...एक अफलातून विश्व

संतोष शिंत्रे
सोमवार, 25 एप्रिल 2022

कव्हर स्टोरी

मराठी साहित्य आणि भारताचे समाजकारण ह्यातील तेवीस बिनीच्या शिलेदारांचे वाचन-विश्व नक्की काय आणि कसे आहे, हे ‘ग्रंथांच्या सहवासात’आपल्यापुढे फार विस्तृत पद्धतीने मांडते. त्या त्या व्यक्तींनी खूप प्रांजळपणे आपले वाचन, संस्कार, प्रभाव, आवडी-नावडी हे सगळे लिहिले असल्याने हे पुस्तक, लिहिणाऱ्‍या व्यक्ती आणि वाचक ह्यांच्यात आपसूक एक अनौपचारिक स्नेहबंध निर्माण करते. इतकी मोठी विचारवंत, लेखक ह्यांची फौज आपल्याला त्यांचे वचन उलगडून दाखवते, हीच एक बौद्धिक मेजवानी म्हणता येईल.

लहानपणी कदाचित वेळ घालवण्याचे एक साधन म्हणून सुरू झालेले वाचन सिंदबादच्या म्हाताऱ्‍याप्रमाणे कधी मानगुटीवर बसते ते कळत नाही. संग्रह वाढत जातो. काही वर्षांतच काहीजण पुस्तकप्रेमी (Bibliophile) ह्या पदाच्या जवळपास पोहोचणारे संग्राहक होण्याच्या आसपास पोहोचलेले असतात. काहीजण त्याहीपुढच्या पायरीवरचे पुस्तकवेडे (Bibliomane) होतात. कोणतेही तारतम्य न ठेवता, पुस्तके जमवणारे (An indiscriminate collector of books) असे ह्या पुस्तकवेड्यांचे वर्णन संशोधक अ. का. प्रियोळकर ह्यांनी केले आहे. संग्राहकांपैकी प्रत्येकजण कदाचित पुस्तकवेडा ह्या ‘बहुमाना’पर्यंत पोचतोच असे नाही; पण पुस्तकप्रेमी संग्राहकांना मात्र पुढेपुढे वेगळीच पीडा उत्पन्न होते. प्रदीर्घ, अथक वाचनाने अभिरुची चांगलीच समृद्ध झालेली असते. आसपास दिसणाऱ्‍या बऱ्‍याच साहित्यापैकी बऱ्‍याचशा फोलपटांतून निके निवडावे लागते, आणि हे काम अत्यंत जिकिरीचे असते. मग फक्त आणखी... आणखी... इतकी तहान भागवत राहणे किंवा तसा प्रयत्न करणे हेच काय ते हाती उरते. आणि अस्सल, निवडक, अभिजात साहित्याची माहिती एकत्रित स्वरूपात कुठे मिळेल हा शोध सुरू होतो. अशी माहिती देणारा स्रोतही तितकाच तालेवार असणे आवश्यक असते. ऐऱ्‍यागैऱ्‍या शिफारशी ही निकड भागवूच शकत नाहीत.    

इंटरनेटपूर्व काळात आणि अगदी आजही हे ‘आणखी’ माहीत होण्याचा एक सुनिश्चित, विद्वत्प्रमाणित मार्ग म्हणजे पुस्तकांविषयीची पुस्तके. इंग्रजीत ‘बुक्स ऑन बुक्स’. आज नेटच्या जमान्यातही ह्या साहित्यप्रकाराचे महत्त्व जराही कमी झालेले नाही. कारण अशी पुस्तके म्हणजे निव्वळ वाण-समानाची जंत्री, यादी नसते. पुस्तकांची समीक्षाही नसते. अशी पुस्तके वाचल्यावर ज्या लेखकाने ते लिहिले असेल; त्याचा व्यासंग, मते, मतांतरे, खुमासदार निरीक्षणे, काही वेळा आपल्या लक्षात आलेल्या पण त्या पुस्तकाच्या लेखकाकडून निसटलेल्या काही गोष्टी- ह्या सर्वांमुळे, आपल्यालाच अधिक समृद्ध झाल्याची भावना येते. नव्हे, आपण बऱ्‍याच वेळा तसे झालेलेही असतो. अगदी एखादेवेळी दोन जुने मित्र म्हणजे अपेक्षाभंग आणि भ्रमनिरास हेही अचानक भेटू शकतात.

इंग्रजीत अशा पुस्तकांविषयीच्या पुस्तकांचा खजिना मराठीपेक्षा कैक पटीने अधिक समृद्ध, वैविध्यपूर्ण आणि असीम आहे. पुस्तकाचे घटक आणि पुस्तकव्यवहाराशी/निर्मितीशी संबंधित घटक ह्या दोन्ही विषयांना वाहिलेली इंग्रजीत मुबलक पुस्तके आढळतात. पुस्तकाचे घटक म्हणजे मुखपृष्ठ, (मागील)परिचयपृष्ठ, उद्दिष्ट-पृष्ठ (Motto of the book), अर्पणपत्रिका, प्रस्तावना, मुख्य आशय, सजावट (Design), मांडणी (Layout). 

तर पुस्तकनिर्मितीशी संबंधित घटक म्हणजे लेखक (अर्थातच), प्रकाशक, मुखपृष्ठ कलाकार, सजावटकार (Designer), अक्षर-रचनाकार (Calligrapher), संपादक (असलाच तर), विक्रेता/वितरक आणि निर्मितीत सहभाग नसूनही अत्यंत महत्त्वाचा - वाचक. 

मराठीत तुलनेने ह्या सर्व घटकांबाबत बोलणारी पुस्तकांविषयीची पुस्तके कमीच म्हणावी लागतील. अगदी गेल्या शतकपासूनच्या अशा प्रकाशित पुस्तकांचा  विचार करायचा झाला, तरी ती १५०चा आकडा ओलांडतील असे वाटत नाही. ह्यातील बहुतांश वाचक आणि संग्राहक ह्याच घटकांभोवती केंद्रित झालेली दिसतात. काही  अपवाद म्हणजे- ‘गाजलेल्या प्रस्तावना’ (संपादक वि. ग. कानिटकर), ‘आक्षिप्त मराठी साहित्य’ (डॉ. गीतांजली घाटे) अशी काही वेगळी पुस्तके आठवून जातात. (माझे मर्यादित ज्ञान, व्यक्तिगत ग्रंथसंग्रह आणि स्मरणशक्तीमुळे काही पुस्तके उल्लेख करायची राहून जाऊ शकतात.) एका मराठी दैनिकाने काही वर्षांपूर्वी काही निवडक पुस्तकांची ओळखपृष्ठे, म्हणजे सर्वात मागील पान - इंग्रजीत ज्याला ब्लर्ब म्हणतात, ते छापणारे सदर वर्षभर चालवल्याचे स्मरते. अर्पणपत्रिकांच्या वैविध्याबाबतही दोन-चार खूप मोठे लेख लिहिले गेले आहेत. मात्र त्या विषयावर पुस्तक अद्याप आलेले नाही. दीपक घारे ह्यांच्या ‘मुद्रणपर्व’ ह्या अत्यंत आगळ्या वेगळ्या पुस्तकाचाही उल्लेख अनिवार्य आहे. सजावट, मांडणी, सुलेखन, दृश्य प्रतिमांचे पुस्तकातील महत्त्व, फाँट, चित्रे छापण्याच्या पद्धती, ह्याचे अभूतपूर्व विश्लेषण त्यात केल्याचे आढळते.

मराठीत त्यातल्या त्यात संख्येने अधिक आढळणाऱ्‍या वाचक-संग्राहक-विचारवंत ह्यांनी लिहिलेल्या पुस्तकांमध्ये मात्र विषय-निवड, दृष्टिकोन, पुस्तकांविषयीचे अनुभव ह्या सर्वातच भरपूर वैविध्य दिसते, ही एक सुखावणारी गोष्ट. काही उदाहरणे पाहिल्यास हा मुद्दा अधिक स्पष्ट होईल. नीतीन रिंढे ह्यांचे ‘लीळा पुस्तकांच्या’ हे पुस्तक कल्पनातीत विषय आपल्यासमोर ठेवते. ‘पुस्तकांचं नाहीसं होणं’, ‘द्युमा क्लब-पुस्तकाविषयीची रहस्यकथा’, ‘पुस्तकचोराच्या मागावर गुप्तहेर’, ‘समासातल्या नोंदी केवळ’ (होय! कच्च्या नोंदींवर एक आख्खे पुस्तक आहे), ‘मुखपृष्ठांच्या रेखीव गोष्टी’, ‘हिटलर- पुस्तके जपणारा आणि जाळणारा’ असले भन्नाट विषय ह्यात हाताळले आहेत. सर्व विषयांमध्ये मुख्यत्वे अमराठी पुस्तके आली तरी अत्यंत अभिमानास्पद असे प्रदीप सेबेस्टियन ह्या भारतीय लेखकाने लिहिलेले जागतिक साहित्याबाबतच्या ‘द ग्रोनिंग शेल्फ’ ह्या अत्यंत उच्च अभिरुचीच्या पुस्तकाचा परिचयही आपल्याला ‘लीळा...’ पुस्तक करून देते. आणखी माहिती न देता, ग्रोनिंग- म्हणजे पुस्तकांच्या भाराने वाकल्याने कुरकूर करणारे पुस्तकाचे शेल्फ, इतकीच माहिती इथे पुरवतो. 

शरद गोगटे ह्या साहित्यव्यवहारात मुरलेल्या लेखक-प्रकाशकांचे ‘ग्रंथगप्पा’ हे अनुक्रमणिकेत वर्ण्य विषयाची मांडणी तीन विभागात करते. ‘ग्रंथ- रूप व अंतरंग’ हा पहिला विभाग मुखपृष्ठ, उल्लेख सूची (Bibliography), ब्लर्ब ह्या अनवट विषयांवर प्रत्येकी एक लेख आणि ‘मराठी ग्रंथसंसारातील पाकशास्त्र’ असा एक वेगळाच विषय आपल्यासमोर मांडताना दिसतो. दुसरा विभाग- ‘ग्रंथव्यवहार’. हा प्रकाशनाचे बदलते अर्थकारण, पुरस्कारांची फलश्रुती, लेखक-प्रकाशक करार, जागतिक ग्रंथ जत्रा असे विषय मांडतो. तर तिसरा विभाग ‘ग्रंथ प्रकाशक लोकमान्य टिळक’, ‘म. गांधींचा प्रकाशन वारसा’, ‘पंधरा लाख रुपये किमतीचे पुस्तक’ असे एकसे एक रसपूर्ण विषय पेश करतो. 

समकालीन साहित्य, समाजकारणावर आपला सुनिश्चित ठसा उमटवणारे नंदा खरे ह्यांचे संचारक्षेत्र मोठे असते. त्यांचे ‘वाचताना, पाहताना, जगताना’ हे पुस्तक त्याचीच प्रचिती देते. निम्मे पुस्तक लेखकांनुसार आणि निम्मी मांडणी विविध विषयांची अशी केल्याचे दिसते. स्टाईनबेक, ऑर्वेल, जॉन बर्जर ह्यांच्या साहित्यातून दिसणाऱ्‍या जगावर प्रत्येकी एक (काहीसा दीर्घ) लेख आहे. ‘उमर खय्याम- एका इहवाद्याचा प्रवास’ ह्या प्रदीर्घ लेखात त्याच्या रुबायांचे केलेले चिकित्सक रसग्रहण मुळापासून वाचण्यासारखेच आहे. ‘होम्स ते हॅनिबल: इंग्रजी डिटेक्टिव कथा’ ह्या लेखात अशा प्रकारच्या लेखनाचे जागतिक राजकारण-समाजकारणानुसार बदलत गेलेले स्वरूप हे एक उत्तम विश्लेषण आहे. २००९मध्ये त्यांनी तापमानवाढ हा विषय ज्या पोक्तपणे हाताळलेला दिसतो, तितकी समज तेव्हाच्या सरकारांनाही तेव्हा नव्हती. ह्या विषयावरील इंग्रजीतील ललित लेखनाचाही आढावा त्यांनी सविस्तर घेतलेला दिसतो. ह्याच पुस्तकातला ‘नेमाड्यांची ‘हिंदू’ आणि माझा विश्वासघात’ हा अत्यंत वेगळा दृष्टिकोन मांडणारा लेख. 

पुस्तकप्रेमी संग्राहकाकडे असलीच पाहिजेत अशी आणखी काही पुस्तके म्हणजे श्री. बा. जोशी ह्यांचे ‘उत्तम-मध्यम’, अरुण टिकेकर ह्यांचे ‘अक्षरनिष्ठांची मांदियाळी’, सारंग दर्शने संपादित ‘ग्रंथांच्या सहवासात’, नीतीन रिंढे ह्यांचे ‘पासोडी’. ह्या तीनही पुस्तकांमधील एखाद-दुसरा प्रसंग किंवा हकिगत वेगळी काढून सांगणे हे पुस्तकावर अन्याय करण्यासारखे तर आहेच, पण मुळात अगदी तसे करायचे म्हटले, तरी त्याची निवड ‘अशक्य’च्या जवळपास जाणारी आहे.    

अरुण टिकेकरांनी आपल्या पुस्तकाचे रुपडे एकदम वेगळे, लांबी-रुंदीने छोटे, असे ठेवले आहे. पण त्याचा आशय इतका तगडा आहे, की व्यासंग ह्या शब्दाचे मूर्तिमंत उदाहरण कुणी विचारले तर बेलाशक हे नाव सांगता येईल. ग्रंथ-शोध आणि वाचन-बोध अशा दोन विभागांमध्ये हा आशय दिलेला आहे. ह्या पुस्तकाला लाभलेले फार मोठे भाग्य म्हणजे विषयानुरूप असणारी वसंत सरवटे ह्यांची अजोड व्यंग-चित्रे. केवळ एखादे पुस्तक मिळवणे म्हणजे केवढी प्रचंड उस्तवार करावी लागू शकते, हे ग्रंथ-शोध हा विभाग आपल्याला सांगतो, तर इतक्या सर्व अनुभवांमधून तावून सुलाखून पार पडल्यावर एकूण साहित्य व्यवहाराविषयी उपजणारी शहाणीव वाचन-बोध विभाग आपल्यासमोर ठेवतो. 

ह्याच तोलामोलाचे ‘उत्तम-मध्यम’. सु. रा. चुनेकर ह्यांनी त्याच्या ब्लर्बमध्ये लिहिलेला मजकूरच मी त्याची अधिक ओळख होण्यासाठी उद्धृत करणार आहे. तो असा- “त्यांचे स्फुट लेखन वाचत असताना आपण अक्षरशः अचंबित होतो; आणि नकळत आपलीही बहुश्रुततेची, ज्ञानाची पातळी उंचावते. त्यांचे अफाट वाचन, विलक्षण स्मरणशक्ती, उपस्थिती यांचा आल्हाददायी प्रत्यय या संग्रहात पानोपानी येतो. त्यांच्या वाचनाला आणि धारणेला अक्षरशः सीमा नाहीत. वाचन हा त्यांचा प्राण आहे. जगणे आहे.” 

मॅडम कामा ते टिनटिन कॉमिक्सची दुनिया आपण श्री.बां.च्या लिहिण्यातून सहजी बघू शकतो. श्री. बा. मूळ ग्रंथपालच होते, पण व्यवसाय छंदात परिवर्तित होण्याचे दुर्मीळ भाग्य त्यांना लाभले.

‘ग्रंथांच्या सहवासात’ची जातकुळी अजूनच वेगळी. मराठी साहित्य आणि भारताचे समाजकारण ह्यातील तेवीस बिनीच्या शिलेदारांचे वाचन-विश्व नक्की काय आणि कसे आहे, हे ते पुस्तक आपल्यापुढे फार विस्तृत पद्धतीने मांडते. त्या त्या व्यक्तींनी खूप प्रांजळपणे आपले वाचन, संस्कार, प्रभाव, आवडी-नावडी हे सगळे लिहिले असल्याने हे पुस्तक, लिहिणाऱ्‍या व्यक्ती आणि वाचक ह्यांच्यात आपसूक एक अनौपचारिक स्नेहबंध निर्माण करते. मे. पुं. रेगे ते लक्ष्मणशास्त्री जोशी, आणि खुशवंतसिंग ते धर्मवीर भारती, गुलज़ार ते दुर्गा भागवत, श्रीराम लागू, सोली सोराबजी, शांता शेळके ते त्र्यं. वि. सरदेशमुख इतकी मोठी विचारवंत, लेखक ह्यांची फौज आपल्याला त्यांचे वचन उलगडून दाखवते, हीच एक बौद्धिक मेजवानी म्हणता येईल. हे पुस्तक सध्या ‘आऊट ऑफ प्रिंट’ आहे हे सांगताना मला अतीव खेद होतो आहे.

ह्याप्रकारच्या पुस्तकांमधले गेल्या दोन वर्षांपूर्वी आलेले पुस्तक म्हणजे ‘पासोडी’. स्ट्रॅन्ड बुक स्टॉल बंद झाला ही घटना त्यात उमटली आहे. विलास सारंग-भालचंद्र नेमाडे ह्या दोघांवरील तौलनिक लेख, अरुण कोलटकर, भुजंग मेश्राम, किरण नगरकर ह्यांच्या साहित्यावरील अभ्यासपूर्ण लेखन, लघु-नियतकालिके, जुझे सारामागू, पामुक ह्या दिग्गजांवरील लेखन, पेशवाईतला पुस्तकविक्या हा तत्कालीन ग्रंथव्यवहार उलगडणारा लेख अशा समृद्ध मजकुराने सजलेले हे पुस्तक. ह्यातल्या एका लेखात बहिणाबाईंची चक्क छापखान्यावर केलेली कविता दिली आहे (ती मूळ पुस्तकात वाचावी). ह्या द्रष्ट्या कवयित्रीची आधुनिक तंत्राचे कौतुक असणारी प्रागतिक दृष्टी पाहून मन आदराने झुकते.

‘आडवाटेवरची पुस्तके’ (निखिलेश चित्रे), ‘देखिला अक्षरांचा मेळावा’ (विजय पाडळकर) हीदेखील ह्याच प्रकारातली आठवून जाणारी पुस्तके. गोविंद तळवलकर ह्यांचीही ‘वाचता वाचता’, ‘वैचारिक व्यासपीठे’ ही समानधर्मी आहेत; पण त्यांचा केंद्रबिंदू त्या त्या पुस्तकाचा ‘टेक ऑफ’ घेऊन तत्कालीन सामाजिक, राजकीय परिस्थितीवर भाष्य करणे, असा असल्याने ह्या आढाव्यात ती समाविष्ट नाहीत. 

पुस्तकांविषयीची पुस्तके आपली आंतरिक समृद्धी वाढवतात. आपला उत्तम साहित्याचा शोध न्यूनतम पातळीवर आणून ठेवतात. आपली सर्जनशीलता थेट  उंचावतात, हा तर माझाच स्वानुभव आहे. ‘लीळा पुस्तकांच्या’मधील आंतरराष्ट्रीय पुस्तक चोरावरचे प्रकरण वाचले आणि माझ्या भारतीय वंशाच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक चोरावरील कथेचा माइंड मॅप पूर्ण होऊन ती कथा लिहिली गेली.

 

संबंधित बातम्या