माणुस‘की’चा आविष्कार 

प्रीती सुदाम कांबळे
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

पुस्तक परिचय

माणुस‘की’ म्हणजे काय? या एकाच प्रश्नाचे उत्तर आपल्याला किती वेगवेगळ्या प्रकारे मिळू शकते, हे संदीप काळे यांच्या ‘भ्रमंती लाईव्ह’ सदरामुळे वाचकांना नव्याने समजले. अनेक लोकांचे जीवनकार्य, वेगळेपण त्यातून आपल्यासमोर आले. या सदराचे माणुस‘की’ हे पुस्तकरूप ‘सकाळ’ प्रकाशनाने वाचकांच्या भेटीस आणले आहे. पुस्तकातील प्रत्येक प्रकरण माणसाला एक वेगळा विचार करायला लावते. भेटलेला प्रत्येक माणूस वेगळा, प्रत्येकाची विचार करण्याच्या पद्धतीही कितीतरी वेगळी. संदीप काळे महाराष्ट्रात सगळीकडे फिरले आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी एक नवीन वेगळेपण असलेला विषय शोधला आणि तोच विषय त्यांनी आपल्या लेखणीतून उतरवला आहे. 

सव्वीस जगावेगळ्या कहाण्यांच्या या पुस्तकात वाचायला मिळतात. पुस्तकाला प्रा. डॉ. माया पंडित (हैदराबाद) यांची प्रस्तावना लाभली आहे. पुस्तकाचे ब्लर्ब प्रा. डॉ. मथुताई सावंत यांनी लिहिले आहे. पुस्तकातील प्रत्येक कहाणी माणसाच्या हृदयातील माणूस‘की’चा ठाव घेते. 

मानसी मूकबधिर असल्याबाबत उर्मिलाताईंना तीन वर्षांनंतर कळले. परंतु, त्यांनी हार मानली नाही. माझी मुलगी इतर धडधाकट मुलांप्रमाणेच वावरली पाहिजे. त्यासाठी मी वाटेल ते करीन, या जिद्दीने त्या कामाला लागल्या. आनंदाने जगणाऱ्या आणि इतरांनासुद्धा प्रेरणा देणाऱ्या कुटुंबाची कहाणी पुस्तकात आहे. 

लातूरमधील जुन्या एमआयडीसी परिसरातील ‘जीवनरेखा प्रतिष्ठान’ या विजयकुमार यादव संचालित व्यसनमुक्ती केंद्रात अनेक रुग्ण मोफत राहतात. त्यांच्या खाण्याची, औषधपाण्याची व्यवस्था केंद्रातर्फे केली जाते. दारूचे व्यसन कुणाला कधी आणि कुणामुळे लागते, कुणी त्यालाच आपले आयुष्य मानतात. अशा लोकांसाठी देवदूत असलेल्या यादव यांच्याविषयी पुस्तकामध्ये लिहिलेले आहे. 

छाया गोलटगावकर यांचे ‘आनंदघर बालसंगोपन केंद्र, लर्निंग अँड रिसर्च सेंटर’ हे फक्त पाळणाघर म्हणून मर्यादित राहत नाही. त्याहीपेक्षा इथे खूप काही नवीन शिकायला मिळते. याचाही उल्लेख आहे.

रामभाऊ इंगोले वेश्या व्यवसाय करणाऱ्‍या वस्त्यांकडे माणुसकीच्या दृष्टीने पाहतात. त्यांनी येथील अनेक मुलींची लग्ने लावून दिली आहेत. कोणी डॉक्टर झाले, कोणी इंजिनिअर झाले. अशाप्रकारे वेश्या व्यवसाय करणाऱ्या बायकांच्या लेकरांना ‘बापा’बरोबर मिळालेले ‘घरपण’ पुस्तकात आहे. 

नांदेड जिल्ह्यातल्या कमळेवाडीच्या विद्यानिकेतन शाळेत देशाच्या सामाजिक स्वास्थ्याची काळजी असणाऱ्‍या शिवाजी आंबुलगेकर नावाच्या एका विद्यार्थिप्रिय शिक्षकाने विद्यार्थ्यांकडून वेगवेगळे प्रयोग करून घेतले आहेत. दुसरीकडे हिंगोली जिल्ह्यातील शाळा ता. सेनगाव येथील एका शिक्षकाने विद्यार्थी शाळेत का येत नाही याचे कारण जाणून घेऊन त्यांची अडचण कशी सोडवता येईल यासाठी कशी धडपड केली आहे. भटकंती करणाऱ्या समाजातील मुलांसाठी नांदेडमधील बार्शी तालुक्यात कोरफळे गावाच्या माळरानावर ‘स्नेहग्राम’ ही एक छोटीशी निवासी शाळा महेश निंबाळकर आणि त्यांच्या पत्नी विनया निंबाळकर यांच्या प्रयत्नातून सुरू केली आहे. यांचेही कार्य या पुस्तकातून वाचायला मिळते.

पुण्यातील काही तरुण तरुणी एकत्र येऊन गरजू लोकांना अन्नदान करतात. ज्या भागात अन्न शिल्लक राहते, तेथील अन्न गोळा करून आणणे आणि गरजू लोकांपर्यंत पोचवणे यासाठी ही तरुणाई धडपड करते. बडदे कुटुंबाची पाटीलकी असताना स्मृती बडदे आणि ऐश्वर्या बडदे या दोघी बहिणी घरच्यांच्या विरोधात जाऊन लावणी नर्तिका झाल्या. पुण्यातील तरुण आणि बडदे भगिनींविषयीदेखील पुस्तकात लिहिले आहे. 

वर्षा आणि संजय दोघेही मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकतात. त्यांना दोन मुले. दोन एकर जमीन असूनही त्यात काही पिकत नाही. वर्षभरापूर्वी संजय यांना झालेला आजार वाढतच राहिला. अनेक अडीअडचणीला सामोरे जाऊन वर्षांबाईनी संजय यांना मृत्यूच्या दारातून बाहेर काढले. त्यांचा संघर्ष पुस्तकात मांडलेला आहे.

पुस्तकाचे मुखपृष्ठ तयार करणारे नयन बारहाते यांनीसुद्धा माणसाला वेगळा विचार करण्यास भाग पाडले आहे. संदीप काळे यांनी स्वतः आनंददूत होऊन समाजातील परिवर्तनाची गाथा वाचकांपर्यंत पोचवली आहे. 

----------------------------------------------
माणूस‘की’
लेखक - संदीप रामराव काळे
प्रकाशन - सकाळ प्रकाशन, पुणे 
किंमत - २४० 
पाने - १९९ 

----------------------------------------------

संबंधित बातम्या