स्त्री भूमिकांचा वेध

अदिती पटवर्धन
सोमवार, 18 एप्रिल 2022

पुस्तक परिचय

प्रसाद नामजोशी यांनी त्यांच्या ‘पॉईंट ऑफ व्ह्यू’ या पुस्तकातून जगभरातल्या प्रसिद्ध चित्रपटांतील स्त्री भूमिकांचा वेध घेतला आहे. साधारण १९४०पासून ते अगदी २०१७पर्यंतच्या मोठ्या कालखंडात जगभरात तयार झालेल्या वेगवेगळ्या ४८ चित्रपटांतील स्त्री भूमिकांविषयी लेखकाने विविध वृत्तपत्रांमध्ये लिखाण केले आणि लोकांच्या पसंतीस उतरलेले हे लेख आणखी काही लेखांसह आता पुस्तकरूपात अभिजित प्रकाशनाद्वारे वाचकांच्या भेटीला आले आहे.

‘पॅाईंट ॲाफ व्ह्यू’ हे देखणे पुस्तक हातात आले आणि अनुक्रमणिकेतील चित्रपटांच्या यादीवर नजर फिरवतानाच मी खूश झाले. ‘भूमिका’, ‘अर्थ’, ‘मकबूल’, ‘सिंहासन’, ‘मिर्च मसाला’, ‘मेघे ढाका तारा’ यांसारखे भारतातले नावाजलेले सिनेमे आणि शिवाय ‘वर्ल्ड सिनेमा’ प्रकारात मोडणारे ‘चिल्ड्रन ऑफ हेवन’, ‘आयडा’, ‘बरान’, ‘ब्लू इज द वॉर्मेस्ट कलर’ यांसारखे उत्कृष्ट सिनेमे या यादीत आहेत, त्यामुळे या निमित्ताने आपल्या आवडत्या सिनेमांची पुन्हा एकदा सफर करायला मिळेल, या विचाराने मन सुखावून गेले.

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात अनेक वर्षे काम करणाऱ्या प्रसाद नामजोशी यांनी त्यांच्या ‘पॉईंट ऑफ व्ह्यू’ या पुस्तकातून जगभरातल्या प्रसिद्ध चित्रपटांतील स्त्री भूमिकांचा वेध घेतला आहे. व्यावसायिकरीत्या या क्षेत्राचा मोठा अनुभव असला आणि चित्रपट लेखनाबरोबरच तांत्रिक बाबींचीदेखील माहिती त्यांना असली, तरी त्यांनी लिहिलेले लेख मात्र सर्वसामान्य प्रेक्षकांना डोळ्यासमोर ठेवून लिहिलेले आहेत. कोणत्याही चित्रपटाचे त्यातल्या स्त्री पात्राला मध्यात ठेवून रसग्रहण ते करतात.

साधारण १९४०पासून ते अगदी २०१७पर्यंतच्या मोठ्या कालखंडात जगभरात तयार झालेल्या वेगवेगळ्या ४८ चित्रपटांतील स्त्री भूमिकांविषयी लेखकाने ‘सकाळ’सह विविध वृत्तपत्रांमध्ये लिखाण केले आणि लोकांच्या पसंतीस उतरलेले हे लेख आता आणखी काही चित्रपटांवरील लेखांसह पुस्तकरूपात अभिजित प्रकाशनाद्वारे वाचकांच्या भेटीला आले आहे. या पुस्तकातील लेखांची मांडणी कालक्रमानुसार केली आहे. त्यामुळे काळाच्या ओघात चित्रपटांमध्ये होत गेलेले बदल आपोआप ठळक होत जातात. सिनेतंत्राच्या सुरुवातीपासून आजपर्यंत तांत्रिकदृष्ट्या असंख्य बदल घडले, चित्रपट रंगीत झाले, चित्रपटांच्या गतीत बदल झाला, लांबी कमी होत गेली, त्यात हाताळले जाणारे विषय बदलत गेले... असंख्य बदल झाले! पण या मोठ्या बदलांच्या पार्श्वभूमीवर ठळकपणे जाणवते ती गोष्ट म्हणजे फारशी न बदललेली स्त्री भूमिका! मुळात स्त्री-केंद्रित कथा असणारे चित्रपट आख्ख्या कणगीत मूठभर म्हणावेत इतके. कथेसाठी हिरो-हिरॉईन महत्त्वाचे असले तरी खरे महत्त्व नायकालाच असते, हे सगळेच जाणून असतात. नायकाला नायिका वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा पुरुषार्थ सिद्ध करण्यासाठी लागते, हे कडू वास्तव फक्त भारतातच नाही, तर जगभरात मुख्य प्रवाहातल्या सिनेमांचे आहे. त्यामुळे अशा गदारोळात ज्या काही सशक्त स्त्री भूमिका आपल्याला पाहायला मिळाल्या, त्यांचा ऊहापोह लेखकाने या पुस्तकात केला आहे. अर्थात यात फक्त उत्कृष्ट जमून आलेल्या स्त्री भूमिकांविषयीच लिहिले आहे असे नाही, तर ‘संगम’, ‘आस्था’, ‘गाईड’ किंवा ‘अर्थ’ यांसारख्या लोकप्रिय सिनेमांतील स्त्री पात्रांची कुचंबणा, त्यांना स्वतःची मते नसणे, असली तरी त्यांना काडीची किंमत नसणे, त्यांच्या निर्णयांमागे कोणतीही सबळ, तार्किक कारणे नसणे यासारख्या उणिवांवरदेखील लेखक बोट ठेवतो. एकुणात वेगवेगळ्या स्त्री पात्रांचे सर्व बाजूंनी विश्लेषण करण्याचा आणि त्या त्या भूमिकेच्या खोलात शिरण्याचा प्रयत्न लेखकाने या पुस्तकात केला आहे. ‘एलिपथयम’, ‘इडा’, ‘मिर्च मसाला’, ‘रिबेका’, ‘रन लोला रन’, ‘मेघे ढाका तारा’ या सिनेमांवरील लेख विशेष उल्लेखनीय आहेत.  

भारतीय चित्रपटांबरोबरच अमेरिकी, फ्रेंच- जर्मन-पोलिश-इटालियन अशा युरोपियन, शिवाय इराणी चित्रपटांचाही पुस्तकात समवेश केला आहे. त्यामुळे लेखकाने भारतीय हिंदी सिनेमा आणि वर्ल्ड सिनेमा यातील फरकावर थेट भाष्य न करताही तो फरक पुस्तक वाचत जाताना सहज आपल्या समोर येतो, हे विशेष. ‘सिंहासन’, ‘उंबरठा’ यांसारखे मराठी चित्रपट आणि अदूर गोपालकृष्णन आणि गिरीश कासारवल्ली यांचा प्रत्येकी एक सिनेमा वगळता इतर भारतीय भाषांतील सिनेमांचा समावेश यात असायला हवा होता, असे वाटते. त्यामुळे हे पुस्तक आणखी परिपूर्ण झाले असते. प्रत्येक सिनेमाविषयी माहिती देणारे ‘रफ कट्स’ नावाचे एक पान प्रत्येक लेखानंतर समाविष्ट करण्यात आले आहे. या पानाची मांडणी उत्तम पद्धतीने केली असली, तरी बरेचदा यावरची माहिती काहीशी अावश्‍यकतेपेक्षा जास्त वाटते.

या पुस्तकाची मांडणी आणि कलानिर्देशन फारच सुरेख जमून आले आहे. चंद्रमोहन कुलकर्णी आणि राजेश भावसार यांचा यासाठी आवर्जून उल्लेख करावासा वाटतो. मुखपृष्ठावरचे ‘सेपिया’ टोनमधले सगळ्या सिनेमांच्या पोस्टर्सचे कोलाज लक्ष वेधून घेते आणि भरपूर फोटो वापरून केलेल्या आतल्या सुरेख मांडणीमुळे पुस्तक चाळताना आपोआप पानांवर वाचकाची नजर रेंगाळते. या पुस्तकाच्या निमित्ताने मराठीत एका वेगळ्या विषयावरच्या आणखी एका देखण्या ‘कॉफी टेबल बुक’ची भर पडली आहे हे नक्कीच!

पॅाईंट ॲाफ व्ह्यू!

  • लेखक :  प्रसाद नामजोशी
  • प्रकाशन : अभिजित प्रकाशन, पुणे
  • किंमत : ₹    ३७५
  • पाने :  २१२

संबंधित बातम्या