वाचणारी अमेरिका

गौतम पंगू, फिलाडेल्फिया, अमेरिका
सोमवार, 25 एप्रिल 2022

कव्हर स्टोरी

अमेरिकेतल्या गॅलप नावाच्या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणानुसार, सुमारे ८० टक्के अमेरिकी नागरिक वर्षाला किमान एक तरी पुस्तक वाचतात आणि २७ टक्के अमेरिकी नागरिक वर्षाला १०पेक्षा अधिक पुस्तकं वाचतात. म्हणजे हे प्रमाण अगदीच नगण्य म्हणता येणार नाही. अमेरिकेला भारत किंवा युरोपसारखा हजारो वर्षांचा इतिहास नसला, तरी स्वतःची अस्सल आणि समृद्ध साहित्यपरंपरा नक्कीच आहे. कित्येक आधुनिक विचारधारांचा, चळवळींचा उगम इथं झालाय आणि त्याचं प्रतिबिंब इथं प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांमध्ये पडलेलं दिसतं. 

‘जागतिक ग्रंथ दिनानिमित्त अमेरिकेतल्या वाचन संस्कृतीबद्दल लिहाल का,’ असा ‘सकाळ साप्ताहिक’च्या संपादकांचा निरोप आल्यावर मी थोडासा विचारात पडलो - इथं आजूबाजूला वाचणारे लोक दिसतात, पुस्तकांची दुकानं, वाचनालयं दिसतात, पण म्हणजे अमेरिकेला स्वतःची अशी वाचन संस्कृती आहे का? ‘वाचन संस्कृती’ म्हणजे मुळात नक्की काय? ती तयार करण्यामध्ये देशाच्या सरकारचा, तिथल्या सार्वजनिक संस्थांचा किती वाटा असतो? गंमत म्हणजे या प्रश्नांची थोडीशी उत्तरं मला लगेच आमच्याच घरी मिळाली. झालं असं होतं की याचवेळी आमच्या मुलीच्या प्लिमथ एलिमेंटरी शाळेनं ‘वन प्लिमथ, वन बुक’ नावाचा एक उपक्रम सुरू केला होता. त्या अंतर्गत त्यांनी शाळेतल्या प्रत्येक विद्यार्थ्याला ‘लिटल डॉग लॉस्ट’ नावाच्या सुमारे २०० पानी पुस्तकाची एकेक प्रत दिली होती आणि सांगितलं होतं की हे पुस्तक महिनाभरात वाचून पूर्ण करायचं. त्याचबरोबर पालकांनाही आवर्जून कळवण्यात आलं होतं, की दररोज तुम्हीही तुमच्या मुलांबरोबर हे पुस्तक वाचत चला. रोजच्या कामाच्या धबडग्यातून मुलांबरोबर पुस्तक वाचायला वेळ कसा काढायचा, मुलांना वाचायची गोडी कशी लावायची आणि त्यातून त्यांची शब्दसंपत्ती वाढीला लागावी म्हणून त्यांच्याबरोबर वाचताना नक्की कशावर भर द्यायचा याच्या टिप देणारे व्हिडिओ शाळेच्या लायब्ररीयननं तयार करून आम्हाला पाठवले होते. हा उपक्रम सुरू असताना दर आठवड्याला झूमवर पुस्तकावर आधारित गप्पासत्रं आणि क्विझचं आयोजन करण्यात आलं होतं आणि महिन्याच्या शेवटी मुलं आणि त्यांचे पालक यांना शाळेत बोलावून पुस्तकाशी संबंधित खेळ, ॲक्टिव्हिटी आणि पिझ्झा अशी एक ‘पार्टी’ ठेवण्यात आली होती. एक पुस्तक केंद्रस्थानी ठेवून मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, शाळेतल्या सगळ्या मुलांना एकच पुस्तक वाचायला सांगून त्यांच्यात समूहभावना वाढीला लावावी, आणि एकत्र पुस्तक वाचायच्या निमित्तानं कुटुंबं जवळ यावीत असा तिहेरी हेतू गुंफलेला हा उपक्रम वाचनाच्या फायद्यांची व्याप्ती फक्त वाचकापुरतीच मर्यादित नसते हे दाखवणारं एक उत्तम उदाहरण होता.

उच्च शिक्षण किंवा नोकरीसाठी अमेरिकेत आलेल्या आमच्यासारख्या लोकांची परदेशी आयुष्यं अर्ध्यातून सुरू झालेल्या रेघेसारखी असतात. मुलं इथं जन्मून मोठी व्हायला लागली की त्यांच्या माध्यमातून इथलं बालपण अनुभवायला मिळतं आणि त्या रेघेचा आधीचा भाग कार्बन कॉपीसारखा अस्पष्ट का होईना पण उमटायला लागतो. इथं मुलं वाढवताना जाणवलेली एक गोष्ट म्हणजे पुस्तकांना किंवा वाचनाच्या प्रक्रियेला अधिकाधिक वाचकाभिमुख करायचा प्रयत्न अगदी लहानपणापासूनच जाणीवपूर्वक केला जातो. मग यामध्ये ‘वन प्लिमथ, वन बुक’सारखे उपक्रम असतात, शाळांमध्ये किंवा सार्वजनिक वाचनालयांमध्ये सामूहिक वाचनाचे कार्यक्रम असतात, बालवाङ्‍मय लिहिणाऱ्या लेखकांना आवर्जून मुलांच्या भेटीला बोलावलं जातं. मार्चमध्ये मुलांसाठी फर्मास पुस्तकं लिहिणाऱ्या डॉक्टर सूस या लेखकाच्या स्मरणार्थ ‘रीड ॲक्रॉस अमेरिका’ हा वाचनाला वाहिलेला दिवस अमेरिकेतल्या सगळ्या शाळांतून साजरा केला जातो. त्या दिवशी मुलांना गोष्टी वाचून दाखवायला त्यांच्या पालकांनाही आमंत्रण असतं. मुलांचं घटकाभर मनोरंजन करण्याबरोबरच पालकांनाही निर्भेळ आनंद मिळेल असाच हा अनुभव असतो. असे कार्यक्रम बाकी देशांतल्या शाळांत होत असतीलच, पण इथले अनुभव सांगणं हा या लेखाचा उद्देश!

अर्थातच सरकारी पाठबळाशिवाय हे उपक्रम पार पडणं शक्य नाहीये. २००२मध्ये बुश सरकारनं मंजूर केलेला ‘No Child Left Behind’ कायदा असो किंवा २०१५मध्ये ओबामा सरकारनं मंजूर केलेली त्या कायद्याची ‘Every Student Succeeds Act’ ही सुधारित आवृत्ती असो, दोन्हीमध्ये मुलांना वाचतं करायचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं होतं. विद्यार्थ्यांना, विशेषतः गरीब आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना, वाचायला पुरेशी पुस्तकं मिळावीत यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या होत्या. तसेच चौथी, आठवी आणि बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची वाचनक्षमता तपासणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरच्या चाचण्याही अमलात आणल्या गेल्या होत्या. ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ या घोषणेवर निवडणूक जिंकलेल्या ट्रम्पसाहेबांच्या कारकिर्दीत मात्र त्यांच्या शिक्षणसचिव डिव्हॉस यांनी अशा कारणांसाठी मंजूर केलेल्या निधीच्या रकमेत भरपूर काटछाट केली होती. आता हे गाडं पुन्हा रुळावर येईल अशी आशा आहे! 

अमेरिकेला काही चांगली संस्कृती किंवा परंपरा वगैरे नाही, अमेरिकी माणसाची नीतिमूल्यं अतिशय भ्रष्ट असतात, आणि त्याचा रिकामा वेळ फक्त डिस्कोमध्ये नाचणं, पबमध्ये दारू ढोसणं, ड्रग्ज घेणं, इतरांना गोळ्या घालणं असल्याच कामात जातो, असे ठोकळेबाज गैरसमज अमेरिकेबाहेर काहीवेळा पाहायला मिळतात. पण इथल्या गॅलप नावाच्या संस्थेनं केलेल्या सर्वेक्षणानुसार, सुमारे ८० टक्के अमेरिकी नागरिक वर्षाला किमान एक तरी पुस्तक वाचतात आणि २७ टक्के अमेरिकी नागरिक वर्षाला १०पेक्षा अधिक पुस्तकं वाचतात. म्हणजे हे प्रमाण अगदीच नगण्य म्हणता येणार नाही. अमेरिकेला भारत किंवा युरोपसारखा हजारो वर्षांचा इतिहास नसला, तरी स्वतःची अस्सल आणि समृद्ध साहित्यपरंपरा नक्कीच आहे. अमेरिकेचं ‘युनायटेड स्टेट्स’ या स्वरूपातलं अस्तित्व जेमतेम अडीचशे वर्षांचं. पण या अल्पशा काळात हा देश व्यक्तिस्वातंत्र्य, कुटुंबसंस्था, समाजव्यवस्था आणि राजकारण यातल्या अनेक बदलांना, नव्या प्रवाहांना सामोरं गेलाय. कित्येक आधुनिक विचारधारांचा, चळवळींचा उगम इथं झालाय आणि त्याचं प्रतिबिंब इथं प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांमध्ये पडलेलं दिसतं. साहित्याचं नोबेल पुरस्कार पटकावणाऱ्या देशांत अमेरिकेचा फ्रान्सपाठोपाठ दुसरा क्रमांक लागतो. बेंजामिन फ्रँकलिन, थॉमस जेफरसन (१८वं शतक), ओ. हेन्री, मार्क ट्वेन, एमिली डिकिन्सन (१९वं शतक) आणि अर्नेस्ट हेमिंग्वे, जॉन स्टाइनबेक, हार्पर ली (२०वं शतक) ही फक्त काही उदाहरणंच अमेरिकी साहित्यपरंपरेची विविधता दाखवायला पुरेशी आहेत. मागच्या २५ वर्षांत यात पडलेली लक्षणीय भर म्हणजे ‘एलजीबीटीक्यू’ लेखकांनी आणि इराण, फिलिपीन्स, व्हिएतनाम, जमैका, भारत अशा बऱ्याच देशांतून अमेरिकेत आलेल्या ‘इमिग्रंट’ लेखकांनी लिहिलेली पुस्तकं. या लेखकांनी आपल्या अनुभवांबद्दल, स्वतःचं वेगळं अस्तित्व जपता-जपता मुख्य प्रवाहात सामावून जायच्या आणि प्रवाहाला निराळं वळण द्यायच्या संघर्षाबद्दल लिहून अमेरिकी साहित्याला एक वेगळा आयाम दिला आहे. झुंपा लहिरी, नील मुखर्जी, किरण देसाई, मीरा जॅकॉब या आघाडीच्या भारतीय-अमेरिकी लेखकांचं लेखन भारतातल्या वाचकांच्या परिचयाचं आहेच.  

अर्थात सध्याच्या स्मार्टफोन, सोशल मीडिया आणि ओटीटी प्लॅटफॉर्मच्या लोकप्रियतेचा परिणाम आपल्या सगळ्यांच्या पुस्तक वाचायच्या सवयीवर निश्चितच झालाय. महासाथीमध्ये घरी अडकल्यावर पूर्वीसारखं एका बैठकीत पुस्तक वाचणं किती अवघड जातंय, हे चांगलंच लक्षात आलं होतं. पण याच तंत्रज्ञानामुळं ई-बुक्स, ऑडिओ बुक्स असेही पर्याय उपलब्ध झालेत. पुस्तकाचा आनंद कसा घ्यायचा हा वैयक्तिक प्राधान्याचा भाग असला तरी शेवटी कुठल्याही मार्गानं पुस्तक ‘वाचलं’ जाणं महत्त्वाचं! म्हणूनच अमेरिकेतल्या सार्वजनिक वाचनालयांची संख्या आजही मॅकडॉनल्ड्स किंवा स्टारबक्सच्या संख्येपेक्षा जास्त आहे ही वस्तुस्थिती आश्चर्य आणि आनंद वाटण्यासारखीच आहे. इतकंच काय, तर अनेक सर्वेक्षणांतून असंही दिसून आलंय की आजची ‘मिलेनियल’ पिढी त्यांच्या पालकांपेक्षाही जास्त वाचते आणि काही विशिष्ट उद्देश ठेवून वाचते. फक्त त्यांच्या वाचनाची माध्यमं आणि पद्धत वेगळी आहे इतकंच! हे चित्रसुद्धा दिलासा देणारं आहे. 

पुस्तक ही अशी गोष्ट आहे की जी आपलं मनोरंजन करते, आपल्याला शिकवते, विचार करायला भाग पाडते. एखादं चांगलं पुस्तक वाचताना आपण बसल्या जागी एका वेगळ्याच दुनियेची सफर करून येतो, आणि त्याचबरोबर पुस्तक वाचताना आपला स्वतःच्या आतमध्येसुद्धा एक सुंदर प्रवास घडतो. सध्या आजूबाजूला जे चाललंय त्या परिस्थितीत स्वतःला वाचवायचं असेल तर पुस्तकं वाचत राहायलाच हवं!

संबंधित बातम्या