भानावर आणणारी गोष्ट

पूनम छत्रे 
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

पुस्तक परिचय

पर्यावरण आणि विकास या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. पर्यावरण जपायचे असेल, तर विकास करता येणार नाही आणि आधुनिक जगाच्या कल्पनांमध्ये बसेल असा विकास करायचा असेल, तर पर्यावरणाचा ऱ्हास अटळ आहे. हे द्वंद्व आजचे नाही, तर प्राचीन आहे. मानवाची उत्क्रांती झाली, तेव्हापासूनचा हा पेच आहे. तेव्हा मानवाने जंगले तोडली, साफ केली म्हणून वसाहती होऊ शकल्या. पुढे शेती आली, घरे झाली, स्थैर्य आले. जंगले साफ केली गेली म्हणून मानवाच्या प्रगतीची सुरुवात झाली. आज ज्या यांत्रिक, अत्याधुनिक, तंत्रज्ञानाधारित युगात आपण जगतोय, त्याची मुळे या कापलेल्या झाडांमध्येच तर आहेत! निसर्गाचा समतोल ढळला आहे, पृथ्वीचा विनाश अटळ आहे, हे आता-आता कुठे आपल्याला जाणवते आहे, पण त्याची सुरुवात तर कधीच झालेली आहे. त्यामुळे, एका बाजूला निसर्ग आणि दुसऱ्या बाजूला विकास अशी वाटणी आपोआप झालेलीच आहे. या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, ज्या एकमेकांना सामोऱ्या येऊ शकणार नाहीत. पर्यावरण आणि विकास हातात हात घेऊन कधीच नांदू शकणार नाहीत का? निसर्गाचे सौंदर्य अबाधित राखूनही चकचकीत विकास साध्य नाही करता येणार का? या प्रश्‍नांचा ऊहापोह, म्हणजे मृणालिनी वनारसे लिखित ‘घाटमाथा’ ही कादंबरी.   

वृषाली नावाच्या लॅंडस्केप आर्किटेक्टच्या कथनातून ही कादंबरी उलगडते. ‘बिलोरे’ हे शहराजवळच्या धरणापलीकडे असलेले डोंगरावरचे एक छोटेसे, टुमदार गाव आहे. तिथे एक शानदार हिलस्टेशन करायचे ठरते आहे. कॅनडातले आर्किटेक्ट्स या ‘प्रोजेक्ट’ करिता नियुक्त केले गेलेले आहेत. भारतातल्या विकसक कंपनीच्या माध्यमातून वृषालीच्या ऑफिसकडे हे काम येते. वृषाली बिलोऱ्यात दाखल होते आणि तिथल्या निसर्गाच्या, लोकांच्या, अगदी तिथल्या ओढ्याच्या, वनराईच्या आणि निळ्या फुलपाखराच्याही प्रेमात पडते. हे सगळे लवकरच नष्ट होणार आहे, तिचाही त्यात सहभाग असणार आहेच. वृषाली वयाच्या अशा टप्प्यावर आहे, जिथे तिच्यातला निरागसपणा अजूनही शाबूत आहे, पण ती भाबडी नाहीये. विकसकांचे विश्‍व पर्यावरणाच्या मुळावर घाव घालूनच उभे राहते याची तिला कल्पना आहे. त्यामुळे, तिचे स्वत:शीच एक द्वंद्व सुरू होते. 

बिलोऱ्याचे सौंदर्य शाबूत ठेवूनही विकास साधता येऊ शकेल असे तिला आतून वाटते. पण राजकारण्यांना, विकसकांना, ग्रामस्थांना आणि या साखळीत असलेल्या असंख्य घटकांना हे पटवणं महामुश्किल आहे. एकट्या तरुण, स्वप्नाळू मुलीला तर ते अशक्यच आहे. विकास जसा आकर्षक असतो, तितकेच आकर्षक आहेत यातले देवेनसर. वरून सुंदर दिसणारा विकास किती गोष्टींचा विध्वंस करणार आहे याची जशी कल्पना येत नाही, तशीच देवेनसरांच्या व्यक्तिमत्त्वाची कल्पना वृषालीलाही फार उशिराने येते. मग काय होते? एक निर्बल घटक अनेक मात्तबर घटकांपुढे हात टेकतो का? वृषालीला साथीदार भेटतात का? याचा अत्यंत रोचक, गुंगवून ठेवणारा प्रवास पानापानावर उलगडत जातो.

मृणालिनीच्या कथनात अनेक कविता येतात, स्व-संवाद येतात, निरीक्षणे येतात जी वाचताना आपोआपच दाद दिली जाते. कादंबरीच्या मनोगतात मृणालिनी लिहिते, ‘सह्याद्रीवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकाची आपली एक कथा असेल. अशा अनेक कथांना सामावून घेणारा बंध निर्माण व्हावा, अशी ‘घाटमाथा’द्वारे अपेक्षा आहे. कोणतीही विशेष भूमिका नसतानासुद्धा आपल्या पर्वतावर प्रेम करणारे सुहृदजन असतातच, त्यांनाही ही कादंबरी आपलीशी वाटेल, अशी अपेक्षा आहे.’ वृषालीच्या कथनाला एक सुंदर ओघ आहे, एक आवेग आहे. तिच्या गोष्टीशी प्रत्येक जण तादात्म्य साधू शकतो. त्यामुळे, मृणालिनीची ही अपेक्षा शंभर टक्के पूर्ण होते. वृषालीची गोष्ट ही आपलीच गोष्ट आहे असे वाटते. तिच्याबरोबर आपणही बेचैन होतो, वैतागतो, सैलावतो, हसतो, तिच्या नजरेतून बिलोऱ्याचे सौंदर्य अनुभवतो आणि ते नष्ट होणार म्हणून कासावीसही होतो.

विकास हा न रोखता येणारा राक्षस आहे. पण, त्याच्याशी दोस्ती करता येईल का? प्रश्‍न बिकट आहे, क्लिष्टही आणि गुंतागुंतीचाही. पण अशा गोष्टीरूपांतून तो सामोरा आला, की सामान्य माणसांनाही याबद्दल ठोस विचार आणि कृती करण्याची स्फूर्ती मिळू शकते. म्हणूनच ही कादंबरी प्रत्येकाने जरूर वाचावी. तिच्यातून आनंदही मिळेल आणि थोडेसे भानही.    

घाटमाथा
लेखिका - मृणालिनी वनारसे
प्रकाशन - मेनका प्रकाशन, पुणे
किंमत - ३२५ रुपये
पाने - २१४

संबंधित बातम्या