अनोखा प्रवास

स्वप्निल जोशी
रविवार, 31 जानेवारी 2021

पुस्तक परिचय

दोन वस्तूंना एकत्र बांधण्यासाठी जशी गाठ बांधलेली असते, तशी दोन रेल्वे मार्गांना गाठीने एकत्र बांधून ठेवायची जागा म्हणजे रेल्वे जंक्शन. भारतासारख्या खंडप्राय देशात मोठ्या शहरांना रेल्वेने जोडायचे काम या रेल्वे जंक्शनरूपी गाठी करतात. रेल्वे जंक्शनच्या बाहेर पडून त्या गावाचे दर्शन घडवणारे ‘Chai, Chai’ हे विश्वनाथ घोष यांचे पुस्तक.

पुस्तकाच्या मुखपृष्ठावर चहाने भरलेल्या मातीच्या कुल्लडचे चित्र व रेल्वेरुळांचा फोटो पुस्तकाबद्दल खूप काही सांगतो. लेखक विश्वनाथ घोष यांनी या पुस्तकात उत्तरेतल्या मुघलसराई, झाशी व मध्य भारतातल्या इटारसीबद्दल, तर दक्षिणेतल्या गुंटकल, अरक्कोणम व जोलरपेट आणि शोरणूर या ठिकाणांबद्दल लिहिले आहे. 

मुघलसराई म्हटले की डोळ्यांसमोर येते आशिया खंडातील सर्वात मोठे रेल्वे यार्ड किंवा बनारसला जाण्यासाठी उतरायचे ठिकाण. पण स्टेशनबाहेरचे मुघलसराई विश्वनाथ घोष आपल्याला या पुस्तकातून दाखवतात. मुघलसराई स्टेशन जेवढे मोठे तेवढेच गाव मात्र लहान. मुघलसराई हे भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे जन्म ठिकाण. लेखक विश्वनाथ घोष त्या रेल्वे कॉलनीतील शास्त्रीजींचे जन्मस्थान व त्यांची शाळा बघून येतात. या व्यतिरिक्त स्थानिक लोकांशी बोलताना लेखकाला मुघलसराई स्टेशनचे नामांतर ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय’ कसे झाले याचीही माहिती मिळते. 

पुस्तकाच्या पुढच्या प्रकरणात विश्वनाथ घोष आपल्याला घेऊन जातात झाशीला. ऐतिहासिक दृष्ट्या झाशीची राणी लक्ष्मीबाईंमुळे झाशीला विशेष महत्त्व आहे. पण या झाशीचे आणखीन एक वैशिष्ट्य विश्वनाथ घोष लिहितात, ते म्हणजे झाशीमधला एलिट चौराहा (चौक). त्या चौकाला त्याचे नाव कसे मिळाले आणि चौकाची वैशिष्ट्ये पुस्तकामध्ये वाचायला मिळतात. झाशीजवळील ओरछा येथील जहांगीर महाल बघून विश्वनाथ घोष जातात जगप्रसिद्ध खजुराहोला. खजुराहो व ओरछा हे मध्यप्रदेशात, तर झाशी उत्तरप्रदेशात आहे. भारताच्या नाभी स्थानी असलेले जंक्शनचे ठिकाण म्हणजे इटारसी. उत्तर भारताला दक्षिण भारतापासून वेगळे करणारी विंध्य पर्वतरांग ओलांडून होशंगाबाद या जिल्ह्याच्या ठिकाणचा थांबा घेऊन गाडी पोहोचते इटारसीला. इटारसीतून फिरताना विश्वनाथ घोष यांना एखाद्या रेल्वे जंक्शनमुळे गावात चालणारे अर्थकारण समजते. 

आंध्रप्रदेशातील गुंटकल हे पश्चिम भारत व दक्षिण भारताला जोडणारे जंक्शन. मुंबईहून चेन्नई, बंगळूरला जाणाऱ्या गाड्यांसाठी गुंटकल हे महत्त्वाचे जंक्शन. गुंटकल गावात एक स्थानिक रिक्षावाला त्यांना गुंटकलजवळच्या सैद मस्तान अली बाबा दर्ग्यात घेऊन जातो. या दर्ग्यात आलेल्या लोकांशी बोलताना त्यांना गुंटकलबद्दल आणखीन माहिती मिळते. यानंतर विश्वनाथ घोष आपल्याला घेऊन जातात तामिळनाडूतल्या अरक्कोणम व जोलारपेट या रेल्वे जंक्शन असलेल्या गावांमध्ये. अरक्कोणम हे स्वतःची ओळख नसलेले ठिकाण. चेन्नईचे उपनगर असलेले, पण रेल्वेच्या दृष्टीने महत्त्वाचे. विश्वनाथ घोष जेव्हा अरक्कोणम स्टेशनच्या बाहेर पडतात, तेव्हा इथे रेल्वेस्टेशन शिवाय दुसरे बघण्यासारखे काहीच नाही हे त्यांच्या लक्षात येते. अधिक चौकशी केल्यावर त्यांना समजते की अरक्कोणमला एक नाविक तळ आहे व या तळावरची विमानाची धावपट्टी ही जगातील सर्वात मोठी आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी दिल्लीत होणाऱ्या संचलनात प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी विमान याच धावपट्टीवरून आकाशात झेपावतात. 

जोलारपेट हे चेन्नई व बंगळूर या रेल्वे मार्गावरचे मध्यावरचे जंक्शनचे ठिकाण. कर्नाटक व दक्षिण तामिळनाडूत जाणाऱ्या गाड्यांसाठी हे महत्त्वाचे जंक्शन. आर. के. नारायण यांच्या ‘मालगुडी डेज’ मधल्या एका कथेत जोलारपेट जंक्शनचा उल्लेख येतो. जोलारपेट गावाजवळ रेल्वे स्टेशन व्यतिरिक्त बघण्याचे आणखीन एक ठिकाण म्हणजे ‘येलागिरी’ हिल स्टेशन. येलागिरीची तुलना उटी किंवा कोडाईकॅनालशी होऊ शकत नाही. कारण तेवढी या हिल स्टेशनची ‘उंची’च नाही. रेल्वेच्या दृष्टीने जोलारपेट जंक्शनचे महत्त्व म्हणजे सालेम, चेन्नई व बंगळूर या तीन विभागांना एकत्र आणणारे हे ठिकाण. या ठिकाणी रेल्वेचा चालकदल बदलतो. पुस्तकाच्या शेवटाकडे आपण पोहोचतो केरळातल्या शोरणुर जंक्शनला. केरळहून मुंबईला जाणाऱ्या व चेन्नईहून मॅंगलोरला जाणाऱ्या गाड्यांसाठी हे जंक्शनचे ठिकाण. एकेकाळचे केरळचे मुघलसराईच जणू काही. स्वातंत्र्यपूर्व काळात साउथ इंडियन रेल्वे कंपनीने मद्रास व मॅंगलोर दरम्यान लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करेपर्यंत शोरणुरला फारसे महत्त्व नव्हते. मद्रास (आता चेन्नई) ते मॅंगलोर (आता मंगळुरू) दरम्यान रेल्वेसेवा सुरू झाल्यावर कोचीच्या राजाने साउथ इंडिया रेल्वे कंपनीला विनंती करून ही रेल्वे कोचीपर्यंत नेली व शोरणुर स्टेशनला महत्त्व आले. शोरणुर हे गाव केरळची गंगा समजल्या जाणाऱ्या ‘भारतपुझा’ नदीच्या काठावर वसले आहे. 

भारतपुझा नदीच्या पलीकडे १९३० साली मल्याळी भाषेतील कवी वल्लाथोल नारायण मेनन यांनी स्थापन केलेल्या ‘केरळा कलामंडलम’ या प्रायोगिक कला केंद्राला विश्वनाथ घोष भेट देतात. मुघलसराई पासून शोरणुरपर्यंतचा प्रवास विश्वनाथ घोष यांनी रेल्वे जंक्शन बाहेरचे गाव बघणे या उद्देशाने केलेला, पण शोरणुर ते नीलांबुर हा रेल्वे प्रवास मात्र प्रवासाचा अनुभव घेण्यासाठी केला. हिरव्या कंच झाडांमधून वाट काढणारा रेल्वे मार्ग, आजूबाजूला उंचच उंच सागवानी झाडे. एखाद्याच प्रवाशाची चढ-उतार असेल अशी छोटी छोटी स्टेशने. असा दोन तासाचा प्रवास करत गाडी पोहोचते नीलांबुर या शेवटच्या स्टेशनला. स्टेशनवर उतरल्यावर जवळपास कुठलेही गाव असेल अशी शक्यताही वाटणार नाही एवढ्या दाट जंगलातले हे स्टेशन. याच गाडीने विश्वनाथ घोष शोरणुरपर्यंतचा परतीचा प्रवास करतात. 

‘चाय चाय’ या पुस्तकाचा प्रवास खरे तर इथेच संपतो. पण वाचकाच्या मनात या जंक्शन्सबद्दल उत्सुकता निर्माण करून एका नवीन प्रवासाची सुरुवात होते एवढे मात्र 
नक्की.

Chai, Chai 
Writer ः Bhishwanath Ghosh 
Publisher ः TranqueBar 
Price ः Rs. 350
Pages ः 212

संबंधित बातम्या