व्यापाऱ्यांसाठी दिशादर्शक
पुस्तक परिचय
वस्तू व सेवाकर १ जुलै २०१७ रोजी आणण्यात आला. वस्तू व सेवाकराचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजेच कर चुकवेगिरीवर आळा बसेल, या उद्देशाने केलेली ई-वे बिल प्रणाली. ती मात्र १ एप्रिल २०१८ पासून अमलात आली. त्यातही बदल होत होत आता जरा ती स्थिरावली आहे. या ‘ई-वे बिल’ प्रणालीची संपूर्ण माहिती सरळ सोप्या मराठी भाषेत ‘GST ई वे बिल मार्गदर्शिका’ या पुस्तकातून उपलब्ध झाली आहे.
ॲड. गोविंद पटवर्धन लिखित ‘GST ई वे बिल मार्गदर्शिका’ पुस्तक प्रश्नोत्तर स्वरूपात लिहिले आहे. समजण्यास किचकट असलेला कायदा सोपा करून सांगणे ही लेखकाची खासियत आहे. तसेच हेही पुस्तक आहे.
यामध्ये ई-वे बिलाची पार्श्वभूमी, ई-वे बिलाचे महत्त्व, ई-वे बिल कायदा काय आहे, नियम काय आहेत? तो कोणाला लागू होतो? त्यातून सूट कोणाला आहे? ई-वे बिलाआधारे माल वाहतूक कशी करावी? पुरवठादार, खरेदीदार यांची जबाबदारी काय आहे? कुठली माहिती ठेवावी? वाहतुकीदरम्यान कुठले कागदपत्र जवळ ठेवावेत? ई-वे बिलाच्या पुढचे पाऊल म्हणजेच ‘ई-इनव्हॉइसिंग’ काय आहे? या सगळ्याची माहिती सोप्या भाषेत दिलेली आहे. त्याचबरोबर ई-वे बिल कसे काढायचे, त्याचे स्वरूप काय आहे, त्याचा तपशील, माहिती कशी भरायची, नोंदणी कशी करायची हेदेखील दिलेले आहे. ई-वे बिलाची वैधता किती तासाची असते? याचेही उत्तर पुस्तकात आहे. आंतरराज्य माल पुरवठ्यासाठी ई-वे बिल मर्यादा ₹ ५०,००० आहे, तर महाराष्ट्र राज्यांतर्गत माल पुरवठ्यासाठी ई-वे बिल मर्यादा ₹ १,००,००० आहे. मालाची किंमत यापेक्षा जास्त असल्यास ई-वे बिल तयार करणे बंधनकारक आहे. राज्यामध्ये किंवा आंतरराज्य पुरवठा यासाठी ई-वे बिल यात काय फरक आहे, यांसारखे जे जे प्रश्न सामान्य व्यापाऱ्याला पडतात त्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तर या पुस्तकातून नक्कीच मिळतील.
मला सर्वात महत्त्वाचा भाग वाटतो तो म्हणजे, ‘आयात - निर्यात आणि ई-वे बिल’ व ‘विशिष्ट परिस्थितीत ई-वे बिल’ याविषयावरच्या प्रश्नांची उत्तरे बारकाईने अभ्यासपूर्वक लिहिली असून प्रत्यक्ष व्यवहारात खूप उपयुक्त असलेली माहिती आहे. तसेच टॅक्स इनव्हॉइस, डिलिव्हरी चलन, भाग ‘अ’, भाग ‘ब’ कधी करायचे? ई-वे बिल न करता माल पाठवला आणि पकडला गेला तर किती कर व दंड भरावा लागेल, याच्या जाचक अटी (कलम १२९ व १३०) समजावून सांगितल्या आहेत.
महत्त्वाच्या न्यायालयीन निर्णयांचा गोषवाराही दिला आहे. फायनान्स ॲक्ट २०२१अन्वये होणारे बदल, त्यामध्ये कलम १२९ व कलम १३०मध्ये दंडाच्या तरतुदींमध्ये केलेले बदल नमूद केले आहेत.
एकंदरीतच ‘सकाळ’ प्रकाशनचे ॲड. गोविंद पटवर्धन लिखित ‘GST ई वे बिल मार्गदर्शिका’ हे पुस्तक सर्व व्यापारी, खरेदीदार, पुरवठादार, मालवाहतूकदार, हिशोबनीस, लेखनिक, करसल्लागार यांच्यासाठी अत्यंत उपयोगी, दिशादर्शक आहे त्यामुळे ते संग्रही हवेच.
GST ई वे बिल मार्गदर्शिका
- लेखक : ॲड. गोविंद पटवर्धन
- प्रकाशन : सकाळ प्रकाशन, पुणे
- किंमत : ₹ १४०
- पाने : ९५