूल्यदर्शन, तसेच गीता, भागवत, भारुडे, संकीर्तन, गीतारहस्य, गाथा, संतांचे सामाजिक व वाङ्‍मयीन योगदान यांचा परामर्श, संत साहित्याच्या अंगाने घेत, ‘आनंदाचे डोही, आनंद-तरंग’, ‘शारदीचिये चंद्रकळे’, ‘संत साहित्यातील पर्यावरण विचार’ यांसारखे चिंतनात्मक ग्रंथ लिहिले गेले. ‘संत साहित्यातील पर्यावरण विचार’ हा ग्रंथ वाचून ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात पत्र लिहून ‘हे पुस्तक संत साहित्याचा एक वेगळा नवा गुणविशेष प्रकट करणारे आहे,’ असा केलेला गौरव मला खूप मोलाचा वाटतो. या ग्रंथावर महाराष्ट्र शासनाने बोधपट काढला, तर ‘आनंदाचे डोही’ हा ग्रंथ त्यावर्षी सर्वाधिक खपाचा ग्रंथ म्हणून गौरविला गेला.

माझी अशी धारणा आहे, की संतांच्या विवेकप्रामाण्यावादावर सुधारकांचा बुद्धिप्रामाण्यवाद उभा आहे. अशा बुद्धिवादी सुधारकांची एक परंपरा महाराष्ट्राला लाभली. ‘सुधारकांचा महाराष्ट्र’ या ग्रंथातून सुधारकांच्या बुद्धिवादी विचारांचा एक वेगळा साहित्य प्रवाह ठळकपणे मांडता आला. ‘जीवनयोगी साने गुरुजी’ आणि ‘लोकशिक्षक गाडगेबाबा’ हे माझे चरित्रग्रंथ, त्यांच्या विचारतत्त्वातूनच चरित्र उभे करतात. या ग्रंथातून मला तत्त्वज्ञ साने गुरुजी आणि गाडगेबाबा नावाचे लोकविद्यापीठ वाचकांपुढे ठेवायचे होते. प्रतिभेची उत्तुंगता आणि विचारांची प्रगल्भता लाभलेल्या आणि भारतीय साहित्याचे आदर्श ठरलेल्या कालिदास, भवभूती, उशना, भर्तुहरी, श्रीहर्ष, दंडी, जयदेव यांसारख्या महाकवींच्या काव्यप्रतिभेतून प्रकटलेले संस्कृत भाषेचे सौंदर्य आणि मराठीचे लावण्य यांची भेट ‘महाकवी’ या ग्रंथात घडते. ज्यांनी महाराष्ट्राची लोकसंस्कृती घडविली, टिकवली, अशा वासुदेव, गोंधळी, पिंगळा, पांगुळ, सरवदा, भांड, शकुनी, कोल्हाटी यांसारख्या २४ लोकभूमिकांचे संशोधन करून त्यांचा व त्यांच्या लोकपरंपरेचा परिचय करून देणारे ‘बहुरूपी महाराष्ट्र’ हे पुस्तक म्हणजे अंगणातील विद्यापीठाशी घडलेला, लोकसांस्कृतिक संवाद होय. या ग्रंथाला १९८९-९०चा ‘महाराष्ट्र राज्य ग्रंथ’ पुरस्कार लाभला. त्यानंतरही अनेक पुस्तकांना शासनाचे व इतरही वाङ्‍मयीन पुरस्कार लाभले. ‘लागे शाहिरी गर्जाया’, ‘महाराष्ट्राचा लोकदेव खंडोबा’, ‘गोंधळ परंपरा आणि अविष्कार’, ‘लोकश्रुती’ हे ग्रंथ लोकसाहित्य, लोककला, यांचे लोकसांस्कृतिक संशोधनात्मक रूप उभे करतात. रात्री उभा राहिलेला गोंधळ पहाटेपर्यंत अखंडपणे लोकरंजन आणि प्रबोधन घडवत होता. आता ‘गोंधळ’ खूप छोट्या स्वरूपात सादर होत आहे. कालांतराने गोंधळाचे मूळ स्वरूप कदाचित लोपेल. गण, आवातणे, पदे, निरूपण, बतावणी, आख्यान, आरती यासह सादर होणारा मूळ गोंधळ जसा होता तसा, म्हणजे मूळ स्वरूपात संहिताबद्ध करण्याचा हा प्रयत्न आहे. लोकसाहित्य आणि लोककला यातील मौखिक लोकश्रुती लिखित स्वरूपात उभी राहावी हा माझा लोकसाहित्य संशोधनाचा उद्देश आहे. लोककला, नृत्य, संवाद, नाट्य, निरूपण, अध्यात्म, प्रतिभा, रूपक, बतावणी, संगीत आणि लोकभाव यातून शतकानुशतके ‘गौळण’ हा प्रकार लोकमानसात ठसला आहे. भागवतातील गौळण, कृष्णोपनिषद, विविध संतांच्या विरहिणी आणि गौळणी, गौळणीचे अध्यात्म आणि रूपक, राधा आणि रासक्रीडा, शाहिरांच्या गौळणी, तमाशातील गण गौळण आणि मथुरेचा बाजार, तसेच आधुनिक कवितेतील गौळण इथपर्यंतचा गौळणीचा प्रवास तसेच शब्द, अर्थ व भावमाधुर्यातून उभे राहिलेले एक समृद्ध दालन म्हणजे ‘गौळण, वाङ्‍मय आणि स्वरूप’ होय. संत साहित्य, लोकसाहित्य आणि आधुनिक मराठी काव्य या तीनही प्रवाहाशी जोडल्या गेलेल्या या ग्रंथाला रसिकांनी दिलेला प्रतिसाद आणि शुभेच्छा माझ्या यापुढील ग्रंथनिर्मितीला प्रेरणादायी ठरणार आहेत, हे निश्चित!

संबंधित बातम्या