पुस्तक ‘ऐकणे’ही स्थिरावतेय...

प्राची कुलकर्णी
सोमवार, 25 एप्रिल 2022

कव्हर स्टोरी

ऑडिओ बुक्सनी प्रकाशनविश्वाचा एका अर्थाने फायदाच करून दिल्याचं उपलब्ध आकडेवारी दाखवते. परदेशात अनेक लोक ऑडिओ बुक्स ऐकून मग पुस्तक खरेदीकडे वळले अशी उदाहरणं आहेत. शिवाय भारतातदेखील प्रसिद्ध ठरलेली ऑडिओ बुक्स छापील स्वरूपात येण्याचा उलटा प्रयोग पण झालाय. शिवाय काही ऑडिओ बुक्स आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेबसीरीजच्या रूपातही दाखल होत आहेत.

“मी  एका दिवसात आख्खं पुस्तक ऐकून संपवलं…” 

“मी या एका महिन्यात दहा पुस्तकं ऐकायचं टार्गेट सेट केलं आहे…”

जुन्या पिढीतल्या लोकांसमोर ही वाक्यं उच्चारली तर ते कदाचित आश्चर्यचकित होतील...  पुस्तकं ‘वाचली’ हे म्हणणं ठीक आहे, पण हे ‘ऐकली’ काय प्रकरण आहे? असा त्यांचा प्रश्‍न असेल. पण नव्या शतकातल्या पिढीसाठी ही वाक्य अगदी सवयीची होण्याची सुरुवात झाली आहे.

पूर्वी काम करताना, जेवतानाही, काही ‘पुस्तकी किडे’ कसे पुस्तक सोडत नाहीत, याच्या कहाण्या सांगितल्या जायच्या. काळ बदलला जीवनशैली वेगवान झाली ... मनोरंजनाची साधनं हातातल्या मोबाईलवर आली. एका क्लिकवर माहिती मिळायला लागली आणि हळू हळू अनेकांच्या हातून पुस्तकं निसटून गेली. वाचनाची आवड तर आहे पण वेळ मिळत नाही.. किंवा मिळालेला वेळ ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या मनोरंजनाचे पर्याय निवडताना निघून जातो..  मग पुस्तकं वाचायची तरी कधी? असा सवाल आज अनेकांना भेडसावतो आहे. त्यातही जे नियमित वाचक, वाचन प्रेमी आहेत ते वेळ काढतातसुद्धा. पण त्यांच्यासाठीही पुस्तकं निवडणं, सोबत घेऊन फिरणं हा एक अडचणीचा मुद्दा. एका वेळी किती पुस्तकं सोबत ठेवायची म्हणता म्हणता ती किंडलमध्ये ई-बुक्सच्या स्वरूपात आली. पुढे याच किंडलची मोबाईल अॅप्लिकेशन आली आणि तंत्रस्नेही पिढीला एका क्लिकवर पुस्तकं वाचणं आणखी सोपं होत गेलं. यात काही वेळा ऑडिओचा -पुस्तक ऐकण्याचा -पर्यायदेखील होता, पण ही अॅप्लिकेशन वापरताना दरवेळी तुमचं लक्ष त्या पुस्तकाकडे असणं गरजेचं असायचं. वाचायचं किंवा ऐकायचं म्हटलं तरी मजकुराची निवड करण्याचं बंधनही यात होतं. शिवाय त्या अॅप्लिकेशनमधला आवाजदेखील मशिनचा -अतिशय कंटाळवाणा, एकसुरी! ज्यांना मुळातच खूप आवड नाही, ते पुस्तकांच्या दुनियेपासून लांब जातील की काय, अशीच एकूण परिस्थिती. पण या सगळ्यांना पुन्हा साहित्यविश्वाकडे आकर्षित करणारा एक पर्याय सध्या चांगलाच पॉप्युलर होतोय, तो म्हणजे ‘ऑडिओ बुक्स’चा.

 परदेशात हा पर्याय जरा जास्त रुळला असला तरी भारतात मात्र गेल्या तीन चार वर्षांमध्ये त्याचा प्रचार प्रसार होतो आहे. अर्थात हा मार्ग तुलनेने नवा असला तरी त्यात कोट्यवधींची उलाढाल होते आहे. गेल्या काही वर्षातच जवळपास चार ते पाच वेगवेगळ्या भाषांमधली पुस्तकं, अन्य मजकूर देणारी अॅप्लिकेशन मोबाईल वर उपलब्ध झाली आहेत.  

महत्त्वाचं म्हणजे छापील पुस्तकं वाचणारेही अनेक लोक या ऑडिओ बुक्सकडे वळले आहेत. छापील पुस्तकं वाचत असूनही या पर्यायाकडे का वळलात? असं विचारता संग्राम कुलकर्णी सांगतात, “माझं घर आणि ऑफिस हे अंतर बरंच आहे. हा वेळ तसा मोकळाच असायचा. पण ड्रायव्हिंग करत असल्यामुळे दुसरं काहीच करता यायचं नाही. अशात  पुस्तकवेड्या असणाऱ्या मला ऑडिओ बुक्स हा प्रकार सापडला आणि मग हा वेळच काय तर इतर वेळीही, म्हणजे चालायला जातो तेव्हा, झोपायच्या आधी वगैरे माझं पुस्तकं ऐकणं सुरू झालं. अगदी सहज काम करता करता पण पुस्तकं ऐकून होतात, आणि हल्ली मीटिंगला कानात हेडफोन घालून ठेवावे लागत असल्याने काम करता करता ऐकलं तरी कोणाला शंकाही यायचं कारणही नाही.”

संग्रामसारख्या अनेकांनी आधी वाचलेली किंवा ‘बेस्टसेलर’ ठरलेली अनेक पुस्तकं ऑडिओ बुक्सच्या रूपात  पुन्हा ऐकली आहेत. काहींना तर यामुळे पुन्हा वाचनाची आवड निर्माण झाली. ओजस सांगतो, “पूर्वी मी तास न तास वाचन करायचो. पण नंतर घरात ढीगभर पुस्तकं असूनही वाचायला वेळ मिळेना. ऑडिओ बुक्समुळे मी पुन्हा पुस्तकांकडे ओढला गेलो. इतका की त्याच महिन्यात मी जवळपास चार-पाच हजारांची पुस्तक खरेदी केली.”

अर्थात हे ऑडिओ बुक्सच गणित वाटतं तितकं सोपं नाही. मुळात पुस्तकांची ही बाजारपेठ दोन पद्धतींनी काम करते. एक म्हणजे क्लासिक्स किंवा प्रसिद्ध पुस्तकांचे हक्क प्रकाशक- लेखकांकडून घ्यायचे आणि दुसरं म्हणजे ओरिजिनल -म्हणजे या अॅप्लिकेशनवर जाण्यासाठीच लिहिलेल्या गोष्टी. प्रसिद्ध पुस्तकांसाठी ऑडिओ बुक्स निर्मिती करणाऱ्या कंपनीकडून लेखक किंवा प्रकाशकांना रॉयल्टी दिली जाते. पण ‘ओरिजनल’मुळे नवीन लेखकांनासुद्धा एक मोठा प्लॅटफॉर्म उपलब्ध झालाय.  मूळचा पत्रकार पण आता अनेक ऑडिओ सीरीजचा लेखक झालेल्या निरंजन मेढेकरच्या मते, “ऑडिओ बुक्सच गणित जमवायचं तर लोक काही तरी करत करत ती गोष्ट ऐकणार आहेत, हे गृहीत धरावं लागतं की मग साहजिकच त्यांना खिळवून ठेवणारं लिखाण करणं हे ओघाने आलं. आणि यातल्या लेखकाचं यश मोजण्याची गणितंसुद्धा फिक्स आहेत. तुमची गोष्ट कुठंपर्यंत, किती वेळ आणि किती मिनिटं ऐकली गेली याचा 

डाटा अॅप्लिकेशनकडे तयार असतो. त्यामुळे एखाद्या ऐकणाऱ्याचं एकही क्षण दुर्लक्ष होऊ नये, यासाठी प्रयत्न करावा लागतो. आणि जर एक पुस्तक चाललं,तरच तुम्हाला पुढचं पुस्तक लिहायची संधी मिळणार असते. त्यामुळे छापील पुस्तकांप्रमाणे एकदा पुस्तक विकत घेतलं की झालं इतकंच ते मर्यादित राहत नाही.”

यातला आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे कंटेंट कितीही उत्तम असला तरी तो सादर कसा होतोय, त्यावरसुद्धा ऐकणारा त्या पुस्तकाकडे वळणार की नाही, हे ठरतं. म्हणजे सादरीकरण उत्तम असेल तर साधं पुस्तकही यशस्वी आणि चांगलं पुस्तक केवळ सादरीकरण नीट नाही म्हणून फ्लॉप होण्याची शक्यतादेखील. ऑडिओ बुक्सचं हे गणित मांडताना सुकीर्त गुमास्ते सांगतो, “आपल्याकडे एक तर सब्स्क्रिप्शन बेस मॅाडेल  आहे किंवा मग अॅप्लिकेशनवर जाहिराती असणारं दुसरं मॉडेल. म्हणजे यूट्यूबप्रमाणे जर जाहिरात नको तर पैसे द्या. जितकं पुस्तक ऐकलं जातं तितके पैसे मिळतात. हा प्रकार तुलनेने नवा असला तरी गेल्या दोन वर्षात ऑडिओ बुक्स ऐकणाऱ्यांच प्रमाण आठ पटींनी वाढलं आहे. परदेशात हे प्रमाण खूपच जास्त आहे. आपल्याकडे आता प्रयोग होण्याची सुरुवात आहे. म्हणजे काही लोकं आता ऑडिओ बुक्सच्या मालिका सुरू करायचा विचार करत आहेत. पण सतत काही तरी नवीन देत राहणं, हा यातला महत्त्वाचा भाग. नवा कंटेंट नसेल तर श्रोते 

दुरावणार.” 

अर्थात असं म्हणत असताना क्लासिक म्हणून गणल्या जाणाऱ्या पुस्तकाकडे वळणाऱ्यांची संख्या मोठी आहे, हा भागदेखील लक्षात घ्यावा लागेल. अगदी आत्ताचं गणित पाहायचं झालं तर ऑडिओ बुक्समध्ये सर्वाधिक ऐकलं गेलेलं पुस्तक आहे ‘हॅरी पॉटर’. हॅरी पॉटरचे सर्व भाग पुस्तकांच्या स्वरूपात उपलब्ध आहेत, शिवाय त्या सगळ्या भागांवर चित्रपटही आहेत, पण तरीही ऑडिओ बुक स्वरूपात हॅरी पॉटर ऐकला जात आहे.

ऑडिओ बुक्सचा प्रचार प्रसार अजूनही शहरी भागात जास्त आहे, असंही एक निरिक्षण मांडलं जातं. ग्रामीण भागातला वाचक अजून ऑडिओ बुक्सकडे फारसा वाळलेला नाही. म्हणूनच की काय प्रकाशकांच्या दृष्टीने ऑडिओ बुक्स हा अजून एक प्रयोगच आहे. रोहन प्रकाशनच्या रोहन चंपानेरकर यांच्या मते, “सध्या ऑडिओ बुक हा एक पर्याय उपलब्ध झाला आहे. आम्ही अनेक पुस्तकांचे हक्क त्यांना देतो आहे. पण आमच्यासाठी हा अनेक प्रयोगांपैकी एक आहे. खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत जेव्हा ऑडिओ बुक्स पोहोचतील तेव्हा त्याचा फायदा होईल.”

मात्र ऑडिओ बुक्सनी प्रकाशनविश्वाचा एका अर्थाने फायदाच करून दिल्याचं उपलब्ध आकडेवारी दाखवते. परदेशात अनेक लोक ऑडिओ बुक्स ऐकून मग पुस्तक खरेदीकडे वळले अशी उदाहरणं आहेत. शिवाय भारतातदेखील प्रसिद्ध ठरलेली ऑडिओ बुक्स छापील स्वरूपात येण्याचा उलटा प्रयोग पण झालाय. शिवाय काही ऑडिओ बुक्स आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर वेबसीरीजच्या रूपातही दाखल होत आहेत. ओटीटी प्लॅटफॉर्मच्या काळात मनोरंजन आणि माहिती एका क्लिकवर उपलब्ध होत असताना, साहित्याचं माध्यमांतर घडवणारा हा प्रयोग महत्त्वाचा आहे हे नक्की.

संबंधित बातम्या