बुकशेल्फ

बुकशेल्फ
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

बुकशेल्फ

रमलो मी
ज्येष्ठ अभिनेते श्रीराम रानडे यांचे हे आत्मकथन. रानडे यांनी त्यांच्या पिढीने पाहिलेला काळ, जगलेले आयुष्य, त्यांनी अनुभवलेले चांगले-वाईट प्रसंग, व्यक्ती हे सारे काही पुस्तकरूपाने वाचकांसमोर ठेवले आहे. ‘लाभ’ या मनोगताच्या निमित्ताने श्रीराम रानडे म्हणतात, ‘मी माझ्या अनुभवांची पोतडी अक्षरांच्या चिमट्यामापट्यानं तुमच्या पिशवीत टाकण्याचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी ‘मी’ याचा अर्थ ‘आम्ही’ असाच आहे माझ्याच वयाचे, जीवनाचा कडू-गोड अनुभव घेतलेले अनेक लोक आहेत. त्यांनी लिहिले नाही, मी लिहितो आ इतकेच!’ 

 • लेखक - श्रीराम रानडे
 • प्रकाशन - राजहंस प्रकाशन, पुणे व भारद्वाज प्रकाशन, पुणे
 • किंमत - २२५ रुपये
 • पाने - २०२

 

पर्वतपुत्र शेर्पा
शिखर चढाई करताना प्रत्येक गिर्यारोहकाला खाऊ घालण्यापासून त्याचे ओझे उचलण्यापर्यंत शेर्पांची सर्वोतपरी मदत होत असते. अशा या पर्वतपुत्रांचे जीवनही खडतर आहे. गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी शेर्पांच्या खडतर जीवनाचे विविध पैलू या पुस्तकामधून उलगडले आहेत. गिर्यारोहकांना चढाईसाठी साहाय्य करणे यापलीकडे जाऊन आता शेर्पा इतर क्षेत्रांमध्येही दिसू लागले आहेत. त्यामुळे या लोकांची ओळख सीमित न राहता सर्वांना यांचा परिचय व्हावा, या उद्देशातून झिरपे यांनी हे पुस्तक लिहिले आहे.

 • लेखक - उमेश झिरपे
 • प्रकाशन - रोहन प्रकाशन, पुणे
 • किंमत - २२५ रुपये
 • पाने - १५२

 

हां ये मुमकिन है।
भ्रष्ट व्यवस्था, निष्क्रिय डॉक्टर्स, कुपोषणासारख्या समस्या अशा अनेक आघाड्यांवर लढत देऊन अविश्‍वसनीय बदल घडवून आणणाऱ्या एका तरुण डॉक्टरची प्रेरणादायी संघर्ष कथा म्हणजे हे पुस्तक. मुंबईसारख्या महानगरातून बिहारमधल्या दुर्गम आणि मागासलेल्या मोतीहारी गावात काम करायला जाणे हे खूप आव्हानात्मक होते. पण तरू जिंदल यांनी हे आव्हान उत्तमरीत्या पेलले. अजिबात सोयीसुविधा नसलेल्या रुग्णालयामध्ये आवश्‍यक सोयी करून घेणे, लोकांमध्ये जनजागृती करणे, कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देणे अशा अनेक गोष्टी त्यांना कराव्या लागल्या; त्यांचा हा अनुभव या पुस्तकातून वाचायला मिळतो. 

 • लेखक - डॉ. तरु जिंदल
 • अनुवाद - रमा हर्डीकर-सखदेव
 • प्रकाशन - रोहन प्रकाशन, पुणे
 • किंमत - ३२५ रुपये
 • पाने - २८६

 

अपोलो ११
अपोलो ११ च्या मोहिमेमध्ये मानवाने चंद्रावर पहिले पाऊल टाकले. त्या मोहिमेमागचा इतिहास या पुस्तकात मांडला आहे. चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर मानवी संस्कृतीच्या इतिहासाला कलाटणी मिळाली. हा सगळा गौरवशाली इतिहास वाचकांसाठी या पुस्तकात मांडला आहे. यामध्ये अग्निबाणाच्या विकासाला मिळालेली चालना, महायुद्धानंतर अद्ययावत अग्निबाणांची निर्मिती, त्यांचा अंतराळविज्ञानातील विकास, शीतयुद्ध आणि त्यातून निर्माण झालेली अंतराळ स्पर्धा व चंद्रस्पर्धा हा सर्व इतिहास पुस्तकात वाचायला मिळतो.

 • लेखक - सुधीर फाकटकर
 • प्रकाशन - सकाळ प्रकाशन, पुणे
 • किंमत - २०० रुपये
 • पाने - २०६

 

जलतरंग
माधवराव चितळे यांच्या अनुभवांचे, त्यांच्या आठवणींचे, त्यांच्या कार्याची ओळख करून देणारे पुस्तक म्हणजे ‘जलतरंग’. सामान्य शेतकऱ्यापासून ते देशपातळीवरील व्यक्तिमत्त्वे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासक यांच्या उल्लेखांच्या प्रसंगांमधून मानवी स्वभावाचे कंगोरे वाचायला, अनुभवायला मिळतात. प्रतिकूल  परिस्थितीला अनुकूल करण्याचे आव्हान, शासकीय सेवेतील खाचखळगे, देशोदेशीच्या पाण्याच्या कहाण्या, आंतरराष्ट्रीय पातळीवर या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि भारतीय मानसिकता अशा अनेक गोष्टींवर चितळे यांनी भाष्य केले आहे. 

 • लेखक - माधव चितळे
 • प्रकाशन - साकेत प्रकाशन, औरंगाबाद
 • किंमत - ३५० रुपये
 • पाने - २६४

 

ते पंधरा दिवस...
भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामाच्या इतिहासात १ ऑगस्ट १९४७ ते १५ ऑगस्ट १९४७ या पंधरा दिवसांमध्ये बरेच काही घडले. त्या पंधरा दिवसांची ही कहाणी आहे. या काळात समाज ढवळून निघत असताना इतिहासाला आकार देणारे धुरीण आपले आयुष्य कसे जगत होते, त्यांच्या हालचाली नेमके काय दर्शवीत होत्या, त्यांच्या ‘कथनी आणि करणी’मध्ये काही अंतर पडत होते का? अशा अनेक प्रश्‍नांचा धांडोळा पुस्तकामध्ये घेण्यात आला आहे. 

 • लेखक - प्रशांत पोळ
 • प्रकाशन - स्नेहल प्रकाशन, पुणे
 • किंमत - १९० रुपये
 • पाने - १५९

 

स्वर प्रभाकर
पं. प्रभाकर कारेकर यांचा संगीतमय जीवनप्रवास या पुस्तकातून मांडला आहे. पं. कारेकर यांचा गायनासंदर्भातील पक्व समंजस दृष्टिकोन, विचार यामुळे ते गायनातला तरतम भाव फास नीटसपणे समजावू शकतात. अशा अनेक सहजसंवादांचा परिपाक म्हणजे हे पुस्तक आहे, असे लेखिका मनोगतामध्ये म्हणतात. कारेकरबुवांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले. 

 • लेखिका - मंगला खाडिलकर
 • प्रकाशन - कौशिक प्रकाशन, सातारा
 • किंमत - २७० रुपये
 • पाने - १७४

 

न्यायनिवारा
‘न्यायनिवारा’ या पुस्तकामध्ये कायदा अतिशय सोप्या भाषेमध्ये समजवून सांगितला आहे. हुंडा, कौटुंबिक हिंसाचार, लैंगिक अत्याचार, घटस्फोट या घटनांचा कायदेशीर मागोवा इथे घेण्यात आला आहे. तसेच दलित अत्याचार, वंचित व अल्पसंख्याक, लिंगभेद, आरोग्य, शिक्षण, जगण्याचे हक्क, मानवी प्रतिष्ठा या संदर्भात सामाजिक न्यायाचा अन्वयार्थ पुस्तकामध्ये मांडला आहे. त्याशिवाय जनहित याचिका म्हणजे काय, मानवी हक्कांची पायमल्ली होणे म्हणजे काय यावरही प्रकाश टाकण्यात आला आहे.

 • लेखिका - ॲड. स्मिता सरोदे सिंगलकर
 • प्रकाशन - सकाळ प्रकाशन, पुणे
 • किंमत - १७० रुपये
 • पाने - ११०

 

पिता-पुत्र
माणसाच्या जीवनात जेवढ्या प्रकारचे नातेसंबंध आहेत, त्यात पित्यासारखे बहुआयामी आणि विविध स्तर असलेले दुसरे नाते नाही. अशा नातेसंबंधांचा वेध घेणाऱ्या मराठी व हिंदी, कन्नड आणि उडिया या भाषांमधील निवडक अनुवादित कथा ‘पिता-पुत्र’ या पुस्तकामध्ये आहेत. तर, मराठीमधील श्री. दा. पानवलकर, सखा कलाल, ए. वि. जोशी, मधुकर धर्मापुरीकर यांच्या कथा पुस्तकामध्ये समाविष्ट आहेत. 

 • प्रकाशन - मनोविकास प्रकाशन, पुणे
 • संपादन - मधुकर धर्मापुरीकर
 • किंमत - २०० रुपये
 • पाने - १७५

 

राजीव गांधी ः हत्या-कारण-राजकारण
आत्मघातकी बॉम्बस्फोटामध्ये राजीव गांधी आणि त्यांच्या आसपास असलेल्या निरपराधांचा जीव घेतला. तेव्हा पत्रकार असलेल्या नीना गोपाल स्वतः राजीव गांधींपासून अवघ्या काही फुटांवर उभ्या होत्या. राजीव गांधी यांच्या हत्येचा मागोवा घेताना तपशीलवार घेतलेल्या मुलाखती, अभ्यास आणि पत्रकार म्हणून स्वतःचा विस्तृत अनुभव या पुस्तकामध्ये दिसतो. 

 • लेखिका - नीना गोपाल
 • अनुवाद - सविता दामले
 • प्रकाशन - मनोविकास प्रकाशन, पुणे
 • किंमत - २५० रुपये
 • पाने - १९१

 

आयुष्य समृद्ध करताना
‘आयुष्य समृद्ध करताना’ हा एक कथासंग्रह आहे. या संग्रहातील कथा वाचकांना संमिश्र अनुभव देतात. कधी निखळ करमणूक करतात, कधी बोध देऊन जातात, कधी मनात प्रश्‍नांचे मोहोळ उठवतात, तर कधी अस्वस्थ, अंतर्मुख करतात. काही कथांमध्ये लेखकाने स्वतःचे मत न मांडता वाचकांच्या विचारांना, जिज्ञासेला आणि कल्पकतेला वाव ठेवल्याचे दिसते. 

 • लेखक - जयप्रकाश झेंडे
 • प्रकाशन - गमभन प्रकाशन, पुणे
 • किंमत - २०० रुपये
 • पाने - १५२

संबंधित बातम्या