िवलोभनीय निसर्गविभ्रम

ऐश्वर्य पाटेकर
सोमवार, 19 सप्टेंबर 2022

पुस्तक परिचय
 

समकाल अनेक व्यथांनी आणि समस्यांनी ग्रासलेला तर आहेच, शिवाय माणसाची माणुसकी हरवल्याच्या कितीतरी घटना आसपास घडताहेत. मूल्यांची अतोनात पडझड सुरू आहे. जागतिकीकरणाच्या रेट्यात गावगाडा चिणून गेला आहे. सत्त्वाचा ऱ्‍हास झाला आहे. या आणि अशा अनेक अनिष्ट गोष्टींनी भवताल ग्रासलेला असताना, आणि माणसाच्या जीवनातून निसर्ग दूर जाण्याच्या पार्श्वभूमीवर कवी प्रशांत केंदळे यांची कविता निसर्गाचे विविध विभ्रम मांडून मनाला आल्हाददायक गारवा देणारी आणि मनाला थंडावा देणारी आहे. निसर्गाच्या सन्मुख घेऊन जाणारी आहे. त्यामुळे मला या कवितांचे खूप मोल वाटते आहे.

‘‘प्रशांत केंदळे यांच्या कवितांतील आशय, त्यांचे विषय, यात वापरलेल्या प्रतिमा, प्रतीकं, रूपकं पाहता त्यांनी कुणाचंही कुंकू आपल्या भाळात भरून लेखणीशी बेईमानी केली नाही. आपली स्वतःची शैली निर्माण करणारा, सगळं हलाहल पचवत वाचकांना अस्सल तेच देणारा हा ताकदीचा कवी आहे. लेखन आणि सादरीकरण या दोन्ही आघाड्यावर भक्कम राहत ‘कवितेसाठी जगलो तेव्हा कवितेनेही मला जगवले’ अशी कृतार्थतेची, कृतज्ञतेची भावना जपणाऱ्‍या मोजक्या कवीत प्रशांत यांचा समावेश करावा लागेल. संत कवी, तंत कवी आणि पंत कवी या परंपरेनंतर आधुनिक मराठी कवितेची नेमकी दिशा काय आहे आणि तिचं सामर्थ्य कितपत आहे, पडताळून पहायचं असेल तर प्रशांत केंदळे यांचा ‘गुलमोहराचं कुकू’ हा कवितासंग्रह एक उत्तम प्रमाण आहे,’’ अशी घनश्याम पाटील यांची पाठराखण निश्चितच सार्थ ठरविणारी कवी प्रशांत केंदळे यांची कविता आहे.

प्रशांत केंदळे यांच्यातील माणसाने ग्रामीण कृषिवलाचे जगणे त्याच्या व्यथा, वेदना आणि असंख्य समस्या या स्वतः भोगलेल्या आहेत. हे त्यांच्या कवितेतून पाझरले आहेच, पण त्या व्यथा वेदनांचे त्यांनी बिलकूल भांडवल केलेले नाही. ते दुःख त्यांच्या कवितेच्या तळाशी ठेवून त्यावरच त्याच्या भोवतालच्या निसर्गाच्या कळा लयीत घेऊन त्यांनी कवितेला निसर्ग प्रतिमांच्या कशीद्यात गुंफले आहे. तो कशिदा इतका मनोहारी आहे की कवीच्या दुःखभोगाकडे सहजी आपला काणाडोळा होतो. कवितासंग्रहाचे शीर्षक ठरलेली ‘गुलमोहराचं कुकू’ ही नितांत सुंदर निसर्गकविता आहे. इथे बालकवींच्या ‘फुलराणी’ कवितेचा संदर्भ मला मुद्दाम आठवतो. तो एवढ्याचसाठी की बालकवींची कविता निखळ निसर्गकविता आहे. तसे ‘गुलमोहाराचं कुकू’ ही कृषिवलाच्या आयुष्यात पावसाचे काय महत्त्व आहे, हे अधोरेखित करते. ही कविता प्रथमदर्शनी प्रेमकविता भासेल, पण ती नुसतीच प्रेमकविता नाहीये. कवितेला आशयाची अशी डूब आहे की हीच्या मुळाशी कृषिवलाचे जगणे आहे. तो पावसाच्या भरवशावर पेरून देतो. तो आला तर समृद्धी, नाही तर वर्षभराची उपासमार. म्हणून हे कृषिवलासाठी पावसाचे आळवणी गीत ठरलेले आहे.

कधी पावसा मातीला फारकत नको देऊ
तिच्या आधाराला राहो तुझे आभाळाचे बाहू
सूर्य लावील नादाला तुला बोलवील वर
तरी पावसा तू तव्हा सोडू नको रे संसार
गुलमोहराचं कुकू तुझं ठरू दे रे खरं

या ओळीच इतक्या बोलक्या आहेत की शेवटचं वास्तव सांगून जातात. समृद्ध निसर्ग मांडणारा हा कवी म्हणूनच मला खूप निराळा वाटतो. ज्याला मातीच्या आतड्याचा पीळ उमगला आहे..

ऊन वाढत जाताना आटत जातं तळं
मला मातीच्या आतडीचा कळू लागतो पीळ

एका बाजूला या कवीला निसर्गाचे विभ्रम खुणावतात अन् दुसऱ्‍या बाजूला आयुष्यातील रखरखीत वास्तव. म्हणूनच कवी वास्तवावर निसर्गाची शाल धीमे धीमे पांघरवत नेतो. यासाठी प्रेमाचे हलकेफुलके गाणे तो गात बसत नाही. तो कवितेला खोल आशयाची अशी डूब देतो, की रसिक आपोआपच तल्लीन होऊन जातो. ‘कवितेने माझ्या’ या कवितेची सुरुवात जेव्हा कवी करतो तेव्हा आपल्याला असे वाटून जाते की एखाद्या प्रेयसीचे वर्णन तिच्यात आले असावे. ती वाचून संपली की लक्षात येते की अरे ही तर कवितेसाठीची कविता आहे. ती मुद्दाम इथे ठेवतो,

ती हसावी जराशी आम्रतरू मोहरावा
ती लाजावी अशी की गहू शहारून जावा..

अशी सुरुवात कवी जेव्हा करतो अन्‌् शेवटाकडे आपल्याला घेऊन जातो,

पाण्यापरी विहिरीच्या खोल पाख्यातून यावी
कवितेने माझ्या शब्दांना गा संजीवनी द्यावी

खरेतर माझ्या या विवेचनासाठी संपूर्ण कविताच इथे देण्याचा मोह होत होता, पण तो टाळावा लागतोय. वाचकांनी ती नक्की अभ्यासावी. तिच्यात निसर्गप्रतिमांची जी पेरणी कवीने केलीय ती अतिशय लाजवाब आहे. कवी वास्तवाचा विस्तव जरी समोर ठेवत असला, तरी त्याचा आशावाद अतिशय चिवट आहे. त्याच्यातला कृषिवल हतबल होतो. प्राप्त परिस्थिती समोर हातही टेकतो. पण त्याची आळवणी त्याच्यातली सकारात्मकता दर्शवते.

दुष्काळाची दैना
सारी ही सरू दे
कुणब्याला स्वप्न
हिरवं पेरू दे
पदरात टाक
पावसाचे मोती
भरू दे आभाळा
धरणीची ओटी..

चार विभागांत विभागलेला हा संपूर्ण कवितासंग्रहच मला 
खूप मोलाचा वाटला. रान आणि रानाचा साज गाणारा हा कवी खरोखरच ‘रानकवी’ आहे. रानाला आपल्या शब्दकळेने त्याने असे काही पेश केले की वास्तवाची खंजिरी हातात घेऊन रानाच्या निसर्गाचा पोवाडा गाणारा तो शाहीर ठरला आहे. शब्दांचे 
निराळेपण आहे. त्यास भाषेचा गोडवा आणि वेगळ्या प्रतिमांची 
साथ आहे. या कवीची कविता खरेतर व्यासपीठावरून 
रसिकांच्या दालनात दाखल कधीचीच झाली आहे. आता 
संग्रहाच्या रूपाने मराठी साहित्य प्रवाहास दखल घ्यायला लावेल असा ठाम विश्वास देणारा त्यांच्या ‘गुलमोहराचं कुकू’ हा काव्यसंग्रह आहे.

गुलमोहराचं कुकू
कवितासंग्रह
लेखकः प्रशांत केंदळे
प्रकाशन ः चपराक प्रकाशन, पुणे
किंमतः  ₹     १२०/-
पानेः ८८

संबंधित बातम्या