ग्रंथ: मानवाचा सच्चा मित्र

सुप्रिया चित्राव
सोमवार, 24 जानेवारी 2022

पुस्तक परिचय

जग बदलून टाकणारे असे हजारो ग्रंथ खरंतर आजवर निर्माण झाले आहेत. त्यातील निवडक पन्नास ग्रंथांची अभ्यासपूर्ण ओळख दीपा देशमुख यांनी वाचकांना करून दिली आहे. ही त्यांची वैयक्तिक निवड आहे. परंतु ही पन्नास पुस्तकं निवडत असताना त्यांनी ज्या पद्धतीने विषयांचं वैविध्य राखलं आहे ते पाहता वाचकांसाठी हे पुस्तक म्हणजे मानवी इतिहासातील आजवरच्या लिखित ज्ञानाचा सर्वसमावेशक असा, संक्षिप्त आणि आयता, दस्तावेज आहे असं म्हणाला हरकत नाही.

हजारो वर्षांच्या मानवी इतिहासात माणूस रानटी अवस्थेतून उत्क्रांत होत होत आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगापर्यंत येऊन पोहोचला आहे. हा सगळा प्रवास थक्क करणारा आहे. त्यातही त्याला लागलेला भाषेचा शोध ही तर त्याचं जग इतर प्राण्यांपासून वेगळं करणारी अफलातून घटना आहे. मानवाला मिळालेली भाषा नावाची ही जादूची कांडी वापरून त्याने आपली संस्कृती घडवण्यात मोलाचं योगदान दिलं. आणि या भाषेला जेव्हा लिखित स्वरूप प्राप्त झालं, तेव्हा याच देणगीचा वापर करून त्याने आपल्या या इतिहासाचं दस्तावेजीकरण केलं. साधारण चौदाव्या शतकात पहिलं पुस्तक आलं, असं मानलं जातं, त्यानंतर गेली सात शतकं जगाच्या पाठीवर हजारो भाषात कोट्यवधी पुस्तकं निर्माण झाली आणि पुढेही होत राहतील. यातल्या काही पुस्तकांनी मैलाचा दगड बनून माणसाच्या जगण्यालाच वेगळं वळण दिलं, त्याचं जगच बदलून टाकलं.

लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या दीपा देशमुख या स्वतः एक उत्तम वाचक आणि रसिक आहेत. त्यांना वेगवेगळ्या विषयांबद्दल प्रचंड कुतूहल असतं आणि त्या तेवढ्यावर न थांबता एखाद्या विषयाचा ध्यास घेऊन त्याबद्दल सखोल अभ्यास करतात आणि तो सुसूत्रपणे पुस्तकरूपाने वाचकांसमोर ठेवतात. त्यातूनच त्यांनी जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि त्यांचे शोध, चित्र-शिल्पकला, पाश्चात्त्य संगीत आणि संगीतकार यांच्यावरील पुस्तकांच्या सहलेखनासह, ‘तुमचे आमचे सुपर हिरो’ या मालिकेत मुलांसाठी काही आदर्श व्यक्तिमत्त्वांवर अभ्यासपूर्ण पुस्तकं लिहिली आहेत. नुकतंच त्यांचं नवीन पुस्तक ‘मनोविकास प्रकाशना’तर्फे वाचकांसाठी उपलब्ध झालं आहे, ‘जग बदलणारे ग्रंथ’. वर म्हटल्याप्रमाणे खरं तर जग बदलून टाकणारे असे हजारो ग्रंथ आजवर निर्माण झाले आहेत. त्यातील निवडक पन्नास ग्रंथांची अभ्यासपूर्ण ओळख दीपाताईंनी या पुस्तकात वाचकांना करून दिली आहे. त्यांनी मनोगतात म्हटल्याप्रमाणे ही त्यांची वैयक्तिक निवड आहे, इतरांसाठी जग बदलणाऱ्या ग्रंथांची यादी वेगळीही असू शकते. परंतु ही पन्नास पुस्तकं निवडत असताना त्यांनी ज्या पद्धतीने विषयांचं वैविध्य राखलं आहे, ते पाहता सामान्य वाचकासाठी हे पुस्तक म्हणजे मानवी इतिहासातील आजवरच्या लिखित ज्ञानाचा सर्वसमावेशक असा, संक्षिप्त आणि आयताच हाती येणारा दस्तावेज आहे, असं म्हणाला हरकत नाही. यामध्ये त्यांनी धर्म, अर्थ, काम, विज्ञान, तत्वज्ञान, राज्यशास्त्र, मानसशास्त्र, मानववंशशास्त्र, गणित, स्त्रीवाद, माध्यमं, खेळ ते जागतिकीकरण अशा अनेक ज्ञानशाखांमधील महत्त्वाच्या पुस्तकांचा ओघवत्या भाषेत आढावा घेतला आहे.

लेखिकेनं मनोगतात म्हटल्याप्रमाणे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत पुस्तकांचा फार मोठा वाटा आहे. जगभरच्या कवींच्या पुस्तकासंबधीच्या कवितांचे त्यांनी दिलेले संदर्भ त्यांच्या व्यासंगाचे द्योतक आहेत. हिंदी कवी शैलेन्द्रकुमार म्हणतात, ‘एका परिपूर्ण जाणिवेचं नाव आहे पुस्तक’. याच भावनेतून हे पुस्तक वाचकांच्या  वेगवेगळ्या विषयातल्या जाणिवा समृद्ध करतं. ‘भगवद्गीता’, ‘कुरआन’, ‘बायबल’, ‘त्रिपिटक’ अशा धर्मग्रंथांची या पुस्तकात ओळख होते, तशीच सन त्सूचं ‘आर्ट ऑफ वॉर’, वात्स्यायनाचं ‘कामसूत्र’, मार्क्सचं ‘दास कॅपिटल’, बर्नचं ‘गेम्स पिपल प्ले’, न्यूटनचं ‘प्रिन्सिपिया’, रसेलचं ‘मॅरेज अँड मॉरल्स’, सिमॉन द बोव्‍हाचं ‘द सेकंड सेक्स’ ते मार्श मॅक्लुहानचं ‘अंडरस्टँडिंग मीडियाः द एक्स्टेंशन ऑफ मॅन’, रिचर्ड डॉकिन्सचं ‘द सेल्फिश जीन’, स्टिफन हॉकिंग यांचं ‘अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाइम’ आणि एकविसाव्या शतकातला लेखक असणारा युवाल नोवा हरारी यांच्या ‘अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ ह्युमनकाइंड’ या पुस्तकापर्यंतच्या विविध विषयांवरच्या पुस्तकांची वाचकाला भेट घडते. 

या पुस्तकांबद्दल  लिहिताना त्या पुस्तकाचा आशय, त्याच्या लेखकाचा संक्षिप्त जीवनप्रवास, त्या पुस्तकाने जगावर केलेले तत्कालिक आणि सार्वकालिक परिणाम यांचाही दिपाताईंनी लालित्यपूर्ण भाषेत आढावा घेतला आहे. निवडलेला मूळ ग्रंथ कितीही जड, गंभीर विषयावरचा असला, तरी लेखिकेनं त्याची ओळख करून देताना अत्यंत सोप्या, रसाळ शब्दात मांडणी करत त्या शब्दांना वाचकांचे मित्र बनवण्याचं कसब साधलं आहे. त्यामुळे हे पुस्तक वाचणाऱ्या प्रत्येक वाचकाला मूळ ग्रंथ वाचायची उत्सुकता निर्माण होईल. वेगवेगळ्या रुची, जाणिवा, बौद्धिक क्षमता आणि प्रगल्भता असलेल्या मराठी वाचकांच्या फार मोठ्या वर्गाला यात आपल्या आवडीचं नक्कीच काही ना काही सापडेल. आणि मग त्या मिषापोटी तो या पुस्तकांकडे वळला की पुढे त्याला ही जगभरच्या पुस्तकांची अद्भुत दुनिया आपल्याकडे खेचून घेईल, त्यात तो रमून जाईल आणि बाहेर पडताना एक समृद्ध व्यक्ती म्हणूनच बाहेर पडेल यात शंका नाही.

या पुस्तकाची निर्मिती दर्जेदार झाली आहे. चंद्रमोहन कुलकर्णी यांचं समर्पक मुखपृष्ठ वाचकाला पुस्तकाकडे आकर्षित करतं. पुस्तकाची रचना दोन कॉलमांमध्ये असल्याने आणि छपाईसाठी वापरलेला ठसा तुलनेनी मोठा असल्यामुळे वाचताना सोईचं होतं. ‘मनोविकास प्रकाशना’च्या वैचारिक आणि माहितीपूर्ण पुस्तकांच्या परंपरेला साजेसं असं हे पुस्तक झालं आहे.

मनोगतात आलेल्या गुलजारांच्या कवितेत मित्रांशिवायचा एकाकी, उदास दिवस इथे-तिथे फिरत कसाबसा ढकलून रिकाम्या घरात परत आलेल्या व्यक्तीला टेबलावरचं पुस्तक जिव्हाळ्याने म्हणतं- ‘उशीर केलास मित्रा!’ हाच धागा पुढे न्यायचा तर मला वाटतं चोखंदळ मराठी वाचकांनी या मित्राला भेटायला उशीर करू नये.

जग बदलणारे ग्रंथ

  • लेखिका : दीपा देशमुख
  • प्रकाशन : मनोविकास प्रकाशन, पुणे
  • किंमत : ₹    ३९९
  • पाने : ४३२

संबंधित बातम्या