वस्तुनिष्ठ, रंजक विवेचन

डॉ. श्रीकांत कार्लेकर
सोमवार, 7 डिसेंबर 2020

पुस्तक परिचय

माधव गाडगीळ यांनी लिहिलेले आणि राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेले ‘उत्क्रांती : एक महानाट्य’ हे पुस्तक पृथ्वीच्या जन्मापासून आजपर्यंत पृथ्वीपृष्ठावर घडलेल्या भूशास्त्रीय घटनांचा आणि त्या अनुषंगाने पृथ्वीवरील वन्य आणि प्राणी जीवनात झालेल्या उत्क्रांतीचा मनोवेधक असा वैज्ञानिक आढावा आहे. हे सगळे महानाट्य, ‘पडदा उघडण्यापूर्वी’, ‘बोधगाथा’, ‘मिळवूनी मिळवूनी शिताफीने’, ‘निवडून पाखडून’, ‘उत्क्रांतीचा ओघ’, ‘लहान पण महान’, ‘जलचर गाथा’, ‘सीमोल्लंघन’ आणि ‘ज्ञानदीप लाविला’ या अतिशय समर्पक अशा नऊ प्रकरणांत उलगडून दाखविण्यात आले आहे.  

या पुस्तकात प्राणी आणि व वनस्पती जीवनाची उत्क्रांती आणि पृथ्वीची, विशेषतः पृथ्वी कवचाची, उत्क्रांती यांची सांगड अतिशय उत्तम प्रकारे घातली आहे. मानव हा सगळ्या उत्क्रांतीचा परिपाक असल्यामुळे उत्क्रांतीच्या प्रक्रियेचे यथार्थ आकलन होण्यासाठी उत्क्रांतीची पार्श्वभूमी समजणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यावर जास्त भर दिल्याचे दिसून येते. सत्तर लाख वर्षांपूर्वी अवतरलेल्या मानवाच्या पूर्वजापासून उत्क्रांतीच्या महानाट्याचा शेवटचा अंक आफ्रिकेच्या जंगलात सुरू झाला. त्यानंतर पन्नास लाख वर्षांपूर्वी आफ्रिकेच्या या भागात भूरचनेत आणि हवामानात मोठे बदल झाले. त्यापूर्वी गोंडवनभूमीचे  तुकडे होऊन आफ्रिका उत्तरेकडे सरकत गेले आणि आताही सोमालियाचा प्रदेश भविष्यात तुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

आफ्रिका उत्तरेकडे जाऊ लागल्यावर पठारे, ज्वालामुखी कसे निर्माण झाले आणि त्याचा पाऊस, पर्यावरण व मानवी शरीराची ठेवण यावर कसा परिणाम झाला, पन्नास हजार वर्षांपूर्वी माणूस आफ्रिकेबाहेर पडून झपाट्याने कसा विश्वव्यापी झाला, त्याने समुद्रकिनारे, समुद्र तट डोंगर, पठारे, माळराने, अरण्ये, बेटे असे वेगवेगळे अधिवास वस्त्यांसाठी कसे निवडले, माणसाचा वर्ण हवामान प्रदेशानुसार कसा बदलत गेला, आपल्या आजूबाजूच्या निसर्गाशी त्याने यशस्वीपणे कसे जुळवून घेतले, उत्क्रांतीचक्रातील प्रत्येक सजीवाने आपल्यात कसे बदल करून घेतले, इत्यादी गोष्टींचे अतिशय उत्तम वर्णन पुस्तकात आहे. ओघवती आणि नेटकी भाषा यामुळे ते अधिक वाचनीय झाले आहे. 

विज्ञानातील, विशेषतः भूविज्ञानातील, अनेक क्लिष्ट संकल्पना सहज समजतील अशा प्रकारे विशद केल्या  गेल्या आहेत. याचे एक चांगले उदाहरण म्हणजे Sea floor spreading किंवा सागरतळ विस्तार या संकल्पनेची केलेली मांडणी. सगळ्या महासागरांतील सागरमध्य पर्वतरांगा, त्यावरील तडे आणि त्यातून झालेल्या पृथ्वीवरील भूतबकांच्या (Tectonic plates) हालचाली आणि त्याच्याशी जुळत गेलेली पक्षी आणि प्राण्यांची स्थलांतरे याची घातलेली सांगड इतकी सुरेख आहे, की साडेचार अब्ज वर्षांपूर्वी निर्माण झालेल्या पृथ्वीवरील प्रत्येक भू-हालचालींचा आणि संजीवांच्या उत्क्रांतीचा एकत्रितपणे मागोवा घेणे या वाचनातून सहज शक्य होते.

पृथ्वीवर आत्तापर्यंत घडलेल्या घटना भूशास्त्रीय कालगणनेनुसार मांडल्यामुळे आणि वर्णन केल्यामुळे त्याची वाचनीयता नक्कीच वाढली आहे. पृथ्वीवर आढळणाऱ्या वेगवेगळ्या भूशास्त्रीय कालखंडातील शिलास्तरात असणारा अनुक्रम Stratigraphy आणि प्रत्येक थराशी निगडित असलेल्या प्राण्यांचे जीवाश्म हे दाखविणाऱ्या आकृतीमुळे ही सांगड समजणे सुलभ झाले आहे.

सीमोल्लंघन या आठव्या प्रकरणात ‘बदलते देखावे, बदलती पात्रे’ अशा शीर्षकाच्या अनेक तक्त्यांतून सव्वादोन अब्ज वर्षांपूर्वीपासून आजपर्यंत पृथ्वीवर उत्क्रांती संदर्भात कार्बन डायऑक्साईड आणि प्राणवायूचे प्रमाण, सरासरी तापमान, पर्जन्यमान, पृथ्वीपृष्ठावर तसेच वनस्पती व प्राणी सृष्टीत झालेले बदल यांचा उत्तम प्रकारे आढावा मांडण्यात आला आहे.

अतिशय आकर्षक, अचूक आणि नेमक्या आकृत्या आणि उत्कृष्ट रंगीत छायाचित्रे, निरनिराळी कोष्टके, छेदरेषा या सर्वच गोष्टी या ग्रंथाचे बलस्थान असून त्यामुळेच त्याचे वैज्ञानिक मूल्यही वाढले आहे यात शंका नाही. ग्रंथाच्या अखेरीस दिलेली पारिभाषिक शब्दांची सूची तसेच जीवनामे, विषय आणि व्यक्तिनाम व ग्रंथनाम सूची यामुळे ग्रंथाची उपयुक्तता नक्कीच वाढली आहे. पारिभाषिक शब्दसूची इंग्रजी-मराठी अशी आहे, पण पुस्तकातील मराठी शब्द वाचताना ती मराठी-इंग्रजी अशीही असती, तर जास्त उपयोगी झाली असती असे वाटते. पृथ्वीवरील उत्क्रांतीचे विज्ञानाच्या वस्तुनिष्ठ पायावर केलेले रोचक आणि रंजक भाषेतील विवेचन असेच या ग्रंथाचे वर्णन करता येईल. 

०००००००

उत्क्रांती : एक महानाट्य 
लेखक - माधव गाडगीळ 
प्रकाशन - राजहंस प्रकाशन, पुणे 
किंमत - ८०० रुपये  
पाने - २६८

संबंधित बातम्या