आपत्ती व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक

भाग्यश्री मग्गीरवार
सोमवार, 23 ऑगस्ट 2021

पुस्तक परिचय

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भूशास्त्र विभागाचे निवृत्त विभागप्रमुख डॉ. सतीश ठिगळे यांच्या चाळीस वर्षांहून अधिक काळ केलेल्या संशोधनावर आधारित ‘न्यूटन जागवा, दरडी थोपवा’ हे पुस्तक विज्ञान साहित्यातील एक आगळावेगळा आविष्कार आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. हे पुस्तक दीर्घकालीन निरीक्षणे, दरडग्रस्तांशी साधलेला संवाद, स्पर्शिलेल्या संवेदना आणि राबविलेल्या जनजागर मोहिमा यातून साकारले असल्यामुळे आपत्तींशी संबंधित सर्व घटकांना मार्गदर्शक ठरेल हे निश्चित. 

‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ असा लौकिक असलेला सह्याद्री परिसर गेली काही दशके भूकंप, चक्रीवादळे, अतिवृष्टी आणि भूस्खलन या समस्यांनी खिळखिळा होत आहे. त्यात भर पडत आहे ती वाड्यावस्त्यांचा विस्तार, घाट रस्त्यांचे रुंदीकरण आणि त्यासाठी होणारी वृक्षतोड, डोंगर उतारांचे सपाटीकरण, उडणारे सुरुंग अशा मानवनिर्मित अतिक्रमणांची. त्यातून विशेषतः पावसाळ्यात अतिवृष्टी दरम्यान मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी होत आहे. अशा संकटांकडे केवळ आपत्ती निवारणाच्या चौकटीतून न पाहता दृष्टिकोन कसा ठेवावा आणि काय करावे अशा चौपदरी विवेचनात या पुस्तकाची रचना आहे.

पहिल्या भागात सह्याद्रीचे अंतरंग आणि मानवनिर्मित करणीमुळे झालेली त्याची अवस्था वर्णन केली आहे. दुसऱ्या भागात ठिगळे सरांनी आत्तापर्यंत अभ्यासलेल्या दरड समस्यांची कथारूपाने मांडणी केली असून त्या निरीक्षणांतून दरडी का, कशा, कोठे आणि केव्हा घसरतात/ कोसळतात/ घरंगळतात यासंबंधीचे निष्कर्ष वाचकांपुढे मांडले आहेत. तिसऱ्या भागात ‘डोंगर घसरतात, माणसं गाडली जातात, परंतु त्यातून जे वाचतात त्यांच्यासाठी समस्यांचा पर्वत उभा ठाकतो’ अशी व्यथा मांडत दुर्घटना घडल्यापासून आपद्ग्रस्तांचे पुनर्वसन होईपर्यंत त्यांना सोसाव्या लागणाऱ्या हालअपेष्टा, तसेच त्या अनुषंगाने अनुभवलेली संवेदनशील आणि सक्षम मनुष्यबळाची वानवा वर्णन केली आहे. त्यातून उद्‍भवलेल्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि मानसिक परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्ती नियोजनाची सद्यःस्थिती बदलणे आवश्यक आहे, असे लेखकाने म्हटले आहे. अखेरच्या भागात सह्याद्री पर्वतराजीत दरडी कोसळण्याआधी अनेक पूर्वचिन्हे दिसून येतात, त्याची ओळख नवीन पिढीला करून देण्यासाठी, त्यांना दरड साक्षर करण्यासाठी सरांनी शाळा-महाविद्यालयांमध्ये राबविलेल्या जनजागरण मोहिमांची माहिती करून दिली आहे.

‘न्यूटन जागवा, दरडी थोपवा’ हे पुस्तकाचे नाव कुतूहल निर्माण करते. ठिगळे यांना १९८३ पासून सह्याद्री पर्वतराजीत अभ्यासलेल्या निरीक्षणांवरून भूस्खलनाची समस्या द्रुतगती महामार्ग, रेल्वे मार्ग, गावठाणे तसेच शहरी भागात डोंगरावर पसरलेल्या झोपडपट्ट्यांच्या परिसरातच निर्माण होते हे लक्षात आले. त्यातून त्यांना ‘क्रिया बल आणि प्रतिक्रिया बल यांची परिमाणे समान असतात परंतु त्यांच्या दिशा परस्परविरोधी असतात’ हा न्यूटनचा गतीविषयक तिसरा सिद्धांत आठवला. सह्याद्री परिसरात डोंगर माथ्यापासून ते पायथ्यापर्यंत होणारे उतारांवरील बदल आणि त्यातून ढळणाऱ्या समतोलामुळे उद्‍भवणारी ही समस्या हे न्यूटनच्या या नियमाचे ज्वलंत उदाहरण आहे हे लक्षात घेता पुस्तकाचे ‘न्यूटन जागवा, दरडी थोपवा’ हे नाव समर्पक वाटते.

सह्याद्री परिसरात दरडी अचानक नाही तर संथ गतीने घसरतात. त्यांची लक्षणे काही वर्षे, काही महिने, काही दिवस, एवढेच नव्हे, तर काही तासही आधी अतिवृष्टी दरम्यान स्पष्ट दिसू लागतात. या लक्षणांचे गांभीर्य लक्षात न आल्यामुळे गेल्या तीन दशकात दरडी घसरून शेकडो जीव गाडले गेले, घरेदारे उद्ध्वस्त झाली. भाजे, जुई, कोडीवते, दासगाव, माळीण ही गावे नकाशावरून पुसली जाऊन तेथे स्मारके उभी राहिली. अशी स्मारके इतरत्र उभी राहू नयेत म्हणून सह्याद्रीचे अंतरंग जाणून घेणे गरजेचे आहे. एकूणच भूस्खलनासारख्या उत्पातांकडे आकस्मितता किंवा अपघात म्हणून पाहणे अशास्त्रीय आहे हा पुस्तकाच्या विवेचनाचा गाभा आहे. त्यासाठी सर्व संबंधित घटकांना भूमातेच्या भाषेची ओळख करून दिली पाहिजे. त्यातून अशी लक्षणे दिसताच गावकरी तातडीने धोक्यापासून दूर जाऊन हानी टाळू शकतील हेच बिंबविण्याचा या पुस्तकाचा  उद्देश आहे.

यासंबंधी कायमस्वरूपी पुनर्वसनाबाबतच्या मर्यादा लक्षात घेता तात्पुरत्या स्थलांतराच्या पर्यायाचा विचार रुजला पाहिजे. धोक्यापासून  

तात्पुरते पण तातडीने दूर होण्याची मानसिकता त्यांच्यामध्ये बळावली पाहिजे. दरडी घसरण्याची शक्यता दर्शविणारी पूर्वचिन्हे पावसाळ्यात स्पष्ट दिसू लागताच स्थलांतराचे महत्त्व दरडग्रस्तांना पटवून देणे आवश्यक आहे. त्यासाठी तात्पुरत्या स्थलांतरासाठी सुरक्षित जागी शेड्स बांधल्या पाहिजेत. ‘दरड कोसळण्याच्या निर्णायक क्षणी घर सोडून कोठे जायचे? या प्रश्नावर पर्यायी जागी’ हे मनावर ठसविल्याशिवाय ग्रामस्थ घरातून बाहेर पडणार नाहीत हे लक्षात घेतले पाहिजे हे दाखले देऊन स्पष्ट केले आहे.

तसेच आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित नियोजनापासून ते अंमलबजावणीपर्यंतच्या कार्यात एकसूत्रता, सुलभता, संवेदनशीलता, पारदर्शकता, लवचिकपणा, आकलनशक्ती अशा कौशल्यांसह सक्षम मनुष्यबळाला पर्याय नाही. यासाठी मनुष्यबळातील सक्षमतेची नव्याने बांधणी होणे गरजेचे आहे. या बांधणीची व्याप्ती केवळ शासकीय नव्हे तर आपत्ती निवारणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग असणाऱ्या प्रसिद्धी माध्यमे, सेवाभावी संस्था, प्रशिक्षण संस्था तसेच प्राध्यापक, संशोधक आणि अभ्यासक अशा सर्व स्तरांतील मनुष्यबळापर्यंत असायला हवी यासंबंधीचे सखोल विवेचन सरांनी केले आहे.

या पुस्तकाला ख्यातनाम साहित्यिक डॉ. सदानंद मोरे यांची प्रस्तावना लाभली आहे. त्यात ‘पुस्तकातील विवेचनाला अनुभवांचे आणि सातत्याच्या निरीक्षणांचे अधिष्ठान असल्यामुळे त्याला बौद्धिक आणि भावनात्मक आवाहन क्षमता प्राप्त झाली आहे. त्यानिमित्ताने प्रकट झालेल्या सरांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा व मार्गदर्शनाचा लाभ शासनाला आणि जनतेला झाल्याशिवाय राहणार नाही’ असे त्यांनी म्हटले आहे.

आपण स्वतः सर्वच दरडग्रस्त परिसरांपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून या लिखाणातील विचार नवीन पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी ठिगळे सर ‘न्यूटन जागवा, दरडी थोपवा’ हे अभियान राबवीत आहेत. त्याअंतर्गत शाळा- महाविद्यालयांना या पुस्तकाच्या प्रती विनामूल्य वाटप करण्याची योजना त्यांनी आखली आहे.

न्यूटन जागवा, दरडी थोपवा

  • लेखक : डॉ. सतीश ठिगळे
  • प्रकाशक : डॉ. सतीश ठिगळे
  • किंमत ः ₹  २२०/-
  • पाने ः ११४

संबंधित बातम्या