किशोर आणि साहित्य... 

डॉ. वैशाली देशमुख
सोमवार, 25 एप्रिल 2022

 कव्हर स्टोरी

तंत्रज्ञानाचं बाळकडू प्यायलेल्या आणि त्याच्याशिवाय पानही न हलणाऱ्या आजकालच्या किशोर मुलांना काय बरं आवडेल वाचायला? किशोरांचं लक्ष वेधून घ्यायचं तर आंतरजालाच्या भुलभुलैयाला पुरून उरेल असं काहीतरी द्यायला लागेल. मग ‘गूगल-पूर्व’ काळात जन्मलेल्या प्रौढ लेखकांना हे जमेल का? या साहित्यामध्ये नवीन तंत्रज्ञान, संगणक, गेम्स, त्यातल्या प्रतिमा असायलाच हव्यात का? पण असं नसावं बहुधा... त्यात दाखवलेल्या भावना, प्रसंग खरे वाटणारे असतील; मुलांच्या मनाला समजणारे आणि भिडणारे असतील, आणि त्यातले संदर्भ आजच्या काळाला सुसंगत असतील तर मुलांना ते भावतात.      

‘फास्टर फेणे’चे जनक भा. रा. भागवत यांनी १९७५मध्ये पहिल्या मराठी बालकुमार साहित्य संमेलनात केलेलं अध्यक्षीय भाषण वाचनात आलं. त्यात त्यांनी कुमार-किशोर वयातल्या वाचकांबद्दल मांडलेले विचार आजच्या काळालाही लागू आहेत. ते म्हणतात त्याप्रमाणे ही मुलं बालसाहित्याच्या परिघातून बाहेर पडलेली असतात. अद्‍भुतापेक्षाही वास्तविकतेला ती जास्त महत्त्व देतात; चमत्कार दाखवणाऱ्या गोष्टींपेक्षा धडाडी दाखवणारी, रहस्यमय, रोमांचक पात्रं त्यांना आवडतात. समाजात काहीतरी मोठे बदल करावेत; नवीन पाऊलवाटा तयार कराव्यात; एक नवीन, क्रांतिकारी जग तयार करावं, असं त्यांना वाटत असतं. या सगळ्याचं प्रतिबिंब प्रभावीपणे ज्यात पडेल असं साहित्य किशोर-साहित्य म्हणायला हरकत नाही.  

किशोरवय हे तसं आत्ता आत्तापर्यंत दुर्लक्षिलं गेलेलं वय. ‘जी मोठी माणसं नाहीत ती सगळी लहान मुलं’ अशा न्यायानं त्यांना लहान मुलांच्या गठ्ठ्यात जमा करून टाकलं जायचं. ना त्यांच्यासाठी काही वेगळे डॉक्टर असायचे, ना कपड्यांची काही वेगळी फॅशन. ‘एवढा मोठा घोडा झालास/झालीस’ यापलीकडे त्यांच्या वाढत्या वयाची फारशी दाखल घेतली जात नसे. वेगळ्या साहित्यनिर्मितीचा तर प्रश्नच नव्हता. दुसऱ्या महायुद्धानंतर, मुख्यतः पाश्चिमात्य देशांमध्ये हा वयोगट विशेषकरून डोळ्यांत भरायला लागला, कारण त्यांच्या काही समस्या डोकं वर काढू लागल्या. तज्ज्ञांचंही त्यांच्याकडे लक्ष गेलं. त्यांच्या शरीराची नाट्यपूर्ण वाढ, आणि त्याहीपलीकडे त्यांच्या मनोविश्वात होणारे प्रचंड मोठे बदल या मुलांचं विशेषत्व अधोरेखित करतात. ही अडनिड्या, वाढत्या वयाची मुलं नवनव्या संवेदना अनुभवायला उत्सुक असतात; स्वतःची मूल्यं, जीवनशैली, उद्दिष्टं ठरवत असतात. या अत्यंत संस्कारक्षम काळात मुलांच्या विचारांना काय खतपाणी घातलं जातं, त्यांच्या भावनांना कुठल्या प्रकारे दिशा मिळते यावर त्यांच्या मोठेपणीच्या व्यक्तिमत्त्वाचा पाया घातला जातो. या संवेदना त्यांना दैनंदिन अनुभवांतून, आजूबाजूच्या लोकांकडून, जाणवणाऱ्या परिस्थितीतून आणि लिखित किंवा दृश्य माध्यमांतून मिळतात. 

किशोर-साहित्य म्हणून जेव्हा आपण विचार करतो तेव्हा डोळ्यांसमोर चार प्रकारचं साहित्य येतं- प्रौढांनी मुलांसाठी लिहिलेलं साहित्य, प्रौढांनी मुलांबद्दल लिहिलेलं साहित्य, मुलं जे वाचतात असं प्रौढ साहित्य आणि मुलांनी स्वतः लिहिलेलं साहित्य! आता प्रश्न असा पडतो की तंत्रज्ञानाचं बाळकडू प्यायलेल्या आणि त्याच्याशिवाय पानही न हलणाऱ्या आजकालच्या मुलांना काय बरं आवडेल वाचायला? किशोरांचं लक्ष वेधून घ्यायचं तर आंतरजालाच्या भुलभुलैयाला पुरून उरेल असं काहीतरी द्यायला लागेल. मग ‘गूगल-पूर्व’ काळात जन्मलेल्या प्रौढ लेखकांना हे जमेल का? या साहित्यामध्ये नवीन तंत्रज्ञान, संगणक, गेम्स, त्यातल्या प्रतिमा असायलाच हव्यात का? पण असं नसावं बहुधा, कारण जे. के. रोलिंगच्या पुस्तकांत यातलं काहीही नसताना हॅरी पॉटरनं मुलांना पुस्तकांकडे खेचून आणलंच की! याचा अर्थ असा की, जर त्यात दाखवलेल्या भावना, प्रसंग खरे वाटणारे असतील; मुलांच्या मनाला समजणारे आणि भिडणारे असतील, आणि त्यातले संदर्भ आजच्या काळाला सुसंगत असतील तर मुलांना ते भावतात.      

किशोरांसाठी लिहिताना मोठ्या माणसांच्या दृष्टिकोनातून, तशा फूटपट्ट्या लावून लिहिलं जाण्याची भीती असते. करमणुकीच्या माध्यमातून मुलांना ‘शहाणे करून सोडावे’ अशीही इच्छा होऊ शकते. लहान मुलांच्या बाबतीत हे चालून जातं, पण किशोर मात्र कुठलीही गोष्ट फक्त कुणीतरी सांगितली म्हणून ऐकत नाहीत. त्यांना त्याच्या इतर पैलूंची माहिती हवी असते, त्याच्यामागचं वैज्ञानिक सत्य हवं असतं, त्यावर त्यांची स्वतःची मतं असतात. त्यामुळेच जे लेखक किशोरांच्या भावविश्वात शिरू शकतात; या वयाच्या वैशिष्ट्यांचा विचार करून, त्यांना समजून घेऊन, सह-अनुभूति ठेवून लिहितात; त्यांच्या बुद्धिमत्तेला विचारात घेऊन, अनादर न करता लिहू शकतात; त्यांचं साहित्य मुलांना आवडतं. त्यातूनही ते जर त्यांच्या कल्पनाशक्तीला खतपाणी घालणारं, विचारांना चालना देणारं, भूतकाळाविषयी जाणीव आणि भविष्यकाळाविषयी कुतूहल निर्माण करणारं, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणारं आणि पूर्वग्रहरहित असेल तर सोन्याहून पिवळं!  

काहीशा अनोळखी झालेल्या, बेदरकार, आत्मकेंद्रित पण अपरिपक्व अशा आपल्या मुलांशी बोलायचं तरी काय आणि कसं, असा प्रश्न पालकांना जेव्हा पडतो तेव्हा त्यांचं म्हणणं मुलांपर्यंत पोचवण्यासाठी पुस्तकांची छान मदत घेता येते. या आव्हानात्मक, कठोर जगात एक शाश्वत असा खजिना या पुस्तकांच्या रूपानं आपण मुलांच्याकडे सुपूर्त करत असतो. या साहित्यातून कितीतरी महत्त्वाचे विषय आणि मूल्यं मुलांपर्यंत परस्परच पोहोचवणं शक्य होतं. मैत्री, प्रेम, नैराश्य, व्यसनं, कौटुंबिक समस्या अशासारख्या किशोरवयातल्या विशिष्ट आव्हानांवर आधारित माहितीवजा आणि कथारूपात बरंच किशोर साहित्य इंग्रजीमध्ये लिहिलं गेलंय. अशा काल्पनिक जगतातल्या सुरक्षित वातावरणात मुलं समस्या सोडवण्याचे अनेक वास्तवदर्शी मार्ग मनातल्या मनात अजमावून पाहू शकतात. आदर्श व्यक्तिमत्त्वं, नवनवी माहिती, सामान्यज्ञान यांविषयी जाणून घ्यायला त्यांना आवडतं. शिवाय नव्यानं विकसित होणाऱ्या शरीर-मनाविषयी त्यांच्या मनात खूप कुतूहल आणि शंका असतात. तसं बघायला गेलं तर याविषयी पालकांनी, शिक्षकांनी स्पष्टपणे वैज्ञानिक माहिती देणं, चर्चा करणं हा सर्वोत्तम मार्ग. पण तसं सहसा होत नाही. मग त्याऐवजी निदान रंजकपणे शास्त्रशुद्ध माहिती देणारी पुस्तकं मुलांना आपापल्या आकलनानुसार आणि गरजेनुसार वाचता आली तर तो प्रश्न मिटेल.  

अर्थात, नुसतं वाचन पुरेसं नाही. मुलांवर आदळणाऱ्या माहितीचं आणि करमणुकीचं प्रमाण बघता मुलं जे काही वाचतील, पाहतील ते सारासार विचार वापरून ग्रहण करता येणं ही आज काळाची गरज आहे, जी सर्वच प्रकारच्या माध्यमांच्या बाबतीत उपयोगी पडणारी आहे. मिळालेल्या माहितीतलं काय, कसं घ्यायचं आणि काय सोडून द्यायचं, याचं भान म्हणजेच माध्यमसाक्षरता. वाचलेल्या पुस्तकांविषयी ऐसपैस चर्चा, एकमेकांनी मतं मांडणं आणि ऐकून घेणं, त्यावर विवेकी विचार करणं अशा काही पद्धतींनी ही माध्यमसाक्षरता मुलांच्यात रुजवता येते. खास या वयोगटाचा विचार करून लिहिलेल्या पुस्तकांची आज गरज आहेच, पण मुलांना याविषयी सजग केलं तर जे काही वाचतील ते ती समजून-उमजून वाचतात, खऱ्या-खोट्याची शहानिशा करायला शिकतात, त्यातले धडे दैनंदिन जीवनात आचरायला शिकतात असं दिसून आलंय.   

आज किशोरांमध्ये प्रामुख्यानं प्रचलित असलेली इलेक्ट्रॉनिक आणि दृश्य माध्यमं शक्तिशाली आणि प्रभावशाली आहेत. त्यामागं खूप मोठं अर्थकारण आहे, छुपे हेतू आहेत. त्यांच्यामुळे असंख्य मनो-सामाजिक दुष्परिणाम होतात हे आपण जाणून आहोत. त्यावर उतारा म्हणून मुद्रित साहित्य अधिक प्रभावीपणे प्रसारित करता येईल का? न वाचणाऱ्या किशोर गटाला ऑडिओ पुस्तकं, गटवाचन, पुस्तक-वाचनाचे जाहीर कार्यक्रम पुस्तकांकडे वळवू शकतील का? अगदीच नाही तर अशा कार्यक्रमांतून निदान किशोरांशी संबंधित विविध विषयांना रोचक पद्धतीनं तोंड फुटेल का? त्यावर छोट्या-छोट्या गटांत चर्चा आणि गप्पा होतील का? आणि किशोरांची ही भूक भागवणारं उपयुक्त साहित्य आकर्षक स्वरूपात आपण निर्माण करू शकू का? या प्रश्नांची उत्तरं जर आपण होकारार्थी मिळवू शकलो, तर हे साहित्य आणि किशोर यांच्यामध्ये अर्थपूर्ण सेतू बांधण्यात आपण यशस्वी होऊ.

संबंधित बातम्या