जर्मनीतील  वाचनसंस्कृती

ऋत्विक गजेंद्रगडकर,  म्युनिक, जर्मनी
सोमवार, 25 एप्रिल 2022

कव्हर स्टोरी

पुस्तकं ही सुसंस्कृतपणाची मोठी खूण आहे याचं भान असणाऱ्या माणसांमध्ये आपण वावरतो आहोत, याचं  समाधान तर असतंच पण पैशाइतकंच पुस्तकांचं मूल्य जपणाऱ्या या जीवनशैलीचं, एका उदार खुल्या मानसिकतेचं, आणि खऱ्या अर्थानं समृद्ध जीवनमूल्यांचं दर्शन आपल्याला होत राहतं.

वाचनाची मनापासून आवड अनेकांना असते आणि ती आवड जपण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीमध्येही लोक प्रयत्नशील असतात. काहींना जागेची उणीव भासते, पुस्तकांच्या खरेदीसाठी काहींकडे पुरेसे पैसे नसतात, काहींना या दोन्हीचा आणि त्याहून अधिक अडचणींचा सामना करावा लागतो. पण मुळात वाचनानं, आणि वाचलेल्याबद्दल इतरांशी केलेल्या अनौपचारिक संवादामधून आपल्याला काहीतरी मिळत आहे, आपण समृद्ध होत आहोत हा ठाम विश्वास असला की मगच प्रतिकूलतेवर मात करण्याची इच्छा होते आणि त्यासाठी बळही मिळतं. अशा उत्कटतेनं वाचनाचा छंद जोपासणारे आपल्याला आपल्या अवतीभवती कितीतरी वेळा भेटतात. 

या छंदाला आपल्या अभ्यासाचा विषय बनवणारे मात्र तुलनेनं कमी असतात. साहित्याचा अभ्यास करण्यासाठी नुसतं साहित्यावर नाही, तर ‘वाचन’ या क्रियेवर जिवापाड प्रेम असलं पाहिजे. (मी सध्या शिकत आहे त्या म्युनिक विद्यापीठातील एका प्राध्यापकांनी वाचनाचा कंटाळला असणाऱ्या विद्यार्थ्यांना हीच गोष्ट फार कडक शब्दात सुनावल्याची आठवण झाल्याशिवाय राहत नाही!) मुळात साहित्याचा, साहित्यशास्त्राचा अभ्यास करायचा म्हणजे केवळ लेखकानं, कवीनं अथवा नाटककारानं ‘काय म्हटलं आहे’ किंवा त्याला ‘काय म्हणायचं आहे’ याचा शोध घेणं असं नसून एखादी साहित्यकृती उदयाला येण्याची कारणं आणि प्रक्रिया, त्या काळातील सामाजिक-सांस्कृतिक-राजकीय परिस्थितीचा साहित्यनिर्मितीवर आणि वाचकांच्या ‘वाचनदृष्टीवर’ असणारा प्रभाव, त्या भाषेच्या साहित्याच्या इतिहासातील त्या कलाकृतीचं महत्त्व अशा अनेक पैलूंचा अभ्यास समाविष्ट असतो. शिवाय, त्या काळातील इतर भाषांमध्ये गाजलेल्या आणि ऐतिहासिक महत्त्व लाभलेल्या साहित्यकृतींचीही माहिती असणं गरजेचं असतं. इतका खोलात जाऊन अभ्यास शक्य होण्यासाठी काय करावं लागतं, या प्रश्नाचा जर मागोवा घ्यायचा झाला, तर ‘पोषक वातावरण’ असं थोडक्यात उत्तर देता येईलही कदाचित, पण ते वातावरण साध्य कसं करायचं, याचं उत्तर सहज मिळणं मात्र फार कठीण आहे. 

नियमितपणे वर्गात उपस्थित राहणं, शिक्षकांच्या अपेक्षा समजून घेऊन त्यांनी घालून दिलेल्या मर्यादेतच विचार करणं, परीक्षेचं स्वरूप समजून घेऊन चांगले गुण मिळवून परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी म्हणून  अभ्यास करणं या चौकटीपलीकडे जायचा प्रयत्न केला तर ‘पोषक वातावरण’ म्हणजे नक्की काय याचा निदान विचार करणं शक्य होऊ शकतं. भारतामधील शालेय तसंच महाविद्यालयीन शिक्षणपद्धतीकडे एक नजर टाकली तर काही प्रयोगशील, विद्यार्थ्यांचं ‘वाचनस्वातंत्र्य’ जपू इच्छिणाऱ्या शिक्षकांचा,त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रत्येक सत्रामध्ये नव्यानं अभ्यासक्रम आणि परीक्षेचं स्वरूप ठरवण्याचं स्वातंत्र्य शिक्षकांना देऊ पाहणाऱ्या ‘जेएनयू’सारख्या काही विद्यापीठांचा अपवाद वगळता अभ्यासक्रम आणि परीक्षा या चौकटीपलीकडचा अभ्यास आणि त्यासाठीचं वाचन करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या जागांचा अभावच दिसून येतो. 

जर्मनीतील म्युनिक येथील ‘एलएमयू’ या प्रतिष्ठित विद्यापीठामध्ये जर्मन साहित्यात पी.एचडी. करण्याची आणि तिथल्या भाषाविभागाचा भाग होण्याची संधी मला मिळाली. जसा माझा अभ्यास सुरू झाला, स्थानिक विद्यार्थ्यांशी, माझ्या गाईडकडे पूर्वी पी.एचडी. करून त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्यांशी जशी माझी ओळख झाली, तसं मला जाणवलं की साहित्यावर, वाचनावर नितांत प्रेम असणारेच ही वाट निवडतात. साहित्याची आवड नसूनही केवळ पदवी प्राप्त करण्यासाठीचा ‘सोपा मार्ग’ म्हणून या विषयांकडे तिथे बघितलं जात नाही. उलट साहित्य आणि इतर मानव्यशाखा यासाठी लागणारी अभ्यासाची आणि वाचनाची बैठक लक्षात घेऊन स्वतः त्या वाटेला न गेलेले, पण गेलेल्यांचा मनापासून आदर करणारे काही मला मित्रांच्या रूपात भेटले. 

त्यांच्याशी अनेकदा झालेल्या गप्पांमधून मला समजलं की त्यांच्या शालेय पाठ्यक्रमात साहित्याच्या इतिहासातील नामवंत लेखक आणि त्यांच्या गाजलेल्या साहित्यकृती सर्वांनीच वाचलेल्या आहेत. मग त्या फ्रांस काफ्काच्या छोट्या कथा असोत, बेर्टोल्ट ब्रेश्टची निवडक नाटकं असोत किंवा जर्मन साहित्य ज्यांच्या उल्लेखाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही अशा महाकवी ग्योथं आणि शिलरची नाटकं किंवा त्यांच्या कविता असोत. त्यामुळं पुढे जाऊन इंजिनिअरिंग, एमबीए किंवा एखादी वैद्यकीय शाखा जरी तिथल्या विद्यार्थांनी निवडली, तरी त्यांना आपल्या मातृभाषेतील प्रथितयश साहित्यकारांची नुसती नावंच नव्हे, तर त्यांच्या साहित्याचीही चांगली ओळख झालेली असते. आणि म्हणूनच ज्यांना वाचनाची आवड किंवा सवय जपायची आहे, त्यांना काय वाचायचं हे पक्कं ठाऊक असतं. 

विद्यापीठातील वाचनसंस्कृतीबद्दल बोलायचं झालं तर ‘एलएमयू’ सारख्या विद्यापीठात (किंवा ग्योटिंगेन, ट्युबिंगेन, फ्रायबुर्ग, हैडलबर्ग अशा इतर अतिशय जुन्या आणि नामवंत विद्यापीठांमध्ये) प्रवेश मिळाला की अभ्यास आणि संशोधन यांना प्रोत्साहन देण्यासाठी एक संस्था काय काय करू शकते हे जवळून पाहायला मिळतं. एक विद्यार्थी म्हणून विद्यापीठाची मुख्य (सेंट्रल) आणि आपल्या विभागाच्या लायब्ररीसोबत विद्यापीठाशी संलग्न कुठलीही लायब्ररी आपण केवळ पुस्तकं घेण्यासाठी नव्हे तर अभ्यास करण्याची जागा म्हणून वापरू शकतो. यांपैकी कुठेही आपल्याला हवं ते पुस्तक उपलब्ध नसेल, तर त्या राज्यातील दुसऱ्या कुठल्याही विद्यापीठाकडून ते निःशुल्क मागवू शकतो. शिवाय प्रत्येक राज्याची स्वतंत्र अशी राष्ट्रीय (स्टेट) लायब्ररी असते. तिथूनही आपण हवी ती आणि हवी तेवढी पुस्तकं मागवू शकतो. विभागीय पुस्तकालयं वेळोवेळी जुन्या झालेल्या काही ग्रंथांच्या आवृत्त्या विद्यार्थ्यांना मोफत नेण्यासाठी आपल्या प्रवेशद्वारापाशी ठेवत असतात. मुळात इथे अभिजात साहित्यकृतींच्या साठ-सत्तर आवृत्त्या सहज निघतात, ही बाब विशेष म्हणावी अशी आहे.

आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी केवळ पुस्तकांच्या खरेदीकरता वेगळ्या शिष्यवृत्त्या तिथली विद्यापीठं उपलब्ध करून देतात. सत्र संपलं तरी आपल्या सहकाऱ्यांशी संपर्क तुटू नये म्हणून विद्यार्थी शिक्षकांच्या मध्यस्थीशिवाय आवडलेल्या लेखकांच्या नावानं ‘रिडींग सर्कल’ सुरू करतात आणि त्यामध्ये सातत्यानं सहभागही घेत राहतात. मधल्या काळात लॉकडाउनमुळे जवळजवळ दोन वर्षं सर्वांनाच घरामध्ये बसून राहावं लागलं. हे लक्षात घेऊन विद्यापीठातील अनेक प्राध्यापक, हा वेळ वाचन वाढवण्यासाठी कसा वापरता येईल, आपल्या सहकाऱ्यांशी संपर्क कसा ठेवता येईल  यावर मार्गदर्शन करत होतेच, पण त्याचबरोबर २०-३० या वयोगटातील विद्यार्थ्यांशी आपण बोलत आहोत याचं भान ठेऊन अभ्यासातील, वाचनामधील रस कमी होऊ नये म्हणून अभ्यासेतर मौज-मजा करण्यासाठीचे पर्याय सुचवायला ते विसरले नाहीत. आपण शिकत असलेला विषय, वाचत असलेली एखादी कादंबरी किंवा एखादं नाटक समजून घेताना त्याच्याशी निगडित इतर कोणत्या साहित्यकृती का महत्त्वाच्या आहेत, त्या का आणि कशासाठी वाचायच्या हे इथले प्राध्यापक समजावून सांगतात. पण हे शिकण्याचा ‘उपयोग’ काय, या प्रश्नात आणि त्याच्या उत्तरात ते अडकून राहत नाहीत. काही विचारांचा जसा समाजावर पगडा असतो तसाच तो साहित्यिकांवरही कसा असतो आणि प्रत्येक साहित्यकृतीत त्यांची अभिव्यक्ती कशी वेगळी असते, याचं रसाळ विवेचनही ते करत जातात. हे करताना, त्या वर्गासाठी ठरवलेलं शिकवून किंवा वाचून झालं नाही तर ही शिक्षकमंडळी त्याचं काहीच मानून घेत नाहीत. त्या वेळात जो काही संवाद झाला त्यातून चांगलंच काहीतरी पुढे येईल या खात्रीनं आणि विश्वासानं ते तेवढा वेळ आपल्या विद्यार्थ्यांसाठी देतात. 

तिथली वाचनसंस्कृती ही विद्यापीठाबाहेर दैनंदिन आयुष्यातही दिसून येते. जुन्या पुस्तकांची भांडारं, तिथे अत्यंत कमी दरात (विद्यार्थ्यांचं राष्ट्रीयत्व न बघता त्यांना विशेष सवलतींसह) मिळणारी पुस्तकं आणि त्यांना असणारं सांस्कृतिक महत्त्व असो किंवा पूर्वी शहरभर जागोजागी फोनचे बूथ होते तशी पाहायला मिळणारी पुस्तकांची खुली कपाटं असोत, पुस्तकं आणि वाचन इथल्या माणसांच्या दिनचर्येचा आवश्यक घटक बनून गेला आहे, याची स्पष्ट जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. ह्या खुल्या कपाटांमध्ये लोक आपल्या संग्रहातील, वाचून झालेली पुस्तकं आणून ठेवतात, तिथे असलेली, आपल्या आवडीची पुस्तकं घेऊन जातात, तीच पुन्हा किंवा त्या जागी वेगळी पुस्तकं आणून ठेवतात. ही ने-आण अखंड चालू असते. लॉकडाउनच्या काळातील निर्बंध शिथिल करण्याचा निर्णय जर्मन सरकारनं घेतला तेव्हा अत्यावश्यक सेवांमध्ये पुस्तकांच्या दुकानांचा समावेश केल्याने शासनाला असणारी विद्यार्थ्यांची, अभ्यासकांची किंमत आणि त्यांच्या प्रति असणारा आदरच स्पष्ट झाला.  

अशा अनेक गोष्टींमधून - शासनाच्या धोरणांमधून आणि सर्वसामान्यांच्या जीवनशैलीमधून - पुस्तकांचं, वाचनाचं एखाद्या प्रदेशाच्या संस्कृतीमध्ये काय स्थान आहे हे लक्षात येतं. पुस्तकं ही सुसंस्कृतपणाची मोठी खूण आहे याचं भान असणाऱ्या माणसांमध्ये आपण वावरतो आहोत, याचं  समाधान  तर असतंच पण पैशाइतकंच पुस्तकांचं मूल्य जपणाऱ्या या जीवनशैलीचं, एका उदार खुल्या मानसिकतेचं, आणि खऱ्या अर्थानं समृद्ध जीवनमूल्यांचं दर्शन आपल्याला होत राहतं. ‘वाचाल तर वाचाल’ अशा घोषणाबाजीमध्ये न अडकता सरकार, विद्यापीठाचं प्रशासन, प्राध्यापक, विद्यार्थी आणि सामान्य माणूस हे सगळेच जण आपल्या कामातून, आचरणातून वाचनसंस्कृतीचा, ती जतन करण्याचा आदर्श सहज घालून देतात, आणि अशा संस्कृतीच्या पायाभरणीसाठी आवश्यक असलेलं ‘पोषक वातावरण’ अनुभवण्याचा आनंद आणि त्या वातावरणाच्या श्रीमंतीचा अपूर्व स्पर्श आपल्यालाही  देत राहतात.

 

संबंधित बातम्या