पत्रांच्या पलीकडले...

निरंजन आगाशे
सोमवार, 25 एप्रिल 2022

कव्हर स्टोरी

संपादकाचा साक्षेप आणि लेखकाची अस्वस्थता हे या नात्यातले दोन ध्रुव ‘जीएं’च्या पत्रसंग्रहातून प्रतीत होतात. ‘जीएं’चा तिरकसपणा, खट्याळपणा याच्या सर्व छटा या पत्रांमधून दिसतात आणि तरीही या दोघांच्या नात्यातील स्नेहाचा त्याआड झुळझुळणारा प्रवाह कधीही दृष्टीआड होत नाही.  त्याची खुमारी ही पत्रे वाचूनच अनुभवावी... 

मला आवडलेल्या पत्रांच्या पुस्तकांचा विचार करताना तीन नावे चटकन डोळ्यांसमोर आली. त्यातील पहिले अर्थातच ‘विश्रब्ध शारदा’. महाराष्ट्राच्या किंबहुना देशाच्या प्रबोधनपर्वात ज्यांचा मुख्य सहभाग होता, अशा लोकोत्तर व्यक्तींच्या पत्रांचा हा संग्रह. हरिभाऊ मोटे यांनी मोठ्या हौसेने ही मौलिक पत्रे गोळा केली आणि त्यांचे संकलन प्रसिद्ध केले. पण हे नुसतेच संकलन नव्हे. त्यांना पुस्तकाचे कोंदण देताना जी घडण केली आहे, ती वाचकाला खिळवून ठेवणारी आहे. यातील पहिला खंड १८१७ ते १९४७ या काळातील समाज आणि साहित्य या क्षेत्रातील पत्रांचा.

थंड गोळा होऊन पडलेल्या महाराष्ट्राला ऊब देऊन त्यात चलनवलन निर्माण करण्यात न्या. रानडे अग्रभागी असल्याचे लोकमान्यांनी म्हटले होते. तत्कालीन परिस्थितीचे हे नेमके वर्णन म्हणावे लागेल. तर या ‘चलनवलना’च्या सगळ्या क्रिया, त्यातील वेदना, आशा-आकांक्षा, संघर्ष आणि उन्मेष यांचे प्रतिबिंब आपल्याला या पत्रांमधून दिसते.

ज्यांनी पत्रे लिहिली आणि ज्यांना लिहिली ती दोन्हीही मोठी माणसे. त्यामुळे मुळातच मौलिक असा हा संवाद. त्याला ‘विश्रब्ध शारदा’ असे अन्वर्थक नाव हरिभाऊंनी दिले. सार्वजनिक जीवनात वावरताना आपोआपच अभिव्यक्तीला ‘सावधपणा’चा, एक सूक्ष्म-तरल का असेना, पण लगाम असतो. एखाद्या व्यक्तीला पत्र लिहिताना मात्र आपोआपच तो गळून पडतो. लिहिताना अधिक मोकळेपणा येतो. म्हणूनच ‘विश्रब्ध’ म्हणजे विसावलेली शारदा.

या प्रकल्पाचा भाग्ययोग असा, की अनेकविध क्षेत्रांतील मातब्बर व्यक्तींचा सहभाग त्यात आहे. ‘साहित्य आणि समाज’ या विभागाला संपादन साहाय्य लाभले ते गं. दे. खानोलकर यांचे, तर प्रस्तावना दि. के. बेडेकर यांची. या पत्रांमागचे रंग-अंतरंग, पोत, गंध न्याहाळतानाच त्यामागचा इतिहासाचा विशाल पट बेडेकर नजरेस आणून देतात. पत्रलेखकांच्या अनुक्रमणिकेवर जरी नजर टाकली तरी ताऱ्यांनी खच्चून भरलेल्या आकाशाकडे नजर टाकावी तशी स्थिती होते. त्यापैकी काही नावे अशीः माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन, लोकहितवादी, बाबा पद्‌मनजी, महात्मा फुले, डॉ. भाऊ दाजी लाड, जगन्नाथ शंकरशेठ, न्या. म. गो. रानडे, महात्मा गांधी, फ्लॉरेन्स नाइटिंगेल, दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, महाराजा सयाजीराव गायकवाड, पंडिता रमाबाई, वीर सावरकर, श्रीशाहू छत्रपती, न. चिं. केळकर, वि.रा. शिंदे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, धर्मानंद कोसंबी, मानवेंद्रनाथ रॉय, श्री.अ. डांगे, सेनापती बापट, साने गुरुजी, महामहोपाध्याय द.वा. पोतदार, र.धों. कर्वे, वि.भि.कोलते, महामहोपाध्याय पां.वा. काणे, डॉ. केशव बळिराम हेडगेवार इत्यादी. या सगळ्यांची पत्रे वाचताना या थोर नेत्यांमधील ‘माणसे’ कशी होती, त्यांचे राग, लोभ कशा प्रकारे व्यक्त होत असत, त्यांच्या प्रेरणा कोणत्या, परस्परातील स्नेहबंध कसे होते, त्यासंबंधांत प्रसंगी उद्‌भवलेले ताण कशा स्वरूपाचे होते, या सगळ्यांची कल्पना वाचकाला येते. ‘हरिभाऊंनी या पत्रांचा एक सुंदर गोफ विणला आहे,’ असा अभिप्राय बेडेकर देतात, तो अगदी रास्त आहे. खानोलकरांनी दिलेल्या तळटिपांमुळे हे विणकाम नीट साधले गेलेच, पण त्या काळात घडलेल्या रेनेसॉंची कल्पना येण्यासही त्यांचा उपयोग होतो. राजकीय, सामाजिक जागृतीबरोबरच विविध क्षेत्रांतील कलाकर्तृत्वाच्याही बहराचा हा काळ होता. त्याची स्पंदनेही संगीत नाटक (खंड-२) आणि चित्रकला- शिल्पकला (खंड-३) यात जाणवतात. 

मराठी रंगभूमीशी संबंधित पत्रसंग्रहाचे संपादन केले आहे वसंत शांताराम देसाई यांनी, तर संगीताविषयीच्या पत्रांचे वामनराव देशपांडे यांनी. दुसऱ्या खंडाच्या प्रस्तावनेत पु. ल. देशपांडे लिहितात, ‘गायक-गायिकांची ही पत्रे संगीतविषयक असली तरी त्यांचे वैयक्तिक राग-लोभही तंबोऱ्यातल्या गांधारासारखे त्यात आपोआप प्रकटले आहेत.’ इंदूरच्या श्रीमंत महाराजसाहेबांस १९२३मध्ये लिहिलेल्या पत्रात, ‘संगीताच्या उद्धारार्थ काहीतरी कायमची संस्था अस्तित्वात येवो,’ अशी प्रार्थना विष्णू नारायण भातखंडे करतात. ही आस आणि तळमळ त्या काळाविषयी बरेच काही सांगून जाणारी आहे. चित्रकार - शिल्पकारांच्या पत्रव्यवहारात उमटलेल्या कलाक्षेत्रातील उषःकालाच्या खुणा वाचकांना भारावून टाकतात.

‘जीएं’ची निवडक पत्रे

जी. ए. कुलकर्णी हे मराठी कथाविश्‍वातील मातब्बर नाव. पण सार्वजनिक सभा-समारंभ, मुलाखती या सगळ्यांपासून कटाक्षाने दूर राहिलेला हा लेखक. त्यामुळेच या व्यक्तिमत्त्वाविषयी एक प्रकारचे गूढ निर्माण झाले. हा माणूस आहे तरी कसा? त्यांच्या आवडीनिवडी काय? इतर साहित्यिक आणि त्यांचे साहित्य याविषयी ‘जीएं’ची मते काय आहेत, असे अनेक प्रश्‍न वाचकांच्या मनात कधी ना कधी आल्याशिवाय राहात नाहीत. ‘जीएं’च्या पत्रांमधून हे कुतूहल काही अंशी तरी शमते. याचे कारण एरवी समाजापासून काहीसे फटकून राहणारे, आपल्या मठीत राहून ग्रंथांच्या सहवासात राहणे पसंत असलेले ‘जीए’ पत्रांतून मात्र अगदी मोकळेढाकळे झालेले दिसतात. पण म्हणून या नुसत्याच गप्पा नाहीत. त्यात ‘जीएं’ची साहित्याविषयीची, चित्र-शिल्पादी कलांविषयीची संपन्न अभिरुची दिसते. त्यांची विनोद करण्याची खास पद्धत, त्यांची प्रतिमांची ‘भाषा’, त्यांचे तत्त्वज्ञान या सगळ्यांची झलक अनुभवायला मिळते. त्यामुळेच त्यांची सगळी पत्रे प्रसिद्ध करण्याचा खटाटोप ज्यांनी केला त्यांना धन्यवाद द्यावेत तेवढे थोडे. पु. ल. देशपांडे,  ग. प्र. प्रधान. म. द. हातकणंगलेकर, रामदास भटकळ, श्री. पु. भागवत यांनी या प्रकल्पासाठी पुढाकार घेतला. संपादक आणि माणूस म्हणूनही मराठी साहित्यविश्‍वात ज्यांचा दबदबा आहे, अशा श्री. पु. भागवत यांना ‘जीएं’नी लिहिलेली पत्रे मला विशेष आवडली. संपादक आणि लेखक यांच्यातले नाते कसे असते, त्यातले ताणेबाणे, त्यातला ओलावा हे सगळे या पत्रांतून प्रकटते. ‘‘श्रीपुं’शी कडाक्‍याने भांडण्याची इच्छा आहे; पण दुर्दैवाने भांडण करायला निदान दोघांची गरज असते,’ हे राम पटवर्धनांना लिहिलेल्या पत्रातील ‘जीएं’चे वाक्‍य पुरेसे बोलके आहे. पण ही भांडणाची इच्छा साध्यासुध्या भांडणाची नाही. कथानिवडीच्या निकषांपासून वाङ्‌मयीन भूमिकेपर्यंत, अंकाच्या सजावटीपासून ते भाषाशैलीपर्यंत अनेक विषयांकडे ‘श्रीपु’ कशारीतीने पाहतात, याविषयीचे कमालीचे औत्सुक्‍य ‘जीएं’ना होते. आणि आपली मते ‘श्रीपुं’पर्यंत पोचली पाहिजेत, ही आंतरिक तळमळही.

संपादकाचा साक्षेप आणि लेखकाची अस्वस्थता हे या नात्यातले दोन ध्रुव या पत्रसंग्रहातून प्रतीत होतात. ‘जीएं’चा तिरकसपणा, खट्याळपणा याच्या सर्व छटा या पत्रांमधून दिसतात आणि तरीही या दोघांच्या नात्यातील स्नेहाचा त्याआड झुळझुळणारा प्रवाह कधीही दृष्टीआड होत नाही.  त्याची खुमारी ही पत्रे वाचूनच अनुभवावी आणि त्यातले मर्म जाणून घ्यावे प्रधान सरांच्या प्रस्तावनेतून. अतिरिक्त लाभ असा, की ही पत्रे जीएंविषयी जेवढी ‘बोलतात’ तेवढीच ती ‘श्रीपुं’च्या व्यक्तिमत्त्वावरही प्रकाश टाकतात. अन्य खंडांमध्ये ‘जीएं’नी सुनीता देशपांडे, म.द. हातकणंगलेकर, माधव आचवल आदींना लिहिलेली पत्रे आहेत.

कुरुंदकरांची पत्रे

महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात अगदी तरुण वयातच ‘विचारवंत’ ही उपाधी स्वकर्तृत्वाने मिळविणारे नरहर कुरुंदकर यांनी प्रकाशक रा. ज. देशमुख आणि त्यांच्या पत्नी सुलोचनाबाई यांना लिहिलेल्या पत्रांचा ‘निवडक पत्रे’ हा संग्रहही वाचनीय आहे. मात्र ‘जीए’ ज्याप्रमाणे सार्वजनिक वावर कटाक्षाने टाळायचे तशी स्थिती कुरुंदकरांची नव्हती. उलट ते माणसांमध्ये रमत. संस्थांच्या व्यवहारांत उत्साही भाग घेत. लेखनाइतकीच वक्तृत्वाचीही त्यांना आवड. विचारपद्धती मात्र तर्ककठोर. त्यामुळे साहित्यकृती असो वा एखादी सामाजिक घटना, त्यांची चिकित्सा करताना मूलग्राही विचार कसा केला जातो याचा वस्तुपाठच जणू त्यांच्या लेखनातून सादर होई. त्यांच्या या सर्व गुणवैशिष्ट्यांची प्रचिती या पत्रांमधूनही येते. विनय हर्डीकर यांच्या प्रस्तावनेचा खास उल्लेख करायला हवा. या पत्रांचे महत्त्व तर ते विशद करतातच; पण एक भाष्यकार, विश्‍लेषक म्हणून कुरुंदकरांचे मोठेपण नेमके कशात आहे, हे स्पष्ट करतात. हर्डीकर लिहितात, ‘निबंधकाराची विषयाची जाण, व्यासंग, पकड, तर्कामुळे मांडणीला येणारे सौष्ठव आणि विषय घाईघाईने उरकून न टाकता, ठाम लयीत, विलंबित ख्याल मांडणाऱ्या गायकाचे रसिकाभिमुख, कलावंत मन या पत्रांमधून जाणवते.’

मला आवडलेल्या पत्रांच्या या तीनही पुस्तकात प्रकाशक - संपादकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, हा एक योगायोग.

पुस्तकांचा तपशील

 • विश्रब्ध शारदा, खंड पहिला. समाज आणि साहित्य संपादक 
 • ह. वि. मोटे, सहायकः कृष्णाबाई मोटे, पृष्ठेः ५८९
 • खंड दुसराः  मराठी रंगभूमी, महाराष्ट्रातील संगीत विभाग संपादकः  वसंत देसाई, वा. ह. देशपांडे, पृष्ठेः ३९८
 • खंड तिसराः भारतातील चित्रकला व शिल्पकला. विभाग संपादकः अरविंद मंगरूळकर, पृष्ठेः २६९
 • प्रकाशकः ह. वि. मोटे प्रकाशन, मुंबई
 • जीएंची निवडक पत्रे. एकूण चार खंड
 • संपादकः म. द. हातकणंगलेकर, श्री. पु. भागवत, सु. रा. चुनेकर 
 • प्रकाशकः मौज प्रकाशनगृह, मुंबई
 • निवडक पत्रेः नरहर कुरुंदकर
 • संपादकः जया दडकर, पृष्ठेः २३७    
 • प्रकाशकः देशमुख आणि कंपनी, पुणे

84 चेरिंग क्रॉस रोड
‘मी न्यूयॉर्कमध्ये जिथे राहते तिथून सतराव्या रस्त्यावरील पुस्तकाच्या दुकानात जाण्यापेक्षा मला लंडन जवळ आहे, कारण माझ्या टाईपरायटर समोरून उठण्याचीही तसदी न घेता मला चांगली आणि सुबक पुस्तकं मागवता येतात.’ नाटककार हेलन हान्फ आणि लंडन मधल्या 84, चेरिंग क्रॉस रोड या पत्त्यावरच्या मार्क्स अॅण्ड कंपनी या पुस्तकाच्या दुकानाचा व्यवस्थापक फ्रँक डोएल यांच्यातल्या पत्रव्यवहारातील एका पत्रातला हा मजकूर. मार्क्स अॅण्ड कंपनी वाचकांना जुनी, दुर्मीळ पुस्तकं मिळवून देण्यासाठी प्रसिद्ध होती. एकमेकांना कधीही न भेटलेल्या हेलन हान्फ आणि फ्रँक डोएल यांचा हा पत्रव्यवहार तब्बल १९४९पासून साडेएकोणीस वर्षे सुरू होता. या पत्रव्यवहाराचं पुस्तक म्हणजे ‘84, चेरिंग क्रॉस रोड.’
हेलन हान्फ यांच्या या पुस्तकाचं १९७०च्या दशकात वाचकांच्या जगात उत्साहानं स्वागत झालं होतं. त्यावर नंतर एक रेडिओ आणि टिव्ही मालिका झाली. नाटक लिहिलं गेलं आणि एक चित्रपटही निघाला.  चित्रपटात हेलन यांची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री अॅने बॅन्कक्राफ्ट पुस्तकाबद्दल लिहितात, ‘84, चेरिंग क्रॉस रोड, हा नुसताच पुस्तकांविषयीचा पत्रव्यवहार नाहीये. त्याही पलिकडे जाणारी मैत्री, आपुलकी, औदार्य आणि बुद्धिमत्ताही त्यातून प्रतिबिंबित होताना दिसते.’

संबंधित बातम्या